पूर्वांचल - मातृशक्तीचे विराट दर्शन - २
विमानतळापासून निघून गुवाहाटी मधल्या धुळ भरलेल्या रस्त्यामधून आमचा प्रवास सुरु झाला. मध्ये मध्ये दिसणार्या ओळखीच्या वास्तू, युनिवर्सिटी यांची माहिती आशिष आम्हाला देत होते. मधेच युनिवर्सिटीच्या गेटजवळ त्यांचा एक मित्र त्यांना भेटायला आला होता. अरुणजींनी माझ्याकडे एक जाडजूड पुस्तक दिले होते, जे मी पहाटेच आशिषकडे देऊन टाकले होते. ते पुस्तक घेण्यासाठी तो मित्र आला आणि त्याने काही गरम कपड्यांची एक पिशवी गाडीत देऊन ठेवली! न जाणो आम्हाला लागली तर म्हणुन!
विमानतळापासून निघून गुवाहाटी मधल्या धुळ भरलेल्या रस्त्यामधून आमचा प्रवास सुरु झाला. मध्ये मध्ये दिसणार्या ओळखीच्या वास्तू, युनिवर्सिटी यांची माहिती आशिष आम्हाला देत होते. मधेच युनिवर्सिटीच्या गेटजवळ त्यांचा एक मित्र त्यांना भेटायला आला होता. अरुणजींनी माझ्याकडे एक जाडजूड पुस्तक दिले होते, जे मी पहाटेच आशिषकडे देऊन टाकले होते. ते पुस्तक घेण्यासाठी तो मित्र आला आणि त्याने काही गरम कपड्यांची एक पिशवी गाडीत देऊन ठेवली! न जाणो आम्हाला लागली तर म्हणुन!
शहराच्या थोडं बाहेर आलो तसं धुळ कमी वाटायला लागली. रस्त्याच्या बाजूला बर्याच पाणथळ जागा जागोजागी दिसत होत्या. इथलं साठलेलं पाणी लालसर रंगाच दिसत होतं, बहुधा जमिनीत लोह जास्त असावं. त्या पाणथळ जागांच्या पलिकडे बांबूच्या झाडीमागे छोटी छोटी घरं. काही सिमेंटने बांधलेली, काही चक्क बांबूनी बांधलेली. सिमेंटच्या घरांना जमिनी पासूनचा दोन तीन फुटाचा भाग पूर्ण सिमेण्टचा तर वरचा थोडा वेगळा दिसत होता. बांबूची घर तर जमिनीपासून उंचावरच बांधली होती. खालची दलदल, प्रचंड पावसात साठणारे पाणी यापासून बचाव करण्यासाठी ही अशी घरं! मुख्य रस्त्यावरून घरांच्या बाजूला जायचं तर पाणथळ भाग ओलांडावा लागेल , त्यासाठी नाजुकसे, दिसणारे बांबूचे इवले इवले ब्रिज होते. दुरून बघताना सुंदर दिसत असले तरी त्यावरून चालत जायला धास्तीच वाटेल इतके नाजुक.
हळुहळू हे मागे टाकून आमची गाडी डोंगर चढायला लागली. थंडी थोडी वाढली आणि थोडे धुकेही जाणवायला लागले. या सगळ्याच रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरु होते. त्यामुळे प्रचंड धुळ होती. मला धुळीची एलर्जी असल्यामुळे तो त्रास पहिल्याच दिवशी उद्भवू नये अशी मनोमन विनवणी करत की नाकाला रुमाल बांधून ठेवला होता. दुपारच्या जेवणासाठी आम्ही 'नाँगपो' इथे थोडासा वेळ थांबलो. पहिल्याच दिवशी जेवायला कुठे थांबता येईल याची कल्पना नसल्याने आम्ही आदल्या रात्री करून आणलेले डबे उघडले. डब्यासाठी काय करून न्यायचे हे आमचे ठरले नव्हते पण योगायोगाने आम्ही तिघींनीही मेथी पराठेच नेले होते! मग तीन घरांच्या चवीचे पराठे आणि गरमागरम चहा घेतला. निघायच्या आधीच असम मध्ये रहाणार्या दोन मायबोलीकर मैत्रिणींचा फोन नंबर घेऊन ठेवला होता. मायबोलीवरून ओळख झाली असली की हक्काने आणि आपुलकीने बोलता येतं असा नेहेमीचा अनुभव. त्यापैकी एकीशी एअरपोर्टवरुनच बोलणं झालं होतं, इथे येऊन दुसरीशी बोलले. दोघींनीही अगदी आवर्जून काही मदत लागली तर हक्काने सांग असं बजावलं. मग थोडं आमचंच फोटोसेशन केलं आणि पुढे निघालो. इथे रस्तोरस्ती फळविक्रेत्या स्त्रियांच्या टपर्या दिसत होत्या. केशरी, गुलाबी हिरवट अशा रंगछ्टा असलेली अननसे जवळपास सगळ्याच ठिकाणी सजवून मांडुन ठेवलेली दिसली. प्रत्येक वळणावर काहितरी नवीन दिसायचं आणि आम्हाला थांबायची इच्छा व्हायची पण आमच्या पुढचे टारगेट रात्री लवकरात लवकर मेघालयात पोहोचणे हे होते. शिवाय ठाण्यातून निघतानाच आम्हाला स्ट्रिक्ट वॉर्निंग होती की उगाच कुठल्याही रस्त्यावर थांबून फोटोग्राफी करायची नाही. हे वेळ आणि सुरक्षा या दोन्ही दृष्टीकोनातून सांगितले असल्याने आम्ही तोंड बंद करून गुपचूप बाहेर बघत होतो.
हळुहळू थंडी वाढली, साडेचारलाच अंधार झाल्यासारखे वाटायला लागले आणि काही वेळात अगदी काळोख झाला. हिवाळ्यात इथे फारच लवकर अंधार होतो त्यामुळेच लवकरात लवकर पोचणे जरूर होते. मेघालयातला हा तसा घाटरस्ताच होता. बर्याच वेळाने आम्ही मुठलॉंगला पोहोचलो. रस्त्यावरून डावीकडे एका चढावावर गेटमधून गाडी आत शिरली. आणि एक अगदी तरुण हसतमुख मुलगा आमच्या स्वागताला येऊन उभा राहिला. तोमी सुचियाङ. आज आमचा मुक्काम याच्या घरी होता. आम्ही गाडीतून उतरलो आणि गारठलोच! बाहेर प्रचंड थंडी होती. गाडीत एकमेकाला चिकटून बसल्याने आम्हाला कोणालाच ती जाणवली नव्हती पण आता अगदी कुडकुडायाला लागलो. कसेबसे सामान घेऊन आत गेलो तर तोमीने पटापटा गरम कोळशाची शेगडीच समोर आणुन ठेवली आणि आम्ही सभोवती शेकायला बसलो. थोड्याच वेळात गरमगरम लाल चहा समोर आला आणि त्याच्या बरोबर राइस केक्स. लाल चहा म्हणजे कोरा चहा पण तितकासा उकळलेला नसतो त्यामुळे फारसा कडु लागत नाही. इथे दुधाची कमतरता असल्याने सगळीकडे असाच लाल चहा प्यायला जातो. उबदार शेगडीजवळ खात आणि चहा पीत आल्याआल्याच आमच्या गप्पा रंगल्या.
तोमी आणि हमकल्ला सोबत, अवघ्या काही मिनिटापूर्वी आम्ही अनोळखी होतो!
या फोटोत माझेही हात हवे होते असे राहून राहून वाटते
तोमीचे इलेक्ट्रोनिक्सचे दुकान होते. त्याचा मावसभाऊ 'हमकल्ला' तोही असाच अगदी हसतमुख आणि पोरगेलासा. हा मुलगा काही वर्ष ठाण्यात राहून शिकला होता आणि नंतर मेकॅनिकल इंजिनीअर झाला होता. त्याला थोडं मराठीही येत होतं ते पाहून तर आम्हाला फारच आश्चर्य वाटलं. पुढचे दोन दिवस तो आमच्या टिममधला, मराठी मुलगा म्हणुनच वावरत होता!. तितक्यात आतून तोमीची आई आणि हमाकल्लाची आई आली. दोघींची तोंडं पान खाऊन रंगलेली. आत्ताही त्यांच्या तोंडात पान किंवा सुपारी होतीच. आता पुढचे काही दिवस हे दृश्य आम्हाला सवयीचे करून घ्यावे लागणार होते म्हणा. त्यांच्या मागून लपत छपत आणखी दोन तीन वेगवेगळ्या वयाची मुलं आली. एक गोबर्या गोबर्या गालाची इवलीशी 'काका' आणि दुसरा अगदी उत्सुक डोळ्यांचा 'मेबानकिरी', आणि अजून एकजण नंतर पुढे आलाच नाही. ती तिघे वाकून चोरून आमच्याकडे बघत होते. मी हळुच खिशातून चॉकलेट्स काढुन त्यांच्या पुढे धरली आणि आमची थोडी गट्टी झाली म्हणजे भाषा तर फारशी समजत नव्हती पण त्यांची भिती मात्र पळाली.
हे घर हमकल्लाच्या आईचे आणि मावशीचे ! इथे मेघालयात एक अनोखी प्रथा आहे, मातृसत्ताक पद्धत. लग्न झाले की मुलगा आपल्या आईवडलांचे घर सोडुन बायकोच्या घरी रहायला येतो. घरात भरपूर मुलं असतात पण आईवडलांना सांभाळायची जबाबदारी सगळ्यात लहान लेकीची. त्याचे कारणही मजेदार! ती सगळ्यात लहान असल्याने जास्त दिवस आईबाबांकडे लक्ष देऊ शकेल म्हणून. मग रहाते घर तिच्या नावावर होणार. बाकीच्या मुलींनी आपापली घर बनवायची. मुलं आपली बायकोच्या घरी नांदायला जाणार. या एका कारणासाठी इथल्या लोकांचे मला फ़ारच कौतुक वाटले. आपल्याकडेही अशी प्रथा यावी असे मनापासून वाटले ते वेगळेच. पण इथे सहसा घरातली आणि बाहेरची , शेतीची कामेही सगळी बायकाच करतात. पुरुष फारसे काही काम करत नाहीत. आणि बायका अगदी धडाडीच्या , कणखर वाटल्या.
हे घर अतिशय सुंदर आणि नीटनेटके होते. आम्ही बसलो होतो त्या हॉलला मोठी काचेची तावदानं, त्याला सुंदर पांढरे लेसचे पडदे, समोरच्या भिंतीवर एक मोठे शोकेस होते. त्यात अनेक वस्तू, वेगवेगळे फोटो वगैरे ठेवले होते. त्यात एक मामाचा म्हणजे 'माहे' चा फोटोही होता. असा फोटो इथे सगळीकडेच असतो म्हणे. किचनमध्ये भांडी अगदी चकाचक आणि एकावर एक रचून ठेवलेली होती. चुलीवरचा धूर घराबाहेर निघून जावा म्हणुन उंच घराबाहेर काढलेले एक धुरांडे सगळीकडे असते. नंतर आम्हाला कळले की इथे सगळ्यांचीच घरे अशी सुंदर आणि नेटकी असतात.
थोडा वेळाने मला आठवलं की मघाशी गाडीतून उतरलो तेव्हा आकाश अतिशय सुंदर, खचाखच चांदण्यांनी भरलेलं दिसत होतं. आपल्याकडे शहरात इतक्या चांदण्या कधीच दिसत नाहीत पण तिथे अक्षरश: चांदण्याचा सडा पसरला होता. तेव्हाच याचा फोटो काढूयात असे वाटले पण इतक्या थंडीत कॅमेरा बाहेर काढला नव्हता. आता त्या आकाशाचा फोटो काढायला म्हणुन मी बाहेर निघाले तर हमकल्ला म्हणाला की आपण गच्चीवर जाऊन पाहू. घराचे वरचे बांधकाम अजुनही चालू होते, शिडीवरून वगैरे जावे लागणार होते. मग मी, वेदिका , हमकल्ला हातात ट्रायपॉड, कॅमेरा घेऊन वर निघालो. घराच्या मागच्या भागात गुडुप्प अंधार, तिथेच ती शिडी लावली होती. आता विचार केला तर आश्चर्य वाटेल पण आम्ही बिनधास्त त्या आताच तासाभरापूर्वी भेटलेल्या मुलांवर विश्वासून आणि त्यांचाच हात पकडून ती शिडी चढुन वरच्या दाट अंधार्या मजल्यावर गेलो. पण इथल्या या मुलांनी इतक्या पटकन आपलेसे केले की असा काही विचार करावासा वातालाक नव्हता. तिथल्या सिमेंट आणि इतर गोष्टीमधून अंधारातच वाट काढून उघड्या गच्चीत पोचलो. आमच्या मागोमाग कुमार आणि इतरही आले. भराभरा ट्रायपॉड लावला, कॅमेरा लावून तो वर वळवणार इतक्यात आकाशाकडे लक्ष गेले. हाय रे देवा! आकाश राखाडी ढगांनी आच्छादले होते. अगदी एखादीही चांदणी दिसत नव्हती! फोटोग्राफीमध्ये एखादा क्षण वाया घालवला तर तो पुन्हा येत नाही हे पुन्हा एकदा जाणवले. तो ट्रायपॉड काढून आमची वरात पुन्हा खाली आली.
आम्ही खाली आलो तोपर्यंत जेवण तयार झाले होते. आम्ही थेट किचनमधेच गेलो. इथे पुर्वांचलात मांसाहारी जेवण नेहेमीचे आहे आणि बर्याच प्रकारचे प्राणी खाल्ले जातात. त्यामुळे आमही सगळेच जण पूर्ण शाकाहारी आहोत असेच सांगितले होते. आज जेवायला लाल तांदळाचा भात, वरण आणि दोन तीन प्रकारच्या भाज्या होत्या. शिवाय तोमीची आई किचनच्या मधोमध एक स्टोव्ह ठेवून त्यावर बटाट्याच्या सळ्या तळत होती. त्या स्टोव्हच्या उबेत बाकी काही जण आणि छोटी काका , तिचा भाऊ वगैरेही होते. संजय आणि आशिष सोडले तर आमच्या सगळ्यांसाठी पूर्वांचलातले जेवण जेवण्याचा हा पहिलाच अनुभव होता. तो गरम वाफ़ाळता लाल भात अतिशयच चविष्ठ होता. असा लाल भात आम्हाला नंतरही चाखायला मिळाला नाही. पोटोबा तृप्त करून आम्ही तिथेच गप्पा मारत बसलो. तोमी आणि हमकल्लाच्या आया एका हाताने सुपारी कातरत काहीबाही सांगत होत्या आणि आम्ही ऐकत होतो. आम्हालाही सुपारी खायचा आग्रह झाला. पण ही सुपारी चांगलीच लागते असे ऐकून होतो आणि ती टाळण्याबद्दल सल्लाही आधीच मिळाला होता त्यामुळे नागवेलीचे नुसते पान तेवढे आम्ही घेतले.
जेवणानंतरचा कार्यक्रम - पान सुपारी
थोड्यावेळाने आम्हाला किचनच्या बाजूलाच एक खोली दिली त्यात आम्ही तिघी होतो आणि इतर तिघे दुसर्या एका बाहेरच्या खोलीत होते. एका मुलीने रूममध्ये कोळशाची शेगडी आणुन ठेवली. आणि उबदार दुलई पांघरुन मी दिवसभरात कुठून कुठे आलो याची उजळणी करत राहिले. केवळ दोन तीन तासात हे घर, त्यातल्या माणसांनी इतका जीव लावला की आपण पहिल्यांदाच भेटतोय हे जाणवू नये याचं आश्चर्य वाटलं. तसं म्हटलं तर ही फक्त एक सुरुवात होती. उद्यापासून आमचे खरे काम सुरु होणार होते आणि असे अजून अनेक अनुभव आमची वाट बघत होते.
No comments:
Post a Comment