पश्चिमेकडुन पूर्वेकडे - जाऊन येऊन सुमारे ४००० किमीचा प्रवास - १
फेब्रुवारीमध्ये XUV500 गाडी घेतली तेव्हाच नवर्याने सांगितलं की त्याला गाडी घेउन ठाण्याहुन भुवनेश्वरला जायचे अाहे. लेकीची सुट्टी बघुन कधी जायचे ते ठरवु. तेव्हा मला वाटले की हा नुसता म्हणेल , खरच जाणार नाही कारण घरात ़फिरायची अावड फक्त मलाच अाहे. पण नाही. नवी गाडी जितकी चालवली तितका त्याचा जायचा इरादा पक्का होत गेला. अाणि माझी धाकधुक वाढायला लागली. दोघेही केवळ दोन वर्षापूर्वी गाडी शिकलेलो. तेव्हा आय१० होती पण त्यात सेफ्टी फिचर अजिबात नसल्याने लॉन्ग ड्राईव केला नव्हता. नवीन गाडीनेही अजून दोघांनीही २०० किमी पेक्षा जास्त मोठा पल्ला ड्राइव केलं नव्हतं. हा प्रवास १८०० किमीचा वन वे, इतकी गाडी चालवता येईल का अशी मला भिती होती. बरोबर सात वर्षाची लेक. ती पाठी एकटी बसुन कंटाळणार असेही वाटत होते. काही मायबोलीवरच्या मित्रमैत्रिणींशी बोलले. केदार कडुन थोडे इन्स्पिरेशन घेतले, त्याचाही सल्ला घेतला (केदार ने खरेतर महिंद्राकडुन काहितरी कमिशन घेतले पाहिजे कारण त्याच्या लेह लडाख ट्रिप बद्दल वाचूनच ही गाडी घ्यायचे मनात आले होते. ) अाणि माझ्या मनाची तयारी केली.
ठरल्याप्रमाणे आम्ही सकाळी साडेपाचला घर सोडले. जाताना नाशिक, धुळे, अमरावती, नागपूर, रायपुर, संबलपूर, भुवनेश्वर असा रस्ता घ्यायचा ठरवला होता. नागपूर आणि संबलपुर इथे रात्री मुक्काम करणार होतो त्यामुळे तिथल्या हॉटेल्सचे पत्ते शोधून ठेवले होते आणि जर नागपूरपर्यंत पोचलो नाहीच तर अमरावतीला मुक्काम करू असा विचार करून तिथलेही हायवेवरचेच हॉटेल शोधून ठेवले होते.
नाशिक आणि पुढे धुळे (NH3) पर्यंत अतिशय मस्त रस्ता! चार लेन, मध्ये डिवायडर वगैरे होता त्यामुळे पटापट पोहोचलो. धुळ्याच्या पुढे मात्र (NH6/ AH46) दुपदरी, बिना दुभाजकाचा रस्ता सुरु झाला आणि स्पीड कमी झाला. त्यात मध्ये मध्ये बरीच गावे लागतात तिथे गर्दी, ट्राफिकजाम होता. जळगावला पोहोचेपर्यंत जेवणाची वेळ होऊन गेली. तिथून पुढे भुसावळ, मलकापूर, खामगाव, अकोला अमरावती हा सगळा रस्ता तसाच दुपदरी, बिना दुभाजकाचा आणि प्रचंड मोठे खड्डे असलेला असा आहे. त्यातच दर थोड्या अंतरावर सारखे रम्बलर्स, तीन चार स्पीडब्रेकर्स येतात. मोठे मोठे मालवाहू ट्रक याच भागातून जातात. त्यामुळे इथे गाडी चालवणे त्रासदायक वाटले. बर्याच भागात रस्ता अगदी अरुंद होतो. पुढे ट्रक्टर वगैरे आला तर त्याला ओवरटेक करून पुढे जायला फार वेळ लागायचा. काही वेळेस तर ट्रकच्या दोन्ही बाजूंनी अर्धा अर्धा मीटर बाहेर आलेली मशिनरी घेऊन ट्रक जातात. असा एखादा ट्रक समोर आला तर झालंच कारण त्याच्या पुढे जायला जागाच उरत नाही.
नाही म्हणायला या सिझनमध्ये दोन्ही बाजूला बाजरीची टपटपीत कणसे आणि पिवळीधम्मक शेते दिसत होती. हे 'शेतात पिकलेलं सोनं' मी पहिल्यांदाच पाहिलं. एरवी कोकणात जाणार्याला डोंगरदर्या बघायची सवय असते , पण इथे दूरवर पसरलेली शेती आणि सपाट जमीन पाहून वेगळेच वाटत होते.
मात्र जसजसा उशीर व्हायला लागला तसतसं अंधारात अशा रस्त्यावरून गाडी हाकण धोक्याचं वाटायला लागलं. सहा साडेसहाला अगदीच अंधार झाला आणि नागपूर अजून बरेच दूर होते. अंधारात बाहेरचे काहीच दिसेना त्यामुळे लेकीची चीडचीड सुरु झाली. अंधारात बिना दुभाजकाच्या आणि मोठे मालवाहू ट्रक जाणार्या रस्त्यावर गाडी चालवणे ताणाचे वाटायला लागले. आता नवरा गाडी चालवत होता तरी मला टेन्शन फ्री रहाता येत नव्हतेच. आधी नवरा 'आपण नागपुरपर्यंत जाऊच, अमरावतीचे काही शोधू नकोस' असे म्हणत होता, आता मात्र त्यालाही वाटले की अमरावतीला रहाणे श्रेयस्कर आहे. काही वेळ तर मला असेही वाटून गेले की उगीच आलो गाडीने. असाच रस्ता असेल तर किती त्रासदायक आहे पोहोचणे! शेवटी अमरावतीला पोचायच्या आधीचा सुमारे १० किमीचा रस्ता अगदी गुळ्गुळीत आणि एक्प्रेसवे सारखा होता. पण या रस्त्याचे काम चालू आहे / टोलनाका अजून सुरु झाला नाही शिवाय या रस्त्यावर एकही गाडीही दिसेना. त्यामुळे पुढे रस्ता कसा असेल/ असेल की नाही याचा अंदाज बांधणे कठिणच होते. अमरावतीला पोहोचलो पण अंधारात या हायवे वरून शहरात प्रवेश करायला रस्ता दिसेना. गाडीचे जिपिएस नवा रस्ता दाखवत नाही , त्यामुळे ते जुन्या ठिकाणी ( जिथे आधी डावी वळणे असतील तिथे ) वळायला सांगत होते पण हायवेवर वळणच नव्हते! मग एका ठिकाणी एक्सिट घेऊन थांबलो. तो अमरावती एम आय डी सी भागाचा रस्ता होता. तिथे चिटपाखरुही नव्हते. मग तिथे चक्क हॉटेलचे नाव जिपिएस मध्ये शोधले आणि ते मिळालेही. आम्ही थांबलो होतो तिथून केवळ आठ किमी वर, आणि अगदी रस्त्यावरच होते. हॉटेलमध्ये पोहोचून खरच हुश्श झाले.
दुसऱ्या दिवशीचा प्रवास तसा लांबचा होता, शिवाय काल अमरावतीला थांबल्याने नागपुरपर्यंतचे दिडशे किमी वाढले. त्यामुळे आज रात्री उशिरापर्यंत गाडी चालवावी लागेल अशी मानसिक तयारी करुनच निघालो. रायपुर ते संबलपूर हा पट्टा पुर्ण जंगल आहे. मध्ये रहाण्यासारखे शहरच नाहीये त्यामुळे मुक्कामी पोहोचण्याशिवाय गत्यंतर नाहीच. एकदा हायवेवर लागले की खायला ( लेकीसाठी बिन तिखटाचे) काही मिळत नाही, त्यामुळे नाश्ता करून साडे आठला बाहेर पडलो. गाडीचे जिपिएस ETA ( Exprected Time of Arrival) रात्री एक असे दाखवत होते, तिथे काणाडोळा केला. हा अमरावतीपासून नागपूर पर्यंतचा रस्ता असा काही अफ़ाट आहे की बस्स! पोटातले पाणीही हलणार नाही असा गुळगुळीत, लांबच्या लांब सरळ पसरलेला, चौपदरी, तुरळक ट्रक सोडता काहीच वाहतूक नाही. अगदी मीही गाडी सहज १४०च्या स्पीडने पळवत होते. एण्ट्रीलेवलचा, अडथळे कमी असलेल्या कार रेसिंग गेम असल्यासारखे वाटत होते. कार रेसिंग मध्ये पॉइंट मिळतात इथे ETA कमी होतो. विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे अजून टोल सुरु झाला नव्हता, अगदी शेवटच्या टप्प्यात थोड्डासा टोल घेतला. नागपूरपासून २०किमी अलिकडे अंतरावर उजवीकडे जाणारा एक नागपूर बायपास रोड आहे. तो घेतला आणि खडखड चालू झाली. इथे सगळा रस्ता म्हणजे नुसते खड्डेच होते पण ते बारके असल्याने गाडीला फारसा त्रास न होता खडखड करत पण जरा कमी वेगाने जाता येत होतं. नंतर एक टप्पा मात्र अगदी ऑफरोडींग करावं तसा रस्ता (!) होता. मोठे मोठे पाणी आणि चिखलाने भरलेले खड्डे!, त्यात समोरून येणारे कंटेनर्स! एक कसरतच होती. आमच्या पुढे एक छोटी मारुती इंडिका गाडी होती. ती खड्ड्यात गेली तर आपली जायला काहीच हरकत नाही असे म्हणुन मी जात होते. एका ठिकाणी चिखलात मात्र गाडीची चाकं एक्स्ट्रा फ़्रिक्शन देत होती ते लक्षात आलं ( AWD मोड ?? ) पण हा भाग सोडला आणि मग पुन्हा पुढे भंडार्यापर्यंत छान रस्ता सुरु झाला.
भंडाऱ्याच्या पुढे मधेच चौपदरी, मधेच दुपदरी रस्ता आहे. पण ओवरऑल चांगलाच आहे. इथेच डावीकडे नागझिरा अभयारण्यचा फाटा लागतो, तिथून पुढे गेल्यावर उजवीकडे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानाचा फाटा लागतो. इथे आल्यावर मारुती चितमपल्लींची आठवण आलीच! या दोन्ही जंगलात एकदातरी जायचे आहे. मग रस्त्याचा काही भाग चक्क नवेगाव जंगलातूनच जातो. दोन्ही बाजूला गर्द झाडी. एरवी रस्ता ओलांडताना कुत्रे वगैरे दिसतात, तसे इथे माकडं दिसतात. काही ठिकाणी हरणं वगैरे प्राणी रस्ता ओलांडतात त्यामुळे हळु जा असे सांगणारे बोर्डही होते. आम्हाला माकडे आडवी गेलीच पण चक्क एक शॅमेलिअनही आडवा गेला.
इथून पुढे आपण महाराष्ट्र ओलांडून छत्तिसगडमध्ये प्रवेश करतो. इथेही रस्ता चांगला पण मोठे मोठे ट्रक आणि कंटेनर फार दिसतात. भिलाई स्टील प्लाण्ट जवळ आल्याचे हे द्योतक होते. अचानक एका ठिकाणी आम्ही काळा डांबरी रस्ता सोडुन गुलाबी छटेच्या डांबरी रस्त्यावरून जायला लागलो. आधी आम्हाला वाटलं की रस्त्यावर लाल माती सांडली असेल. पण मग लक्षात आलं की रस्ता बनवताना त्यातल्या गुलाबी खडीच्या मिश्रणामुळे हा रस्ताच गुलाबी दिसतो! भिलाई शहर अगदीच बकाल आणि खराब दिसत होतं. खूप वर्दळ असलेल्या , आणि उद्योगधंदे असणाऱ्या शहराला असतो तसा गर्दी आणि घाणीचा शाप याही शहराला होताच. शहरातला टोल लोकल वहानासाठी नव्हता हे पाहून ठाण्याहून मुंबईत जाताना आणि परततानाही टोल द्यावा लागतो या दुखा:वरची खपली निघाली ! जेवायची वेळ झाली होती पण इथे जेवण्याची इच्छा झाली नाही. भिलाई सोडुन रायपुर जवळ आल्यावर एका ठिकाणी जेवलो. जेवण चांगले, कमी तिखटाचे असेल अशी अजिबात अपेक्क्षा नव्हती पण सुदैवाने आमचा अपेक्षाभंग झाला आणि जेवण चविष्ठ निघाले ! याहूनही दुसरे सुदैव असे की इथे स्वच्छ रेस्टरूमही मिळाले.
रायपुर सोडुन आम्ही पुन्हा काळ्या डांबरी रस्त्यावर आलो. आता रस्ता खराब व्हायला लागला होता, ट्राफिक तर होतेच, रस्ताही दुपदरीच होता. गाडीचे जिपिएस NH6चा रस्ता दाखवत होते, तर फोनवर गुगल एका ठिकाणी NH6 सोडुन उजवीकडे NH217 वर वळायचा रस्ता दाखवत होता. गुगल नुसार हा रस्ता ५० किमी जास्तीचा होता मात्र याला वेळ कमी लागणार होता. हाच २१७ पुढे पुन्हा ६ ला मिळणार होता. आम्ही गुगलच्या ज्ञानावर विश्वास ठेवायचे ठरवले आणि महानदीवरचा पूल ओलांडल्यावर एका ठिकाणी उजवीकडे २१७ वळलो. अचानक रस्त्यावरच्या गाड्या अगदी कमी झाल्या. हा रस्ताही दुपदरी होता पण गाड्या कमी आणि खड्डेही कमी होते. दोन्ही बाजूंनी झाडीच दिसत होती. गाडीचे जिपिएस रिरुट करून प्रत्येक डाव्या वळणाला आम्हाला आता NH6साठी वळा असे सांगत होते पण गुगलने सांगितल्याप्रमाणे ८०किमी याच रस्त्यावर जायचे होते. हळुहळू आजूबाजूचे जंगल दाट झाले आणि सहा वाजताच काळोख झाला. इथे गुगलचा सिग्नलही गेला. आता काय करायचे असा प्रश्न पडला पण ८० किमीचे डोक्यात होते त्यामुळे तशीच गाडी चालवत राहिलो. अचानक समोरच्या गाड्यांचे नंबर ओडीशाचे दिसायला लागले आणि ओडिशा जवळ आलो हे लक्षात आलो. पुढच्या सगळ्या गावांची नावे उडिया भाषेत लिहिलेली. अक्षरं माहिती असली तरी मला पटापट वाचता येईनात! मधेच केव्हातरी गुगल सिग्नल येऊन जाऊन होता त्यामुळे लक्षात आले की गाडीच्या जिपिएसने आम्हाला योग्य वाटेवर लावायचे प्रयत्न सोडुन देऊन गुगलने दाखवलेली वाटच दाखवायला सुरुवात केली आहे, त्यामुळे थोडे बरे वाटले. इथे आम्हाला रस्त्यावरच्या धुळीचा फार त्रास झाला. काचेवर धुळ आणि बाष्प बसून नीट दिसत नव्हते. पाणी उडवून वायपरने पुसले तरी समोरून गाडी आली की तिच्या हेडलाईमुळे अगदीच धुसर दिसायचे. आता रस्त्यावर गाड्या अगदीच तुरळक झाल्या, मध्ये मध्ये गावं फारशी येईनात, आली तरी पाड्यासारखी दोन चार घरं असलेली वस्ती असायची. त्या वस्त्यांवरही इलेक्ट्रिसिटी नव्हतीच. एरवी संपूर्ण रस्ता दुतर्फा घनदाट जंगल असावे असे वाटले कारण काहीही दिसत नव्हते. गाडीच्या मिरर मध्ये मागचा रस्ताही दिसत नव्हता. गाडीचे हेडलाईट एकदम पॉवरफुल असल्याने रस्ता मात्र नीट दिसत होता.
८० किमीच्या वळणावर SH3 वर एकदा वळलो आणि अजून ११८ किमी याच रस्त्यावर असे गाडीने सांगितले. रस्ता खराब होता आणि आम्ही तेव्हा ३०च्या स्पीडने जात होतो. आम्ही दोघांनीही एकमेकाकडे पाहून ' अशा अंधारातून आणि रस्त्यावरून अजून ४ तास' असा एक हिशेब न बोलताच एकमेकाला सांगितला ! इतक्यात पुढे एक गाडी दिसली तिच्या पाठच्या काचेवर जगन्नाथाचे डोळे काढले होते. हे एक मात्र नोंद करण्यासारखे आहे महाराष्ट्रात गाडीवर गणपती किंवा साईबाबा दिसतात, ओरिसात गेलो की जगन्नाथ दिसतो, दक्षिणेत गेलो की बालाजी दिसतो! तर त्या गाडीच्या मागे मागे आम्ही जायला लागलो त्यामुळे खड्डे वगैरे त्या गाडीकडे बघून आधीच कळायचे आणि वेग कमी करता यायचा. आता मध्ये मध्ये चांगला रस्ता आणि मधेच खड्ड्यांचा भाग येत होता. इथे एका ठिकाणी खड्ड्यातून हळुच गाडी काढताना रस्त्याच्या बाजूला काहीतरी येऊन बसलं. आणि आम्ही नीट बघेपर्यंत ते उडालं तेव्हा पांढरे छोटे घुबड होते असं लक्षात आलं. बरेच अंतर आम्हाला सोबत करून ती जगन्नाथाची गाडी कुठेतरी वळुन गेली आणि त्या एकाकी निर्जन रस्त्यावर आमचीच गाडी उरली.
एका ठिकाणी दूर लाल झेंडे लावले होते आणि एक झाड रस्तात आडवे होते. 'हे नक्षलवादी असतील का? काय करुयात? थांबवावी लागेल गाडी?' असा नवर्याचा प्रश्न ! आमच्याकडे असाही काय उपाय होता ? मी थांबव म्हटलं. जवळ जाऊन आम्ही थांबलो. रापलेली, काळी, छोटा पंचासारखे काहीतरी गुंडाळलेली दोन चार माणसं होती. आमचा एमएच नंबर बघून ती माणसं आमच्याकडे काही क्षण नुसतीच बघत राहिली. मी नवर्याला म्हणाले काच उघड आणि उडीयात विचार काय झालं म्हणुन. तसे केल्यावर मात्र त्या माणसांच्या चेहृयावरचा ताण जाऊन किंचित हसू उमलले. आणि घडाघडा संबलपुरी उडिया भाषेत त्यांनी नवर्याला जे सांगितले ते मला अजिबात कळले नाही. पण त्याचा अर्थ असा होता की इथला ब्रिज खचला आहे आणि बाजुची काही झाडं तोडुन एक मातीचा खडबडीत रस्ता केला आहे त्यावरून जायचे आहे. फक्त काही मिटर असल्याने आणि आमची गाडी फार मोठी नसल्याने ती सहज जाईल. आम्ही दोघेही विश्वास ठेवावा की नाही अशा द्वंद्वात एखाद क्षण होतो इतक्यात त्या बाजूच्या रस्त्यावरून एक सेडान गाडी आली. त्यामुळे आम्हालाही धीर आला आणि आम्ही तो मातीचा रस्ता पार करून पुन्हा एकदा डांबरी रस्त्यावर लागलो.
शेवटी एकदाचे जंगलातले ते ११८ किमी संपले आणि आम्ही सोहेला गावाजवळ उजवीकडे वळून पुन्हा एकदा NH6 वर पोचलो. इथला रस्ताही खराब होता पण थोड्याच अंतरावर चांगला चौपदरी रोड सुरु झाला तो पार संबलपूर पर्यंत होता. रात्री रहाण्यासाठी आम्हाला संबलपूर मध्ये घुसावे लागणार होते. महानदीच्या गर्द काळोखाला उजवीकडे टाकत आम्ही बरेच शोधत शोधत संबलपुरच्या हॉटेलमध्ये पोचलो. इथल्या माणसांचे आदरातिथ्य पाहून एकाकी अंधार्या जंगलातून पुन्हा माणसात आल्याची भावना झाली! इथे आम्ही सुमारे साडे दहा वाजता पोचलो. इतका उशीर होईल हा अंदाज आला असल्याने रायपुर सोडल्यावर रस्त्यातूनच फोन करून हॉटेल बुकिंग आणि जेवण ऑर्डर करून ठेवले ते चांगले झाले.
तिसर्या दिवशी फक्त ३०० किमीचा प्रवास होता. त्यामुळे आरामात साडेनऊला निघालो. खाली येऊन काचा वगैरे साफ केल्या, काल वायपरचे पाणी संपले होते ते भरले. इतक्यात बाजुची एमएच नम्बरची गाडी दिसली! अर्थात त्यांच्याशी बोललोच. ते बंगाली कुटुंब पुण्यावरून कोलकत्याला निघाले होते. आपण NH6 मधेच स्किप केला तो चांगला होता की खराब ही एक उत्सुकता आम्हाला होतीच त्यामुळे त्यांना कालच्या रस्त्याबद्दल विचारलेच. तो NH6 वरून आला होता आणि वैतागला होता, म्हणे तिथे रस्ताच नव्हता, नुसते खड्डेच होते. तो आमच्याही खूप नंतर पोचला होता. मग आम्ही आमच्या रस्त्याबद्दल त्याला सांगितले आणि निघालो.
आजचा रस्ता अगदी आनंददायक होता. दुतर्फा घनदाट जंगल, सकाळचे सोनेरी ऊन आणि मस्त फ्रेश हवा ! NH42 रस्ता दुपदरीच असला तरी जास्त वाहानं नव्हती शिवाय खड्डेही नव्हते! या जंगलातुन मात्र संध्याकाळी उशिरा / रात्री प्रवास करणे धोक्याचे आहे. कटक जवळ NH5 घेऊन अतिविस्तिर्ण अशी महानदी पार केली. आणि भुवनेश्वर मध्ये पोहोचलो. अडीच दिवस आणि एकुण सुमारे १८०० किमी पार करून दुपारी तीन वाजता जेवायला घरात होतो!
काही नोंदी -
- गाडी असल्याचा मोठा ़फायदा म्हणजे कॅमेरा अाणि लेन्स घेता अाल्या पण मुक्कामी वेळेवर पोचायची गरज असल्याने फोटोसाठी जास्त थांबले नाही .
- पुर्ण वेळ तिघेही सीटबेल्ट लावूनच गाडी चालवली.
- लेकीसाठी एक मोठी उशी, पांघरुण, एक मोठे कापड बरोबर घेतले होते. उशी असल्याने सीटबेल्ट लावूनही ती व्यवस्थित झोपू शकली. कापडाने उन्हाच्या वेळेस मागच्या सीटसाठी सावली करता आली.
- गरजेची सगळी औषधे, कोरडा खाऊ , ज्युस, पाण्याच्या बाटल्या होते, पण कोरडा खाऊ फारसा संपला नाही. ज्यूस कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवून गार करून पिता आले.
- कार बॅटरीवर चालणारा हवेचा पंप घेतला ( गरज लागली नाही पण स्टेपनी बाहेर कशी काढायची याची माहिती करून घेतली नव्हती, जे अतिशय चुकीचे होते. परतीच्या प्रवासात ही चूक केली नाही)
- मोठी , दुरवर प्रकाश पोहोचेल अशी टॉर्च होती, २४० व्होल्ट कन्वर्टर मागवला होता पण तो निघेपर्यंत पोचलाच नाही.
- माबोवर विचारुन बरीच नवी जुनी गाणी घेतली होती, त्यामुळे लेकीला मजा आली. या प्रवासात एरवी आम्ही ऐकत नाही अशीही गाणी तिने ऐकली आणि एन्जॉय केली.
- पुर्ण वेळ तिघेही सीटबेल्ट लावूनच गाडी चालवली.
- लेकीसाठी एक मोठी उशी, पांघरुण, एक मोठे कापड बरोबर घेतले होते. उशी असल्याने सीटबेल्ट लावूनही ती व्यवस्थित झोपू शकली. कापडाने उन्हाच्या वेळेस मागच्या सीटसाठी सावली करता आली.
- गरजेची सगळी औषधे, कोरडा खाऊ , ज्युस, पाण्याच्या बाटल्या होते, पण कोरडा खाऊ फारसा संपला नाही. ज्यूस कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवून गार करून पिता आले.
- कार बॅटरीवर चालणारा हवेचा पंप घेतला ( गरज लागली नाही पण स्टेपनी बाहेर कशी काढायची याची माहिती करून घेतली नव्हती, जे अतिशय चुकीचे होते. परतीच्या प्रवासात ही चूक केली नाही)
- मोठी , दुरवर प्रकाश पोहोचेल अशी टॉर्च होती, २४० व्होल्ट कन्वर्टर मागवला होता पण तो निघेपर्यंत पोचलाच नाही.
- माबोवर विचारुन बरीच नवी जुनी गाणी घेतली होती, त्यामुळे लेकीला मजा आली. या प्रवासात एरवी आम्ही ऐकत नाही अशीही गाणी तिने ऐकली आणि एन्जॉय केली.
XUV500 बद्दल -
- अतिशय कम्फर्टेबल गाडी
- दिवसभर बसूनही कोणालाच पाठीचा , गुढग्याचा त्रास झाला नाही. ( अडिचाव्या दिवशी पोहोचल्यावरही अजिबात थकवा नव्हता)
- सुमारे ९५०० किमी झाल्यावर गाडी एकदम जास्तच स्मूथ वाटायला लागली आहे ( आत्ता रीडिंग १२४०० आहे )
- हेडलाईट एकदम पॉवरफुल. तीव्र वळणावर जास्तीचा हेडलाईट लागतो ते सुरुवातीला कन्फ्युजिंग वाटते म्हणजे अचानक दुसरी गाडी आली की काय असे वाटते पण सवय झाल्यावर फार उपयोगी आहे.
- त्रुटी किंवा मिसिंग फिचर म्हणजे सीट अॅडजस्टमेंटचे दोन प्री सेट असायला हवेत. म्हणजे एक बटन दाबले की सेट केलेली उंची, मिरर पोझिशन, स्टेरिंग पोझिशन आपोआप येईल. दर दोन तीन तासांनी ड्रायवर बदलल्यावर सीट, मिरर अॅडजस्ट करावे लागते. ( ऑडी मध्ये असे फिचर आहे म्हणे )
- माझ्या उजव्या हाताला रेस्ट मिळत नाही. नवर्याला हा त्रास जाणवत नाही. नेहेमीच्या प्रवासात मलाही जाणवला नव्हता. दुरवरच्या प्रवासात जाणवला.
- महत्वाचा मुद्दा ज्याबद्दल सगळेच विचारतात - मी जाताना सुमारे ८०० किमी आणि येतानाही तेवढेच चालवले. रात्री आणि डिवायडर नसलेल्या रोडवर माझा स्पीड थोडा कमी होतो.
- अतिशय कम्फर्टेबल गाडी
- दिवसभर बसूनही कोणालाच पाठीचा , गुढग्याचा त्रास झाला नाही. ( अडिचाव्या दिवशी पोहोचल्यावरही अजिबात थकवा नव्हता)
- सुमारे ९५०० किमी झाल्यावर गाडी एकदम जास्तच स्मूथ वाटायला लागली आहे ( आत्ता रीडिंग १२४०० आहे )
- हेडलाईट एकदम पॉवरफुल. तीव्र वळणावर जास्तीचा हेडलाईट लागतो ते सुरुवातीला कन्फ्युजिंग वाटते म्हणजे अचानक दुसरी गाडी आली की काय असे वाटते पण सवय झाल्यावर फार उपयोगी आहे.
- त्रुटी किंवा मिसिंग फिचर म्हणजे सीट अॅडजस्टमेंटचे दोन प्री सेट असायला हवेत. म्हणजे एक बटन दाबले की सेट केलेली उंची, मिरर पोझिशन, स्टेरिंग पोझिशन आपोआप येईल. दर दोन तीन तासांनी ड्रायवर बदलल्यावर सीट, मिरर अॅडजस्ट करावे लागते. ( ऑडी मध्ये असे फिचर आहे म्हणे )
- माझ्या उजव्या हाताला रेस्ट मिळत नाही. नवर्याला हा त्रास जाणवत नाही. नेहेमीच्या प्रवासात मलाही जाणवला नव्हता. दुरवरच्या प्रवासात जाणवला.
- महत्वाचा मुद्दा ज्याबद्दल सगळेच विचारतात - मी जाताना सुमारे ८०० किमी आणि येतानाही तेवढेच चालवले. रात्री आणि डिवायडर नसलेल्या रोडवर माझा स्पीड थोडा कमी होतो.
अरे वा! योग्य गाडी घेतली. मुख्य म्हणजे घेउन नुसती घरी ठेवली नाही. प्रवासाची आवड असेल तर गाडी घेउन गुजराथ वा कर्नाटकात जा. रस्ते एकदम मस्त आहेत.
ReplyDelete