१९ जानेवारी १९४१, कोलकत्यातल्या एका बंगाली घरातून एक पठाण कारमधून बाहेर पडला आणि मजल दरमजल करत थेट अफगणीस्तानात पोहोचला. तिथल्या मित्रांच्या मदतीने मूकबधिर असल्याने नाटक वठवत सोविएत रशियाच्या सरहदीजवळ पोचला. तिथून पुन्हा एकदा इटालियन माणसाचे वेषांतर करून मॉस्कोला पोचला. सोविएत रशिया कडून भारताच्या स्वातंत्र्यासाठी मदत होईल अशी अपेक्षा होती, ती फोल ठरल्यावर तो तरुण थेट जर्मनीला थडकला. त्याकाळात जेव्हा दळणवळणाची साधने फारशी उपलब्ध नव्हती, सतत पकडले जाण्याचा धोका होताच तरीही इतका मोठा प्रवास करण्याचे धारिष्ट्य आणि दूरदृष्टी ठेवणारे नेताजी सुभाषचंद्र बोस! त्यांनी खूप वेगळे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी अगदी शब्दश: आकाशपाताळ एक केले.
Credit : http://kishorekumar62.wordpress.com/tag/subash-chandra-bose/
All google maps taken from the http://kishorekumar62.wordpress.com blog posts.
नेताजींनी जर्मनीत जाउन तिथल्या जर्मन लोकांच्या मदतीने आझाद हिंद रेडियोचे प्रसारण चालू केले. हिटलरशी बोलणी करून भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात जर्मनीची मदत घ्यायची आणि ब्रिटिशांना हुसकावून लावायचे अशी त्यांची कल्पना होती.
त्यांनी जर्मनीशी संधान साधायचा प्रयत्न सुरु केला. जर्मनी ब्रिटीशांच्या विरोधात असल्याने तिथून भारताच्या स्वातंत्र्यलढयासाठी नक्की मदत मिळेल असे त्यांना वाटत होते. १९४३ पर्यंत नेताजी बर्लिन मध्ये होते मात्र तेव्हा हळूहळू जर्मनीचा पाडाव व्हायला लागला आणि जर्मन मदतीने स्वातंत्र्य मिळवण्याचे स्वप्न धुसर वाटू लागले. त्याच सुमारास पूर्वेकडे जपानी सैन्याची धडक वाढत होती. जर्मनीतून जपानमध्ये जाउन तिथून मदत घ्यायची असे प्रयत्न नेताजींनी सुरु केले.
त्याकाळात पाणबुड्या अतिमहत्वाचे सामान वाहून नेण्यासाठी वापरल्या जात असत. अशीच एक महत्वाकांक्षी जपानी पाणबुडी I-29 मादागास्कर बेटाजवळून जाणार होती. तिचा कॅप्टन होता सबमरीन फ्लोटीला कमांडर मासाओ तेराओका. त्याच वेळेस जर्मन पाणबुडी U-180 ने अतिशय दूरवरचा प्रवास करत नेताजी मादागास्कर बेटाजवळ आले. दोन्ही पाणबुड्या तिथे पोहोचल्या तेव्हा वातावरण खराब होते त्यामुळे सुमारे बारा तास थांबून राहावे लागले. नंतर जर्मन पाणबुडी आणि जपानी पाणबुडी यांनी एक ऐतिहासिक ट्रान्स्फर केली. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि अबिद हसन हे जर्मन पाणबुडीतले प्रवासी जपानी पाणबुडीत आणि U-180च्या बांधणीचे तांत्रिक शिक्षण घ्यायचे होते असे दोन जपानी प्रवासी जर्मन पाणबुडीत आले. दुसऱ्या महायुद्धात दोन वेगवेगळ्या देशाच्या पाणबुड्यांनी तिसऱ्याच देशाच्या माणसांची ट्रान्स्फर ही ऐतिहासिक म्हणावी अशीच. तिथून जपानी पाणबुडीने ते सबांग इथे उतरून नंतर पुढे तोक्योमध्ये पोहोचले.
Credit : http://kishorekumar62.wordpress.com/tag/subash-chandra-bose/
All google maps taken from the http://kishorekumar62.wordpress.com blog posts.
फोटो -
जपानी पाणबुडीच्या खालाश्यांबरोबर नेताजी ( फोटो विकीपेडिया वरून )
आधी सुमारे १९४१ साली इंडियन नॅशनल आर्मी स्थापन करायचा प्रयत्न जपानच्या इवाइची फुजीवारा आणि मोहन सिंग यांनी केले होते पण नंतर ते बंद पदले. नेताजी पूर्व आशियामध्ये पोचल्यानंतर पुन्हा एकदा अशा प्रकारच्या स्वातंत्र्य सेनेची गरज जाणवायला लागली आणि सिंगापूर मध्ये राश बिहारी बोस यांनी सगळी सूत्रे नेताजींच्या हातात सोपवली. नेताजींनी लोकांना संघटीत करून देशासाठी लढण्यास प्रवृत्त केले. इंडियन नॅशनल आर्मी मध्ये 'Rani of Jhansi Regiment' हे स्त्रियांचे वेगळे युनिट होते आणि हे आशियामध्ये प्रथमच घडले होते. जपानी सैन्य आणि इंडियन नॅशनल आर्मीमधले पूर्व भारतातले स्वातंत्र्यसैनिक भारताच्या अतिपूर्व भागात वेगाने मुसंडी मारत होते.
Credit : http://kishorekumar62.wordpress.com/tag/subash-chandra-bose/
All google maps taken from the http://kishorekumar62.wordpress.com blog posts.
आय एन ए चा मार्ग
आय एन ए ने आपले पहिले पाऊल मणिपूर येथील मोईराङ येथे ठेवले. मोईराङ , सर्वात प्रथम स्वतंत्र झालेला भारतीय प्रदेश ! स्वतंत्र भारतातले पहिले पाऊल!! पहिला तिरंगा मानाने झळकताना पाहिला तो मोईराङने.
सिंगापूर येथील स्मारकाची प्रतिकृती. या प्रतिकृतीचा पाहीला दगड नेताजींनी ठेवला आहे असे त्यावर नमूद केलेले आहे.
आज तेच मोईराङ पाहीले, तिथला तिरंगा पाहीला की ऊर अभिमानाने भरून जातो. दूरदृष्ट्या आणि अतिशय साहसी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याविषयी अतीव आदर वाटून जातो. तिथले म्युझियम बघताना, त्यांचे फोटो बघताना, त्यांच्या प्रवासाविषयी वाचताना भारून जायला होतं. पण या भारून जाण्यालाही एक हळवी किनार आहे. मणिपूर , मोईराङ हा भाग अजून शांत नाही. त्याची कारणे अनेक असतील , आहेतही. पण एक सामान्य नागरिक म्हणून मला मनापासून वाटतं की इथे शांतता नांदावी.
नेताजी आणि त्यांच्यासारख्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या स्वातंत्र्याची, त्यांच्या बलिदानाची चाड राखत देशातल्या शांततेसाठी, एकात्मतेसाठी प्रयत्न करणे हे आपलेच कर्तव्य आहे. आज नेताजींच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करताना ही जाणीव नक्किच गरजेची आहे.
रेफरन्स
http://en.wikipedia.org/wiki/Subhas_Chandra_Bose
http://en.wikipedia.org/wiki/Japanese_submarine_I-29
http://en.wikipedia.org/wiki/Subhas_Chandra_Bose
http://en.wikipedia.org/wiki/Japanese_submarine_I-29
No comments:
Post a Comment