मायबोली लेखनस्पर्धा २०१३ साठी लिहिलेला लेख -
"एक अतिशय हुशार, होतकरू तरुण मुलगा आकाशात उंच उडायचं स्वप्न बाळगुन २००० किमी पेक्षा जास्त प्रवास करत देहरादूनला पोचला. भारतीय हवाई दलात पायलट व्हायचं हेच त्याचं स्वप्न होतं, बऱ्याच काळापासून मनात जपलेलं! आकाशात उंच उडायचं स्वप्नं! देहरादूनमध्ये भारतीय हवाई दलाची निवड समिती आज पंचवीस मुलांची मुलाखत घेणार होती. मुलाखतीतच त्याला जाणवलं की इथे आपल्या बुद्धीपेक्षा व्यक्तिमत्व, तंदुरुस्ती याला महत्व दिले जातेय. पंचवीस पैकी आठ मुलांची निवड झाली आणि तो नेमका नवव्या स्थानावर होता. हवाई दलात जाण्याची, आकाशात उंच उडण्याची त्याची संधी हुकली होती. निराशेने त्याला घेरलं. पुढे काय करायचं याचा विचारही त्याला करवत नव्हता."
कुठलाही संदर्भ गाळून हा प्रसंग वाचला तर त्याचे महत्व कळून येणार नाही. कुठल्याही सर्वसामान्य तरुण मुलाच्या आयुष्यात घडणारी ही घटना! भारतीय हवाई दलाच्या निवड परीक्षेत आजवर हजारो मुलं फेटाळली गेली असतील. पण हा नकार वेगळा होता , एका अर्थाने स्वतंत्र भारताचे भविष्य घडवणारा नकार !
निराश झालेला तो तरुण तसाच हृषिकेशला पोहोचला. तिथे त्याची एका स्वामींशी भेट झाली. त्या स्वामींनी त्याला सांगितले की "आपल्या अंतर्मनातून एखादी इच्छा निर्माण झाली तर त्यापासून निघणारी उर्जा ती इच्छा पूर्ण करायला नक्कीच मदत करते. फक्त ती इच्छा तितकी निर्मळ आणि अतीव उत्कट असायला हवी." या क्षणानंतर मात्र त्या मुलाचं नैराश्य कुठल्या कुठे पळून गेलं. अपयश विसरून तो दिल्लीला पोचला. तिथे 'डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल डेवलपमेंट अॅण्ड प्रॉडक्शन ( एअर )' - DTD&P(Air) चे नियुक्तीपत्र त्याची वाटच पहात होते. दुसऱ्याच दिवशी अवुल पाकिर जैनूलाब्दीन अब्दुल कलाम आपल्या 'सिनीअर सायिण्टिफिक असिस्टंट' या पदावर रुजू झाले. आणि भारताच्या इतिहासात एक नवे कोरे, तंत्रज्ञानाला वाहिलेले पान जोडले गेले. साल होते १९५८. या पानावरचा इतिहास डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम, डॉ. विक्रम साराभाई अशा महारथींच्या हस्तेच लिहिला गेला.
तिथे काम सुरु केल्यापासून काही काळातच त्यांची नियुक्ती एरॉनॉटीकल डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंट (ADE) , बंगळुरू इथे झाली. इथे त्यांनी ग्राउण्ड इक्विपमेंट मशीन बनवायचे एक प्रोजेक्ट चालू केले. कुठलेच मशीन बनवायचा अनुभव नसलेल्या, अगदी छोट्या, चार जणांच्या टिमने अतिशय तुटपुंज्या अर्थसंकल्पात चालू केलेले हे प्रोजेक्ट होते मात्र अगदी महत्वाकांक्षी! हे नवीन, सक्षम भारताचे पहिले, पूर्ण भारतीय तंत्रज्ञान असणारे होवरक्राफ्ट असणार होते. प्रोजेक्ट चालू केल्यापासून अडीच वर्षात या होवरक्राफ्टचा प्रोटोटाईप तयार होता. "नंदी" - शंकराचे वाहन - असे नाव असलेल्या या प्रोटोटाईप होवरक्राफ्टमध्ये डॉ. कलाम यांनी तत्कालीन संरक्षण मंत्री कृष्णा मेनन यांना बसवून प्रात्यक्षिकही दिले. पण पुढे मात्र राजनैतिक इच्छेच्या अभावी या प्रोजेक्टचे काहीच झाले नाही. जवळपास ५० वर्षांनी आजही आपण होवरक्राफ्ट आयात करतो यापेक्षा वेगळे दुर्दैव ते कुठले !!
मात्र हाच प्रोटोटाईप पाहून प्रो. एम. जी. के. मेनन यांनी डॉ. कलाम यांना इंडियन कमिटी फॉर स्पेस रिसर्च (INCOSPAR) मध्ये रॉकेट इंजिनिअर म्हणुन बोलावणे पाठवले. नासा (NASA) मध्ये तयार केलेले रॉकेट भारतातून यशस्वीरीत्या प्रक्षेपित केल्या नंतर भारतीय डॉ. विक्रम साराभाई यांनी एक फार महत्वाकांक्षी स्वप्न पाहीले. भारतीय बनावटीचे उपग्रह प्रक्षेपण यान म्हणजेच सॅटेलाईट लाँच व्हेइकल (SLV) !
एखादा उपग्रह जेव्हा पृथ्वीच्या कक्षेत फिरण्यासाठी सोडायचा असतो तेव्हा तो प्रक्षेपण यान वापरून अवकाशात सोडला जातो. उपग्रह घेऊन अवकाशात उडणे, योग्य ठिकाणी उपग्रह सोडणे आणि त्या उपग्रहाला पृथ्वीच्या कक्षेत फिरण्यासाठी गतिमान करणे हे प्रक्षेपण यानाचे कार्य.
मात्र डॉ. विक्रम साराभाई अतिशय दूरदर्शी होते. त्यांनी नुसते उपग्रह प्रक्षेपण यानाचे स्वप्न न बघता, पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत सोडता येणारे रोहिणी हे साऊंडींग रॉकेट आणि क्षेपणास्त्रे (मिसाईल) यांच्यावरही काम चालू करायला लावले. साऊंडींग रॉकेट म्हणजे वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी पृथ्वीच्या वातावरणाजवळ सोडले जाणारे रॉकेट्स. आणि क्षेपणास्त्रे तर आपल्या सर्वांनाच चांगल्या प्रकारे माहित आहेत. वेगात असलेल्या लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रांमध्ये असते.
भारतातल्या अनेक नेत्यांना आणि सर्वसामान्य जनतेलाही या इतक्या मोठ्या कामाचे महत्व लक्षात येत नव्हते. भारतात, जिथे बहुतांश सामान्य जनतेला दोन वेळेचे पोट भरायची मारामार आहे त्या नवनिर्मित, गरीब देशाने अवकाश पादाक्रांत करण्याची स्वप्ने का बघावीत हा त्यांचा सवाल होता. पण डॉ. विक्रम साराभाई आणि तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहेरु यांना मात्र या कार्याचे महत्त्व अगदी व्यवस्थितपणे जाणवले होते. जर भारताचे भविष्य उज्ज्वल बनवायचे असेल तर प्रगत तंत्रज्ञानात मागे राहून चालणार नाही हे त्यांचे स्पष्ट मत होते.
शिवाय १९६२ आणि १९६५ मध्ये भारतात झालेल्या दोन युद्धानंतर भारताला लष्करात प्रगत तंत्रज्ञान आणुन बाकीच्या राष्ट्रांवर वचक ठेवण्याखेरीज पर्याय नव्हता हे ही एक महत्वाचे सत्य समोर होते. रशियाकडून आपल्याला क्षेपणास्त्रे आणता आली होती. मात्र दूरदृष्टी दाखवून या क्षेत्रात तंत्रज्ञानासाठी स्वयंपूर्ण होणे किती जरुरी आहे ते डॉ. विक्रम साराभाई सारख्या द्रष्ट्या माणसाला उमगले होते. त्यामुळेच एकाच वेळी ही तीन प्रोजेक्ट्स आणि सैनिकी विमानांसाठी रॉकेट असिस्टेट टेकऑफ सिस्टीम (RATO) यांचे कामही साधारणपणे एकाच सुमारास चालू झाले. ही तीनही प्रोजेक्ट्स वरवर बघता वेगवेगळी असली तरी त्यात परस्पर संबंध होता आणि म्हणुनच डॉ. साराभाईंना हे एकाच सुमारास चालू करणे जरुरी वाटले होते. SLV आणी RATO सारख्या महत्वाकांक्षी प्रोजेक्टस वर काम करण्यासाठी डॉ. अब्दुल कलाम यांच्यापेक्षा योग्य व्यक्ती कोण असणार?
तो काळ भारतातल्या तंत्रज्ञान विषयक प्रयोगशाळांसाठी भारलेला असा काळ होता. बहुतेक प्रयोगशाळा त्यांना नेमून दिलेल्या विशिष्ठ भागावर त्यांचे प्रयोग करत होत्या पण सर्वांचे एकत्रित लक्ष साऊंडींग रॉकेट बनवणे हेच होते. मोठी ध्येय समोर ठेवणे आणि त्यानुसार स्वातंत्र्य देऊन, लोकांवर विश्वास ठेवून काम करून घेण्यात, काम करण्यात डॉ. अब्दुल कलाम आणि डॉ. साराभाई आणि त्यांचे सहकारी वाकबगार होते. तेव्हा भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रात खूप मोठी उलाढाल होत होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. वसंत गोवारीकर,मुथूनायागम, श्री. कुरूप, डॉ. ब्रह्मप्रकाश, प्रोफ. धवन असे अनेक दिग्गज त्यावेळी एकत्र काम करत होते. याच कामाला समांतर असे काम नारायणन यांच्या नेतृत्वाखाली डी.आर.डी.ओ.ने जमिनीवरुन हवेत मारा करता येणाऱ्या ( सरफेस टू एअर ) क्षेपणास्त्रांच्या रुपात सुरु केले होते.
प्रक्षेपण यानांसाठी भारताच्या पूर्व किनाऱ्यावर श्रीहरीकोटा इथल्या बेटावर शार (SHAR) रॉकेट लॉन्च स्टेशन तयार करण्यात आले. त्याच काळात इस्रो - Indian Space Research Organisation (ISRO) ची स्थापना झाली. १९७२ साली RATO ची यशस्वी टेस्ट झाली आणि सुखोई १६ विमानाने फक्त १२०० मीटरची धाव घेत हवेत उड्डाण केले. या यशस्वी तंत्रज्ञानाने RATO ची आयात बंद करून भारताची करोडो रुपयांची बचत झाली आणि डॉ. साराभाई यांचे एक स्वप्न साकार झाले. मात्र ते बघायला डॉ. विक्रम साराभाई हयात नव्हते.
अगदी कमी तंत्रज्ञ घेऊन केलेल्या अथक परिश्रमानंतर १९७९ साली SLV-3 चे एक अयशस्वी उड्डाण झाले. त्यावेळी माध्यमांनी इस्त्रोच्या या कामगिरीवर बरीच टिका केली होती. मात्र त्या प्रयत्नांनंतर १९८० साली भारताच्या पहील्या SLV-3 चे यशस्वीरीत्या अवकाशात प्रक्षेपण झाले. SLV-3 ने पे-लोड म्हणुन नेलेला रोहिणी हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावला. डॉ. कलाम यांनी प्रोजेक्ट डायरेक्टर या नात्याने या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशाची घोषणा केली आणि भारताने अवकाशाला गवसणी घातली. इस्त्रोचे तत्कालीन चेअरमन प्रो. धवन होते. त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही टीमचे अभिनंदन केले. भारताच्या इतिहासातल्या तंत्रज्ञानाच्या पानावर सुवर्णाक्षरात एक महत्वाची नोंद झाली.
१९८१ साली डॉ. अब्दुल कलाम यांना पद्मभूषण किताबाने आणि प्रो. धवन यांना पद्मविभूषण किताबाने सन्मानित करण्यात आले.
आता SLV-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर यापुढचे काम जिओ सॅटेलाईट्स लाँचवर सुरु झाले. सरफेस टू एअर मिसाईल्सही यशस्वी झाली होतीच. गाईडेड मिसाईल्स वर काम सुरु झाले. भारताच्या शत्रूला धडकी भरवणारी आणि भारतीयांची मान अभिमानाने ताठ करणारी पृथ्वी (१९८८), अग्नी(१९८९), आकाश(१९८९) ही क्षेपणास्त्रे तयार झाली. या सर्व प्रकारच्या चाचण्यांसाठी SHAR हे एक महत्वाचे प्रक्षेपण केंद्र बनले. अण्वस्त्रे निर्मिती झाली आणि भारताचे नाव अणु तंत्रज्ञानात स्वयंपूर्ण म्हणुन प्रसिध्द झाले. आता १ ऑगस्ट २०१३ ला भारताचा अतिप्रगत असा वातावरणाचा अभ्यासक INSAT-3D अवकाशात स्थिर झालाय. हवामानातले बदल जाणणे आणि त्याचा अभ्यास करणे त्यानुसार शेती आणि इतर गोष्टी यांचा विचार करणे आता अधिक सुकर होणार आहे.
मात्र पुन्हा एकदा आपण इतिहासात अडकून राहून इतिहासाची पुनरावृत्ती तर करणार नाही ना याची भिती वाटते. हजारो वर्षापूर्वी भारत कसा होता, किती प्रगत होता याच्या चर्चा आपण आताही करतो पण नुसत्याच पोकळ चर्चा! त्यातून निष्पन्न काहीच नाही. तसेच पन्नास वर्षापूर्वी काही द्रष्ट्या माणसांनी जी स्वप्न पाहिली, जसे झोकून देऊन काम केले त्याबद्दल नुसतेच बोलत राहिलो तर त्याचा काय उपयोग आहे? डॉ. साराभाई, प्रो. धवन यांच्या काळात ज्या आत्मियतेने देशासाठी सर्वस्व झोकून देऊन काम झाले तसे आता होताना फारसे दिसत नाही.
विज्ञान आणि तंत्रज्ञान या गोष्टी हातात हात घालून चालतात. कुठलेही तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी ज्या मुलभूत विज्ञानाचा अभ्यास करावा लागतो त्या अभ्यासात आपण कमी पडतो असे मला वाटते. विकसित देशात अनेक नवनवीन शोध लागत असतात, विविध संशोधने होत असतात, वेगळ्या विषयांवर काम करण्यासाठी चालना दिली जाते. त्या तुलनेत व्हायला हवे त्या प्रमाणात भारतात संशोधन होत नाही, अशा प्रयोगांना चालना, पाठबळ मिळत नाही . याचे कारण काय असावे? अगदी परदेशातून तंत्रज्ञान आयात केले तरीही आपल्याकडे ते योग्य रित्या वापरले जात नाही. अवकाशातले जाऊ द्या साधे चांगले रस्ते बनवायचे कौशल्य आपण बाळगू शकत नाही. चार महिने भरपूर पाऊस मिळणाऱ्या आपल्या देशात दुष्काळ टाळण्यासाठी काहीच प्रयत्न केले जात नाहीत. नद्या जोडणीसारखे प्रकल्प अनेक दशके कागदावरून प्रत्यक्षात उतरतच नाहीत. विविध आणि विपुल प्रमाणात असलेले आमचे नैसर्गिक उर्जास्त्रोत अजून आम्ही पुरेसे वापरून घेऊ शकत नाही. आज ६७ वर्षानंतरही सर्व भारताला पुरेश्या विजेचे उत्पादन आपण करू शकत नाही. आज ६७ वर्षानंतरही वीज, पाणी या मुलभूत सोयी न मिळणारी, मुख्य रस्त्याशी न जोडलेली गावं भारतात आहेत. आज ६७ वर्षानंतरही अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण या गरजा न भागलेली कुटूंबे आहेत. या प्रश्नांना राजकीय, समाजशास्त्रीय, भौगोलिक असे अनेक पैलू असले तरीही मुळ मुद्दा तोच रहातो.
त्या काळात कुठल्याही सोयी, सुविधा नव्हत्या, पुरेसा निधी नव्हता, माहिती तंत्रज्ञान अगदी बाल्यावस्थेत म्हणावे असे होते, देश अतिशय गरीब अवस्थेत होता आणि तरीही भारत अवकाशाला गवसणी घालू पहात होता. त्यातुलनेत आता देश कितीतरी चांगल्या आर्थिक परिस्थितीमध्ये आहे, संशोधनासाठी सोयी, सुविधा उपलब्ध होऊ शकतात. हवे असल्यास स्वत:चे तंत्रज्ञान विकसित करता येण्याची क्षमता भारतात आहे. परदेशातले संशोधन आणि त्याविषयीची माहिती काही क्लिक वापरून मिळू शकते. चांगले शिक्षण उपलब्ध आहे. मात्र तरीही आपण खूप प्रगती केली असे म्हणता येणार नाही. याची कारणे आपल्या पिढीने आत्ताच शोधली नाहीत तर फार उशीर झालेला असेल. भारत महासत्ता बनणार हे वाक्य हजारो, लाखो वेळा बोलून आणि त्यावर चर्चा करून देश महासत्ता बनत नसतो. तो बनतो ते धडाडीच्या, देशावर प्रेम करणाऱ्या, कणखर राजकीय नेतृत्वामुळे! डॉ. साराभाई, डॉ. कलाम, प्रो. धवन यांच्यासारख्या दूरदर्शी लोकांमुळे!! हे असे नेतृत्व, हे असे दूरदर्शी लोक तुमच्या आमच्यामधुनच पुढे येतात. म्हणुनच आज गरज आहे ती या मोठ्या लोकांचे आदर्श डोळ्यापुढे ठेवून काहीतरी करून दाखवण्याची, पुढच्या पिढीला सक्षम बनवायची. नुसत्या पोकळ चर्चा न करता काहीतरी घडवून दाखवायचे हे शिवधनुष्य आज आपल्यापुढे आहे.
-----------------------------------
संदर्भ -
विंग्स ऑफ फायर - डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम , अरुण तिवारी
http://dos.gov.in/launchvehicles.aspx
http://www.isro.org/scripts/Aboutus.aspx
स्वातंत्र्यदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा
No comments:
Post a Comment