प्रकाशरानातून चालताना...

प्रवास वर्णने आणि फोटोग्राफी विषयी लेख

  • Home
  • Posts RSS
  • Comments RSS

Wednesday, May 4, 2011

देखा एक ख्वाब तो ये...




अनेक वर्षापूर्वी जेव्हा सिलसिले मधले 'देखा एक ख्वाब' हे गाणे बघितले होते तेव्हाच मनाशी ठरवले होते की या ठिकाणी मला जायचेय. विविध रंगानी रंगलेले ट्युलिप गार्डन तेव्हा स्वप्नवतच वाटले होते. अशा गार्डन मधे कुणाबरोबर तरी फिरण्याचे स्वप्न तेव्हाच रंगवून टाकले असणार मी. अर्थात तेव्हा कुणाबरोबर वगैरे ते महत्वाचे नव्हतेच. या अशा फुलांच्या ताटव्यांमधुन जाणार्‍या धुक्याने भरलेल्या वाटा तेवढ्या महत्वाच्या होत्या!

लग्न झाल्यावर नवर्‍यालाही हे स्वप्न सांगुन झालं पण त्याने सिलसिले हा सिनेमाच पाहीला नसल्याने आणि तेव्हा युट्युब वगैरे काही उपलब्ध नसल्याने मी जे काही वर्णन केलं ते त्याने ऐकून घेतलं आणि फक्त हो जाऊयात इतकच म्हणाला.

आता अनेक वर्षांनीही हे स्वप्न त्या ट्युलिपच्या  रंगांएवढेच  ताजेतवाने राहिलेय. ती सिनेमामधली बाग हॉलंड मधली आहे वगैरे ऐकीव माहीती मिळाली आणि तिथे जाण्याचा योग कधीतरी यावा अशी एक आशा मनात होती.

मागच्या वर्षी जपान मधल्या हिताचीनाकाकोएन म्हणुन एका पार्कची माहीती मिळाली आणि तिथेही योग्य सिझन मधे गेल्यास ट्युलिपच्या बागा बघायला मिळतील हे कळले.   त्याप्रमाणे जायचा प्लॅन होता यावर्षी  पण वसंताच्या आगमनाच्या त्याच काही दिवसात भारतात असल्याने यावर्षीही तो चान्स हुकला म्हणुन हळहळतच होते.  पार्क कॅलेंडर प्रमाणे एप्रिल चे दोन आठवडे फक्त ट्युलिपचा सिझन असणार होता. मे महिना उजाडल्यावर   नेमोफिला नावाच्या निळ्या फुलांचा सिझन चालू होणार होता.
आता ट्युलिप नाही तर नेमोफिला तरी बघावित या विचाराने काल हिताचीनाकाकोएन ला निघाले.  बरच लांब असल्याने आणि मी फक्त फोटोग्राफी या उद्देशाने जात असल्याने एकटीच जायचं असे ठरवले.


साधारण तीन एक तास ट्रेन आणि मग बसने प्रवास करुन शेवटी त्या कोएन म्हणजे पार्कच्या गेट पाशी उतरले. तिथे मॅप बघताना उगीचच तिथल्या मुलीला कुठली फुलं आता बघता येतील असा प्रश्न केला आणि तीच्या ट्युलिप या उत्तराने एक आनंदाचा धक्काच बसला. अर्थात पहिली भेट तिथेच दिली.
एकूण ७० प्रकारच्या आणि विविध रंगांच्या या ट्युलिपच्या बागा प्रत्यक्षातही तितक्याच अप्रतिम दिसत होत्या. त्यांचे वर्णन वगैरे करण्यासाठी तर माझ्याकडे शब्दच नाहीत त्यामुळे तुम्ही  सरळ फोटोच पहा.

नेहेमीचा ५डी मार्क २ भारतात ठेवल्याने २०डी आणि त्याची १७-८५ लेन्स आणि १५मिमि सिग्मा लेन्स  बरोबर घेतल्या.  हा निर्णय अगदी योग्य होता हे मला तिथे गेल्या गेल्या कळलं. १७-८५ लेन्स वाईड अँगल ला नेल्यावर म्हणजे २४ च्या पेक्षा कमी सेटिंगला ठेवल्यावर कॅमेरा हँग होत होता. हा प्रॉब्लेम आधीही आलेला पण मीच इग्नोर केला होता. पण आता मात्र हे सारखच होत होतं. शेवटी सगळेच्या सगळे फोटो १५मिमि सिग्माने काढले आहेत. फक्त ती २०डी वर लावल्याने १५ मिमि ऐवजी २२मिमि सारखी वापरली गेली आणि अल्ट्रा वाईड न दिसता फक्त वाईड दिसली.




























Posted by Swapnali Mathkar at 4:36 AM 3 comments
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: hitachinaka koen, Tulip, ट्युलिप

Tuesday, January 25, 2011

फोटोग्राफी : अ‍ॅपर्चर


बऱ्याच दिवसांचा ब्रेक झालाय नाही? तुम्हाला या दरम्यान वेगवेगळे प्रयत्न करून बघायचा  कदाचित मोका मिळाला असेल. मागे आपलं  शटरस्पीड बद्दल वाचून झालंय ना?   यावेळी आपण  फोटोग्राफीचा अजून एक महत्वाचा भाग पाहुयात. तो म्हणजे अ‍ॅपर्चर.

तुमचा कॅमेरा मध्ये मी अ‍ॅपर्चर काय असतं त्याची अगदी थोडक्यात माहिती दिली होती.
तुम्हाला कधी वाचलेलं / शिकलेलं आठवतंय का? आपला डोळा खुप प्रकाश असेल तेव्हा बुबुळामधला पडदा छोटा करतो आणि खुप अंधार असला कि हाच पडदा मोठ्ठा होतो. कशासाठी करत असेल बरं असं? कमी प्रकाशात जास्तीत जास्त प्रकाश डोळ्याच्या पटलापर्यंत जायला हवा, तर आपल्याला नीट दिसेल म्हणून कमी प्रकाशात पडदा मोठा होतो. आता जास्त प्रकाशात मोठा पडदा उघडला तर खुप प्रकाश पटला पर्यंत जाऊन पटल खराब होऊ नये म्हणून डोळ्याचा पडदा छोटा होतो. कमाल आहे ना निसर्गाची!
तुमच्या माझ्या कॅमेऱ्यात सुद्धा माणसाने निसर्गाची हीच संकल्पना वापरली आहे.

अ‍ॅपर्चर म्हणजे एक भोक ज्यामधून कॅमेरा सेन्सर /फिल्म  वर किती प्रकाश पाठवायचा ते ठरवलं जातं. भोक जेवढं मोठं तितका जास्त प्रकाश  सेन्सर वर पडणार आणि भोक जितकं छोटं तितका कमी प्रकाश लेन्स वर पडणार. सहाजिकच हे भोक हवा तसं छोटं / मोठं करायला काही यंत्रणा हवी. हि यंत्रणा पाकळ्यांच्या स्वरुपात असते. एकावर एक येणाऱ्या पाकळ्या सगळ्या बंद असतील तर चक्क उमललेल्या चाफ्याच्या फुलाच्या मधल्या भागासारखी दिसते. या पाकळ्यांना iris diaphragm असे म्हणतात.

iris diaphragm फोटो - मोठा आणि लहान  अ‍ॅपर्चर

साभार - http://en.wikipedia.org/wiki/File:Aperures.jpg

कॅमेऱ्याच्या लेन्स साठी हे अ‍ॅपर्चर एफ स्टॉप मध्ये निर्देशित करतात. एफ स्टॉप म्हणजे फोकल लेंग्थ आणि अपेर्चर डायमीटर यांचा रेशो. उदा. फ/४.५. या मध्ये जितका नंबर छोता तितक अ‍ॅपर्चर मोठं म्हणजेच जास्त प्रकाश आत जातो.
खालच्या चित्रामध्ये बघितलं तर फ/१.४ (छोटा नंबर) हे जास्त अ‍ॅपर्चर आणि फ/२२ हा छोटा अपेर्चर (जास्त नंबर)
छोटा नंबर - जास्त अ‍ॅपर्चर - जास्त प्रकाश  - उदा. फ/१.८
मोठा नंबर - कमी अ‍ॅपर्चर - कमी प्रकाश - उदा. फ/२२

फोटो साभार : http://en.wikipedia.org/wiki/File:Aperture_diagram.svg वरून 

अ‍ॅपर्चर जेव्हा जास्त असते (कमी नंबर) (आणि फोटो सबजेक्टचे लेन्स पासूनचे अंतर जेव्हा जास्त) तेव्हा फोकस मध्ये येणारे प्रतल (Plane) अगदी पातळ असते. आणि अ‍ॅपर्चर जेव्हा कमी तेव्हा जास्त दूरपर्यंतचा भाग फोकस मध्ये दिसतो.

अ‍ॅपर्चर हे लेन्स चे स्पेसिफिकेशन म्हणून सांगितले जाते. आणि या अ‍ॅपर्चरच्या व्हेल्यूवर लेन्सच्या किमती बदलतात. जितके जास्त अ‍ॅपर्चर असेल (कमी नं.) तितकी लेन्स महाग. सहसा ज्या लेन्सचे अ‍ॅपर्चर फ/२.८ पेक्षा जास्त असते त्या लेन्सना फास्ट लेन्स असे संबोधले जाते. सहाजिकच जितके अ‍ॅपर्चर जास्त तितका जास्त प्रकाश लेन्स मधून जाणार. अशा लेन्स कमी प्रकाश असणाऱ्या ठिकाणी अतिशय उत्तम. मग कमी प्रकाशातही शटरस्पीड जास्त न वाढवता चांगले फोटो काढता येतात.
पण प्रत्येक लेन्सचा एक स्वीट स्पॉट असतो. म्हणजे जरी लेन्सच सर्वाधिक अ‍ॅपर्चर फ/१.८ आहे तरी ती लेन्स फ/१.८ला तिचा सर्वोत्तम पर्फोर्मंस देत नाही तर एखाडा स्टोप कमी केल्यावर म्हणजे फ/२.८ ला देते. तसाच मिनिमम अ‍ॅपर्चर फ/२२ आहे तरी फ/२२ला फोटो काढला तर खुप डीफ्राक्शन होऊन फोटो चांगला येत नाही या वेळी फ/१६ फ/११ असे सेट करावे लागते. हे स्वत:च्या आणि इतरांच्या अनुभवानेच कळते.

झूम लेन्स मध्ये हे अ‍ॅपर्चर स्पेसिफिकेशन रेंज मध्ये सांगितले जाते जसे १००-४००मिमी फ/४.५ ते फ/६. याचा अर्थ लेन्स १०० ते ४०० मिमी झूम करते १०० मिमिला फ/४.५ मिळतो आणि ४०० मिमिला फ/६ मिळतो.

आता हे अ‍ॅपर्चर फोटो मध्ये काय बदल करून आणतं ते बघुयात.

शटर स्पीड आणि कमी प्रकाशातले प्रकाशचित्रण:
कमी प्रकाशात फोटो काढायला शटर स्पीड कमी हवा असतो. पण बऱ्याच वेळा कमी शटर स्पीड केल्यावर जो ब्लरी इफेक्ट येतो तो नकोसा असतो. अशा वेळी जर अ‍ॅपर्चर जास्त ठेवले तर जास्तीचा शटर स्पीड मिळतो. जास्त अ‍ॅपर्चर मध्ये जास्त प्रकाश सेन्सर वर पडतो आणि शटर स्पीड त्या प्रमाणात वाढवता येतो. समजा तुम्हाला एखाद्या स्टेज प्रोग्रॅमचे फोटो काढायचे आहेत. अशावेळी फ/१.४ किंवा फ/१.८ लेन्स असेल तर तुलनेने जास्त शटरस्पीड ठेऊन बिना फ्लॅशचा फोटो काढता येईल.


डेफ्थ ऑफ फिल्ड
 अ‍ॅपर्चर आणि फोटो सबजेक्टचे लेन्स पासूनचे अंतर, आणि लेन्सची फोकल लेंग्थ या महत्वाच्या गोष्टी फोटोचे डेफ्थ ऑफ फिल्ड ठरवतात. डेफ्थ ऑफ फिल्ड म्हणजे अंतराची एक रेंज जी तुलनेने सगळ्यात अधिक फोकस मध्ये आणि शार्प असते. फोटोमध्ये नेहेमी एक सर्वाधिक शार्प ऑब्जेक्ट असतं. त्याच्या पुढच्या आणि मागच्या वस्तू क्रमाक्रमाने धुसर होत गेलेल्या असतात. हे धुसर होणे कुठल्याही एका बिंदूवर आहे / नाही अशा बायनरी स्वरूपात नसून एका टप्प्याटप्प्याने असते यालाच सर्कल ऑफ कन्फ्युजन म्हणतात. मानवी डोळ्यांना जाणवणार नाही इतके ते छोटे केलेले असते. खालचे फोटो पहा म्हणजे लक्षात येइल की दूरच्या वस्तु कशा क्रमाक्रमाने धूसर होत जातात.



अपेर्चर जेव्हा जास्त असते (कमी नंबर) आणि सबजेक्ट ते लेन्स अंतर कमी असते तेव्हा फोकस मध्ये येणारे अंतर किंवा प्रतल (Plane) अगदी कमी किंवा पातळ  असते. म्हणजे समजा तुमचे अ‍ॅपर्चर फ/१.८ असेल तेव्हा तुम्हाला केवळ एका सेमी इतकेच प्रतल फोकसिंग साठी मिळते (हे उदा. आहे.) तुमचा फोटो सब्जेक्ट एक सेमी पेक्षा जाड असेल तर उरलेला भाग फोकस मधून निघून जाणार. म्हणजे फुलाचा फोटो घेताय. मध्ये परागकणावर फोकस केलात  आणि  पाकळ्या पुढे मागे आहेत तर त्या पाकळ्या आउट ऑफ फोकस होतील. हि तुमच्या फोटोची गरज असेल तर उत्तम नाहीतर तुम्हाला अपेर्चर कमी करायला हवं किंवा थोडं दूर जाऊन फोटो काढायला हवा.
या खालच्या फोटोमधे फुलांच्या मधल्या भागावर फोकस आहे. त्याच्या पाकळ्या अगदी थोड्या मागेपुढे असून सुद्धा त्या आउट ऑफ़ फोकस झाल्यात.


फोकसिंग पोईंट ठरवताना लक्षात घ्यायचा मुद्दा म्हणजे वाईड लेन्स मध्ये फोकसिंग पोईंटच्या मागचा जवळपास ६० ते ७० टक्के भाग आणि पुढचा केवळ ३०/४० टक्के भाग फोकस मध्ये येणार त्यामुळे फोकसिंग मध्यावर न करता मध्यापेक्षा थोडं पुढे करायला हवं. तसंच टेली लेन्स मध्ये हे साधारणपणे ५०% - ५०% असल्याने फोकसिंग पोईट मध्यावर ठेवायला हवा.
खालच्या तिन्ही फोटोमधे फोकस असलेला भागाच्या पुढे आणि मागे दोन्हीकड़े ब्लर दिसते ते बघा.


या फोटोमधे हिरव्या पानावर फोकस आहे.

जास्त फोकल लेन्थ असलेल्या लेन्स म्हणजे ४०० मिमी वगरे लेन्स सुद्धा फार कमी डेफ्थ ऑफ फिल्ड देतात. आणि या लेंसने काढलेल्या फोटो मधे बॅकग्राउंड अगदी छान येतात.
तसाच एखाद्या जागे बरोबर माणसांचा फोटो घेताना, ती जागा आणि माणसं दोन्ही चांगले फोकस मध्ये दिसावेत यासाठी अपेर्चर कमी केलं म्हणजे फ/११ फ/१६ फ/२२  असे केले तर सर्व भाग फोकस मध्ये दिसेल. खालच्या फोटोमधे कसे दूरचे सुद्धा नीट फोकस मधे दिसते ना.



बोके
तुम्ही सगळ्यांनीच सुंदर मऊशार बेकग्राउंड असणारे पक्षांचे फोटो , पोर्ट्रेट बघितली असणार. तो पाठचा एकसंध धुसर दिसणारा भाग तुमच्या कदाचित लक्षात आला असेल. त्यामुळे तुमच्या मूळ चित्राला एक उठाव मिळतो. तर हि कमाल आहे बऱ्याच अंशी अपेर्चरची. या अशा बेकग्राउंडला म्हणतात बोके (Bokeh) हा शब्द जपानी शब्द बोके (暈け) वरून आलाय. याचा अर्थ आहे ब्लर.
हा ब्लर इफेक्ट मिळतो तो जास्त अ‍ॅपर्चर वापरून. (इतर प्रकारहि आहेत.)  खालच्या फोटोमधे बोके एकदम चांगला आलाय बघा.


खालच्या दोन फोटोच्या बोके मधे फारसा फरक दिसत नाहिये ना? पण लक्षात आलं का की पहिला फोटो चक्क फ/११ आहे. मग कशामुळे मिळाला असेल बरं हा बोके? हं. आधीच वर म्हटल्या प्रमाणे टेलीफोटो लेंस कमी डेफ्थ ऑफ़ फिल्ड देतात. त्यामुळे त्यांच्या फोटोमधे सुद्धा असेच छान बोके मिळतात.


व्यक्तीचा फोटो काढताना तिचा चेहेरा फोकस मध्ये येईल असा अ‍ॅपर्चर सेट करून फोटो काढला तर  पाठीमागचा सगळा भाग ब्लर दिसतो. त्यामुळे मूळ चेहेर्याला उठाव येतो. हा बोके मिळतो तो इतर सगळ्या गोष्टी आउट ऑफ फोकस गेल्यामुळे. लाईट्स चा बोके पाहिला तर काहीवेळा तो पूर्ण गोलाकार न दिसता थोड्या कडा दिसतात. त्या लेन्सच्या डायफ्रेम च्या असतात. प्रीमियम लेन्स मध्ये हे डायफ्रेम (पाकळ्या) जास्त असतात त्यामुळे बोके जास्त स्मूथ आणि गोलाकार दिसतात. खालच्या २ फोटोमधे तुम्हाला हे गोलाकार ब्लॉब्स दिसतील .

 वरचे दोन्ही फोटो फ/१.८ ने काढलेत. आणि ते संध्याकाळी खुप उशिरा काढलेत. पण आता हा खालचा फोटो फ/५.६ आहे त्यामुले त्याचे ब्लॉब्स फारसे चांगले दिसत नाहीयेत.

जर जास्त अ‍ॅपर्चर वाली लेन्स नसेल तर सबजेक्टचे बेकग्राउंड पासूनचे अंतर वाढवायचे. त्यामुळे वर डेफ्थ ऑफ फिल्ड मध्ये सांगितल्याप्रामाने पाठचा भाग आउटऑफ फोकस होतो. आणि चांगला बोके दिसतो.
या खालच्या फोटोमधे त्या चतुरापासून पाठचे पाणी खुपच दूर होते. म्हणून चांगला स्मूथ बोके मिळाला.

  
अजुन एक उदाहरण खाली देते. एकाच सेटिंगला फक्त अपर्चर बदलून फोटोमधे काय बदल दिसतो ते दिसेल. पाठच्या स्ट्रोबेरीज आधी धूसर आणि मग जरा जास्त नीट दिसू लागल्यात (माझ्या कड़े फ/११ चा फोटो नाहीये , नाहीतर अजुन चांगला फरक जाणवला असता. )







तुमच्या कॅमेर्‍यामध्ये:


डीएसएलआर /एसएलआर मध्ये साधारणपणे शटर डायल {Main Dial} [main command dail] आणि अ‍ॅपेर्चर डायल {Quick Control dial}[sub command dial] अशा दोन डायल किंवा बटणे असतात.हे दोन्ही घटक एकमेकांवर अवलंबून असतात.
आजकाल बऱ्याच डीजीकॅम मध्ये शटर आणि अ‍ॅपेर्चर बदलायचे ऑप्शन असतात. जर मॅन्युअल नीट वाचलत तर ते मिळतील. प्रत्येक कॅमेर्‍यामध्ये यासाठी वेगळी पद्धती असते त्यामुळे इथे लिहिता येणार नाही. तरी सुद्धा इथे आपण सोयीसाठी त्या सॉफ्ट कीज ना (मेनू मध्ये असणारे ऑप्शन) शटर डायल आणि अ‍ॅपेर्चर डायल अशीच नावं देऊ.

आता कॅमेर्‍यामध्ये शुटींग मोड असतात. मॅन्युअल मोड {M}[M], अ‍ॅपेर्चर प्रायोरिटी मोड {Av}[A], शटर प्रायोरिटी मोड {Tv}[S]. कॅमेर्‍याच्या कंपनी प्रमाणे यांची नावं वेगवेगळी असतात. मोड डायल वापरून वेगवेगळे मोड सिलेक्ट करता येतात.
या पैकी आपण आता  अ‍ॅपेर्चर प्रायोरिटी मोड वापरून बघू
मॅन्युअल मोड - शटर आणि अ‍ॅपेर्चर दोन्ही फोटोग्राफरला ठरवावे लागते
अ‍ॅपेर्चर प्रायोरिटी मोड - फोटोग्राफर अ‍ॅपेर्चर ठरवतो, आणि कॅमेरा शटरस्पीड आपोआप ठरवतो.
शटर प्रायोरिटी मोड - फोटोग्राफर शटरस्पीड ठरवतो, आणि कॅमेरा अ‍ॅपेर्चर आपोआप ठरवतो.

तुमचा कॅमेरा अ‍ॅपेर्चर प्रायोरिटी मोडमधे  ठेवा.  कॅमेरा शटर स्पीड आपोआप ठरवेल, तुम्ही फक्त अ‍ॅपेर्चर बदलून बघा.
 योग्य एक्पोजर मिळाल नाही तरी चालेल फक्त प्रयोग करून पहा.  वेगवेगळया अ‍ॅपेर्चरला एकाच वस्तूचे फोटो काढा. साधारण  फ/४.५, फ/५.६ फ/७.१ फ/११ असे ऑप्शन वापरून बघा. यापेक्षा जास्त अ‍ॅपेर्चर शाक्य असल्यास तेहि करून बघा.  

नोट:
वर म्हटल्याप्रमाणे जास्त अ‍ॅपर्चर वाल्या लेन्स महाग असतात. पण कॅनन मध्ये ५०मिमि फ़/१.८ लेन्स आहे ती अतिशय स्वस्त आणि अप्रतिम लेन्स आहे. तिला फोटोग्राफर लाडाने निफ्टीफिफ्टी म्हणतात :) तिच्या बिल्ड क्वालिटीमुळे तिची किमत इतकी कमी आहे तरी फोटोसाठी एकदम छान आहे. निकॉन किंवा इतर कंपन्यामध्ये अशा स्वस्त आणि मस्त लेन्स आहेत का ते माहिती करून लिहेन.

पुढच्या वेळी एक्स्पोजर आणि आयएसओ वर जरा नजर टाकूयात.



*[] - निकॉन कॅमेर्‍यातली नावे


*{} - कॅनन कॅमेर्‍यातली नावे


*** सर्व फोटोग्राफ आणि लेखन कोपीराईट प्रोटेक्टेड आहे. लिखित पूर्व परवानगी शिवाय कुठेही वापरू नये.****
Posted by Swapnali Mathkar at 2:44 AM 8 comments
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: bokeh, camera, depth of field, अ‍ॅपर्चर, कॅमेरा, डेफ्थ ऑफ फिल्ड, फोटोग्राफी, बोके

Friday, December 31, 2010

नविन वर्षाचे स्वागत इकेबाना सोबत

जपान मधे नविन वर्षाच्या स्वागतासाठी घराघरांवर फुलापानांची सजावट करुन लावतात. घराच्या आत सुद्धा एका स्पेशल कोपर्‍यात, टेबलावर अशी सजावट करुन नविन वर्षाच स्वागत करण्याची प्रथा आहे. आता दरवाज्यावर लावण्यासाठी प्लॅस्टीकच्या पण हुबेहुब खर्‍यासारख्या दिसणार्‍या रचना विकतही मिळतात पण खरी सजावट काही वेगळीच. अशा घरामधे करणार्‍या सजावटीला इकेबाना असं नाव आहे.
म्हणुनच अशाच एका रचने द्वारे तुम्हा सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नविन वर्ष तुम्हा सगळ्यांना आनंदाचे आणि भरभराटीचे जाओ.



इकेबाना हि एक जपानी कला. शब्दश: म्हटलं तर फुलांच्या रचना करणे. पण या कलेमधे त्याहुन अधिक बरच काही अभिप्रेत आहे.
सुरुवातीला जपानमधे आल्यावर वाटायचं काय शिकायचं असेल यात. नुसती फुलांची रचनाच तर करायची. सुंदरतेची दृष्टी असेल तर आपसुकच जमेल. पण इथे अनेक रचना बघितल्यावर माझ्या या कल्पनांना तडा गेला. इकेबाना म्हणजे फुलांच्या रचनेहून अधिक काहीतरी आहे याची जाणिव व्हायला लागली आणि या कलेशी निदान थोडीतरी ओळख व्हावी असं वाटायला लागलं.
मनापासुन इच्छा असेल तर कुठेतरी मार्ग मिळतोच. त्यानुसार ऑफिसमधे पुर्णवेळ नोकरी करत असुनही इकेबाना शिकायचा योग आलाच. खरतर माझ्याकडे फक्त ५ महीने होते. मुलीचा जन्म झाल्यावर या सगळ्या गोष्टीना वेळ मिळणारच नव्हता. तर निदान या कलेशी ओळख व्हावी असा विचार करुन शिकवणी चालु केली.
आधीच्या सगळ्या कल्पना झुगारुन देउन पाटी पुर्ण रिकामी करुन एका नविन भाषेत हे शिकणे म्हणजे जरा अतिच होतं. शिक्षिकेला सांगायच्या गोष्टी आणि माझं तेव्हाचं जपानीचं ज्ञान या गोष्टी एका प्रतलात नव्हत्याच. पण हळुहळू समजायला लागलं.

हि कला निसर्ग आणि मानव यांना जोडणारा एक दुवा म्हणा हवं तर. थोडसं अध्यात्माकडे झुकणारी कला. या कलेच्या माध्यमातुनही कलाकार आपलं स्टेटमेंट (काय मराठी शब्द?) मांडतो. तसं तर ते सगळ्याच कलातुन मांडतो नाही का? पण बर्‍याच वेळा ते प्रत्यक्ष असतं. इकेबाना मधे मात्र कुठेतरी मुर्ततेतुन अमुर्ततेकडे असा काहीसा उलटा प्रवास वाट्तो. अर्थातच हा मला जाणवणारा अर्थ. प्रत्येकाला जाणवणारा अर्थ आणि आकार वेगळा असु शकेल.

इकेबानाचं वैशिष्ठ म्हणजे "काय आहे" पेक्षा "काय नाही" यातुन आकार, रंग, रुप, अनुभुती मिळवुन देणं. म्हणजे असलेल्या सगळ्या फुला पानासकट रचना करण्या पेक्षा. काय नकोय ते आधी काढुन टाकणं मग उरलेल्यातुन सुद्धा एका स्पेस / अवकाशाची निर्मिती करणं. मिनिमलस्टिक रचना हे या कलेचं महत्वाच अंग आहे. असलेली सगळी साधने वापरुन गर्दी करण्यापेक्षा काय नको ते काढुन टाकुन कलाकार निर्मिती सुरू करतो. सुरुवातीला एखाद्या फांदीला असलेली सगळीच पानं मला सुंदर वाटायची. कुठलही पान कापुन टाकायला मन धजावायचं नाही. आणि शेवटि मात्र गर्दी आणि गिचमिड शिवाय काही मिळायचं नाही. सेन्सेईंच्या नेहेमीच्या सांगण्याने मात्र हळुहळू यात फरक पडायला लागला. कुटली पानं काढुन टाकली तर काय होईल ते जाणवायला लागलं.

इकेबाना हि कला निसर्गाच्या सृजनाला दाद देण्यासाठी किंवा त्याची मानवाला जाणीव करुन देण्यासाठी निर्माण झाली असं वाटतं. किंवा कदाचित माणसाने बांधलेल्या घर नामक चौकटीत तो एकटा पडु नये आणि बाजुच्या निसर्गाची त्याला सदैव जाणिव रहावी म्हणुन तो निर्सगच घरात आणण्याच्या प्रयत्नानेही या कलेला जन्म दिला असु शकतो. याच मुळे या रचनेत नुसती फुलं पानंच नाही तर निसर्ग निर्मित सगळ्याच वस्तु वापरल्या जातात.

या निर्माणाला लागणारं भांड म्हणजे कंटेनर मात्र तितकाच महत्वाचा असतो. म्हणजे जर तुम्हाला योग्य ऋतुला साजेसं मटेरियल मिळालं तर त्या मटेरियलला कुठल्या भांड्यात सजवल्यास हवा तो परिणाम साधला जाईल हा विचार अगदी महत्वाचा आहे. म्हणजे सृष्टीच्या निर्माणाला जसे मर्त्य शरिर जरुरी आहे तसचं काहिसं वाटतं.

इकेबानाची अनेक घराणी आहेत. प्रत्येक घराण्यांची शिकवण आणि विचार करण्याची पद्धत अर्थातच वेगळी आहे. पण तरिही रचनेमध्ये तीन मुख्य ऑब्जेक्ट्स असतातच. मी सुरुवात केली होती ते सोगेत्सु स्कुल. यात तीन ऑब्जेक्टसला शिन, सोए आणि हिकाए अशी नावे आहेत. आणि पाच महीन्यात माझे केवळ मोरिबाना नावाची एक बेसिक पद्धत शिकुन झाली या पद्धती मधे एका ठराविक पद्धतीने रचना मांडली जाते. अशाप्रकारे अनेक पद्धती आहेत. या सगळ्या पद्धती शिकुन झाल्या आणि त्यात मास्टरी मिळवली की मग तुम्ही तुम्हाला हवे ते प्रयोग करायला मोकळे. पण विद्यार्थ्यांनी मात्र या नियमांना धरुनच रचना करायला शिकायची असते.

आज अर्थात मी थोडीशी मोकळीक घेऊन, मनाप्रमाणे रचना करायचा प्रयत्न केलाय. पण बारिक नजरेने पाहिल्यास मला ही मोरिबाना स्टाईलच आहे अशी शंका येतय. माझं या क्षेत्रामधलं ज्ञान अगदीच संक्षिप्त आहे पण तरी तुमच्यापुढे निदान ओळख करुन देऊन नविन वर्षाची सुरुवात करावी असं वाटल्याने हा छोटासा प्रयत्न केलाय. तुम्हाला आवडला तर नक्की सांगा.

नविन वर्षाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा.
Posted by Swapnali Mathkar at 8:55 AM 0 comments
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: 2011, ikebaana, इकेबाना, जपानी कला, नविन वर्ष, फुलांची रचना

Tuesday, November 9, 2010

२०१०च्या दिवाळी अंकातले माझे लेख आणि फोटो

मायबोली.कॉम या वेबसाईटचा २०१०चा ऑनलाईन दिवाळी अंक नुकताच प्रकाशित  झाला.


या दिवाळी अंकात माझा शरद, हेमंत ऋतूवर (ऑटम् सिझन) लिहिलेला "रंगवूनी आसमंत" हा फोटो फिचर असलेला लेख प्रकाशित झाला आहे.
इथे लिंक आहे http://vishesh.maayboli.com/node/766

याच दिवाळी अंकामध्ये "थेंबाचा प्रवास" ही मी लिहिलेली बालकथा सुद्धा प्रकाशित झाली आहे.
इथे लिंक आहे http://vishesh.maayboli.com/node/761

मोगरा फुलला चा २०१०चा दिवाळी अंकही नुकताच प्रकाशित झाला आहे. या अंकामधल्या एका कवितेसाठी मी काढलेला फोटो पूर्व परवानगीने वापरण्यात आला आहे. (कविता माझी नाही.)


कविता आणि फोटो इथे बघता येतील.
http://mfdiwaliank.blogspot.com/2010/09/shashwat.html



वाचून प्रतिसाद द्यायला विसरू नका.
Posted by Swapnali Mathkar at 5:44 PM 0 comments
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: २०१० दिवाळी अंक

Wednesday, October 20, 2010

ठाणे महापौर पुरस्कार २०१० पारितोषिकप्राप्त प्रकाशचित्र

ठाणे महापौर पुरस्कार २०१० राज्यस्तरिय स्पर्धेत स्थापत्यकला विभागात द्वितीय पारितोषिकप्राप्त प्रकाशचित्र.
हे प्रदर्शन १९ ते २४ ओक्टो. ठाणे कलावैभव , कापुरबावडी येथे भरले आहे.    

शिन्जुकू, तोक्यो  इथला ककून टॉवर फिशआय लेंसने.
लेंस - १५ मिमी सिग्मा फिशआय 
कॅमेरा - Canon 5D MarkII
f /9.0, shutter 1/250 , ISO २००


या संबंधी बातमी  लोकसत्ता मधे इथे पहा 



   
Posted by Swapnali Mathkar at 4:52 AM 2 comments
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: कॅमेरा, ठाणे महापौर पुरस्कार, ठाणे महापौर पुरस्कार २०१०, पारितोषिक

Sunday, September 26, 2010

फोटोग्राफी: शटरस्पीड

शटरस्पीड, प्रकाशचित्रणातला एक अतिशय महत्वाचा पैलू. काढला जाणारा प्रत्येक फोटो कसा दिसणार हे ठरवणारा हा एक महत्वाचा घटक. वेगात जाणाऱ्या गाडीचे फोटो असोत , मऊशार सिल्की, प्रवाही दिसणारे निर्झर असोत, आकाशात रंगांची उधळण करणारे फटाके असोत कि अंधाऱ्या अपुऱ्या उजेडात काढलेले देवळाचे गाभारे असोत. कुठल्याही फोटोमध्ये सगळ्यात आधी दिसून येतं ते जमलेलं किंवा हुकलेलं एक्स्पोजर अर्थात योग्य किंवा अयोग्य प्रमाणातला प्रकाश. आणि हां कंट्रोल करणारा एक महत्वाचा (एकमेव नाही हं!) पैलू म्हणजे शटरस्पीड.

मागच्या भागात आपण अगदी थोडक्यात बघितलं कि शटर हा एक पडदा आहे. आणि तो फिल्म किंवा डिजीटल सेन्सरवर येणारा प्रकाश थोपवून धरतो.  आणि आपण बटन क्लिक केल्यावर तेवढ्या पळापुरतं ते उघडतं. खरतर मागचा भाग खुपच साधा, अरंजक किंवा तांत्रिक वाटला असण्याची शक्यता आहे. पण ती माहिती थोडक्यात तरी जरुरीची होती.

हे शटर मेकेनीकल भाग असून खूप नाजूक असतो. सेकंदाच्या काही हजारांश इतका वेळ नियंत्रित करायचा असल्याने त्याचं प्रिसिजन (अचूकता) खूप जास्त असतं. या शटर ला नुसत्या हाताने हात लावलेला चालत नाही. असही ते सहज हात लावण्याइतकं समोर नसतंच.


या शटरमध्ये दोन प्रकार आहेत.

सेंट्रल लीफ शटर:
हे शटर लेन्स मध्ये असतात. आणि त्यांची पाकळ्या पाकळ्यांसारखी रचना असते. खरतर अगदी चाफ्याच्या फुलासारखी वाटतात फक्त चपटी असतात.  या प्रकारचे शटर तुलनेने सोपे , स्वस्त असतात. पण जेव्हा लेन्स बदलता येणारा कॅमेरा असतो त्यावेळी प्रत्येक लेन्स मध्ये असे शटर असणे जरुरी होते. शिवाय याप्रकारच्या शटरला खूप जास्त स्पीड नसतो.
या आकृती मधे असे शटर कसे उघड बंद होते ते दाखवले आहे. 

आकृती :  http://www.tpub.com/content/armycomsystems/SS0507/SS05070041.htm 


फोकल प्लेन शटर:

हे नावाप्रमाणे फोकल प्लेन जवळ, म्हणजे फिल्म किंवा सेन्सरच्या अगदी पुढेच असतात. हे शटर हॉरिझॉन्टल असायचे. पण आता नवीन कॅमेऱ्यामध्ये हे व्हर्टिकल म्हणजे वरखाली करता येणाऱ्या विंडो ब्लाइंडसारखे असतात. हि शटरसुद्धा मेकेनिकल असून इलेक्ट्रोनिक स्वीच / सर्किट द्वारे ओपरेट होतात. पण ते ऑपरेट होण्याचा स्पीड, सिंक्रोनायझेशन, आणि अ‍ॅक्युरसी जबरदस्त असते.
व्हर्टिकल शटर मुळे जास्त वेगवान शटर सायकल (शटर उघडून पुन्हा बंद होऊन पूर्व स्थितीला येण्याचा काळ) मिळवता येतात (१/८००० सेकंद सुद्धा, सेकंदाचा ८०००वा भाग इतका!). हे शटर कॅमेर्‍यामध्ये असल्याने प्रत्येक लेन्स मध्ये वेगळ्या शटरची गरज नसते. डीएसएलआर /नवीन एसएलआर मध्ये या प्रकारचे शटर असते. त्यामुळे खूप जास्त शटर स्पीड मिळवता येतो.
या खालच्या फोटो मधे कॅनन कॅमेर्‍याचे एक शटर दाखवले आहे. 

शटरचा एक फोटो http://www.usa.canon.com/dlc/controller?act=GetArticleAct&articleID=२४७


डीजीकॅम:

डीजीकॅम मध्ये कधी कधी सेंट्रल शटर असते. इथे लेन्स बदलायच्या नसल्याने सेंट्रल शटर वापरायला हरकत नसते, मात्र त्यामुळे स्पीड लिमिट असतातच. काही डीजीकॅम मध्ये मात्र असे मेकेनिकल शटर नसतेच. त्याट डिजीटल शटर असते, म्हणजे सेन्सर वर कायम प्रकाश पडतो. फक्त चित्रणाचे बटन दाबले कि तेव्हाची इमेज तेवढी मेमरी मध्ये कॅप्चर केली जाते.
या सगळ्या मुळे डीजीकॅमचा आकार छोटा होतो, किमत कमी होते. पण नॉइज, शटर लॅग वाढतो. शटर लॅग म्हणजे कॅमेर्‍याचं बटन दाबल्यावर, खरच फोटो घेतला जाण्यासाठी लागणारा वेळ. डीजीकॅम मध्ये हा वेळ बराच जास्त असतो. खरतर म्हणून मला घरातल्या डीजीकॅमने फारसे चांगले फोटो काढता येत नाहीत. एसएलआरच्या अंदाजाने मी शटर दाबल्यावर लगेच फोटो आला असं समजते आणि सगळा घोळ होतो.


वेगवेगळे शटर स्पीड:
बरं आता या सगळ्याचा आपल्या प्रकाशचित्रणासाठी कसा आणि काय उपयोग करायचा म्हणजे अप्लाईड सायन्स काय आहे ते बघू. 
सध्यातरी या सगळ्या खुलाशा साठी सध्या अ‍ॅपेर्चर हा अजून एक महत्वाचा घटक आपण स्थिर (कॉन्स्टंट) आहे असे मानू.

शटरस्पीड म्हणजे किती वेळात हा पडदा वेगाने उघडून परत बंद होतो तो काळ. अर्थात जेवढा वेळ पडदा उघडला तेवढाच वेळ फिल्म, सेन्सरवर प्रकाश पडणार. जास्त वेगात पडदा उघडला तर अगदी कमी वेळ प्रकाश पडणार आणि कमी वेळात पडदा उघडला तर जास्त वेळ प्रकाश पडणार. गोंधळ झाला का?

म्हणजे बघा खूप प्रखर ऊन आहे बाहेर आणि तुम्ही ऑटो मोड मध्ये फोटो काढता आहात. आता कॅमेर्‍याने १/१२०० असा शटर स्पीड निवडला. तर एका सेकंदाच्या १२०० वा भाग इतकाच वेळ पडदा उघडा रहाणार. आणि अगदी कमी प्रकाश सेन्सर वर पडणार. कारण बाहेरचा प्रकाश इतका प्रखर आहे कि एवढ्या वेळेतच अगदी योग्य चित्रण होऊ शकते. यापेक्षा जास्त वेळ पडदा उघडला तर फोटो ओव्हर एक्सपोज होईल.
हे खालचे फोटो जास्त शटरस्पीड ठेऊन काढलेले आहेत. कारण फोटो काढायच्या वेळी खूप प्रकाश होता.
(मी एक दोन दिवसात प्रत्येक फोटोचा शटर स्पीड काय होता ते लिहेन इथे  )


साप्पोरो स्नो फेस्टीवल  



नारा दाईबुत्सु, बुद्ध मंदिर




मात्सूमोतो


समजा आता तुम्ही घरात फोटो काढताय. घरात साधारण उजेड आहे. या वेळी कॅमेर्‍याने १/१०० असा स्पीड निवडलाय. म्हणजे एका सेकंदाचा १०० वा भाग इतका. घरात बाहेरच्या पेक्षा कमी प्रकाश असल्याने सगळी फ्रेम चांगली प्रकाशमान दिसण्यासाठी एवढा वेळ प्रकाश आवश्यक वाटलं कॅमेर्‍याला.  हे बघा खालचे फोटो कमी प्रकाशात काढले असल्याने शटर स्पीड जरा कमी होता.




भारतीय मसाले
 आता यावेळी तुम्ही एखाद्या कोरीव लेण्यामध्ये फोटो काढताय. गुहेत फारच अंधार आहे. आणि तुमच्या कॅमेर्‍याने आता निवडलाय १/१० इतका स्पीड. म्हणजे एका सेकंदाचा फक्त दहावा भाग. हा काल तुलनेने फार मोठा आहे आणि आता तुम्ही जर कॅमेरा हातात धरून फोटो काढलात तर नक्की फोटो हलणार. अगदी तुम्हाला फोटो काढताना कदाचित कळणार सुद्धा नाही पण फोटो बघितलात ना कि कळेलच. हे फोटो देवळातल्या गाभाऱ्यामध्ये काढलेत. त्यामुळे खूप कमी शटर स्पीड होता. यातला दूसरा फोटो जरासा हलला आहे. 



नारा दाईबुत्सु

नारा दाईबुत्सु

मग अशावेळी काय करायचं? तर ट्रायपॉड वापरायाचा. किंवा कॅमेरा कशावर तरी ठेऊन फोटो काढायचा. आता तुम्हाला प्रश्न पडला असणार कि कधी ट्रायपॉड वापरायचा हे कस ठरवायचं, हो ना?  मग जर एस एल आर वापरत असाल तर हे साधारणपणे लेन्स वर ठरतं. म्हणजे तुमची लेन्स ५० मिमी असेल तर १/५० स्पीड पर्यंत हाताने काढायला हरकत नाही. पण १/५० किंवा त्या खाली स्पीड गेला तर मात्र हातात कॅमेरा धरून काढलेला फोटो हलण्याची शक्यता असते. जर २०० मिमी लेन्स असेल तर १/२०० पर्यंत हातात धरून काढायला हरकत नसते. अर्थात हे फोटोग्राफरच्या क्षमतेवरही अवलंबून असते. काही जण अजून एखादा स्टॉप सुद्धा हातात धरू शकतात. तर काही जणांना आधीच ट्रायपॉड वापरायला लागतो. अनुभवी फोटोग्राफरला नेहेमी स्वत:च्या क्षमतेचा अंदाज असतोच. बाकीच्यांसाठी आधी सांगितलेला लेन्स बद्दल चा नियम वापरणे योग्य. अलीकडे काही नवीन लेन्समध्ये इमेज स्टॅबिलायझर/ अ‍ॅन्टीशेक मेकॅनिझम असतात त्यामुळे जरा फोटो हलण्याचे प्रमाण कमी होऊ शकतं.

कधी कधी मात्र हा इफेक्ट असा वेग दाखवण्यासाथी वापरता येतो.


शिबुया स्टेशनमधली गर्दीची वेळ

या स्पीड मध्ये १/२", १/१०" अशा प्रकारे लिहिलेले ऑप्शन सुद्धा येतात. त्याचा अर्थ काय तर १/१/२ सेकंद म्हणजेच २ सेकंद स्पीड. किंवा १/१/१० म्हणजे १० सेकंद स्पीड. असा स्पीड सिलेक्ट झाला असेल तर तर बटन दाबल्यावर एक खर्र असा आवाज येतो आणि शटर उघडेच रहाते ते पूर्ण २ किंवा दहा (जो स्पीड असेल त्याप्रमाणे) तसेच रहाते. हा कालावधी संपला कि खटॅक असा एक आवाज येऊन शटर बंद होते आणि पूर्वस्थितीला जाते. फिल्म/ सेन्सर पूर्ण एवढा वेळ एक्सपोज होते.


हा फोटो चालत्या ट्रेन मधुन घेतलेला आहे. या फोटोला ठाणे महापौर पुरस्कार मिळाला आहे.
  
अजून एक बल्ब (BULB) असाही एक ऑप्शन असतो एस एल आर/ डी एस एल आर मध्ये. या मुळे आपल्याला हव्या तितक्या वेळ शटर उघडे ठेवता येते. जितका वेळ बटन दाबून ठेवू तितका वेळ ते उघडे रहाते. या ऑप्शन चा उपयोग सहसा फायर वर्क किंवा अ‍ॅस्ट्रोनॉमी बद्दल चे फोटो घ्यायला वापरतात. पण इतर वेळी अगदी अंधाऱ्या ठिकाणी, काही प्रायोगिक फोटोग्राफीच्या वेळी सुद्धा वापरता येते.



फायर वर्क्स


फायर वर्क्स (हा फोटो एका सीडी कव्हर साठी वापरला आहे)


तुमच्या कॅमेर्‍यामध्ये:


डीएसएलआर /एसएलआर मध्ये साधारणपणे शटर डायल {Main Dial} [main command dail] आणि अ‍ॅपेर्चर डायल {Quick Control dial}[sub command dial] अशा दोन डायल किंवा बटणे असतात.हे दोन्ही घटक एकमेकांवर अवलंबून असतात.
आजकाल बऱ्याच डीजीकॅम मध्ये शटर आणि अ‍ॅपेर्चर बदलायचे ऑप्शन असतात. जर मॅन्युअल नीट वाचलत तर ते मिळतील. प्रत्येक कॅमेर्‍यामध्ये यासाठी वेगळी पद्धती असते त्यामुळे इथे लिहिता येणार नाही. तरी सुद्धा इथे आपण सोयीसाठी त्या सॉफ्ट कीज ना (मेनू मध्ये असणारे ऑप्शन) शटर डायल आणि अ‍ॅपेर्चर डायल अशीच नावं देऊ.

आता कॅमेर्‍यामध्ये शुटींग मोड असतात. मॅन्युअल मोड {M}[M], अ‍ॅपेर्चर प्रायोरिटी मोड {Av}[A], शटर प्रायोरिटी मोड {Tv}[S]. कॅमेर्‍याच्या कंपनी प्रमाणे यांची नावं वेगवेगळी असतात. मोड डायल वापरून वेगवेगळे मोड सिलेक्ट करता येतात.
या पैकी आपण सध्या फक्त मॅन्युअल मोड किंवा शटर प्रायोरिटी मोड वापरून बघू
मॅन्युअल मोड - शटर आणि अ‍ॅपेर्चर दोन्ही फोटोग्राफरला ठरवावे लागते
अ‍ॅपेर्चर प्रायोरिटी मोड - फोटोग्राफर अ‍ॅपेर्चर ठरवतो, आणि कॅमेरा शटरस्पीड आपोआप ठरवतो.
शटर प्रायोरिटी मोड - फोटोग्राफर शटरस्पीड ठरवतो, आणि कॅमेरा अ‍ॅपेर्चर आपोआप ठरवतो.

आधी तुमचा कॅमेरा मॅन्युअल मोड मध्ये अ‍ॅपेर्चर साधारणपणे ५.६ असे ठेवा. हे स्थिर ठेवू.
जर शटर प्रायोरिटी मोड वापरत असाल तर कॅमेरा अ‍ॅपेर्चर आपोआप ठरवेल, तुम्ही फक्त शटर स्पीड बदलून बघा.
अर्थात फक्त शटरस्पीडने तुम्हाला योग्य एक्पोजर मिळणे कठीण आहे. त्यासाठी आयएसओ,अ‍ॅपेर्चरची सुद्धा माहिती घ्यावी लागेल ती नंतर घेऊयात.

आता वेगवेगळया शटर स्पिडला एकाच वस्तूचे घरात फोटो काढा. साधारण १/१०, १/२००, १/५००, १/१०००, १/२००० हे स्पीड वापरून बघा. डीजीकॅमला कदाचित १/२००० हा ऑप्शन नसेल. आता यातल्या कमी स्पीडने फोटो जास्त एक्सपोज होतील (पांढरे दिसतील) आणि जास्त स्पीडने अगदी कमी एक्सपोज होतील (काळपट येतील).

आता भरदुपारी बाहेर जाऊन याच प्रकारे फोटो काढा आणि रिझल्ट बघा. मघाशी काढलेल्या फोटोपेक्षा एक्स्पोजर वेगळे दिसेल, कारण घरातला प्रकाश बाहेरच्या प्रकाशापेक्षा कमी होता. आता तुम्हाला अजून काही प्रयोग करता येतील. 
 
अजून काही प्रयोग:

जोरात जाणाऱ्या गाडीचा फोटो, एखाद्या नाचऱ्या पक्षाचा फोटो किंवा एखाद्या खेळाडूचा फोटो काढताना फोटो बऱ्याच वेळा हलू शकतात. कारण त्यांच्या वेगवान हालचालीच्या वेगापेक्षा शटर स्पीड कमी असतो. अशा वेळी शटर स्पीड वाढवला तर छान फोटो काढता येतील आणि तो महत्वाचा क्षण अगदी अलगद पकडता येईल. शटर स्पीड वाढवण्यासाठी आयएसओ वाढवणे, अ‍ॅपेर्चर वाढवणे अशा काही गोष्टी करता येतात.



कमी  शटर  स्पीड



त्याहून कमी शटर  स्पीड
 
धबधबा किंवा पाण्याचा एखाद्या अवखळ झऱ्याचा फोटो आपण पहातो. तिथे पाणी अगदी सिल्की स्मूथ प्रवाही दिसतं. आणि तो फोटो चित्रासारखा कसा दिसतोय याचं अप्रूप आपल्याला वाटत रहातं हो ना? हा इफेक्टही घेता आलाय तो शटरस्पीड मुळे.शटर स्पीड कमी ठेऊन असे फोटो घेता येतात. याबद्दलही आपण पुन्हा केव्हातरी जास्त माहिती करून घेऊयात.


जास्त स्पीड असल्याने पाणी शिंतोडे उडाल्यासारखरे दिसते



स्पीड कमी केल्यावर मात्र प्रवाहि दिसतय.


जास्त शटर स्पीड असल्याने मोमेंट फ्रिज झालेले काही फोटो

Tokyo metropolis या मॅगझिन मधे प्रकाशित.



लॅन्डिंग 




यामधे दिसणार्‍या त्या छोट्या किड्याचा पंखांचा वेग इतका जास्त आहे की १/५०० या शटर स्पीड ला सुद्धा त्याचे पंख दिसत नाहिएत!

 
चला तर कॅमेरा घेउन आता तुमच्या फोटोग्राफी प्रयोगाना सुरुवात करा!

*[] - निकॉन कॅमेर्‍यातली नावे


*{} - कॅनन कॅमेर्‍यातली नावे




Posted by Swapnali Mathkar at 6:51 PM 7 comments
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: एस एल आर, कॅमेरा, फोटोग्राफी, शटरस्पीड
Newer Posts Older Posts Home
Subscribe to: Posts (Atom)

Total Pageviews

Copyright Protected

All content is copyright protected. You are not authorized to use, copy any content in any way without written permission from the Auther, Swapnali Mathkar. ब्लॉग कॉपीराईट अधिकार सुरक्षित
कॉपीराईट: स्वप्नाली मठकर
Copyright: Swapnali Mathkar
MyFreeCopyright.com Registered & Protected

About Me

Swapnali Mathkar
View my complete profile

Followers

Archives

  • ▼  2025 (3)
    • ▼  March (3)
      • Tadoba Pench Safari - 10-March
      • Tadoba Pench Safari - 9th March
      • Tadoba Pench Safari Photos - 8th March
  • ►  2015 (8)
    • ►  October (1)
    • ►  September (1)
    • ►  March (1)
    • ►  January (5)
  • ►  2014 (11)
    • ►  December (1)
    • ►  November (1)
    • ►  July (1)
    • ►  March (3)
    • ►  January (5)
  • ►  2013 (6)
    • ►  December (1)
    • ►  November (4)
    • ►  August (1)
  • ►  2012 (5)
    • ►  December (1)
    • ►  November (2)
    • ►  June (1)
    • ►  May (1)
  • ►  2011 (11)
    • ►  December (1)
    • ►  October (3)
    • ►  August (1)
    • ►  June (3)
    • ►  May (2)
    • ►  January (1)
  • ►  2010 (11)
    • ►  December (1)
    • ►  November (1)
    • ►  October (1)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
    • ►  July (2)
    • ►  June (4)

Categories

'फ' फोटोचा (2) ११-मार्च-२०११ (1) २०१० दिवाळी अंक (1) 2011 (1) 2014 (1) A Bomb Dome (1) Ameka Creations (1) Apple (1) Atomic Bomb (1) baby blue-eyes (1) Binny Yanga (1) bokeh (1) camera (1) collarwali (1) depth of field (1) Diwali Ank (2) Diwali Ank 2011 (1) Diwali Ank 2012 (1) Diwali Ank 2014 (1) dustproof (1) europe (1) fa fotocha (2) Four Elements (1) freezproof (1) hiroshima (2) hitachinaka koen (2) ikebaana (1) ISO (1) itsukushima (1) Little Boy (1) megapixel war (1) miyajima (1) Motherhood redefined (1) Nemophila (1) Paris (1) Pench (1) Photography workshop (1) rome (1) Safari (1) Second world war (1) Selection for photography exhibition in UK (1) shockproof (1) Steve Jobs (1) Tadoba (3) The Photo Saga (1) Tigress (1) Tulip (1) waterproof (1) XUV500 (1) अणुउर्जा (1) अणुबॉम्ब (1) असम (5) अ‍ॅपर्चर (1) आटोमीक बॉम्ब डोम (1) आयएसओ (1) इकेबाना (1) इतिहास (1) इत्सुकुशिमा (1) उपग्रह (1) उपग्रह प्रक्षेपण यान (1) एस एल आर (2) कापसाची म्हातारी (1) कास पुष्प पठार (1) कुनीदेशातल्या कथा (1) कॅमेरा (9) कॅमेर्‍याच कार्य (1) कॅमेर्‍याची काळजी (2) खरेदी (1) जपान (1) जपानी कला (1) जागतिक महिला दिन (6) ट्युलिप (1) ठाणे महापौर पुरस्कार (1) ठाणे महापौर पुरस्कार २०१० (1) डस्टप्रुफ (1) डेफ्थ ऑफ फिल्ड (1) डॉ. अब्दुल कलाम (1) ड्रोसेरा इंडीका (1) तंत्रज्ञान (1) तमसो मा ज्योतिर्गमय (1) तोरी (1) त्सुनामी (1) द फोटो सागा २०१४ (1) दवबिंदू (1) दिवाळी अंक २०१३ (1) दिवाळीअंक (1) दिवाळीअंक 2012 (1) नभा सावर सावर (1) नविन वर्ष (1) नेताजी सुभाषचंद्र बोस (1) नेमोफिला (1) पश्चिमेकडुन पूर्वेकडे (1) पारितोषिक (1) पूर्वांचल (6) पॅरिस (1) प्रकाशचित्रे प्रदर्शन (1) प्रजासत्ताक दिन परेड (1) प्रदर्शन (1) प्रवास (1) फिल्टर (1) फुलांची रचना (1) फोटोग्राफी (9) फोटोग्राफी कार्यशाळा (1) फ्रिजप्रुफ (1) बालकथा (1) बोके (1) भटकंती (1) भुकंप (1) भुवनेश्वर (1) मदर्स ऑफ नॉर्थ ईस्ट (1) मरीन ड्राईव्ह (1) महायुद्ध (1) मियाजीमा (1) मॅग्निट्युड ९.० (1) मेगापिक्सेल वॉर (1) मेघालय (5) मोईराङ (1) रोम (1) लेखन (1) विद्युल्लता (1) विद्युल्लता प्रदर्शन (1) विद्युल्लता प्रदर्शन 2014 (4) विमर्श (1) वॉटरप्रुफ (1) शटरस्पीड (1) शिंगवाला उंदीर (1) शॉकप्रुफ (1) समाज (1) सॅटेलाईट (1) स्टीव्ह जॉब्स (1) स्लाईडशो (1) हिरोशिमा (2)
©प्रकाशरानातून चालताना... ©Swapnali Mathkar
© Template Design by Template Lite
Thanks to Blogger Templates | Converted to Blogger by Falcon Hive.com | Distributed by Deluxe Templates