भारतात आल्यावर प्रकाशचित्रण क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं आहे असं मनात होतं. काय ते नक्की ठरवलं नव्हतं आणि कळतही नव्हतं. इतर अनेक गोष्टी करतानाच ठाण्यातल्या 'फोटो सर्कल सोसायटी' या संस्थेची मेंबर होण्याच्या उद्देशानेच 'फोटो सर्कल सोसायटी'ने आयोजित केलेल्या एका व्याख्यानाला गेले. 'फोटो सर्कल सोसायटी' दरवर्षी 'आविष्कार फोटोग्राफी स्पर्धा' आयोजित करते. तिथे दरवर्षी मी स्पर्धक म्हणून प्रवेशिका पाठवत असे. पण तरीही तिथले कुणी मला पाहिलेलं नव्हतं. त्यामुळे ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. पण जेव्हा मी माझे नाव सांगितलं तेव्हा मला ओळखणारे लोक पाहून मला खरंच धक्का बसला होता. त्यादिवशी अनेक फोटोग्राफर्सना भेटून मस्त वाटलं.
त्यानंतरच्या पुढच्या मिटिंगच्या आधी डोक्यात आलं की इतके सगळे फोटोग्राफर्स आहेत, तर सगळ्यांनी एकत्र मिळून फोटोग्राफी वरती एक दिवाळीअंक काढता येईल का? ही कल्पना सुचल्यावर "फोटो सर्कल सोसायटी"च्या कार्यकारी सदस्यांना एसएमएस करणार होते. मग विचार केला 'उगाच कशाला ! कुणाला आवडणार नाही . जाऊदे.' पण तरीही जेव्हा पुढच्या मिटिंगला गेले तेव्हा "फोटो सर्कल सोसायटी"चे सरचिटणीस संजय नाईक यांच्याशी बोलताना सहज बोलून गेले. त्यांना ही कल्पना तेव्हाच आवडली. मला वाटलं कल्पना दिली, आपलं काम संपलं.
आता जमलं तर एक लेख नक्की देऊ अंकात ! पण एक दोन दिवसात रात्री त्यांचा फोन आला आणि एकदम 'या कामाची जबाबदारी तू घे. तुझी कल्पना आहे त्यामुळे तुला करता येईल' असंच त्यांनी सांगितलं. मी तेव्हा काहीशी गोंधळून जबाबदारी टाळण्याचाही प्रयत्न केला पण तो व्यर्थ ठरला.
पहिल्याच मिटिंगमध्ये फोटो सर्कल सोसायटीची वेबसाईट सांभाळणाऱ्या संजय जाधव यांच्याशी अनेक तांत्रिक मुद्द्यांवर चर्चा करून काही मुद्दे स्पष्ट करुन टाकले. सगळ्यात पहिला मुद्दा हा की लेख पाठवणारा फोटोग्राफरच असला पाहिजे. फोटोग्राफी या विषयातल्या तांत्रिक मुद्द्यांवर असलेले लेख नको तर फोटो काढताना फोटोग्राफरचे विचार आणि अनुभव शब्दबद्ध करणारे लेख असावेत हे ठरले. तसंच सगळं काम आटोक्यात रहाण्यासाठी लेख फक्त निमंत्रित फोटोग्राफर्सकडूनच मागवायचे आणि दोन मुलाखती नक्की घ्यायच्या हे ही ठरले. तेव्हाच अंकासाठी कुठले तंत्रज्ञान वापरायचे इ. गोष्टीही ठरवल्या. नावासाठी आमच्याच ग्रुपकडून सजेशन्स मागवली आणि चार दिवसात निनावी प्रोजेक्टला एक नाव मिळालं 'फ' फोटोचा. प्रवीण देशपांडे यांनी सुचवलेले नाव सगळ्यांनाच आवडले आणि त्याच्या पुढच्या काही दिवसात आकृती माहिमकरने मस्तपैकी बोधचिन्हही करून दिले.
तिथून पुढे मुलाखती, लेखांसाठी, फोटोसाठी फॉलोअप, काही इंग्रजी लेखांचे भाषांतर, काही नवोदीत लेखकांसाठी लेखन सहाय्य, मुद्रितशोधन, फोटो निवड असे भरपूर काम सुरु झाले. माझ्या नेहेमीच्या ऑनलाईन मित्रमैत्रिणींसाठी मी जणूकाही गायबच झाले होते. खूप दिवसात कुणाशीच बोलणे नाही, मायबोलीवर, फेसबुकवर लॉगीन नाही ! ब्लॉगवर नवे लेखन नाही. बहुतेक जणांना वाटले असणार की मी भारतात येऊन ऑनलाईन व्हायचे विसरलेच.
या गेल्या तीन महिन्यात अनेक मान्यवर फोटोग्राफर्सना भेटले, त्यांच्याशी बोलले, खूप काही नवीन शिकले. एरवी मला यातल्या कुणालाच भेटता येण्याची काही शक्यता नव्हती, इतक्या कमी वेळात तर अजिबातच नाही. या सगळ्याच मान्यवर लोकांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. सगळेच जण बोलायला इतके साधे आणि सरळ होते की त्यांच्याशी बोलणं हाच एक वेगळा अनुभव होता.
त्याही पुढचे पाऊल म्हणजे फोटो सर्कलचे कार्यकारिणी आणि सदस्य यांचे होते. त्या सगळ्यांनीच या कामासाठी प्रचंड सहकार्य केलेय. जाहिराती गोळा करण्यापासून ते मुद्रितशोधन केलेले लेख इकडून तिकडे पोहोचवण्यापर्यंत अनेक प्रकारची मदत त्यांनी केली. मुख्य म्हणजे मी तशी नवीन असूनही सगळ्यांनीच माझ्या कामावर आणि आमच्या टीमवर विश्वास ठेवला! त्या एकमेकांवरच्या विश्वासातून आणि सहकार्यातूनच आजचा आमचा 'फ' फोटोचा हा फोटोग्राफीला वाहिलेला पहिलावहिला मराठी दिवाळीअंक नावाजलेले प्रकाशचित्रकार श्री. शिरीष कराळे यांच्या हस्ते प्रकाशित झाला.
अजून एका उल्लेखाशिवाय हा लेख अपुरा राहील. तो म्हणजे मायबोली.कॉम हे संकेतस्थळ आणि तिथले व ब्लॉगवरचे माझे वाचक / लेखक मित्रमैत्रिणी. मी काहीतरी लिहायला सुरुवात केली याचं पूर्ण श्रेय त्यांना. मी लिहिलेलं मोडकंतोडकं सगळंच त्यांनी वाचून नेहेमी मला प्रोत्साहन दिलं आणि अजून लिहायला पाठबळ दिलं. त्यांच्यामुळेच हे वेगळे काम करण्याची हिम्मत मला मिळाली.
'फ' फोटोचा या दिवाळीअंकाचे पहिलेच वर्ष असल्याने अंकात काही चुका, दोष असतीलच, नव्हे आहेतच. पण त्या चुकांसहीत हा फोटोग्राफीला वाहिलेला पहिलावहिला मराठी दिवाळीअंक 'फ' फोटोचा तुम्हा रसिकांसाठी सादर आहे. फोटोग्राफी क्षेत्रातल्या एका नव्या व्यासपिठावर तुमचे सगळ्यांचेच स्वागत आहे.
'फ' फोटोचा या दिवाळीअंकाचे पहिलेच वर्ष असल्याने अंकात काही चुका, दोष असतीलच, नव्हे आहेतच. पण त्या चुकांसहीत हा फोटोग्राफीला वाहिलेला पहिलावहिला मराठी दिवाळीअंक 'फ' फोटोचा तुम्हा रसिकांसाठी सादर आहे. फोटोग्राफी क्षेत्रातल्या एका नव्या व्यासपिठावर तुमचे सगळ्यांचेच स्वागत आहे.
Mast.. Abhinandan & Best Wishes !
ReplyDeleteभारीये हे. आणि अंकही खूप मोठा आहे. वाचून संपतच नाहीये.. :) तुम्हा सर्वांची मेहनत दिसून येतेय. :) अभिनंदन आणि धन्यवाद.
ReplyDelete