बऱ्याच दिवसांचा ब्रेक झालाय नाही? तुम्हाला या दरम्यान वेगवेगळे प्रयत्न करून बघायचा कदाचित मोका मिळाला असेल. मागे आपलं शटरस्पीड बद्दल वाचून झालंय ना? यावेळी आपण फोटोग्राफीचा अजून एक महत्वाचा भाग पाहुयात. तो म्हणजे अॅपर्चर.
तुमचा कॅमेरा मध्ये मी अॅपर्चर काय असतं त्याची अगदी थोडक्यात माहिती दिली होती.
तुम्हाला कधी वाचलेलं / शिकलेलं आठवतंय का? आपला डोळा खुप प्रकाश असेल तेव्हा बुबुळामधला पडदा छोटा करतो आणि खुप अंधार असला कि हाच पडदा मोठ्ठा होतो. कशासाठी करत असेल बरं असं? कमी प्रकाशात जास्तीत जास्त प्रकाश डोळ्याच्या पटलापर्यंत जायला हवा, तर आपल्याला नीट दिसेल म्हणून कमी प्रकाशात पडदा मोठा होतो. आता जास्त प्रकाशात मोठा पडदा उघडला तर खुप प्रकाश पटला पर्यंत जाऊन पटल खराब होऊ नये म्हणून डोळ्याचा पडदा छोटा होतो. कमाल आहे ना निसर्गाची!
तुमच्या माझ्या कॅमेऱ्यात सुद्धा माणसाने निसर्गाची हीच संकल्पना वापरली आहे.
अॅपर्चर म्हणजे एक भोक ज्यामधून कॅमेरा सेन्सर /फिल्म वर किती प्रकाश पाठवायचा ते ठरवलं जातं. भोक जेवढं मोठं तितका जास्त प्रकाश सेन्सर वर पडणार आणि भोक जितकं छोटं तितका कमी प्रकाश लेन्स वर पडणार. सहाजिकच हे भोक हवा तसं छोटं / मोठं करायला काही यंत्रणा हवी. हि यंत्रणा पाकळ्यांच्या स्वरुपात असते. एकावर एक येणाऱ्या पाकळ्या सगळ्या बंद असतील तर चक्क उमललेल्या चाफ्याच्या फुलाच्या मधल्या भागासारखी दिसते. या पाकळ्यांना iris diaphragm असे म्हणतात.
iris diaphragm फोटो - मोठा आणि लहान अॅपर्चर
साभार - http://en.wikipedia.org/wiki/File:Aperures.jpg
कॅमेऱ्याच्या लेन्स साठी हे अॅपर्चर एफ स्टॉप मध्ये निर्देशित करतात. एफ स्टॉप म्हणजे फोकल लेंग्थ आणि अपेर्चर डायमीटर यांचा रेशो. उदा. फ/४.५. या मध्ये जितका नंबर छोता तितक अॅपर्चर मोठं म्हणजेच जास्त प्रकाश आत जातो.
खालच्या चित्रामध्ये बघितलं तर फ/१.४ (छोटा नंबर) हे जास्त अॅपर्चर आणि फ/२२ हा छोटा अपेर्चर (जास्त नंबर)
छोटा नंबर - जास्त अॅपर्चर - जास्त प्रकाश - उदा. फ/१.८
मोठा नंबर - कमी अॅपर्चर - कमी प्रकाश - उदा. फ/२२
फोटो साभार : http://en.wikipedia.org/wiki/File:Aperture_diagram.svg वरून
अॅपर्चर जेव्हा जास्त असते (कमी नंबर) (आणि फोटो सबजेक्टचे लेन्स पासूनचे अंतर जेव्हा जास्त) तेव्हा फोकस मध्ये येणारे प्रतल (Plane) अगदी पातळ असते. आणि अॅपर्चर जेव्हा कमी तेव्हा जास्त दूरपर्यंतचा भाग फोकस मध्ये दिसतो.
अॅपर्चर हे लेन्स चे स्पेसिफिकेशन म्हणून सांगितले जाते. आणि या अॅपर्चरच्या व्हेल्यूवर लेन्सच्या किमती बदलतात. जितके जास्त अॅपर्चर असेल (कमी नं.) तितकी लेन्स महाग. सहसा ज्या लेन्सचे अॅपर्चर फ/२.८ पेक्षा जास्त असते त्या लेन्सना फास्ट लेन्स असे संबोधले जाते. सहाजिकच जितके अॅपर्चर जास्त तितका जास्त प्रकाश लेन्स मधून जाणार. अशा लेन्स कमी प्रकाश असणाऱ्या ठिकाणी अतिशय उत्तम. मग कमी प्रकाशातही शटरस्पीड जास्त न वाढवता चांगले फोटो काढता येतात.
पण प्रत्येक लेन्सचा एक स्वीट स्पॉट असतो. म्हणजे जरी लेन्सच सर्वाधिक अॅपर्चर फ/१.८ आहे तरी ती लेन्स फ/१.८ला तिचा सर्वोत्तम पर्फोर्मंस देत नाही तर एखाडा स्टोप कमी केल्यावर म्हणजे फ/२.८ ला देते. तसाच मिनिमम अॅपर्चर फ/२२ आहे तरी फ/२२ला फोटो काढला तर खुप डीफ्राक्शन होऊन फोटो चांगला येत नाही या वेळी फ/१६ फ/११ असे सेट करावे लागते. हे स्वत:च्या आणि इतरांच्या अनुभवानेच कळते.
झूम लेन्स मध्ये हे अॅपर्चर स्पेसिफिकेशन रेंज मध्ये सांगितले जाते जसे १००-४००मिमी फ/४.५ ते फ/६. याचा अर्थ लेन्स १०० ते ४०० मिमी झूम करते १०० मिमिला फ/४.५ मिळतो आणि ४०० मिमिला फ/६ मिळतो.
आता हे अॅपर्चर फोटो मध्ये काय बदल करून आणतं ते बघुयात.
शटर स्पीड आणि कमी प्रकाशातले प्रकाशचित्रण:
कमी प्रकाशात फोटो काढायला शटर स्पीड कमी हवा असतो. पण बऱ्याच वेळा कमी शटर स्पीड केल्यावर जो ब्लरी इफेक्ट येतो तो नकोसा असतो. अशा वेळी जर अॅपर्चर जास्त ठेवले तर जास्तीचा शटर स्पीड मिळतो. जास्त अॅपर्चर मध्ये जास्त प्रकाश सेन्सर वर पडतो आणि शटर स्पीड त्या प्रमाणात वाढवता येतो. समजा तुम्हाला एखाद्या स्टेज प्रोग्रॅमचे फोटो काढायचे आहेत. अशावेळी फ/१.४ किंवा फ/१.८ लेन्स असेल तर तुलनेने जास्त शटरस्पीड ठेऊन बिना फ्लॅशचा फोटो काढता येईल.
डेफ्थ ऑफ फिल्ड
अॅपर्चर आणि फोटो सबजेक्टचे लेन्स पासूनचे अंतर, आणि लेन्सची फोकल लेंग्थ या महत्वाच्या गोष्टी फोटोचे डेफ्थ ऑफ फिल्ड ठरवतात. डेफ्थ ऑफ फिल्ड म्हणजे अंतराची एक रेंज जी तुलनेने सगळ्यात अधिक फोकस मध्ये आणि शार्प असते. फोटोमध्ये नेहेमी एक सर्वाधिक शार्प ऑब्जेक्ट असतं. त्याच्या पुढच्या आणि मागच्या वस्तू क्रमाक्रमाने धुसर होत गेलेल्या असतात. हे धुसर होणे कुठल्याही एका बिंदूवर आहे / नाही अशा बायनरी स्वरूपात नसून एका टप्प्याटप्प्याने असते यालाच सर्कल ऑफ कन्फ्युजन म्हणतात. मानवी डोळ्यांना जाणवणार नाही इतके ते छोटे केलेले असते. खालचे फोटो पहा म्हणजे लक्षात येइल की दूरच्या वस्तु कशा क्रमाक्रमाने धूसर होत जातात.
अपेर्चर जेव्हा जास्त असते (कमी नंबर) आणि सबजेक्ट ते लेन्स अंतर कमी असते तेव्हा फोकस मध्ये येणारे अंतर किंवा प्रतल (Plane) अगदी कमी किंवा पातळ असते. म्हणजे समजा तुमचे अॅपर्चर फ/१.८ असेल तेव्हा तुम्हाला केवळ एका सेमी इतकेच प्रतल फोकसिंग साठी मिळते (हे उदा. आहे.) तुमचा फोटो सब्जेक्ट एक सेमी पेक्षा जाड असेल तर उरलेला भाग फोकस मधून निघून जाणार. म्हणजे फुलाचा फोटो घेताय. मध्ये परागकणावर फोकस केलात आणि पाकळ्या पुढे मागे आहेत तर त्या पाकळ्या आउट ऑफ फोकस होतील. हि तुमच्या फोटोची गरज असेल तर उत्तम नाहीतर तुम्हाला अपेर्चर कमी करायला हवं किंवा थोडं दूर जाऊन फोटो काढायला हवा.
या खालच्या फोटोमधे फुलांच्या मधल्या भागावर फोकस आहे. त्याच्या पाकळ्या अगदी थोड्या मागेपुढे असून सुद्धा त्या आउट ऑफ़ फोकस झाल्यात.
फोकसिंग पोईंट ठरवताना लक्षात घ्यायचा मुद्दा म्हणजे वाईड लेन्स मध्ये फोकसिंग पोईंटच्या मागचा जवळपास ६० ते ७० टक्के भाग आणि पुढचा केवळ ३०/४० टक्के भाग फोकस मध्ये येणार त्यामुळे फोकसिंग मध्यावर न करता मध्यापेक्षा थोडं पुढे करायला हवं. तसंच टेली लेन्स मध्ये हे साधारणपणे ५०% - ५०% असल्याने फोकसिंग पोईट मध्यावर ठेवायला हवा.
खालच्या तिन्ही फोटोमधे फोकस असलेला भागाच्या पुढे आणि मागे दोन्हीकड़े ब्लर दिसते ते बघा.
या फोटोमधे हिरव्या पानावर फोकस आहे.
जास्त फोकल लेन्थ असलेल्या लेन्स म्हणजे ४०० मिमी वगरे लेन्स सुद्धा फार कमी डेफ्थ ऑफ फिल्ड देतात. आणि या लेंसने काढलेल्या फोटो मधे बॅकग्राउंड अगदी छान येतात.
तसाच एखाद्या जागे बरोबर माणसांचा फोटो घेताना, ती जागा आणि माणसं दोन्ही चांगले फोकस मध्ये दिसावेत यासाठी अपेर्चर कमी केलं म्हणजे फ/११ फ/१६ फ/२२ असे केले तर सर्व भाग फोकस मध्ये दिसेल. खालच्या फोटोमधे कसे दूरचे सुद्धा नीट फोकस मधे दिसते ना.
बोके
तुम्ही सगळ्यांनीच सुंदर मऊशार बेकग्राउंड असणारे पक्षांचे फोटो , पोर्ट्रेट बघितली असणार. तो पाठचा एकसंध धुसर दिसणारा भाग तुमच्या कदाचित लक्षात आला असेल. त्यामुळे तुमच्या मूळ चित्राला एक उठाव मिळतो. तर हि कमाल आहे बऱ्याच अंशी अपेर्चरची. या अशा बेकग्राउंडला म्हणतात बोके (Bokeh) हा शब्द जपानी शब्द बोके (暈け) वरून आलाय. याचा अर्थ आहे ब्लर.
हा ब्लर इफेक्ट मिळतो तो जास्त अॅपर्चर वापरून. (इतर प्रकारहि आहेत.) खालच्या फोटोमधे बोके एकदम चांगला आलाय बघा.
खालच्या दोन फोटोच्या बोके मधे फारसा फरक दिसत नाहिये ना? पण लक्षात आलं का की पहिला फोटो चक्क फ/११ आहे. मग कशामुळे मिळाला असेल बरं हा बोके? हं. आधीच वर म्हटल्या प्रमाणे टेलीफोटो लेंस कमी डेफ्थ ऑफ़ फिल्ड देतात. त्यामुळे त्यांच्या फोटोमधे सुद्धा असेच छान बोके मिळतात.
वरचे दोन्ही फोटो फ/१.८ ने काढलेत. आणि ते संध्याकाळी खुप उशिरा काढलेत. पण आता हा खालचा फोटो फ/५.६ आहे त्यामुले त्याचे ब्लॉब्स फारसे चांगले दिसत नाहीयेत.
जर जास्त अॅपर्चर वाली लेन्स नसेल तर सबजेक्टचे बेकग्राउंड पासूनचे अंतर वाढवायचे. त्यामुळे वर डेफ्थ ऑफ फिल्ड मध्ये सांगितल्याप्रामाने पाठचा भाग आउटऑफ फोकस होतो. आणि चांगला बोके दिसतो.
या खालच्या फोटोमधे त्या चतुरापासून पाठचे पाणी खुपच दूर होते. म्हणून चांगला स्मूथ बोके मिळाला.
अजुन एक उदाहरण खाली देते. एकाच सेटिंगला फक्त अपर्चर बदलून फोटोमधे काय बदल दिसतो ते दिसेल. पाठच्या स्ट्रोबेरीज आधी धूसर आणि मग जरा जास्त नीट दिसू लागल्यात (माझ्या कड़े फ/११ चा फोटो नाहीये , नाहीतर अजुन चांगला फरक जाणवला असता. )
तुमच्या कॅमेर्यामध्ये:
डीएसएलआर /एसएलआर मध्ये साधारणपणे शटर डायल {Main Dial} [main command dail] आणि अॅपेर्चर डायल {Quick Control dial}[sub command dial] अशा दोन डायल किंवा बटणे असतात.हे दोन्ही घटक एकमेकांवर अवलंबून असतात.
आजकाल बऱ्याच डीजीकॅम मध्ये शटर आणि अॅपेर्चर बदलायचे ऑप्शन असतात. जर मॅन्युअल नीट वाचलत तर ते मिळतील. प्रत्येक कॅमेर्यामध्ये यासाठी वेगळी पद्धती असते त्यामुळे इथे लिहिता येणार नाही. तरी सुद्धा इथे आपण सोयीसाठी त्या सॉफ्ट कीज ना (मेनू मध्ये असणारे ऑप्शन) शटर डायल आणि अॅपेर्चर डायल अशीच नावं देऊ.
आता कॅमेर्यामध्ये शुटींग मोड असतात. मॅन्युअल मोड {M}[M], अॅपेर्चर प्रायोरिटी मोड {Av}[A], शटर प्रायोरिटी मोड {Tv}[S]. कॅमेर्याच्या कंपनी प्रमाणे यांची नावं वेगवेगळी असतात. मोड डायल वापरून वेगवेगळे मोड सिलेक्ट करता येतात.
या पैकी आपण आता अॅपेर्चर प्रायोरिटी मोड वापरून बघू
मॅन्युअल मोड - शटर आणि अॅपेर्चर दोन्ही फोटोग्राफरला ठरवावे लागते
अॅपेर्चर प्रायोरिटी मोड - फोटोग्राफर अॅपेर्चर ठरवतो, आणि कॅमेरा शटरस्पीड आपोआप ठरवतो.
शटर प्रायोरिटी मोड - फोटोग्राफर शटरस्पीड ठरवतो, आणि कॅमेरा अॅपेर्चर आपोआप ठरवतो.
तुमचा कॅमेरा अॅपेर्चर प्रायोरिटी मोडमधे ठेवा. कॅमेरा शटर स्पीड आपोआप ठरवेल, तुम्ही फक्त अॅपेर्चर बदलून बघा.
योग्य एक्पोजर मिळाल नाही तरी चालेल फक्त प्रयोग करून पहा. वेगवेगळया अॅपेर्चरला एकाच वस्तूचे फोटो काढा. साधारण फ/४.५, फ/५.६ फ/७.१ फ/११ असे ऑप्शन वापरून बघा. यापेक्षा जास्त अॅपेर्चर शाक्य असल्यास तेहि करून बघा.
नोट:
वर म्हटल्याप्रमाणे जास्त अॅपर्चर वाल्या लेन्स महाग असतात. पण कॅनन मध्ये ५०मिमि फ़/१.८ लेन्स आहे ती अतिशय स्वस्त आणि अप्रतिम लेन्स आहे. तिला फोटोग्राफर लाडाने निफ्टीफिफ्टी म्हणतात :) तिच्या बिल्ड क्वालिटीमुळे तिची किमत इतकी कमी आहे तरी फोटोसाठी एकदम छान आहे. निकॉन किंवा इतर कंपन्यामध्ये अशा स्वस्त आणि मस्त लेन्स आहेत का ते माहिती करून लिहेन.पुढच्या वेळी एक्स्पोजर आणि आयएसओ वर जरा नजर टाकूयात.
*[] - निकॉन कॅमेर्यातली नावे
*{} - कॅनन कॅमेर्यातली नावे
*** सर्व फोटोग्राफ आणि लेखन कोपीराईट प्रोटेक्टेड आहे. लिखित पूर्व परवानगी शिवाय कुठेही वापरू नये.****
एकच शब्द... भन्नाट !!!!!!!!!
ReplyDeleteExtremely useful post. Thanks a ton.
ReplyDeleteFar Far Sahaj - Sundar lekh ahe Swapnali. Thanks a lot.
ReplyDeleteNice information in detailed...very useful for the Beginer's...Thanks a lot...
ReplyDeletetumhi atishay sopya bhashet lihilay...he vaachun vatata kitti soppa aahe...nakkich ek pustak kadha ashyach sopya bhashet...aankhin ashyach post chi vaat baghatoy
ReplyDeleteFarch Chan lihiley !!! Swapnali asich sahaj sunder mahiti det raha.
ReplyDeleteAniket
read ur posts...really very much useful and understandable ...marathit aslyamule lavkar samajala...i just hope ur nxt post will come soon...eagrly waiting for next posts on iso and exposure....pl do post it as soon as possible...all info at one stop houn jaeel mag...
ReplyDeleteawesome snaps n very informative post!
ReplyDeletekeep writing.