कालच्या हिताचीनाका कोएनच्या भेटीचे मुख्य कारण होती नेमोफिला ही इवलाली फुलं. या पार्कची जाहीरातच इतकी आकर्षक होती की माझ्याकडुन दुर्लक्ष झालच नाही. हि फुलं आधी कधीच पाहीली नव्हती त्यामुळे नक्की किती मोठी किंवा छोटी असतील याचा अंदाजही नव्हता. फुलांची बाग खुप मोठ्ठी आहे याचा अंदाज जाहीरात बघुन आला होताच.
म्हणुन मग परवा सकाळीच हिताची नाका कोएन ला गेले. त्या भेटीच्या अर्ध्या भागाचे म्हणजे ट्युलिपचे फोटो इथे आहेत. तर या ट्युलिप गार्डन मधुन कसाबसा पाय काढला . पार्क मधले साईन बोर्ड वाचत वाचत नेमोफिलाच्या दिशेने निघाले होते. एका वळणावर समोर जे आले त्याने अक्षरशः थक्क झाले.
समोर आहे ती बाग आहे कि क्षितीजाला भिडलेला निळा समुद्र आहे हेच कळेना. म्हणजे आधी जो अंदाज वगैरे आला असे वाटले होते ते चुकलेलेच होते. ही अथांग पसरलेली निळाई वेड लावणारी होती. या फुलांचे मराठीमधले नाव माहीत नाही पण त्याक्षणी डोक्यात आले ते निळावंती.
निळावंती हि खरतर प्राण्याची भाषा जाणण्याची कला. पण योग्य प्रकारे साध्य न झाल्यास या कलेमुळे वेड लागते असे मिथक आहे. पण इथे समोर पसरलेली निळाई इतकी सुंदर होती की तीचं वेड न लागलं तरच नवल. कोट्यावधी निळ्या इवल्याला फुलांचा गालीचा पायासमोरपासुन उंचावरच्या टेकाडांवर पसरलेला. त्या टेकाडांमधुन जाणार्या वळणा वळणांच्या वाटा, आणि त्या वाटांमधुन जाणारे रसिक जे स्वतःला त्या निळ्या समुद्रात झोकावून द्यायलाही तयार झाले असते. म्हणुनच निळावंतीची हि निळाई!
आकाशाचा सगळा निळा रंग पांघरून बसलेली हि चिमुकली फुलं अशी कोट्यावधींच्या संख्येत लावून त्यांचा समुद्र करायची ज्याची कोणाची कल्पना असेल त्याच्या कल्पनाशक्तीला सलाम. या निळाईच्या प्रत्येक फुलाला त्याच्या सुंदरते साठी गोंजाराव अशी इच्छा झाली पण त्यासाठी माझा जन्मही अपुरा पडला असता. त्यापेक्षा या देखाव्याला जमेल तसं कॅमेर्यात उतरवलं आणि निळावंतीच्या या निळाईत स्वतःला विसरण्यातच समाधान मानलं.
नाव : नेमोफिला Nemophila
फॅमिली : Hydrophyllaceae
वापरातले नाव : बेबी ब्ल्यु आईज (baby blue-eyes)
हिनाचीनाका कोएन मधे लावलेली रोपसंख्या : ४५००००० रोपे
No comments:
Post a Comment