मागच्या भागात आपण अगदी थोडक्यात बघितलं कि शटर हा एक पडदा आहे. आणि तो फिल्म किंवा डिजीटल सेन्सरवर येणारा प्रकाश थोपवून धरतो. आणि आपण बटन क्लिक केल्यावर तेवढ्या पळापुरतं ते उघडतं. खरतर मागचा भाग खुपच साधा, अरंजक किंवा तांत्रिक वाटला असण्याची शक्यता आहे. पण ती माहिती थोडक्यात तरी जरुरीची होती.
हे शटर मेकेनीकल भाग असून खूप नाजूक असतो. सेकंदाच्या काही हजारांश इतका वेळ नियंत्रित करायचा असल्याने त्याचं प्रिसिजन (अचूकता) खूप जास्त असतं. या शटर ला नुसत्या हाताने हात लावलेला चालत नाही. असही ते सहज हात लावण्याइतकं समोर नसतंच.
या शटरमध्ये दोन प्रकार आहेत.
सेंट्रल लीफ शटर:
हे शटर लेन्स मध्ये असतात. आणि त्यांची पाकळ्या पाकळ्यांसारखी रचना असते. खरतर अगदी चाफ्याच्या फुलासारखी वाटतात फक्त चपटी असतात. या प्रकारचे शटर तुलनेने सोपे , स्वस्त असतात. पण जेव्हा लेन्स बदलता येणारा कॅमेरा असतो त्यावेळी प्रत्येक लेन्स मध्ये असे शटर असणे जरुरी होते. शिवाय याप्रकारच्या शटरला खूप जास्त स्पीड नसतो.
या आकृती मधे असे शटर कसे उघड बंद होते ते दाखवले आहे.
फोकल प्लेन शटर:
हे नावाप्रमाणे फोकल प्लेन जवळ, म्हणजे फिल्म किंवा सेन्सरच्या अगदी पुढेच असतात. हे शटर हॉरिझॉन्टल असायचे. पण आता नवीन कॅमेऱ्यामध्ये हे व्हर्टिकल म्हणजे वरखाली करता येणाऱ्या विंडो ब्लाइंडसारखे असतात. हि शटरसुद्धा मेकेनिकल असून इलेक्ट्रोनिक स्वीच / सर्किट द्वारे ओपरेट होतात. पण ते ऑपरेट होण्याचा स्पीड, सिंक्रोनायझेशन, आणि अॅक्युरसी जबरदस्त असते.
व्हर्टिकल शटर मुळे जास्त वेगवान शटर सायकल (शटर उघडून पुन्हा बंद होऊन पूर्व स्थितीला येण्याचा काळ) मिळवता येतात (१/८००० सेकंद सुद्धा, सेकंदाचा ८०००वा भाग इतका!). हे शटर कॅमेर्यामध्ये असल्याने प्रत्येक लेन्स मध्ये वेगळ्या शटरची गरज नसते. डीएसएलआर /नवीन एसएलआर मध्ये या प्रकारचे शटर असते. त्यामुळे खूप जास्त शटर स्पीड मिळवता येतो.
या खालच्या फोटो मधे कॅनन कॅमेर्याचे एक शटर दाखवले आहे.
डीजीकॅम मध्ये कधी कधी सेंट्रल शटर असते. इथे लेन्स बदलायच्या नसल्याने सेंट्रल शटर वापरायला हरकत नसते, मात्र त्यामुळे स्पीड लिमिट असतातच. काही डीजीकॅम मध्ये मात्र असे मेकेनिकल शटर नसतेच. त्याट डिजीटल शटर असते, म्हणजे सेन्सर वर कायम प्रकाश पडतो. फक्त चित्रणाचे बटन दाबले कि तेव्हाची इमेज तेवढी मेमरी मध्ये कॅप्चर केली जाते.
या सगळ्या मुळे डीजीकॅमचा आकार छोटा होतो, किमत कमी होते. पण नॉइज, शटर लॅग वाढतो. शटर लॅग म्हणजे कॅमेर्याचं बटन दाबल्यावर, खरच फोटो घेतला जाण्यासाठी लागणारा वेळ. डीजीकॅम मध्ये हा वेळ बराच जास्त असतो. खरतर म्हणून मला घरातल्या डीजीकॅमने फारसे चांगले फोटो काढता येत नाहीत. एसएलआरच्या अंदाजाने मी शटर दाबल्यावर लगेच फोटो आला असं समजते आणि सगळा घोळ होतो.
वेगवेगळे शटर स्पीड:
बरं आता या सगळ्याचा आपल्या प्रकाशचित्रणासाठी कसा आणि काय उपयोग करायचा म्हणजे अप्लाईड सायन्स काय आहे ते बघू.
सध्यातरी या सगळ्या खुलाशा साठी सध्या अॅपेर्चर हा अजून एक महत्वाचा घटक आपण स्थिर (कॉन्स्टंट) आहे असे मानू.
शटरस्पीड म्हणजे किती वेळात हा पडदा वेगाने उघडून परत बंद होतो तो काळ. अर्थात जेवढा वेळ पडदा उघडला तेवढाच वेळ फिल्म, सेन्सरवर प्रकाश पडणार. जास्त वेगात पडदा उघडला तर अगदी कमी वेळ प्रकाश पडणार आणि कमी वेळात पडदा उघडला तर जास्त वेळ प्रकाश पडणार. गोंधळ झाला का?
म्हणजे बघा खूप प्रखर ऊन आहे बाहेर आणि तुम्ही ऑटो मोड मध्ये फोटो काढता आहात. आता कॅमेर्याने १/१२०० असा शटर स्पीड निवडला. तर एका सेकंदाच्या १२०० वा भाग इतकाच वेळ पडदा उघडा रहाणार. आणि अगदी कमी प्रकाश सेन्सर वर पडणार. कारण बाहेरचा प्रकाश इतका प्रखर आहे कि एवढ्या वेळेतच अगदी योग्य चित्रण होऊ शकते. यापेक्षा जास्त वेळ पडदा उघडला तर फोटो ओव्हर एक्सपोज होईल.
हे खालचे फोटो जास्त शटरस्पीड ठेऊन काढलेले आहेत. कारण फोटो काढायच्या वेळी खूप प्रकाश होता.
(मी एक दोन दिवसात प्रत्येक फोटोचा शटर स्पीड काय होता ते लिहेन इथे )
साप्पोरो स्नो फेस्टीवल
नारा दाईबुत्सु, बुद्ध मंदिर
मात्सूमोतो
भारतीय मसाले
आता यावेळी तुम्ही एखाद्या कोरीव लेण्यामध्ये फोटो काढताय. गुहेत फारच अंधार आहे. आणि तुमच्या कॅमेर्याने आता निवडलाय १/१० इतका स्पीड. म्हणजे एका सेकंदाचा फक्त दहावा भाग. हा काल तुलनेने फार मोठा आहे आणि आता तुम्ही जर कॅमेरा हातात धरून फोटो काढलात तर नक्की फोटो हलणार. अगदी तुम्हाला फोटो काढताना कदाचित कळणार सुद्धा नाही पण फोटो बघितलात ना कि कळेलच. हे फोटो देवळातल्या गाभाऱ्यामध्ये काढलेत. त्यामुळे खूप कमी शटर स्पीड होता. यातला दूसरा फोटो जरासा हलला आहे.
नारा दाईबुत्सु
नारा दाईबुत्सु
मग अशावेळी काय करायचं? तर ट्रायपॉड वापरायाचा. किंवा कॅमेरा कशावर तरी ठेऊन फोटो काढायचा. आता तुम्हाला प्रश्न पडला असणार कि कधी ट्रायपॉड वापरायचा हे कस ठरवायचं, हो ना? मग जर एस एल आर वापरत असाल तर हे साधारणपणे लेन्स वर ठरतं. म्हणजे तुमची लेन्स ५० मिमी असेल तर १/५० स्पीड पर्यंत हाताने काढायला हरकत नाही. पण १/५० किंवा त्या खाली स्पीड गेला तर मात्र हातात कॅमेरा धरून काढलेला फोटो हलण्याची शक्यता असते. जर २०० मिमी लेन्स असेल तर १/२०० पर्यंत हातात धरून काढायला हरकत नसते. अर्थात हे फोटोग्राफरच्या क्षमतेवरही अवलंबून असते. काही जण अजून एखादा स्टॉप सुद्धा हातात धरू शकतात. तर काही जणांना आधीच ट्रायपॉड वापरायला लागतो. अनुभवी फोटोग्राफरला नेहेमी स्वत:च्या क्षमतेचा अंदाज असतोच. बाकीच्यांसाठी आधी सांगितलेला लेन्स बद्दल चा नियम वापरणे योग्य. अलीकडे काही नवीन लेन्समध्ये इमेज स्टॅबिलायझर/ अॅन्टीशेक मेकॅनिझम असतात त्यामुळे जरा फोटो हलण्याचे प्रमाण कमी होऊ शकतं.
कधी कधी मात्र हा इफेक्ट असा वेग दाखवण्यासाथी वापरता येतो.
शिबुया स्टेशनमधली गर्दीची वेळ
या स्पीड मध्ये १/२", १/१०" अशा प्रकारे लिहिलेले ऑप्शन सुद्धा येतात. त्याचा अर्थ काय तर १/१/२ सेकंद म्हणजेच २ सेकंद स्पीड. किंवा १/१/१० म्हणजे १० सेकंद स्पीड. असा स्पीड सिलेक्ट झाला असेल तर तर बटन दाबल्यावर एक खर्र असा आवाज येतो आणि शटर उघडेच रहाते ते पूर्ण २ किंवा दहा (जो स्पीड असेल त्याप्रमाणे) तसेच रहाते. हा कालावधी संपला कि खटॅक असा एक आवाज येऊन शटर बंद होते आणि पूर्वस्थितीला जाते. फिल्म/ सेन्सर पूर्ण एवढा वेळ एक्सपोज होते.
हा फोटो चालत्या ट्रेन मधुन घेतलेला आहे. या फोटोला ठाणे महापौर पुरस्कार मिळाला आहे.
अजून एक बल्ब (BULB) असाही एक ऑप्शन असतो एस एल आर/ डी एस एल आर मध्ये. या मुळे आपल्याला हव्या तितक्या वेळ शटर उघडे ठेवता येते. जितका वेळ बटन दाबून ठेवू तितका वेळ ते उघडे रहाते. या ऑप्शन चा उपयोग सहसा फायर वर्क किंवा अॅस्ट्रोनॉमी बद्दल चे फोटो घ्यायला वापरतात. पण इतर वेळी अगदी अंधाऱ्या ठिकाणी, काही प्रायोगिक फोटोग्राफीच्या वेळी सुद्धा वापरता येते.
फायर वर्क्स
फायर वर्क्स (हा फोटो एका सीडी कव्हर साठी वापरला आहे)
तुमच्या कॅमेर्यामध्ये:
डीएसएलआर /एसएलआर मध्ये साधारणपणे शटर डायल {Main Dial} [main command dail] आणि अॅपेर्चर डायल {Quick Control dial}[sub command dial] अशा दोन डायल किंवा बटणे असतात.हे दोन्ही घटक एकमेकांवर अवलंबून असतात.
आजकाल बऱ्याच डीजीकॅम मध्ये शटर आणि अॅपेर्चर बदलायचे ऑप्शन असतात. जर मॅन्युअल नीट वाचलत तर ते मिळतील. प्रत्येक कॅमेर्यामध्ये यासाठी वेगळी पद्धती असते त्यामुळे इथे लिहिता येणार नाही. तरी सुद्धा इथे आपण सोयीसाठी त्या सॉफ्ट कीज ना (मेनू मध्ये असणारे ऑप्शन) शटर डायल आणि अॅपेर्चर डायल अशीच नावं देऊ.
आता कॅमेर्यामध्ये शुटींग मोड असतात. मॅन्युअल मोड {M}[M], अॅपेर्चर प्रायोरिटी मोड {Av}[A], शटर प्रायोरिटी मोड {Tv}[S]. कॅमेर्याच्या कंपनी प्रमाणे यांची नावं वेगवेगळी असतात. मोड डायल वापरून वेगवेगळे मोड सिलेक्ट करता येतात.
या पैकी आपण सध्या फक्त मॅन्युअल मोड किंवा शटर प्रायोरिटी मोड वापरून बघू
मॅन्युअल मोड - शटर आणि अॅपेर्चर दोन्ही फोटोग्राफरला ठरवावे लागते
अॅपेर्चर प्रायोरिटी मोड - फोटोग्राफर अॅपेर्चर ठरवतो, आणि कॅमेरा शटरस्पीड आपोआप ठरवतो.
शटर प्रायोरिटी मोड - फोटोग्राफर शटरस्पीड ठरवतो, आणि कॅमेरा अॅपेर्चर आपोआप ठरवतो.
आधी तुमचा कॅमेरा मॅन्युअल मोड मध्ये अॅपेर्चर साधारणपणे ५.६ असे ठेवा. हे स्थिर ठेवू.
जर शटर प्रायोरिटी मोड वापरत असाल तर कॅमेरा अॅपेर्चर आपोआप ठरवेल, तुम्ही फक्त शटर स्पीड बदलून बघा.
अर्थात फक्त शटरस्पीडने तुम्हाला योग्य एक्पोजर मिळणे कठीण आहे. त्यासाठी आयएसओ,अॅपेर्चरची सुद्धा माहिती घ्यावी लागेल ती नंतर घेऊयात.
आता वेगवेगळया शटर स्पिडला एकाच वस्तूचे घरात फोटो काढा. साधारण १/१०, १/२००, १/५००, १/१०००, १/२००० हे स्पीड वापरून बघा. डीजीकॅमला कदाचित १/२००० हा ऑप्शन नसेल. आता यातल्या कमी स्पीडने फोटो जास्त एक्सपोज होतील (पांढरे दिसतील) आणि जास्त स्पीडने अगदी कमी एक्सपोज होतील (काळपट येतील).
आता भरदुपारी बाहेर जाऊन याच प्रकारे फोटो काढा आणि रिझल्ट बघा. मघाशी काढलेल्या फोटोपेक्षा एक्स्पोजर वेगळे दिसेल, कारण घरातला प्रकाश बाहेरच्या प्रकाशापेक्षा कमी होता. आता तुम्हाला अजून काही प्रयोग करता येतील.
अजून काही प्रयोग:
जोरात जाणाऱ्या गाडीचा फोटो, एखाद्या नाचऱ्या पक्षाचा फोटो किंवा एखाद्या खेळाडूचा फोटो काढताना फोटो बऱ्याच वेळा हलू शकतात. कारण त्यांच्या वेगवान हालचालीच्या वेगापेक्षा शटर स्पीड कमी असतो. अशा वेळी शटर स्पीड वाढवला तर छान फोटो काढता येतील आणि तो महत्वाचा क्षण अगदी अलगद पकडता येईल. शटर स्पीड वाढवण्यासाठी आयएसओ वाढवणे, अॅपेर्चर वाढवणे अशा काही गोष्टी करता येतात.
कमी शटर स्पीड
त्याहून कमी शटर स्पीड
धबधबा किंवा पाण्याचा एखाद्या अवखळ झऱ्याचा फोटो आपण पहातो. तिथे पाणी अगदी सिल्की स्मूथ प्रवाही दिसतं. आणि तो फोटो चित्रासारखा कसा दिसतोय याचं अप्रूप आपल्याला वाटत रहातं हो ना? हा इफेक्टही घेता आलाय तो शटरस्पीड मुळे.शटर स्पीड कमी ठेऊन असे फोटो घेता येतात. याबद्दलही आपण पुन्हा केव्हातरी जास्त माहिती करून घेऊयात.
जास्त स्पीड असल्याने पाणी शिंतोडे उडाल्यासारखरे दिसते
स्पीड कमी केल्यावर मात्र प्रवाहि दिसतय.
जास्त शटर स्पीड असल्याने मोमेंट फ्रिज झालेले काही फोटो
Tokyo metropolis या मॅगझिन मधे प्रकाशित.
लॅन्डिंग
गतीमान दृश्यं कमी शटर स्पीड मधे घेतली की त्या दृश्यातील एक निराळंच सत्य चित्रबद्ध होतं, असा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे. मी अजून निसर्ग छायाचित्रण किंवा गतीमान दृश्य कॅमेर्यात बंदिस्त करणं, हे फारसं केलेलं नाही. मात्र मॅक्रो फोटोग्राफीचे दोन चार चांगले फोटो फ्लिकरवर टाकले आहेत.
ReplyDeleteतुमचा हा ब्लॉग फोटोग्राफीवरचा मराठीमधे असलेला पहिला वहिला ब्लॉग असावा. आमच्या सारख्या नवख्यांना या ब्लॉगमुळे खूपच मदत होणार आहे. धन्यवाद.
धन्यवाद कांचन :)
ReplyDeleteहो कमी शटर स्पीड मुळे चित्राला एक गतिमानता येते. पण असे फोटो घेताना कधी कधी फसगतही होऊ शकते. म्हणजे बघणाऱ्याला ती गतिमानता न वाटता हललेला / फसलेला फोटो वाटू शकतो. यासाठी असे फोटो काळजीपूर्वक ट्रायपोड वापरून काढलेले चांगले.
नक्की असे प्रयोग करून बघा.
हो. मी नेहमी ट्रायपॉडवर कॅमेरा ठेवूनच फोटो काढते. IS मुळे जरी फोटो चांगले येत असले तरी एका विशिष्ट झूम नंतर फोटोमधले दोष लक्षात येऊ लागतात. यासाठी ट्रायपॉड बेस्ट.
ReplyDeleteमाझ्या फ्लिकर प्रोफाईलची लिंक इथे देत आहे - http://www.flickr.com/photos/kanchankarai/
वेळ मिळाल्यास अवश्य पहा. तुमचं फ्लिकर कॉन्टॅक्ट मैत्रीमधे अॅड करून घेतलं आहे.
कांचन तुम्हाला परवाच फ्लिकर वर अॅड केल आहे. तुमच्या फोटोवर कमेंटही दिली आहे :)
ReplyDeleteआजच तुमच्या ब्लॉगची लिंक मिळाली.अतिशय उत्तम ब्लॉग आहे तुमचं.दोन दिवसात संपूर्ण ब्लॉग वाचून काढायचं ठरवलं आहे.
ReplyDeleteह्या ब्लॉग बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद .
मराठीत फोतोग्रफिबद्दल असणारा हा एकमेव ब्लॉग आहे.
DEAR SWAPNALLI,
ReplyDeleteMEE EKADAM SHIKAU PHOTAGRAPHER AAHE 50 VARSHACHI.MEE CHALALE AHE LEHLA 17/7/11 LA.MAJYAKADE KODAK Z990 AAHE. TAR TU MALA DIVSA (INDORRE & OUTDOOR) TASECH RATRI (INDORRE & OUTDOOR)CHANGALE PHOTO GHENYASATHI KAHI TIPS,SUCHANA DESHIL KA? AUTO MODEVAR PHARSA PROBLEM YET NAHI PAN MANUALVAR MALA SAMJAT NAHI KAY KARAYACHE.MANUALVAR PHOTO KADHTANA EAK SIDE WINDOW OPEN HOTE AANI PICTURE CLICK HOTEPAN PREVIEW EKADAM BLACK ASATO. TAR KAY PROBLEM AAHE?
PLZ HELP ME.
Hi,
ReplyDeleteSadhya leh chya trip madhe je mahatvache photo aahet te tumhi auto mode madhech kadha mhanaje te miss honar naahit.
Manual mode sathi - tumhala purna manual mode peksha yaa ani Aperture chya lekhat dilele Aperture costant kinva Shutter constant ase mode asatat te vaparun bagha. Tumachya cameryachya manual madhe he mode kase select karayache yachi mahiti milel. yavarun tumhala shutter ani aperture kase adjust karayache yachi kalpana yeil ani manual mode madhe prayatna karane sope jail.
"EAk side window open hote aani picture click hotepan preview black asato">> yaacha nemaka artha mala kalala naahi. Photo yetach naahi ka ki dark photo yeto? photo kadhatana kaahi kshan preview screen black hote te normal aahe. dark photo yet asel tar tumache exposure chukate aahe, shutter speed kami karun, aperture vadhavun baghata yeil
Happy Photography.
Tumachi leh chi trip enjoy kara.