प्रकाशरानातून चालताना...

प्रवास वर्णने आणि फोटोग्राफी विषयी लेख

  • Home
  • Posts RSS
  • Comments RSS

Saturday, January 17, 2015

पूर्वांचल - मातृशक्तीचे विराट दर्शन - २

पूर्वांचल - मातृशक्तीचे विराट दर्शन - २

विमानतळापासून निघून गुवाहाटी मधल्या धुळ भरलेल्या रस्त्यामधून आमचा प्रवास सुरु झाला.  मध्ये मध्ये दिसणार्या ओळखीच्या वास्तू, युनिवर्सिटी यांची माहिती आशिष आम्हाला देत होते.  मधेच युनिवर्सिटीच्या गेटजवळ त्यांचा एक मित्र त्यांना भेटायला आला होता. अरुणजींनी माझ्याकडे एक जाडजूड पुस्तक दिले होते, जे मी पहाटेच आशिषकडे देऊन टाकले होते. ते पुस्तक घेण्यासाठी तो मित्र आला आणि त्याने काही गरम कपड्यांची एक पिशवी गाडीत देऊन ठेवली! न जाणो आम्हाला लागली तर म्हणुन! 

शहराच्या थोडं बाहेर आलो तसं धुळ कमी वाटायला लागली. रस्त्याच्या बाजूला बर्याच पाणथळ जागा जागोजागी दिसत होत्या. इथलं साठलेलं पाणी लालसर रंगाच दिसत होतं, बहुधा जमिनीत लोह जास्त असावं.  त्या पाणथळ जागांच्या पलिकडे बांबूच्या झाडीमागे छोटी छोटी घरं. काही सिमेंटने बांधलेली, काही चक्क बांबूनी बांधलेली. सिमेंटच्या घरांना जमिनी पासूनचा दोन तीन फुटाचा भाग पूर्ण सिमेण्टचा तर वरचा थोडा वेगळा दिसत होता. बांबूची घर तर जमिनीपासून उंचावरच बांधली होती. खालची दलदल, प्रचंड पावसात साठणारे पाणी यापासून बचाव करण्यासाठी ही अशी घरं!  मुख्य रस्त्यावरून घरांच्या बाजूला जायचं तर पाणथळ भाग ओलांडावा लागेल , त्यासाठी नाजुकसे, दिसणारे बांबूचे इवले इवले ब्रिज होते. दुरून बघताना सुंदर दिसत असले तरी त्यावरून चालत जायला धास्तीच वाटेल इतके नाजुक.  

हळुहळू हे मागे टाकून आमची गाडी डोंगर चढायला लागली.  थंडी थोडी वाढली आणि थोडे धुकेही जाणवायला लागले. या सगळ्याच रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरु होते. त्यामुळे प्रचंड धुळ होती. मला धुळीची एलर्जी असल्यामुळे तो त्रास पहिल्याच दिवशी उद्भवू नये अशी मनोमन विनवणी करत की नाकाला रुमाल बांधून ठेवला होता.  दुपारच्या जेवणासाठी आम्ही  'नाँगपो' इथे थोडासा वेळ  थांबलो. पहिल्याच दिवशी जेवायला कुठे थांबता येईल याची कल्पना नसल्याने आम्ही आदल्या रात्री करून आणलेले डबे उघडले. डब्यासाठी काय करून न्यायचे हे आमचे ठरले नव्हते पण योगायोगाने आम्ही तिघींनीही मेथी पराठेच नेले होते! मग तीन घरांच्या चवीचे पराठे आणि गरमागरम चहा घेतला.  निघायच्या आधीच असम मध्ये रहाणार्या दोन मायबोलीकर मैत्रिणींचा फोन नंबर घेऊन ठेवला होता. मायबोलीवरून ओळख झाली असली की हक्काने आणि आपुलकीने बोलता येतं असा नेहेमीचा अनुभव. त्यापैकी एकीशी एअरपोर्टवरुनच बोलणं झालं होतं, इथे येऊन दुसरीशी बोलले.  दोघींनीही अगदी आवर्जून काही मदत लागली तर हक्काने सांग असं बजावलं.  मग थोडं आमचंच फोटोसेशन केलं आणि पुढे निघालो. इथे रस्तोरस्ती फळविक्रेत्या स्त्रियांच्या टपर्या दिसत होत्या. केशरी, गुलाबी हिरवट अशा रंगछ्टा असलेली अननसे जवळपास सगळ्याच ठिकाणी सजवून मांडुन ठेवलेली दिसली.  प्रत्येक वळणावर काहितरी नवीन दिसायचं आणि आम्हाला थांबायची इच्छा व्हायची पण आमच्या पुढचे टारगेट रात्री लवकरात लवकर मेघालयात पोहोचणे हे होते. शिवाय ठाण्यातून निघतानाच आम्हाला स्ट्रिक्ट वॉर्निंग होती की उगाच कुठल्याही रस्त्यावर थांबून फोटोग्राफी करायची नाही.  हे वेळ आणि सुरक्षा या दोन्ही दृष्टीकोनातून सांगितले असल्याने आम्ही तोंड बंद करून गुपचूप बाहेर बघत होतो.  
'नाँगपो' इथला टी ब्रेक,  मी एका मायबोली मैत्रिणीशी फोनवर बोलतेय.  फोटो : कुमार जयवंत  


हळुहळू थंडी वाढली, साडेचारलाच अंधार झाल्यासारखे वाटायला लागले आणि काही वेळात अगदी काळोख झाला.  हिवाळ्यात इथे फारच लवकर अंधार होतो त्यामुळेच लवकरात लवकर पोचणे जरूर होते. मेघालयातला हा तसा घाटरस्ताच होता. बर्याच वेळाने आम्ही मुठलॉंगला पोहोचलो. रस्त्यावरून डावीकडे एका चढावावर गेटमधून गाडी आत शिरली. आणि एक अगदी तरुण हसतमुख मुलगा आमच्या स्वागताला येऊन उभा राहिला. तोमी सुचियाङ. आज आमचा मुक्काम याच्या घरी होता. आम्ही गाडीतून उतरलो आणि गारठलोच! बाहेर प्रचंड थंडी होती. गाडीत एकमेकाला चिकटून बसल्याने आम्हाला कोणालाच ती जाणवली नव्हती पण आता अगदी कुडकुडायाला लागलो.  कसेबसे सामान घेऊन आत गेलो तर तोमीने पटापटा गरम कोळशाची शेगडीच समोर आणुन ठेवली आणि आम्ही सभोवती शेकायला बसलो.  थोड्याच वेळात गरमगरम लाल चहा समोर आला आणि त्याच्या बरोबर राइस केक्स. लाल चहा म्हणजे कोरा चहा पण तितकासा उकळलेला नसतो त्यामुळे फारसा कडु लागत नाही. इथे दुधाची कमतरता असल्याने सगळीकडे असाच लाल चहा प्यायला जातो.  उबदार शेगडीजवळ खात आणि चहा पीत  आल्याआल्याच आमच्या गप्पा रंगल्या.      
तोमी आणि हमकल्ला  सोबत, अवघ्या काही मिनिटापूर्वी आम्ही अनोळखी होतो!

या फोटोत माझेही हात हवे होते असे राहून राहून वाटते  



तोमीचे इलेक्ट्रोनिक्सचे दुकान होते. त्याचा मावसभाऊ 'हमकल्ला' तोही असाच अगदी हसतमुख आणि पोरगेलासा. हा मुलगा काही वर्ष ठाण्यात राहून शिकला होता आणि नंतर  मेकॅनिकल इंजिनीअर झाला होता. त्याला थोडं मराठीही येत होतं ते पाहून तर आम्हाला फारच आश्चर्य वाटलं.  पुढचे दोन दिवस तो आमच्या टिममधला, मराठी मुलगा म्हणुनच वावरत होता!.    तितक्यात आतून तोमीची आई आणि हमाकल्लाची आई आली. दोघींची तोंडं पान खाऊन रंगलेली. आत्ताही त्यांच्या तोंडात पान किंवा सुपारी होतीच. आता पुढचे काही दिवस हे दृश्य आम्हाला सवयीचे करून घ्यावे लागणार होते म्हणा.    त्यांच्या मागून लपत छपत आणखी दोन तीन वेगवेगळ्या वयाची मुलं आली.   एक गोबर्या गोबर्या गालाची इवलीशी 'काका' आणि दुसरा अगदी उत्सुक डोळ्यांचा 'मेबानकिरी', आणि अजून एकजण नंतर पुढे आलाच नाही.  ती तिघे वाकून चोरून आमच्याकडे बघत होते. मी हळुच खिशातून चॉकलेट्स काढुन त्यांच्या पुढे धरली आणि आमची थोडी गट्टी  झाली म्हणजे भाषा तर फारशी समजत नव्हती पण त्यांची भिती मात्र पळाली.                              

 हे घर हमकल्लाच्या आईचे आणि मावशीचे !  इथे मेघालयात एक अनोखी प्रथा आहे, मातृसत्ताक पद्धत.  लग्न झाले की मुलगा आपल्या आईवडलांचे घर सोडुन बायकोच्या घरी रहायला येतो.  घरात भरपूर मुलं असतात पण आईवडलांना सांभाळायची जबाबदारी सगळ्यात लहान लेकीची. त्याचे कारणही मजेदार! ती सगळ्यात लहान असल्याने जास्त दिवस आईबाबांकडे लक्ष देऊ शकेल म्हणून. मग रहाते घर तिच्या नावावर होणार. बाकीच्या मुलींनी आपापली घर बनवायची. मुलं आपली बायकोच्या घरी नांदायला जाणार.  या एका कारणासाठी इथल्या लोकांचे मला फ़ारच कौतुक वाटले. आपल्याकडेही अशी प्रथा यावी असे मनापासून वाटले ते वेगळेच.  पण इथे सहसा घरातली आणि बाहेरची , शेतीची कामेही सगळी बायकाच करतात. पुरुष फारसे काही काम करत नाहीत. आणि बायका अगदी धडाडीच्या , कणखर वाटल्या.  

हे घर अतिशय  सुंदर आणि नीटनेटके होते.  आम्ही बसलो होतो त्या हॉलला मोठी काचेची तावदानं, त्याला सुंदर पांढरे लेसचे पडदे, समोरच्या भिंतीवर एक मोठे शोकेस होते. त्यात अनेक वस्तू, वेगवेगळे फोटो वगैरे ठेवले होते. त्यात एक मामाचा म्हणजे 'माहे' चा फोटोही होता. असा फोटो इथे सगळीकडेच असतो म्हणे. किचनमध्ये भांडी अगदी चकाचक आणि एकावर एक रचून ठेवलेली होती. चुलीवरचा धूर घराबाहेर निघून जावा म्हणुन उंच घराबाहेर काढलेले एक धुरांडे सगळीकडे असते.   नंतर आम्हाला कळले की इथे सगळ्यांचीच घरे अशी सुंदर आणि नेटकी असतात. 

थोडा वेळाने मला आठवलं की मघाशी गाडीतून उतरलो तेव्हा आकाश अतिशय सुंदर, खचाखच चांदण्यांनी भरलेलं दिसत होतं.  आपल्याकडे शहरात इतक्या चांदण्या कधीच दिसत नाहीत पण तिथे अक्षरश:  चांदण्याचा सडा पसरला होता. तेव्हाच याचा फोटो काढूयात असे वाटले पण इतक्या थंडीत कॅमेरा बाहेर काढला नव्हता. आता  त्या आकाशाचा फोटो काढायला म्हणुन मी बाहेर निघाले तर हमकल्ला म्हणाला की आपण गच्चीवर जाऊन पाहू. घराचे वरचे बांधकाम अजुनही चालू होते, शिडीवरून वगैरे जावे लागणार होते. मग मी, वेदिका , हमकल्ला हातात ट्रायपॉड, कॅमेरा घेऊन वर निघालो. घराच्या मागच्या भागात गुडुप्प अंधार, तिथेच ती शिडी लावली होती. आता विचार केला तर आश्चर्य वाटेल पण आम्ही बिनधास्त त्या आताच तासाभरापूर्वी भेटलेल्या मुलांवर विश्वासून आणि त्यांचाच हात पकडून ती शिडी चढुन वरच्या दाट अंधार्या मजल्यावर गेलो. पण इथल्या या मुलांनी इतक्या पटकन आपलेसे केले की असा काही विचार करावासा वातालाक नव्हता.  तिथल्या सिमेंट आणि इतर गोष्टीमधून अंधारातच वाट काढून उघड्या गच्चीत पोचलो. आमच्या मागोमाग कुमार आणि इतरही आले.  भराभरा  ट्रायपॉड लावला, कॅमेरा लावून तो वर वळवणार इतक्यात आकाशाकडे लक्ष गेले. हाय रे देवा! आकाश राखाडी ढगांनी आच्छादले होते.  अगदी एखादीही चांदणी दिसत नव्हती! फोटोग्राफीमध्ये एखादा क्षण वाया घालवला तर तो पुन्हा येत नाही हे पुन्हा एकदा जाणवले.   तो ट्रायपॉड काढून आमची वरात पुन्हा खाली आली. 

आम्ही खाली आलो तोपर्यंत जेवण तयार झाले होते.   आम्ही थेट किचनमधेच गेलो. इथे पुर्वांचलात मांसाहारी जेवण नेहेमीचे आहे आणि बर्याच प्रकारचे प्राणी खाल्ले जातात.  त्यामुळे आमही सगळेच जण पूर्ण शाकाहारी आहोत असेच सांगितले होते. आज जेवायला लाल तांदळाचा भात, वरण आणि दोन तीन प्रकारच्या भाज्या होत्या. शिवाय तोमीची आई किचनच्या मधोमध एक स्टोव्ह ठेवून त्यावर बटाट्याच्या सळ्या तळत होती.  त्या स्टोव्हच्या उबेत बाकी काही जण आणि छोटी काका , तिचा भाऊ वगैरेही होते.  संजय आणि आशिष सोडले तर आमच्या सगळ्यांसाठी पूर्वांचलातले जेवण जेवण्याचा हा पहिलाच अनुभव होता.  तो गरम वाफ़ाळता लाल भात अतिशयच चविष्ठ होता. असा लाल भात आम्हाला नंतरही चाखायला मिळाला नाही. पोटोबा तृप्त करून आम्ही तिथेच गप्पा मारत बसलो.  तोमी आणि हमकल्लाच्या आया एका हाताने सुपारी कातरत काहीबाही सांगत होत्या आणि आम्ही ऐकत होतो.  आम्हालाही सुपारी खायचा आग्रह झाला. पण ही सुपारी चांगलीच लागते असे ऐकून होतो आणि ती टाळण्याबद्दल सल्लाही आधीच मिळाला होता त्यामुळे नागवेलीचे नुसते पान तेवढे आम्ही घेतले.  



जेवणानंतरचा कार्यक्रम - पान सुपारी 


थोड्यावेळाने आम्हाला किचनच्या बाजूलाच एक खोली दिली त्यात आम्ही तिघी होतो आणि इतर तिघे दुसर्या एका बाहेरच्या खोलीत होते. एका मुलीने रूममध्ये कोळशाची शेगडी आणुन ठेवली. आणि उबदार दुलई पांघरुन मी दिवसभरात कुठून कुठे आलो याची उजळणी करत राहिले.  केवळ दोन तीन तासात हे घर, त्यातल्या माणसांनी इतका जीव लावला की आपण पहिल्यांदाच भेटतोय हे जाणवू नये याचं आश्चर्य वाटलं. तसं म्हटलं तर ही फक्त एक सुरुवात होती. उद्यापासून आमचे खरे काम सुरु होणार होते आणि असे अजून अनेक अनुभव आमची वाट बघत होते.       



Posted by Swapnali Mathkar at 9:21 AM 0 comments
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: असम, जागतिक महिला दिन, पूर्वांचल, मेघालय, विद्युल्लता प्रदर्शन 2014

Friday, January 16, 2015

पूर्वांचल - मातृशक्तीचे विराट दर्शन - १

पूर्वांचल - मातृशक्तीचे विराट दर्शन   -  १

बरोब्बर एक वर्षापूर्वी म्हणजे २०१३चे वर्ष संपताना आणि २०१४ चे वर्ष सुरु होताना मी माझ्या घरात नव्हते.  मी होते पूर्वांचलात!  तिथे घालवलेले ते पंधरा दिवस म्हणजे माझ्या विचारांना कलाटणी देणारे, एक वेगळेच आयुष्य दाखवणारे दिवस म्हणायला हवेत.  या पंधरा दिवसात आम्ही चार राज्यात, सुमारे अडीच हजार किमी फिरलो, चौदा धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या स्त्रियांना भेटलो, तिथल्या लोकांच्याच घरी राहिलो, त्यांचेच जेवण जेवलो, त्यांच्या आयुष्यात थोडे डोकावून पाहिले आणि खूप काही अनुभवले.   मग आज एक वर्षाने, इतक्या उशिरा मी त्याबद्दल का लिहितेय?  खरंच सांगायचं तर या विषयावर मी भरपूर लिहिलं आहे. त्याचे चक्क एक अख्ख पुस्तक "फोटो सर्कल सोसायटी" ने प्रकाशित केले आहे. मात्र पूर्वांचलातल्या लोकांनाही वाचता यावे त्यामुळे ते पुस्तक इंग्रजीत आहे. त्यावेळची वर्तमान पत्रे इत्यादीनेही या प्रवासाची दखल घेतली होती, पण त्यांचे आयुष्य एखाद दोन दिवसांचे. 'ईशान्यवार्ता' या मासिकासाठी एक मालिका लिहीली.   एका दिवाळी अंकासाठीही लिहून झाले.    इतके सगळे  लिहिल्यावर मलाच वाटले की आपण या विषयावर अतीच लिहीतोय. लोकांना वाटेल की काय ही एकाच विषयावर लिहीत बसलीये! म्हणुन माझ्यापुरत मी ठरवून टाकलं की बास आता अजून यावर काही लिहायचे नाही.

पण मुक्ता यांचे अरुणाचल बद्दलचे लेख वाचले  आणि मला जाणवले की मायबोली वाचक आणि ब्लॉगवाचक यांच्यापर्यंत माझे अनुभव पोचलेलेच नाहीत. मी आधी जे लिहिलंय ते फक्त कार्यकर्त्या स्त्रीयांबद्दल होते. आमचे अनुभव असे माझ्या टिपणवही शिवाय  कुठे नोंद केलेच नव्हते. आज वर्षभराने देखील ते मला व्यवस्थित आठवतात.  ते देखील यानिमित्ताने लिहायचा प्रयत्न करेन.      महत्वाचं म्हणजे पूर्वांचलाबद्दल लोक जितके अधिक वाचतील, जितके अधिक जाणुन घेतील तितके इथल्या लोकांना आपण अधिक समजून घेऊ, आपलीशी वागणून देऊ. 'भारतीय असुनही इतर राज्यांकडून आपल्याला सापत्न वागणुक मिळते ' हे इथल्या बर्याच जणांच दु:ख आहे, त्याची सामाजिक, भौगोलिक अनेक कारणं असतील पण तरिही एक भारतीय समाज म्हणुन आपण ती कारण दूर करायचा प्रयत्न केला पाहिजे. माझ्या एखाद्या लेखाने लगेच काही मोठा बदल वगैरे होणार नाही हे खरेच, पण ते वाचून  एका जरी व्यक्तीला पुर्वांचलाबद्दल ओढ वाटली, तिथले प्रश्न समजावून घ्यावेसे वाटले तर ते खूप आहे.

ही लेख मालिका लिहायला घेतली याचे श्रेय 'फोटो सर्कल सोसायटी', माझे सगळे सहकारी , आम्हाला पूर्वांचलात मदत करणारे अनेक जण यांच्याबरोबरच मुक्ता यांनाही द्यायला हवे.      

 ------------------

दरवर्षी  ८  मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो.  हा दिवस निवडला गेलाय तो १९व्या शतकात महिलांना  समान हक्क मिळवुन देण्याच्या झगड्याला बळ मिळावे म्हणुन साजरा केलेल्या दिवसाची आठवण म्हणुन !   आज सुमारे एक शतकानंतर महिला अनेक क्षेत्रात आघाडीवर आहेत. ही वाटचाल वाखाणण्याजोगी असली तरीही त्यांना माणुस म्हणुन समान हक्क मिळाले आहेत असे म्हणणे धाडसाचेच ठरेल.  आजही अनेक स्त्रियांना रोजच्या आयुष्यात विविध प्रकारे झगडावे लागते, त्यांना मनोबल देण्यासाठी आणि आजच्या काळातल्या, समाजासाठी झटणाऱ्या तेजस्वीनी महिलांना मानवंदना देण्यासाठी यापेक्षा योग्य दिवस कुठला असेल?

पण सध्या  शहरात महिला दिन साजरा करण्यात एक प्रकारची सवंगता येत चालली आहे.  खरेदीवर सुट, उगाच भेटी, नसते उत्सवीकरण यात घुसले आहे आणि त्यामुळे या महिला दिनाचे जे विशेष महत्व आहे ते कमी होत चालले आहे असे वाटते. "फोटो सर्कल सोसायटी" या ठाण्याच्या फोटोग्राफर्सच्या संस्थेने मात्र २०१२ सालचा महिला दिन वेगळ्या प्रकारे साजरा करण्याची कल्पना मांडली आणि  तिला मूर्त रूपही दिलं. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील स्त्रियांच्या कार्याचे प्रकाशचित्रण करून जागतिक महिला दिनाच्या दिवशी त्या प्रकाशचित्रांचे प्रदर्शन भरवणे हा एक आगळा वेगळा प्रयोगच होता. फोटो सर्कल सोसायटीच्या महिला प्रकाशचित्रकारांनी काढलेल्या फोटोंचे हे प्रदर्शन 'विद्युल्लता' खूप वाखाणले गेले आणि प्रयोग कमालीचा यशस्वी झाला.  २०१२ आणि २०१३ या दोन्ही वर्षी महाराष्ट्रातील अनेक स्त्रियांचे कार्य प्रकाशचित्रांच्या स्वरूपात 'विद्युल्लता' या प्रदर्शनात मांडले गेले. समाजसेवा, शिक्षण, कला, साहित्य, विज्ञान, व्यावसाय,  विविध सरकारी सेवा अशा क्षेत्रात काम करणाऱ्या यशस्विनींपासून ते अगदी  भाजी/ मासे विक्रेत्या, कचरा उचलणाऱ्या स्त्रियांपर्यंत सगळ्यांचेच कार्य या प्रदर्शनाद्वारे पुढे आणले गेले.  आजवर महिलांना कराव्या लागलेल्या कष्टांची आठवण ठेवत आताच्या काळातल्या विद्युल्लतांना फोटोग्राफर्सनी दिलेली ही एक मानवंदना होती.  

साधारण ऑगस्ट २०१३ मध्ये एका मिटिंग मध्ये विद्युल्लताच्या शूटसाठी पूर्वांचलात जायची इच्छा आहे असे संजय म्हणाले. तेव्हा अगदी मनात आले की आपल्याला या प्रोजेक्टवर काम करता आले तर किती छान. तेव्हा एका अदृश्य शक्तीने 'तथास्तु' म्हटले असावे पण मला ते तेव्हा ऐकू आले नव्हते.  नंतर दोन एक महिन्यानंतर जेव्हा  मला 'हे फोटोशुट जमेल का' असे विचारले गेले, तेव्हा 'अर्थातच!' असा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. पण काही क्षणातच मला घराच्या विचाराने जमिनीवर आणले. घरी येऊन मी नवर्याशी बोलले कारण प्रश्न 'पंधरा दिवस लेकीला सांभाळायला कोण' असा होता. पण त्याने लगेचच ती जबाबदारी स्वत:कडे घेतली आणि मी पूर्वांचलात जाण्यास मोकळी झाले.  

२०१४ सालच्या विद्युल्लता फोटो प्रदर्शनासाठी  फोटो सर्कल सोसायटीने एक पाऊल पुढे टाकून  महाराष्ट्राबरोबरच  पूर्वांचलातल्या मेघालय, असम, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर या चार राज्यातल्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांचे कार्य प्रकाशचित्रित करायचे ठरवले होते. आम्ही तीन महिला फोटोग्राफर - मी, संघमित्रा बेण्डखळे, वेदिका भार्गवे, दोन पुरुष फोटोग्राफर - श्री. संजय नाईक, कुमार जयवंत आणि अ.भा.वि.प. चे श्री. आशिष भावे अशा सहा जणांनी १५ दिवस पूर्वांचलात फिरून तिथल्या चौदा स्त्रियांना भेटून त्यांचे कार्य जाणून घ्यायचे असा प्लान होता.   असा प्लान पुर्ण ठरायच्या आधी संजय नाईक, प्रविण देशपांडे, श्री अरुण करमरकर, आशिष भावे आणि या प्रोजेक्टला मदत करणारे अनेक जण यांच्या अनेक बैठका झाल्या. अरुणजी सुमारे १९८० सालापासून पूर्वांचलासाठी कार्यरत आहेत. त्यांचे मौलिक सल्ले या प्रोजेक्ट मध्ये खूपच महत्वाचे होते.    कोणत्या राज्यात कोणाला भेटायचे, कुठून कुठे जायचे , कुठे रहायचे, या सगळ्या प्रवासाचे प्रायोजक इत्यादी बर्याच गोष्टी ठरवल्या गेल्या. खर सांगायचं तर हे ठरवण्यात आमचा काही विशेष हातभार नव्हता. मात्र फोटोग्राफर म्हणुन ज्यांची नावे पुढे आली त्यात आम्ही तिघीही होतो.

एकदा जायचे ठरल्यावर थोडी माहिती गोळा केली, इतर तयारी सुरु केली. तिथे पंधरा दिवस सलग प्रवास! इथल्या चार राज्यातल्या, दुर्गम भागातल्या चौदा  स्त्रियांना भेटायचे होते, त्यांच्या कामाचे प्रकाशचित्रण करायचे होते.  निघायच्या आधी आमची सगळ्यांची जी मिटिंग झाली त्यात अनेक गोष्टी कळल्या.  सुरुवातीला पाच राज्यांचे प्लानिंग होते पण त्याच वेळेस नागालँड इथे जाणारा रस्ता बंद असल्याचे कळले आणि आम्ही केवळ  चार राज्यांचा प्रवास प्लान केला. इथूनच पुर्वांचलातल्या दुर्गम भागात जायचे म्हणजे काय अडचणी येऊ शकतात याची चुणूक दिसायला लागली.  संजय, आशिष आणि अरुणजी यांनी पुन्हा पुन्हा आम्हाला सांगितले की गोष्टी आयत्या वेळेस बदलतील, प्लान बदलावे लागतील, अनेक अडचणी येऊ शकतील त्याची तयारी ठेवा.  आम्ही अर्थातच जे होईल त्याला सामोरे जायला तयार होतो.

आम्हाला सामानाबद्दल फार काळजीपूर्वक प्लान करावा लागला. कारण एकतर आम्ही जाणार होतो भर थंडीत, त्यामुळे थंडीचे गरम कपडे वगैरे घ्यायचे होते.  पण आमचा मूळ उद्देश होता फोटोग्राफी, त्यामुळे आमचे अवजड कॅमेरे, लेन्स, ट्रायपॉड, फ्लॅश , रिफ़्लेक्टर, लॅपटॉप या अति आवश्यक गोष्टी बरोबर घ्यायच्या होत्या.  वेळेच्या कमतरतेमुळे आम्ही मुंबईहून जायचा आणि परतीचा प्रवास विमानाने करणार होतो. त्यामुळे हे सगळे सामान काळजीपूर्वक घेऊन जाणे आणि तिथे वागवणे यासाठी  बरीच काळजी घ्यावी लागली, तिथे फिरतानाही गाडी असणे जरुरीचे झाले.

शेवटी एकदाचा आमचा जायचा दिवस उगवला. आदल्या रात्री संघमित्रा आणि वेदिका माझ्याकडे येऊन थांबल्या होत्या.  पहाटे साडे तीन ला आम्ही  घर सोडलं आणि विमानतळावर पोचलो. संजय आणि कुमार वेगळ्या गाडीने पोचले.  वेदिका, कुमार पहिल्यांदाच विमानप्रवास करणार असल्याने एकदम नवख्यासारखे वावरत होते.

तर शेवटी विमानात बसून आम्ही उडालो! आणि काही तासातच  “Ladies and gentlemen, welcome to Guwahati Lokapriya Gopinath Bordoloi international airport. Outside temperature is 14 degree Celsius. “ अशी आमच्या वैमानिक कॅप्टन रुचा शर्मा यांनी घोषणा केली. विद्युल्लताच्या फोटोशूट साठी जाताना वैमानिकही स्त्री असावी हा एक मोठाच योगायोग होता!  

आम्ही विमानतळाबाहेर आलो आणि एक थंड शिरशिरी अंगावरून गेली आणि इथे भरपूर थंडी असणार याची आम्हाला पुन्हा एकदा आठवण झाली. बाहेर येऊन आमच्या गाडीच्या ड्रायवरला शोधले. आसामचे गोविंदजी ! ते भेटल्यावर आशिष  अगदी  खुलून असामीत बोलायला लागले. आपण खूप दिवसांनी आपल्या गावात किवा शहरात जाऊ तेव्हा कसा 'आलो बाबा आपल्या माणसात परत ' असा एक भाव असतो अगदी तसाच आनंद आशिषच्या चेहर्यावर झळकत होता. बरोबरच आहे म्हणा सुमारे दहा वर्ष ते इथे पुर्वांचलात राहून कार्य करत होते. इथल्या अनेक भाषा त्यांना मुखोद्गत होत्या.  सध्याच्या त्यांच्या पिएचडीचा विषयही पूर्वांचलाशी निगडीत होता.   त्यामुळे हा भाग त्यांना अधिक आपलासा वाटत असणारच.

आमचे सामान गोविंदजीनी गाडीवर बांधले आणि झायलो गाडीतून आमचा प्रवास सुरु झाला.  आता पुढचे बारा दिवस आम्ही याच गाडीत असणार होतो. एक अनोखा प्रवास ज्यामुळे आमचे अंतरंग ढवळून जाणार होते.        





विशेष आभार - फोटो सर्कल सोसायटी


Posted by Swapnali Mathkar at 12:38 PM 1 comments
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: असम, जागतिक महिला दिन, पूर्वांचल, मेघालय, विद्युल्लता प्रदर्शन

Sunday, December 14, 2014

'फ फोटोचा' २०१४ आणि 'द फोटो सागा' २०१४ - प्रकाशन

नमस्कार,

फोटो सर्कल सोसायटी, ठाणे गेले दोन वर्ष फोटोग्राफीला वाहीलेला मराठी दिवाळी अंक 'फ फोटोचा' प्रकाशित करत आहे. २०१४ हे या दिवाळी अंकाचे तिसरे वर्ष. दरवर्षी या अंकाचे प्रकाशन ठाणे महापौर चषक स्पर्धेच्या बक्षिस समारंभाच्या दिवशी ठाणे महापौरांच्या हस्ते होते. ( यावर्षी निवडणुकांच्या कारणास्तव बक्षिस समारंभ उशिरा झाला आणि त्यामुळे या अंकाचे प्रकाशनही आम्ही दिवाळीत करु शकलो नाही, त्याबद्दल दिलगीर आहोत)

काल १४ डिसें रोजी ठाण्याच्या महापौरांच्या हस्ते 'फ फोटोचा' हा दिवाळी अंक प्रकाशित झाला आहे. या वर्षी एक वेगळा प्रयोग म्हणुन आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा अंक पोचावा म्हणुन हा अंक मराठी बरोबरच इंग्रजीमधेही प्रकाशित करण्यात आला.

इंग्रजीत अंक प्रकाशित करणे हे एक वेगळे आव्हान होते कारण ललित प्रकारच्या लेखांचे इंग्रजी अनुवाद कसे होतील याबद्दल थोडी शंका होती. इंग्रजी अंकाचे हे पहीलेच वर्ष असल्याने अंकात चुका राहुन गेल्या असतीलच, किंवा काही ठिकाणी अनुवाद योग्य वाटत नसेल. पण एक पहिला प्रयत्न म्हणुन वाचक नक्कीच दोन्ही अंक वाचुन त्यांच्या प्रतिक्रीया आमच्यापर्यंत पोहोचवतील याची खात्री आहे.

यावर्षी जेष्ठ इंडस्ट्रियल फोटोग्राफर हरी महिधर , प्रख्यात फॅशन फोटोग्राफर विक्रम बावा यांच्या मुलाखती, आयडीयाज्@वर्कचे प्रशांत गोडबोले, सिनेमॅटोग्राफर संदीप यादव यांची मनोगते, अतुल धामणकर, युवराज गुर्जर, बैजू पाटील, गिरपाटील, डॉ. सुधीर गायकवाड अशा प्रख्यात वन्यजीव प्रकाशचित्रकारांचे लेख आणि स्लाईड शोज, किशोर साळी, ज्योती राणे यांचे वेगळ्या प्रकारच्या प्रकाशचित्रण आणि कला यासंबधीचे लेख, वारी या विषयाचे स्वप्नील पवार आणि रेखा भिवंडीकर यांचे रेखलेले शब्दचित्र, सुभाष जिरंगे, अंकिता वनगे, मेघना शहा यांचे लेख, तन्मय शेंडे यांची अमेरिकेतील लँडस्केप्स, योगेश जगताप यांची लाहौलस्पिती येथील लँडस्केप्स, नंदिनी बोरकर यांची ऑस्ट्रेलीयावारी, स्वप्नाली मठकर यांचे फुजी पर्वताचे शब्दचित्र, संघमित्रा बेंडखळे यांनी साकारलेला मणिपुर येथील इमा बाजार, जॉयदिप मुखर्जी आणि सायली घोटीकर यांची स्ट्रीट फोटोग्राफी, इंद्रनील मुखर्जी यांचा फोटोजर्नालिझम मधील नितीमत्ता असा वेगळ्या विषयावरील लेख या अंकात वाचायला मिळतील.

यावर्षी फोटोग्राफी जगतातील तीन महत्वपूर्ण तारे निखळले. श्री. गोपाळ बोधे, श्री. अधिक शिरोडकर आणि श्री के. जी. महेश्वरी या तिन्ही दिग्गजांना श्रद्धांजली वाहणारे आणि त्यांच्या आठवणी सांगणारे बिभास आमोणकर, प्रविण देशपांडे आणि मिलिंद देशमुख यांचे लेखही या अंकात वाचता येतील.


मराठी दिवाळी अंक - फ फोटोचा
Marathi Magazine



इंग्रजी अंक - द फोटो सागा - इन्स्पायरींग स्टोरीज ऑफ मास्टर फोटोग्राफर्स
English Magazine


सर्व लेखकांचे, अंकाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हातभार लावणार्‍या प्रत्येकाचे आणि आमच्या वाचकांचेही मनःपूर्वक आभार.
वाचकांच्या पोचपावतीशिवाय अंक अपूर्ण आहे त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया इथे किंवा खालील लिंक वर नक्की द्या.
http://fotocirclesociety.com/fa-diwalianka.php


धन्यवाद,
स्वप्नाली मठकर
(कार्यकारी संपादक )
Posted by Swapnali Mathkar at 9:27 PM 0 comments
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: 'फ' फोटोचा, 2014, Diwali Ank, Diwali Ank 2014, fa fotocha, The Photo Saga, द फोटो सागा २०१४

Monday, November 17, 2014

पश्चिमेकडुन पूर्वेकडे - ४००० किमीचा प्रवास - भाग १

पश्चिमेकडुन पूर्वेकडे - जाऊन येऊन सुमारे ४००० किमीचा प्रवास - १

फेब्रुवारीमध्ये XUV500 गाडी घेतली तेव्हाच नवर्याने सांगितलं की त्याला गाडी घेउन ठाण्याहुन भुवनेश्वरला जायचे अाहे. लेकीची सुट्टी बघुन कधी जायचे ते ठरवु. तेव्हा मला वाटले की हा नुसता म्हणेल , खरच जाणार नाही कारण घरात ़फिरायची अावड फक्त मलाच अाहे. पण नाही. नवी गाडी जितकी चालवली तितका त्याचा जायचा इरादा पक्का होत गेला. अाणि माझी धाकधुक वाढायला लागली. दोघेही केवळ दोन वर्षापूर्वी गाडी शिकलेलो. तेव्हा आय१० होती पण त्यात सेफ्टी फिचर अजिबात नसल्याने लॉन्ग ड्राईव केला नव्हता. नवीन गाडीनेही अजून दोघांनीही २०० किमी पेक्षा जास्त मोठा पल्ला ड्राइव केलं नव्हतं. हा प्रवास १८०० किमीचा वन वे, इतकी गाडी चालवता येईल का अशी मला भिती होती. बरोबर सात वर्षाची लेक. ती पाठी एकटी बसुन कंटाळणार असेही वाटत होते. काही मायबोलीवरच्या मित्रमैत्रिणींशी बोलले. केदार कडुन थोडे इन्स्पिरेशन घेतले, त्याचाही सल्ला घेतला (केदार ने खरेतर महिंद्राकडुन काहितरी कमिशन घेतले पाहिजे कारण त्याच्या लेह लडाख ट्रिप बद्दल वाचूनच ही गाडी घ्यायचे मनात आले होते. ) अाणि माझ्या मनाची तयारी केली.

ठरल्याप्रमाणे आम्ही सकाळी साडेपाचला घर सोडले. जाताना नाशिक, धुळे, अमरावती, नागपूर, रायपुर, संबलपूर, भुवनेश्वर असा रस्ता घ्यायचा ठरवला होता. नागपूर आणि संबलपुर इथे रात्री मुक्काम करणार होतो त्यामुळे तिथल्या हॉटेल्सचे पत्ते शोधून ठेवले होते आणि जर नागपूरपर्यंत पोचलो नाहीच तर अमरावतीला मुक्काम करू असा विचार करून तिथलेही हायवेवरचेच हॉटेल शोधून ठेवले होते.

नाशिक आणि पुढे धुळे (NH3) पर्यंत अतिशय मस्त रस्ता! चार लेन, मध्ये डिवायडर वगैरे होता त्यामुळे पटापट पोहोचलो. धुळ्याच्या पुढे मात्र (NH6/ AH46) दुपदरी, बिना दुभाजकाचा रस्ता सुरु झाला आणि स्पीड कमी झाला. त्यात मध्ये मध्ये बरीच गावे लागतात तिथे गर्दी, ट्राफिकजाम होता. जळगावला पोहोचेपर्यंत जेवणाची वेळ होऊन गेली. तिथून पुढे भुसावळ, मलकापूर, खामगाव, अकोला अमरावती हा सगळा रस्ता तसाच दुपदरी, बिना दुभाजकाचा आणि प्रचंड मोठे खड्डे असलेला असा आहे. त्यातच दर थोड्या अंतरावर सारखे रम्बलर्स, तीन चार स्पीडब्रेकर्स येतात. मोठे मोठे मालवाहू ट्रक याच भागातून जातात. त्यामुळे इथे गाडी चालवणे त्रासदायक वाटले. बर्याच भागात रस्ता अगदी अरुंद होतो. पुढे ट्रक्टर वगैरे आला तर त्याला ओवरटेक करून पुढे जायला फार वेळ लागायचा. काही वेळेस तर ट्रकच्या दोन्ही बाजूंनी अर्धा अर्धा मीटर बाहेर आलेली मशिनरी घेऊन ट्रक जातात. असा एखादा ट्रक समोर आला तर झालंच कारण त्याच्या पुढे जायला जागाच उरत नाही.

नाही म्हणायला या सिझनमध्ये दोन्ही बाजूला बाजरीची टपटपीत कणसे आणि पिवळीधम्मक शेते दिसत होती. हे 'शेतात पिकलेलं सोनं' मी पहिल्यांदाच पाहिलं. एरवी कोकणात जाणार्याला डोंगरदर्या बघायची सवय असते , पण इथे दूरवर पसरलेली शेती आणि सपाट जमीन पाहून वेगळेच वाटत होते.

मात्र जसजसा उशीर व्हायला लागला तसतसं अंधारात अशा रस्त्यावरून गाडी हाकण धोक्याचं वाटायला लागलं. सहा साडेसहाला अगदीच अंधार झाला आणि नागपूर अजून बरेच दूर होते. अंधारात बाहेरचे काहीच दिसेना त्यामुळे लेकीची चीडचीड सुरु झाली. अंधारात बिना दुभाजकाच्या आणि मोठे मालवाहू ट्रक जाणार्या रस्त्यावर गाडी चालवणे ताणाचे वाटायला लागले. आता नवरा गाडी चालवत होता तरी मला टेन्शन फ्री रहाता येत नव्हतेच. आधी नवरा 'आपण नागपुरपर्यंत जाऊच, अमरावतीचे काही शोधू नकोस' असे म्हणत होता, आता मात्र त्यालाही वाटले की अमरावतीला रहाणे श्रेयस्कर आहे. काही वेळ तर मला असेही वाटून गेले की उगीच आलो गाडीने. असाच रस्ता असेल तर किती त्रासदायक आहे पोहोचणे! शेवटी अमरावतीला पोचायच्या आधीचा सुमारे १० किमीचा रस्ता अगदी गुळ्गुळीत आणि एक्प्रेसवे सारखा होता. पण या रस्त्याचे काम चालू आहे / टोलनाका अजून सुरु झाला नाही शिवाय या रस्त्यावर एकही गाडीही दिसेना. त्यामुळे पुढे रस्ता कसा असेल/ असेल की नाही याचा अंदाज बांधणे कठिणच होते. अमरावतीला पोहोचलो पण अंधारात या हायवे वरून शहरात प्रवेश करायला रस्ता दिसेना. गाडीचे जिपिएस नवा रस्ता दाखवत नाही , त्यामुळे ते जुन्या ठिकाणी ( जिथे आधी डावी वळणे असतील तिथे ) वळायला सांगत होते पण हायवेवर वळणच नव्हते! मग एका ठिकाणी एक्सिट घेऊन थांबलो. तो अमरावती एम आय डी सी भागाचा रस्ता होता. तिथे चिटपाखरुही नव्हते. मग तिथे चक्क हॉटेलचे नाव जिपिएस मध्ये शोधले आणि ते मिळालेही. आम्ही थांबलो होतो तिथून केवळ आठ किमी वर, आणि अगदी रस्त्यावरच होते. हॉटेलमध्ये पोहोचून खरच हुश्श झाले.

दुसऱ्या दिवशीचा प्रवास तसा लांबचा होता, शिवाय काल अमरावतीला थांबल्याने नागपुरपर्यंतचे दिडशे किमी वाढले. त्यामुळे आज रात्री उशिरापर्यंत गाडी चालवावी लागेल अशी मानसिक तयारी करुनच निघालो. रायपुर ते संबलपूर हा पट्टा पुर्ण जंगल आहे. मध्ये रहाण्यासारखे शहरच नाहीये त्यामुळे मुक्कामी पोहोचण्याशिवाय गत्यंतर नाहीच. एकदा हायवेवर लागले की खायला ( लेकीसाठी बिन तिखटाचे) काही मिळत नाही, त्यामुळे नाश्ता करून साडे आठला बाहेर पडलो. गाडीचे जिपिएस ETA ( Exprected Time of Arrival) रात्री एक असे दाखवत होते, तिथे काणाडोळा केला. हा अमरावतीपासून नागपूर पर्यंतचा रस्ता असा काही अफ़ाट आहे की बस्स! पोटातले पाणीही हलणार नाही असा गुळगुळीत, लांबच्या लांब सरळ पसरलेला, चौपदरी, तुरळक ट्रक सोडता काहीच वाहतूक नाही. अगदी मीही गाडी सहज १४०च्या स्पीडने पळवत होते. एण्ट्रीलेवलचा, अडथळे कमी असलेल्या कार रेसिंग गेम असल्यासारखे वाटत होते. कार रेसिंग मध्ये पॉइंट मिळतात इथे ETA कमी होतो. विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे अजून टोल सुरु झाला नव्हता, अगदी शेवटच्या टप्प्यात थोड्डासा टोल घेतला. नागपूरपासून २०किमी अलिकडे अंतरावर उजवीकडे जाणारा एक नागपूर बायपास रोड आहे. तो घेतला आणि खडखड चालू झाली. इथे सगळा रस्ता म्हणजे नुसते खड्डेच होते पण ते बारके असल्याने गाडीला फारसा त्रास न होता खडखड करत पण जरा कमी वेगाने जाता येत होतं. नंतर एक टप्पा मात्र अगदी ऑफरोडींग करावं तसा रस्ता (!) होता. मोठे मोठे पाणी आणि चिखलाने भरलेले खड्डे!, त्यात समोरून येणारे कंटेनर्स! एक कसरतच होती. आमच्या पुढे एक छोटी मारुती इंडिका गाडी होती. ती खड्ड्यात गेली तर आपली जायला काहीच हरकत नाही असे म्हणुन मी जात होते. एका ठिकाणी चिखलात मात्र गाडीची चाकं एक्स्ट्रा फ़्रिक्शन देत होती ते लक्षात आलं ( AWD मोड ?? ) पण हा भाग सोडला आणि मग पुन्हा पुढे भंडार्यापर्यंत छान रस्ता सुरु झाला.

भंडाऱ्याच्या पुढे मधेच चौपदरी, मधेच दुपदरी रस्ता आहे. पण ओवरऑल चांगलाच आहे. इथेच डावीकडे नागझिरा अभयारण्यचा फाटा लागतो, तिथून पुढे गेल्यावर उजवीकडे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानाचा फाटा लागतो. इथे आल्यावर मारुती चितमपल्लींची आठवण आलीच! या दोन्ही जंगलात एकदातरी जायचे आहे. मग रस्त्याचा काही भाग चक्क नवेगाव जंगलातूनच जातो. दोन्ही बाजूला गर्द झाडी. एरवी रस्ता ओलांडताना कुत्रे वगैरे दिसतात, तसे इथे माकडं दिसतात. काही ठिकाणी हरणं वगैरे प्राणी रस्ता ओलांडतात त्यामुळे हळु जा असे सांगणारे बोर्डही होते. आम्हाला माकडे आडवी गेलीच पण चक्क एक शॅमेलिअनही आडवा गेला.

इथून पुढे आपण महाराष्ट्र ओलांडून छत्तिसगडमध्ये प्रवेश करतो. इथेही रस्ता चांगला पण मोठे मोठे ट्रक आणि कंटेनर फार दिसतात. भिलाई स्टील प्लाण्ट जवळ आल्याचे हे द्योतक होते. अचानक एका ठिकाणी आम्ही काळा डांबरी रस्ता सोडुन गुलाबी छटेच्या डांबरी रस्त्यावरून जायला लागलो. आधी आम्हाला वाटलं की रस्त्यावर लाल माती सांडली असेल. पण मग लक्षात आलं की रस्ता बनवताना त्यातल्या गुलाबी खडीच्या मिश्रणामुळे हा रस्ताच गुलाबी दिसतो! भिलाई शहर अगदीच बकाल आणि खराब दिसत होतं. खूप वर्दळ असलेल्या , आणि उद्योगधंदे असणाऱ्या शहराला असतो तसा गर्दी आणि घाणीचा शाप याही शहराला होताच. शहरातला टोल लोकल वहानासाठी नव्हता हे पाहून ठाण्याहून मुंबईत जाताना आणि परततानाही टोल द्यावा लागतो या दुखा:वरची खपली निघाली ! जेवायची वेळ झाली होती पण इथे जेवण्याची इच्छा झाली नाही. भिलाई सोडुन रायपुर जवळ आल्यावर एका ठिकाणी जेवलो. जेवण चांगले, कमी तिखटाचे असेल अशी अजिबात अपेक्क्षा नव्हती पण सुदैवाने आमचा अपेक्षाभंग झाला आणि जेवण चविष्ठ निघाले ! याहूनही दुसरे सुदैव असे की इथे स्वच्छ रेस्टरूमही मिळाले.

रायपुर सोडुन आम्ही पुन्हा काळ्या डांबरी रस्त्यावर आलो. आता रस्ता खराब व्हायला लागला होता, ट्राफिक तर होतेच, रस्ताही दुपदरीच होता. गाडीचे जिपिएस NH6चा रस्ता दाखवत होते, तर फोनवर गुगल एका ठिकाणी NH6 सोडुन उजवीकडे NH217 वर वळायचा रस्ता दाखवत होता. गुगल नुसार हा रस्ता ५० किमी जास्तीचा होता मात्र याला वेळ कमी लागणार होता. हाच २१७ पुढे पुन्हा ६ ला मिळणार होता. आम्ही गुगलच्या ज्ञानावर विश्वास ठेवायचे ठरवले आणि महानदीवरचा पूल ओलांडल्यावर एका ठिकाणी उजवीकडे २१७ वळलो. अचानक रस्त्यावरच्या गाड्या अगदी कमी झाल्या. हा रस्ताही दुपदरी होता पण गाड्या कमी आणि खड्डेही कमी होते. दोन्ही बाजूंनी झाडीच दिसत होती. गाडीचे जिपिएस रिरुट करून प्रत्येक डाव्या वळणाला आम्हाला आता NH6साठी वळा असे सांगत होते पण गुगलने सांगितल्याप्रमाणे ८०किमी याच रस्त्यावर जायचे होते. हळुहळू आजूबाजूचे जंगल दाट झाले आणि सहा वाजताच काळोख झाला. इथे गुगलचा सिग्नलही गेला. आता काय करायचे असा प्रश्न पडला पण ८० किमीचे डोक्यात होते त्यामुळे तशीच गाडी चालवत राहिलो. अचानक समोरच्या गाड्यांचे नंबर ओडीशाचे दिसायला लागले आणि ओडिशा जवळ आलो हे लक्षात आलो. पुढच्या सगळ्या गावांची नावे उडिया भाषेत लिहिलेली. अक्षरं माहिती असली तरी मला पटापट वाचता येईनात! मधेच केव्हातरी गुगल सिग्नल येऊन जाऊन होता त्यामुळे लक्षात आले की गाडीच्या जिपिएसने आम्हाला योग्य वाटेवर लावायचे प्रयत्न सोडुन देऊन गुगलने दाखवलेली वाटच दाखवायला सुरुवात केली आहे, त्यामुळे थोडे बरे वाटले. इथे आम्हाला रस्त्यावरच्या धुळीचा फार त्रास झाला. काचेवर धुळ आणि बाष्प बसून नीट दिसत नव्हते. पाणी उडवून वायपरने पुसले तरी समोरून गाडी आली की तिच्या हेडलाईमुळे अगदीच धुसर दिसायचे. आता रस्त्यावर गाड्या अगदीच तुरळक झाल्या, मध्ये मध्ये गावं फारशी येईनात, आली तरी पाड्यासारखी दोन चार घरं असलेली वस्ती असायची. त्या वस्त्यांवरही इलेक्ट्रिसिटी नव्हतीच. एरवी संपूर्ण रस्ता दुतर्फा घनदाट जंगल असावे असे वाटले कारण काहीही दिसत नव्हते. गाडीच्या मिरर मध्ये मागचा रस्ताही दिसत नव्हता. गाडीचे हेडलाईट एकदम पॉवरफुल असल्याने रस्ता मात्र नीट दिसत होता.

८० किमीच्या वळणावर SH3 वर एकदा वळलो आणि अजून ११८ किमी याच रस्त्यावर असे गाडीने सांगितले. रस्ता खराब होता आणि आम्ही तेव्हा ३०च्या स्पीडने जात होतो. आम्ही दोघांनीही एकमेकाकडे पाहून ' अशा अंधारातून आणि रस्त्यावरून अजून ४ तास' असा एक हिशेब न बोलताच एकमेकाला सांगितला ! इतक्यात पुढे एक गाडी दिसली तिच्या पाठच्या काचेवर जगन्नाथाचे डोळे काढले होते. हे एक मात्र नोंद करण्यासारखे आहे महाराष्ट्रात गाडीवर गणपती किंवा साईबाबा दिसतात, ओरिसात गेलो की जगन्नाथ दिसतो, दक्षिणेत गेलो की बालाजी दिसतो! तर त्या गाडीच्या मागे मागे आम्ही जायला लागलो त्यामुळे खड्डे वगैरे त्या गाडीकडे बघून आधीच कळायचे आणि वेग कमी करता यायचा. आता मध्ये मध्ये चांगला रस्ता आणि मधेच खड्ड्यांचा भाग येत होता. इथे एका ठिकाणी खड्ड्यातून हळुच गाडी काढताना रस्त्याच्या बाजूला काहीतरी येऊन बसलं. आणि आम्ही नीट बघेपर्यंत ते उडालं तेव्हा पांढरे छोटे घुबड होते असं लक्षात आलं. बरेच अंतर आम्हाला सोबत करून ती जगन्नाथाची गाडी कुठेतरी वळुन गेली आणि त्या एकाकी निर्जन रस्त्यावर आमचीच गाडी उरली.

एका ठिकाणी दूर लाल झेंडे लावले होते आणि एक झाड रस्तात आडवे होते. 'हे नक्षलवादी असतील का? काय करुयात? थांबवावी लागेल गाडी?' असा नवर्याचा प्रश्न ! आमच्याकडे असाही काय उपाय होता ? मी थांबव म्हटलं. जवळ जाऊन आम्ही थांबलो. रापलेली, काळी, छोटा पंचासारखे काहीतरी गुंडाळलेली दोन चार माणसं होती. आमचा एमएच नंबर बघून ती माणसं आमच्याकडे काही क्षण नुसतीच बघत राहिली. मी नवर्याला म्हणाले काच उघड आणि उडीयात विचार काय झालं म्हणुन. तसे केल्यावर मात्र त्या माणसांच्या चेहृयावरचा ताण जाऊन किंचित हसू उमलले. आणि घडाघडा संबलपुरी उडिया भाषेत त्यांनी नवर्याला जे सांगितले ते मला अजिबात कळले नाही. पण त्याचा अर्थ असा होता की इथला ब्रिज खचला आहे आणि बाजुची काही झाडं तोडुन एक मातीचा खडबडीत रस्ता केला आहे त्यावरून जायचे आहे. फक्त काही मिटर असल्याने आणि आमची गाडी फार मोठी नसल्याने ती सहज जाईल. आम्ही दोघेही विश्वास ठेवावा की नाही अशा द्वंद्वात एखाद क्षण होतो इतक्यात त्या बाजूच्या रस्त्यावरून एक सेडान गाडी आली. त्यामुळे आम्हालाही धीर आला आणि आम्ही तो मातीचा रस्ता पार करून पुन्हा एकदा डांबरी रस्त्यावर लागलो.

शेवटी एकदाचे जंगलातले ते ११८ किमी संपले आणि आम्ही सोहेला गावाजवळ उजवीकडे वळून पुन्हा एकदा NH6 वर पोचलो. इथला रस्ताही खराब होता पण थोड्याच अंतरावर चांगला चौपदरी रोड सुरु झाला तो पार संबलपूर पर्यंत होता. रात्री रहाण्यासाठी आम्हाला संबलपूर मध्ये घुसावे लागणार होते. महानदीच्या गर्द काळोखाला उजवीकडे टाकत आम्ही बरेच शोधत शोधत संबलपुरच्या हॉटेलमध्ये पोचलो. इथल्या माणसांचे आदरातिथ्य पाहून एकाकी अंधार्या जंगलातून पुन्हा माणसात आल्याची भावना झाली! इथे आम्ही सुमारे साडे दहा वाजता पोचलो. इतका उशीर होईल हा अंदाज आला असल्याने रायपुर सोडल्यावर रस्त्यातूनच फोन करून हॉटेल बुकिंग आणि जेवण ऑर्डर करून ठेवले ते चांगले झाले.

तिसर्या दिवशी फक्त ३०० किमीचा प्रवास होता. त्यामुळे आरामात साडेनऊला निघालो. खाली येऊन काचा वगैरे साफ केल्या, काल वायपरचे पाणी संपले होते ते भरले. इतक्यात बाजुची एमएच नम्बरची गाडी दिसली! अर्थात त्यांच्याशी बोललोच. ते बंगाली कुटुंब पुण्यावरून कोलकत्याला निघाले होते. आपण NH6 मधेच स्किप केला तो चांगला होता की खराब ही एक उत्सुकता आम्हाला होतीच त्यामुळे त्यांना कालच्या रस्त्याबद्दल विचारलेच. तो NH6 वरून आला होता आणि वैतागला होता, म्हणे तिथे रस्ताच नव्हता, नुसते खड्डेच होते. तो आमच्याही खूप नंतर पोचला होता. मग आम्ही आमच्या रस्त्याबद्दल त्याला सांगितले आणि निघालो.

आजचा रस्ता अगदी आनंददायक होता. दुतर्फा घनदाट जंगल, सकाळचे सोनेरी ऊन आणि मस्त फ्रेश हवा ! NH42 रस्ता दुपदरीच असला तरी जास्त वाहानं नव्हती शिवाय खड्डेही नव्हते! या जंगलातुन मात्र संध्याकाळी उशिरा / रात्री प्रवास करणे धोक्याचे आहे. कटक जवळ NH5 घेऊन अतिविस्तिर्ण अशी महानदी पार केली. आणि भुवनेश्वर मध्ये पोहोचलो. अडीच दिवस आणि एकुण सुमारे १८०० किमी पार करून दुपारी तीन वाजता जेवायला घरात होतो!


काही नोंदी -
- गाडी असल्याचा मोठा ़फायदा म्हणजे कॅमेरा अाणि लेन्स घेता अाल्या पण मुक्कामी वेळेवर पोचायची गरज असल्याने फोटोसाठी जास्त थांबले नाही .
- पुर्ण वेळ तिघेही सीटबेल्ट लावूनच गाडी चालवली.
- लेकीसाठी एक मोठी उशी, पांघरुण, एक मोठे कापड बरोबर घेतले होते. उशी असल्याने सीटबेल्ट लावूनही ती व्यवस्थित झोपू शकली. कापडाने उन्हाच्या वेळेस मागच्या सीटसाठी सावली करता आली.
- गरजेची सगळी औषधे, कोरडा खाऊ , ज्युस, पाण्याच्या बाटल्या होते, पण कोरडा खाऊ फारसा संपला नाही. ज्यूस कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवून गार करून पिता आले.
- कार बॅटरीवर चालणारा हवेचा पंप घेतला ( गरज लागली नाही पण स्टेपनी बाहेर कशी काढायची याची माहिती करून घेतली नव्हती, जे अतिशय चुकीचे होते. परतीच्या प्रवासात ही चूक केली नाही)
- मोठी , दुरवर प्रकाश पोहोचेल अशी टॉर्च होती, २४० व्होल्ट कन्वर्टर मागवला होता पण तो निघेपर्यंत पोचलाच नाही.
- माबोवर विचारुन बरीच नवी जुनी गाणी घेतली होती, त्यामुळे लेकीला मजा आली. या प्रवासात एरवी आम्ही ऐकत नाही अशीही गाणी तिने ऐकली आणि एन्जॉय केली.


XUV500 बद्दल -
- अतिशय कम्फर्टेबल गाडी
- दिवसभर बसूनही कोणालाच पाठीचा , गुढग्याचा त्रास झाला नाही. ( अडिचाव्या दिवशी पोहोचल्यावरही अजिबात थकवा नव्हता)
- सुमारे ९५०० किमी झाल्यावर गाडी एकदम जास्तच स्मूथ वाटायला लागली आहे ( आत्ता रीडिंग १२४०० आहे )
- हेडलाईट एकदम पॉवरफुल. तीव्र वळणावर जास्तीचा हेडलाईट लागतो ते सुरुवातीला कन्फ्युजिंग वाटते म्हणजे अचानक दुसरी गाडी आली की काय असे वाटते पण सवय झाल्यावर फार उपयोगी आहे.
- त्रुटी किंवा मिसिंग फिचर म्हणजे सीट अ‍ॅडजस्टमेंटचे दोन प्री सेट असायला हवेत. म्हणजे एक बटन दाबले की सेट केलेली उंची, मिरर पोझिशन, स्टेरिंग पोझिशन आपोआप येईल. दर दोन तीन तासांनी ड्रायवर बदलल्यावर सीट, मिरर अ‍ॅडजस्ट करावे लागते. ( ऑडी मध्ये असे फिचर आहे म्हणे )
- माझ्या उजव्या हाताला रेस्ट मिळत नाही. नवर्याला हा त्रास जाणवत नाही. नेहेमीच्या प्रवासात मलाही जाणवला नव्हता. दुरवरच्या प्रवासात जाणवला.
- महत्वाचा मुद्दा ज्याबद्दल सगळेच विचारतात - मी जाताना सुमारे ८०० किमी आणि येतानाही तेवढेच चालवले. रात्री आणि डिवायडर नसलेल्या रोडवर माझा स्पीड थोडा कमी होतो.

Posted by Swapnali Mathkar at 3:08 AM 1 comments
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: XUV500, पश्चिमेकडुन पूर्वेकडे, प्रवास, भटकंती, भुवनेश्वर, लेखन

Tuesday, July 15, 2014

तीन बालकथांची चित्रमय पुस्तके

मनोविकास प्रकाशन तर्फे माझी तीन बालकथांची चित्रमय पुस्तके प्रकाशित झाली अाहेत. आजच्या महाराष्ट्र टाईम्स , संवाद पुरवणीमध्ये या पुस्तकांबद्दल वाचता येईल. या तिन्ही पुस्तकासाठी Rijuta Ghate (ऋजूता घाटे) यांनी अतिशय सुंदर आणि गोंडस चित्रे काढलेली अाहेत. या पुस्तकांबरोबर पुस्तकातल्या कथांवर आधारित चित्रांचे रंगीत स्टीकर देण्याचा एक नवा प्रयोग प्रकाशकांनी केला आहे .

पुस्तकांची नावे कापसाची म्हातारी, शिंगवाला उंदीर आणि कुनीदेशातल्या कथा अशी असुन ही पुस्तके पुस्तकांच्या दुकानात उपलब्ध आहेत तसेच मायबोली सारख्या वेब्साईट्स वरूनही उपलब्ध होत आहेत.



ही तीनही मायबोलीच्या खरेदीविभागातून विकत घेता येतील.

https://kharedi.maayboli.com/shop/kapasachi-mhatari.html

https://kharedi.maayboli.com/shop/kunideshataly-katha.html

https://kharedi.maayboli.com/shop/shingawala-undir.html
















Posted by Swapnali Mathkar at 2:02 AM 2 comments
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: कापसाची म्हातारी, कुनीदेशातल्या कथा, बालकथा, शिंगवाला उंदीर

Friday, March 14, 2014

मदर्स ऑफ नॉर्थ ईस्ट - स्लाईडशो, ठाणे

पूर्वांचलातल्या आमच्या प्रवासाचे अनुभव आणि तिथे भेटलेल्या कर्तबगार स्त्रियांच्या कार्यावर  आधारीत  स्लाईडशो 'मदर्स ऑफ नॉर्थ ईस्ट'. 
ठिकाण - कलाभवन, बिग बझार जवळ, कापुरबावडी, ठाणे
तारीख / वेळ - १६ मार्च २०१४, संध्याकाळी ५:३० वाजता 
प्रवेश विनामूल्य असला तरी आपली जागा आरक्षित करणे जरुरी आहे.  
९७०२५५२२३३ किंवा ९८१९९७७९०८ या  नंबरवर फोन करून जागा आरक्षित करता येईल.  



Posted by Swapnali Mathkar at 7:55 PM 0 comments
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: मदर्स ऑफ नॉर्थ ईस्ट, स्लाईडशो

Monday, March 10, 2014

मॅग्निट्युड ९.० (तीन वर्षांनी)


११ मार्च २०११ रोजी जपानमध्ये झालेल्या भूकंप आणि त्सुनामीला आज तीन वर्षे पूर्ण झाली.  त्यावेळी मायबोली या वेबसाईटवर हा लेख लिहीला होता. आज तीन वर्षांनी तिथले बदल थोडक्यात  टिपून हा लेख इथे पुन्हा देत आहे.


--------------------------------------

दिवस - ११-मार्च-२०११
स्थळ - तोक्यो
१३:३०
ऑफिस मध्ये सेमिनार होतं. साधारण दीडशे बाहेरचे लोक शोरूम मध्ये आलेले. बॉसने माझे नेहेमीचे काम सोडून मला सेमिनारचे फोटो काढायला सांगितलं. आवडीचं काम पण नेहेमीचा कॅमेरा नव्हता म्हणून त्याचा एस ९५ घेतला. नेहेमीचा कॅमेरा नसल्याचं वाईट वाटलंच पण ते किती बरं झालं ते नंतर कळलंच
१४:४६
जरा हलतेय का बिल्डींग ? असं वाटलं. तसही मला खूप लगेच भूकंप जाणवतो. मी बोलेपर्यंत सगळ्यांनाच जाणवलं. बिल्डींग आधी हळूच झुलायला लागली मग काही सेकंदात जोरजोरात गोलाकार घुमायला लागली असं वाटलं. शोरूम मधली प्रोडक्ट्स सगळी धडधड खाली पडली. तरीही कोणी किंचाळल नाही. सगळे खुर्च्या सोडून खाली बसले. बिल्डिंगची रोटेशन जरा कमी झाली असं वाटतंय तोच एकदा जोरदार धक्का बसला. माझ्या डोक्यावरच असलेले वरचे लाईट्स साठी सिलिंग मधे असलेले दरवाजे खाड खाड उघडले आणि बिल्डिंग वरखाली धडाधडा हलायला लागली. एकदम रफ धावपट्टीवर विमान उतरताना कसं वाटतं तसच काही सेकंद वाटलं. मग बहुधा भूकंप थांबला पण बिल्डीगचे झुलणे हळूहळू होत होते. भूकंपामध्ये टिकाव धरण्यासाठी विशिष्ठ रचना केलेली असल्याने ते कमी व्हायला जास्त वेळ लागतो.
१४:४६ नंतर दोन तीन मिनिटे.
सगळे जरा उभे राहिले. बॉसने येऊन मला याचे व्हिडियो शुटींग नं करण्याबद्दल विचारलंच. तर मी त्या पडलेल्या सामानाचे फोटो काढले. अजुनही समोरच्या बिल्डिंग जोरदार झुलताना दिसत होत्या. आमच्या बिल्डिंगमधल्या सिक्युरिटीने तिथेच थांबायची अनाउन्समेंट केली. म्हणून तसेच थांबलो.
१४:४६ दुसऱ्या धक्क्यांम्तर अजून काही मिनिटे
डेस्क जवळ परत आले. नवर्याचा फोन लागेना.डेकेअरचा फोन लागेना. नेटवर बघितलं तर इवाते का कुठेतरी जपानी स्केलवर ७ दिसलं. सात म्हणजे इथे सगळ्यात जास्त !! म्हणजे भयानक काहीतरी झाल्याचा अंदाज आला. तोक्यो जपानी स्केल ५प्लस दिसलं. त्सुनामीची वॉर्निम्ग दिसली. नवऱ्याचा इमेल आला त्याला उत्तर दिलं आणि लगेच मायबोलीवर मंजिरीसाठी एक मेसेज टाकला. तेवढ्यात माझ्या बरोबर काम करणारा आत आला. तो जिन्यांवरून ११व्यामजल्यावर आला आणि खूप घाबरलेला दिसला. त्याने सांगितलं आत्ताच्या आत्ता खाली चला. या बिल्डीगला तडे गेलेत. तेवढ्यात पुन्हा एकदा तसाच व्हर्टिकल धक्का बसला आणि पुन्हा आमचे विमान लँड झालं. तेवढ्यात बिल्डिंग वाल्यांनी अनाउन्समेंट केली कि बाहेर जा.
नवऱ्याला एक इमेल टाकला आणि खाली निघालो. इतक्या टेन्शन मध्ये सुद्धा आमच्या स्टाफ ने सगळ्या १५० लोकांना जिन्याने सावकाश उतरायला मदत केली. कोणीच धक्काबुक्की धावपळ केली नाही. म्हातारे लोकही होते ते हळू हळू उतरले तरी त्यांच्या मागचे सगळे सावकाशीने खाली गेले.विचार केला तर १५० बाहेरचे आणि १५ स्टाफ असे १६५ लोक एका शोरूम मधे. एकच एक्झिट होतं. सगळे घाबरून धावायला लागले असते तर?
१५:२०
खाली उभे होतो. कोणाचेच फोन लागत नव्हते. सगळे टेन्शन मध्ये खाली उभे होते.
१५:३०
बिल्डिंग सिक्युरिटीने चेक करून सगळं सेफ असल्याचे सांगितलं. आणि बाकीचे सगळे लोक वर पुन्हा जायला लागले. माझा ऑफिसचा वेळ संपला असल्याने मी निघायचा विचार केला. पण नक्की कसे जावे हे कळेना. ट्रेन बंद असल्याचे कळलेच होते. इथून निघाले तर नंतर नवऱ्याशी काही सम्पर्क राहणार नाही म्हणून सरळ घरी जायला होत नव्हतं. मग त्याच्या ऑफिस पर्यंत चालत गेले. आणि तिथे खाली त्याला शोधले पण त्यांना खाली जायची ऑर्डर नव्हती. आणि फोनही लागत नव्हते.
१६:१०
फोन लागत नाही म्हणून तोक्यो स्टेशन मधे पब्लिक फोन शोधायला गेले. तर स्टेशन पूर्ण भरलेले. अजूनही मला कुठे काय किती झालेय याची फारशी कल्पना नव्हतीच. पण इथे अंदाज आलाच. फोनला खूप मोठी लाईन. तेवढ्यात थोडस इंटरनेट चालू आहे असे वाटले. म्हणून नवऱ्याला इमेल केला पण तो गेलाच नाही. नेट बहुतेक ब्लॉक झालं. मग पुन्हा त्याच्या ऑफिस मधे चालत गेले.
१६:५०
नवऱ्याला फोन करुन खाली बोलावले. त्याला अजून काम होतं पण बहुतेक त्याला बाहेरच्या गर्दीचा अंदाजही नव्हता. शेवटी खाली आला तो आणि आम्ही निघालो.
१७:००
बसने जाण्यासाठी बसच्या थांब्यावर गेलो तिथून रांगेचा शेवट शोधात निघालो. दोन रस्ते पार करून गेल्यावरही शेवट दिसेना तेव्हा तो नाद सोडून एका टॅक्सीच्या रांगेत उभी राहण्याची चूक केली. बराच वेळ उभे राहिल्यावरही अजून काही शे मीटर रांग होतीच.
१७:३०
चालत घरी जायचा निर्णय घेतला. स्टेशन मध्ये जाऊन पाणी घ्यावे असा विचार करून गेले तर सगळी दुकाने सामान संपल्याने बंद! शेवटी एका वेंडीग मशीन मध्ये पाणी मिळाले.
मग एका ठिकाणी फोन बुथ शोधून रांगेत उभे राहिलो. लेकीच्या डेकेअर मध्ये फोन लावला. तिथे सगळे आलबेल असेल अशी खात्री होतीच त्याप्रमाणे होतेच. तिथे लोकांना , मुलांना ट्रेन केलेलं असतंच त्याप्रमाणे सगळे मध्ये येऊन एकाजागी बसले. डोक्यावर काही पडणार नाही याची काळजी घेतली. इमारतीला काही झालं तर मुलांना पालकांनी कुठे भेटायचं हे ही सांगून ठेवलेलं असतंच. पण सगळे डेकेअरमध्येच होते. त्यामुळे काळजी नव्हती. त्यांनी मुलांना रात्रीचे जेवण वगरेही दिले.
१८:००
चालायला सुरुवात केली रस्त्यात प्रचंड गर्दी. पण तरी सगळे शांतपणे चालत होते.त्याच्या फोनवर नेट चालू होतं म्हणून रस्ता शोधायला जीपीएस उपयोगी पडलं. रस्त्यात सगळ्या गाड्याही थांबल्या होत्या. काही ठिकाणी दिवे नसल्याने अंधारही होता.
२१:००
लेकीला डेकेअर मधनं घेतलं. सगळ्या सेन्सेईचे हजारवेळा आभार मानले. काही सेन्सेई आज तिथेच रहाणार होते. अजूनही काही पालक पोचले नव्हते. सगळ्यांची चौकशी करून घरी आलो. दरवाजा उघडताना धाकधूक होती काय्य काय पडलं असेल असा विचार करत होतो. पण नशिबाने सगळं ठीकठाक होतं. कुठे काही पडलं नव्हतं. आल्यावर सगळ्यात आधी टीव्ही लावला आणि मग काय प्रचंड उत्पाथ झालाय याची कल्पना आली.
रात्री १ पर्यंत
बराच वेळाने घरी आणि इतर काही मैत्रिणीशी सम्पर्क झाला. बातम्या बघून भयंकर वाटत होतं. मध्येच केव्हातरी भूकंपाचे धक्के बसतच होते. रात्री झोपायला गेल्यावरही झोप येतच नव्हती बाहेरचे लाईट चालू ठेवले. ईव्हेंक्यूएशन ब्याग तयार करून दरवाजाजवळ ठेवली. कुठे जायचं त्याचा म्याप आधीच सिटी ऑफिस ने दिलेला तो काढून ठेवला.
चित्र- इंटरनेट वरून साभार ( भूकंप धक्क्यांची केंद्रे, पिवळा गोळा म्हणजे मुख्य धक्का ) 

चित्र- इंटरनेट वरून साभार


दुसरा दिवस सकाळ:
उठून आधी बातम्या लावल्या. पुन्हा अजून जास्त डीटेल्स आले होते. खेळण्यासारख्या दिसणाऱ्या गाड्या आणि बोटी वाहून जाताना बघायला भयानक वाटत होतं. गावच्या गावे अक्षरश: वाहून गेली होती.
सकाळीच दुकानात जाऊन थोडं आठवडयाच सामान आणलं. थोडं रेडी टू इट पण आणून ठेवलं. लाईट , ग्यास गेले तर काय खाणार असा विचार करून. सकाळीच हे सगळे करणे किती उपयोगी होतं ते कळलंच नंतर. नंतर सगळ्या दुकानात खडखडाट झाला होता.
पुन्हा एखादा धक्का बसत होताच. मध्येच केव्हातरी टीव्हीवर टिंग असा आवाज होऊन येणाऱ्या भूकंपाची नोटीस यायची आणि काही सेकंदात पुन्हा धक्का.
एका जवळच्या मैत्रिणीच्या आईबाबांचे घर सगळे वाहून गेले पण आईबाबा सुखरूप आहेत असंही कळलं.
दुसरा दिवस दुपार:
मला पहिल्यांदा अणुभट्टीची बातमी काहीच क्षण  टीव्हीवर दिसली . सगळ जपानी मध्ये असल्याने सुरुवातीला नीट कळत नव्हती. मग एका मैत्रिणीला भाषांतर करायला सांगितलं. तिने बऱ्याच गोष्टी सांगितल्या.
आधी फुकुशिमा दाई इची १बान मधे एक स्फोट झाला आणि धूर आला असा एक व्हिडियो टीव्हीवर दिसला. तो दोन वेळा दाखवल्यावर गायबच झाला. त्यामुळे जरा टेन्शन आलं. की नक्की काय लपवत आहेत ते कळेना. तो व्हिडियो नंतर दुसऱ्या दिवशी पर्यंत दाखवला नव्हता. शिवाय थोड्या वेळाने अजून एक फोटो. त्यात सकाळी ९ वाजताच्या फोटोत त्या प्लांट ची इमारत दिसत होती तर दुपारी चार च्या फोटोमधे फक्त त्याचा सांगाडा दिसत होता. मग बऱ्याच उलट सुलट इंग्रजी बातम्या, अनालिसीस वगरे ऐकून शेवटी संध्याकाळी एदानो यांची प्रेस कॉन्फरन्स झाली. त्यांनी स्फोट झाल्याची बातमी दिली. आणि आधी ३.५ किमी मध्ये धोका असल्याचे सांगितलं. नंतर ते १० किमी केलं. खरंतर हे प्लांट भूकंप झाल्यावर आपोआप थांबले होते. लाईट गेल्यावर बॅकअप डिझेल पॉवर वर शिफ्ट झाले होते. पण नंतर आलेल्या त्सुनामीने डिझेल पॉवर सप्लाय खराब झाला आणि प्लांटचे तापमान प्रचंड वाढले.
पुढचा सगळा वेळ टेन्शन मध्येच गेला. आता भूकंपाची भीती नव्हती फारशी. पण रेडीएशनचे काय ते कळत नव्हते.
रविवारी अजून एका रीअ‍ॅक्टर मध्ये स्फोट झाला आणि आग लागली. रेडीएशन थोडावेळा पुरते वाढले. आणि पुन्हा कमी झाले. आता २० किमी मधल्या लोकांना बाहेर काढलं आणि ३० किमी मधल्या लोकांना शक्यतो घरातच राहून ए.सी वगरे सगळे बंद ठेवायला सांगितले.
सगळ्या एव्हेक्युएट केलेल्या लोकांना खायला प्यायला फारसे मिळत नव्हते. एखादी ओनिगिरी, एक डोनट, एक बाटली पाणी असे जेवण. काही ठिकाणी थोडी बरी परिस्थिती होती तिथे सूप किंवा नुडल्स शिजवून मिळत होते. अशा परिस्थितीतही लोकं प्रत्येकी एक बेन्तो आणि एक बाटली पाणी हे आपले आपण घेत होते. उगीच कुनी खेचाखेची नाही. ओरबाडून घेणे नाही. कोणाची फारशी तक्रार नाही.
सतत काही तासांनी प्राईम मिनिस्टर कान किंवा एदानो यांची प्रेस. कॉन्फ असायची. काय करणार आहेत. काय परिस्थिती आहे याबद्दल ते नीट उत्तरे द्यायचे. शिवाय तोक्यो इले. पॉवर कंपनी काय करतेय, तिथे लोकं कसे प्रय्तन करत आहेत हे सांगायचे.
११तारखेचा भुकंप ९.० रिश्टर स्केलचा होता ही बातमीही आली. आधी ८.९ चा सांगितला होता.
अजुन साधारण १०००० लोकांचा ठावठीकाणा कळत नव्हता. साधारण ३००० मृत घोषीत केले होते. घरे, आणि इतर वित्तहानी तर अपरिमित होती.
आम्ही सगळा वेळ बातम्या बघण्यामध्ये बिझी असल्याने लेक प्रचंड वैतागलेली होती. त्यात मध्ये मध्ये येणारे भूकंपाच्या सुचना आणि काम थांबवून एका जागी बसणे यामुळेही तिला जरा भीती वाटत होती. तिच्या खेळातही , ब्लॉक्स च्या खेळण्यातही ती भूकंप भूकंप खेळत होती. बघून वाईट वाटत होतं, पण इथल्या सगळ्याच मुलांना असंच वाटणार ना!
सोमवार १४ मार्च-
नेहेमीसारखेच ऑफिसला गेलो. नेहेमीची कामं सुरु केली. पॉवरसेव्हिंग करण्यासाठी एलेव्हेटर, एस्कलेटर बंद होते. पण कुठे कोणाची तक्रार चिडचिड दिसलींच नाही. ट्रेनही बऱ्याच बंद होत्या. किंवा खूप कमी फ्रिक्वेन्सीने चालत होत्या. प्लेटफॉर्मवर जायला इतकी गर्दी होती कि रांगा अगदी पायऱ्या चढून वर तिकीट गेट्स च्या बाहेर आल्या होत्या. पण लोक शांतपणे रांगेत उभे होते.
ऑफिसमध्ये आवराआवरी करत असतानाच अजून एक भूकंपाचा धक्का बसला. त्या नंतर बॉसने ऑफिस चे शोरूम् आठ दिवस बंद ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी ऑफिस बंद ठेवायचा निर्णय घेतला.
ही अनिश्चितता बघून मग आम्ही दोघेही फोनवर बोललो. थोडे दिवस भारतात राहूयात का असा विचार करायला लागलो. हं निर्णय फारच कठीण होता. शिवाय सगळे आमचे जपानी मित्र मैत्रिणी इथे असताना सगळ्यांना सोडून जाणे पटत नव्हते. शेवटी रात्री पुन्हा एकदा बोलून निर्णय घ्यायचे ठरवले.खरंतर घरातूनही लेकी साठी प्रेशर येत होतं कि लगेच परत या.
घरी येऊन मंजिरी आणि नेरीमाशी बोलले. त्यांनीही सांगितले कि त्यांच्या ओळखीचे काहीजण परत जात होते. मग पुन्हा नवऱ्याला फोन केला तर त्याने नुकतेच तिकीट बुकही करून टाकलेले. त्या एजंटने सांगितले कि लगेच बुक केलेत तर १६चे मिळेल नाहीतर मग १८ /१९ चे मिळेल. हे ऐकून त्याने लगेच बुक करून टाकले. हा निर्णय घेतल्यावर रात्री दोघेही झोपू शकलो नाही. फारच वाईट वाटत होतं.
टीव्ही वरच्या बातम्या चालूच होत्या. आता बातम्यांचे स्वरूप जरा बदलून रेस्क्यू ऑपरेशन्स आणि इतर गोष्टी दाखवत होते.
मंगळवार १५ मार्च -
आज ऑफिस नव्हतेच. पण मग इतर लायब्ररीची पुस्तके परत देणे. नर्सरी मध्ये जाऊन सांगणे अशी कामं केली.सगळया भाज्या दुध वगरे नर्सरी मध्ये नेऊन दिले म्हणजे फुकट जाणार नाही. नर्सरी मध्ये सेन्सेईना वाईट वाटलं. आणि त्याहून जास्त वाईट मला वाटलं. पण शेवटी निर्णय घेतलेला होता. काही जपानी लोकही हिरोशिमा, किंवा ओसाका अशा लांबच्या शहरात निघाले होते.
पुन्हा मध्येच तोक्यो मध्ये थोडं रेडीएशन आढळल्याची बातमी आली. आजही प्रेस. कॉन्फ झाली.
दुपारी एअरपोर्ट वर जाण्यासाठी काही उपाय मिळत नव्हता. बसेस बंद होत्या. ट्रेन बंद होत्या. शेवटी एका ठिकाणी प्रीपेड टेक्सी केली.
संध्याकाळी एक मोठा भूकंपाचा धक्का बसला. तोक्यो मधेही बऱ्यापैकी जोरात वाटला. हा धक्का शिझुओका मध्ये होता. तिथेही थोडीफार हानी झाली.
बुधवार १६ मार्च -
सकाळ पासून धावपळ करतच होतो. साडे दहा वाजता ठरल्या प्रमाणे गाडी आली आणि आम्ही निघालो.
रस्त्यात गर्दी असेल असं वाटलं होतं. पण अजिबातच नव्हती. त्यामुळे लवकर पोचलो. आत घुसल्यावर मात्र क्षणभर दचकायलाच झालं. खूप गर्दी. बरेच लोकं पथारी पसरून चक्क झोपले होते. काही फ्लाईट्स कॅन्सल झाल्या होत्या.
तिथे पोचल्यावर थोड्याच वेळात पुन्हा एक भूकंप झाला. हाही वरखाली होणारा धक्का होता.
विमान वेळेवर सुटेल का याची जराशी धाकधूक होती. चेक इन आणि सिक्युरिटीसाठी प्रचंड मोठ्या रांगा होत्या. वेळेवर सगळं होऊन विमानात बसलो. टेक ऑफ झाला आणि थोड्यावेळाने किंचित टर्ब्युलन्स आला. तसं लेकीची पहिली रिएक्शन "ममा, भूकंप!"
गुरुवार १७ मार्च-
आमच्या परतण्याने घरातले सगळेच खुश!
दुपारी खेळताना लेकीने एक बोट बनवली आणि सांगितलं कि नवीन प्रकारची बोट आहे ती त्सुनामी मध्येही बुडत नाही!

१० एप्रिल २०११
आम्ही पुन्हा तोक्योमध्ये परतलो.  बाहेरचे खाणे, पाणी, विशिष्ठ भागातल्या भाज्या इत्यादीवर निर्बंध ठेवले पण इतर रोजच्या आयुष्यात काहीच फरक नव्हता.   पण सगळ्यांचीच नजर सतत फुकुशिमा आणि तिथल्या घडामोडींवर होती.   काही आठवड्यांनी आधी दडपलेल्या पण वेगवेगळ्या बातम्या येऊ लागल्या. १५ मार्चला केवळ वाऱ्याच्या दिशेमुळे तोक्यो बचावले होते ही त्यातलीच एक बातमी. किती खरे किती खोटे कोण जाणे. पण त्यादिवशी वारा तोक्योच्या दिशेने वाहात असता तर तोक्योमध्ये किरणोत्सर्ग खूप वाढला असता म्हणे. तोक्योसारखे शहर रिकामे करणे ही कल्पना सुद्धा शक्य नाहीये.      
अनेक गोष्टी लिहायच्या राहिल्यात.पण जसे आठवले तसे लिहीले.
इतक्या सगळ्या आपत्तीमधेही लक्षात रहाण्यासारख्या गोष्टी म्हणजे जपानी लोकांची सहनशीलता, आणि कुठल्याही परिस्थितीमधे नियम न तोडता रहाण्याची शिस्तप्रियता!
कुठच्याही दुकानात कुठेही लुटालूट नाही, कुठेही उगाच धक्काबुक्की नाही, उगाच दुसर्‍याला, सरकारला दोष देणे, आक्रोश करणे नाही.
जपान च्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशुन केलेल्या भाषणात दुसर्‍या महायुद्धा नंतरचा हा सर्वात कठीण प्रसंग आहे असे सांगुन लोकांना सहकार्याचे आवाहन केले.
आता परवाच कुठल्यातरी वर्तमान पेपर मधे वाचले की हे नुकसान भरुन काढायला अमुक वर्षे लागतील, इतके मनुष्यबळ लागेल वगैरे वगैरे. पण मला मनापासुन खात्री आहे की जपान लवकरच हे नुकसान भरुन काढून पुन्हा ती राख झालेली सगळी घरं तशीच्या तशी उभी करेल. आणि गेलेल्या माणसांच्या स्मृती मनात जपुनही पुन्हा एकदा जपान आपलं अस्तित्व सिद्ध करेल.  हे देशप्रेम, हि मानसिकता या लोकांनी कुठून आणली असेल?
-----------------------------
११ मार्च २०१४ 
आम्ही २०१२ मध्ये मुलीच्या शिक्षणासाठी परत भारतात आलो.  आज जपानमध्ये सर्वकाही आलबेल आहे / असेल असे वाटतेय. पण तीन वर्षात फुकुशिमाच्या अपघातामुळे तिथल्या गावातून विस्थापित झालेले लोक अजुनही विस्थापितांचेच आयुष्य जगात आहेत. तिथल्या ओसाड गावांमध्ये  किरणोत्सर्गाचे प्रमाण अजुनही बरेच आहेत. लोक आपले व्यवसाय, शेती सर्व सोडुन रहात आहेत.  तिथल्या सरकारने माहिती दडपून ठेवली असे आरोपही करत आहेत.  इथल्या लोकांचा अणूउर्जेला तीव्र विरोध आहे.  आणि जपान मधल्या अनेक अणुभट्ट्या बेमुदत बंदच आहेत.  
यातून उर्वरित जग काय धडा घेणार आणि कशी पावलं उचलणार हे येणारा काळच ठरवेल.  


Posted by Swapnali Mathkar at 9:35 PM 0 comments
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: ११-मार्च-२०११, अणुउर्जा, जपान, त्सुनामी, भुकंप, मॅग्निट्युड ९.०
Newer Posts Older Posts Home
Subscribe to: Posts (Atom)

Total Pageviews

Copyright Protected

All content is copyright protected. You are not authorized to use, copy any content in any way without written permission from the Auther, Swapnali Mathkar. ब्लॉग कॉपीराईट अधिकार सुरक्षित
कॉपीराईट: स्वप्नाली मठकर
Copyright: Swapnali Mathkar
MyFreeCopyright.com Registered & Protected

About Me

Swapnali Mathkar
View my complete profile

Followers

Archives

  • ▼  2025 (3)
    • ▼  March (3)
      • Tadoba Pench Safari - 10-March
      • Tadoba Pench Safari - 9th March
      • Tadoba Pench Safari Photos - 8th March
  • ►  2015 (8)
    • ►  October (1)
    • ►  September (1)
    • ►  March (1)
    • ►  January (5)
  • ►  2014 (11)
    • ►  December (1)
    • ►  November (1)
    • ►  July (1)
    • ►  March (3)
    • ►  January (5)
  • ►  2013 (6)
    • ►  December (1)
    • ►  November (4)
    • ►  August (1)
  • ►  2012 (5)
    • ►  December (1)
    • ►  November (2)
    • ►  June (1)
    • ►  May (1)
  • ►  2011 (11)
    • ►  December (1)
    • ►  October (3)
    • ►  August (1)
    • ►  June (3)
    • ►  May (2)
    • ►  January (1)
  • ►  2010 (11)
    • ►  December (1)
    • ►  November (1)
    • ►  October (1)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
    • ►  July (2)
    • ►  June (4)

Categories

'फ' फोटोचा (2) ११-मार्च-२०११ (1) २०१० दिवाळी अंक (1) 2011 (1) 2014 (1) A Bomb Dome (1) Ameka Creations (1) Apple (1) Atomic Bomb (1) baby blue-eyes (1) Binny Yanga (1) bokeh (1) camera (1) collarwali (1) depth of field (1) Diwali Ank (2) Diwali Ank 2011 (1) Diwali Ank 2012 (1) Diwali Ank 2014 (1) dustproof (1) europe (1) fa fotocha (2) Four Elements (1) freezproof (1) hiroshima (2) hitachinaka koen (2) ikebaana (1) ISO (1) itsukushima (1) Little Boy (1) megapixel war (1) miyajima (1) Motherhood redefined (1) Nemophila (1) Paris (1) Pench (1) Photography workshop (1) rome (1) Safari (1) Second world war (1) Selection for photography exhibition in UK (1) shockproof (1) Steve Jobs (1) Tadoba (3) The Photo Saga (1) Tigress (1) Tulip (1) waterproof (1) XUV500 (1) अणुउर्जा (1) अणुबॉम्ब (1) असम (5) अ‍ॅपर्चर (1) आटोमीक बॉम्ब डोम (1) आयएसओ (1) इकेबाना (1) इतिहास (1) इत्सुकुशिमा (1) उपग्रह (1) उपग्रह प्रक्षेपण यान (1) एस एल आर (2) कापसाची म्हातारी (1) कास पुष्प पठार (1) कुनीदेशातल्या कथा (1) कॅमेरा (9) कॅमेर्‍याच कार्य (1) कॅमेर्‍याची काळजी (2) खरेदी (1) जपान (1) जपानी कला (1) जागतिक महिला दिन (6) ट्युलिप (1) ठाणे महापौर पुरस्कार (1) ठाणे महापौर पुरस्कार २०१० (1) डस्टप्रुफ (1) डेफ्थ ऑफ फिल्ड (1) डॉ. अब्दुल कलाम (1) ड्रोसेरा इंडीका (1) तंत्रज्ञान (1) तमसो मा ज्योतिर्गमय (1) तोरी (1) त्सुनामी (1) द फोटो सागा २०१४ (1) दवबिंदू (1) दिवाळी अंक २०१३ (1) दिवाळीअंक (1) दिवाळीअंक 2012 (1) नभा सावर सावर (1) नविन वर्ष (1) नेताजी सुभाषचंद्र बोस (1) नेमोफिला (1) पश्चिमेकडुन पूर्वेकडे (1) पारितोषिक (1) पूर्वांचल (6) पॅरिस (1) प्रकाशचित्रे प्रदर्शन (1) प्रजासत्ताक दिन परेड (1) प्रदर्शन (1) प्रवास (1) फिल्टर (1) फुलांची रचना (1) फोटोग्राफी (9) फोटोग्राफी कार्यशाळा (1) फ्रिजप्रुफ (1) बालकथा (1) बोके (1) भटकंती (1) भुकंप (1) भुवनेश्वर (1) मदर्स ऑफ नॉर्थ ईस्ट (1) मरीन ड्राईव्ह (1) महायुद्ध (1) मियाजीमा (1) मॅग्निट्युड ९.० (1) मेगापिक्सेल वॉर (1) मेघालय (5) मोईराङ (1) रोम (1) लेखन (1) विद्युल्लता (1) विद्युल्लता प्रदर्शन (1) विद्युल्लता प्रदर्शन 2014 (4) विमर्श (1) वॉटरप्रुफ (1) शटरस्पीड (1) शिंगवाला उंदीर (1) शॉकप्रुफ (1) समाज (1) सॅटेलाईट (1) स्टीव्ह जॉब्स (1) स्लाईडशो (1) हिरोशिमा (2)
©प्रकाशरानातून चालताना... ©Swapnali Mathkar
© Template Design by Template Lite
Thanks to Blogger Templates | Converted to Blogger by Falcon Hive.com | Distributed by Deluxe Templates