Friday, November 23, 2012

जाणिवांच्या पलीकडे...

मायबोली दिवाळी अंक २०१२ मध्ये प्रकाशित झालेली माझी कथा.
-------------------------------


जाणिवांच्या पलीकडे...


हिवाळा ओसरत आला की साधारण सगळ्यांनाच 'साकुरा'ची म्हणजे चेरीच्या बहराची ओढ लागते.  शुष्क, पर्णहीन, रंगहीन हिवाळ्यानंतर फिकट गुलाबी पाकळ्यांनी अवघा आसमंत रोमांचित करणाऱ्या या फुलांची आस लागणे सहाजिकच आहे म्हणा !  सगळे डोळे असे साकुराकडे लागले असतानाच त्याच्या  महिनाभर आधीच फुलणाऱ्या 'उमे' म्हणजे प्लमच्या बहराकडे फारसे कुणाचे लक्षच जात नाही. खरं  सांगायचं तर वसंताच्या आगमनाची चाहूल घेऊन येणारा हा पहिला मानकरी. पण आपल्या पाकळ्या भिरभिरवत जमिनीवर झेपावत गुलाबी गालिचे घालणाऱ्या साकुराची नजाकत याला नसल्याने आणि याचा बहरही पटकन येऊन जात असल्याने कुणी त्याची  फारशी दाखल घेत नाहीत. हां, पोपटी रंगाचा डोळ्याभोवती पांढरे कडे असलेला चष्मेवाला मात्र या बहराच्या आगमनाने अगदी खुश होऊन जातो.

असंच एका वर्षी कुठेतरी जाहिरातीत एका ठिकाणच्या प्लमच्या बहराबद्दल वाचले आणि तिथे जायचे असे ठरवले. ते ठिकाण तसे फारसे दूर नव्हते. फक्त बस स्थानकापासून बरेच आत चालायचे होते. गारठणाऱ्या थंडीतून आणि  बोचऱ्या वाऱ्यातून माझा कॅमेरा सावरत मी चालले होते.  बागेजवळ पोहोचले तर  समोरच गरमागरम भाजलेले दान्गो म्हणजे भाताचे चिकट गोळे विकायला एक जण  बसला होता.  थंडीवाऱ्यात  गोठून आल्यानंतर काठीला टोचून आमाकारा सॉसमध्ये बुडवलेले  ते गरमागरम भाजके गोळे,  तिथेच उभे राहून तोंड भाजत खाणे म्हणजे स्वर्गसुखच. पण सध्यातरी कॅमेरा हातात असल्याने हे स्वर्गसुख नंतर परत येताना चाखावे असे ठरवून निघाले.

 त्याच्या जरा पुढे  एका छोट्या मोकळ्या जागेत फुलझाडांचा बाजार भरला होता.  वसंत येणार म्हणून वेगवेगळी फुलझाडे लावण्याचा एक कार्यक्रम घरोघरी असतो. प्लमच्या फुलांचा बहर पाहून जाताना थोडी फुलझाडे, ट्युलीपचे कंद आपल्या घरी न्यायचे, त्यांची निगा राखायची. हवा उबदार व्हायला लागली कि मातीत लावलेल्या त्या कंदातून एक हिरवी रेघ तरारून वर येते.  काही दिवसातच वाढलेल्या त्या हिरव्या पानांतून  हळूचकन डोकावून पहाणाऱ्या कळ्या शोधायच्या. त्यांची फुले उमलताना पहायची हा ही  एक वेगळाच अनुभव. परतताना करायच्या गोष्टींमध्ये हे कंद घेऊन जायचे कामही टाकून  मी पुढे निघाले.

बागेच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचले आणि थोडीशी निराशाच झाली.  साकुरासारख्याच या प्लमच्या बागाही फुलांनी डवरलेल्या असतील अशी काहीशी अपेक्षा मी ठेवली होती. पण दूरवरून पहाताना मात्र ही  छोटीशी बाग तशी वाटली नाही. आता आलेच आहे तर सगळी बाग बघून यावी असे ठरवून मी चालायला सुरुवात केली.



पायऱ्या पायऱ्याची रचना असलेल्या त्या बागेत खाली उभे राहिले कि समोरची अगदी चिमुकली टेकडी रंगीत फुलांनी भरून गेलेली दिसते. त्या पायऱ्या झाडांच्या आसपास घुटमळत आपल्याला टेकडीच्या वर नेऊन पुन्हा खाली आणून सोडतात. जस जसे चालायला लागले तसतसे   त्या झाडांमधली नजाकत मला जाणवायला लागली. त्यांचे दाट काळे बुंधे, चित्रासारख्या लयीत वाढलेल्या बाकदार फांद्या आणि त्या फांद्यांवरच चिकटलेली नाजूक गोल पाकळ्यांची, मंद वासाची फुले!  ती डौलात उभी असलेली झाडं  पाहून सर्वात आधी काय आठवलं असेल तर ते म्हणजे चीनी चित्रं. मी लहान असताना घरात एका भिंतीवर एक वॉलपेपर होता त्यावरही असंच  एक कमानदार झाड असलेलं  आठवलं. त्यानंतरही अनेक चीनी चित्रांमध्ये  अशी  कमानदार खोडाची झाडं पाहिली होती. अशी गोल पाकळ्या असेली फुलं  पाहिली होती.   बरं, या चित्रातल्यासारख्या झाडावरच्या फुलांतही इतक्या छटा की दोन झाडांच्या फुलांचे  रंग एकमेकांशी जुळायचे नाहीत.  पांढऱ्यापासून  ते गुलाबी, लाल, किरमिजी रंगाच्या छटा  ल्यायलेली  ही असंख्य सुवासिक फुलं त्या पर्णहीन काळ्या फांद्यावर खुलून दिसत होती.   पायऱ्यांच्या वळणावळणातून फिरताना मधेच  एक मंद गोड सुवासही अवती भवती रुंजी घालत होता.   अशा नजाकतदार झाडाच्या फांद्यावर बसून, त्यावर उमललेल्या फुलांमध्ये चोच घालून मध पीत फुलांशी गुजगोष्टी करण्याऱ्या  पोपटी चष्मेवाल्याचा हेवा वाटावा तितका थोडाच.






अशा पक्षांना शोधत आणि  वेळावणाऱ्या फांद्यावरच्या फुलांचे नखरे पाहत जात असताना एक अतिशय वृध्द अशा आज्जी दिसल्या. एक बाई त्यांच्याबरोबर सोबतीला होती. ती बहुधा वृद्धांच्या मदतीसाठी येणारी मदतनीस होती. पण ती आज्जीचा हात हातात धरून त्यांना प्रेमाने चालवत होती. मधेच कुठल्यातरी झाडाजवळ त्याना थांबवत होती. एखादी फांदी  वाकवून त्या फुलांचा सुवास आज्जीला घ्यायला लावत होती.   इतक्यात त्यांच्या हातातली लालपांढरी काठी दिसली आणि त्यावेळी मला जाणवलं कि त्या आज्जीना पाहता येत नाही. वार्धक्यामुळे म्हणा किंवा इतर काही कारणांमुळे  म्हणा पण त्यांना काही दिसत नव्हते.  आणि ती मदतनीस म्हणूनच त्यांचा हात धरून बागेतून चालवत त्या सुंदर, नाजूक फुलांचा सुवास , स्पर्श त्यांना देत होती. आज्जी त्या फुलाना बोटांनी हलकेच कुरवाळत होत्या.  त्या मखमली स्पर्शाने आणि  त्या सुवासाने आज्जींचा चेहेरा प्रत्येकवेळी उजळून निघत होता.   तो स्पर्श आणि गंध त्यांच्या आठवणींच्या कुठल्यातरी बंद दालनाची कड्या कुलुपे अलगद उघडून त्यांना एका वेगळ्याच प्रवासाला घेऊन जात असेल का असे सहजच वाटून गेले.    इतक्या म्हातारपणी काहीच दिसत नसताना सुद्धा मुद्दामहून बागेत येऊन  त्या फुलांना दाद देण्याची ही आज्जींची  रसिकता म्हणावी कि जुन्या आठवणीना उजाळा देण्याची त्यांची अनोखी रीत म्हणावी हे मला ठरवता येईना.

मी कितीतरी वेळ त्यांचे ते फुलांना अनुभवणे पहात होते. त्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंद बघत होते.  त्यांच्यासाठी ही कदाचित साधीशीच गोष्टं असली तरी    माझ्यासाठी मात्र हा अनुभव  एक वेगळेच प्रकाशाचे दालन उघडून गेला.   पूर्वी योग्यांना योगसामर्थ्याने हव्या त्या ठिकाणी जाण्याची सिद्धी प्राप्त होती असे म्हणतात.  निसर्गातल्या सगळ्या अनुभूतीही जाणिवांच्या पलीकडच्या असतात.   तो निसर्ग मनात असाच झिरपत ठेवला तर जाणिवांची कवाडं बंद करूनही आयुष्यात  हव्या त्या क्षणी, हव्या त्या ठिकाणी मनानेच जाऊन यायची सिद्धी आपल्यालाही प्राप्त होईल का असे काहीसे वाटून गेले.







Wednesday, November 7, 2012

Making of 'फ' फोटोचा - फोटोग्राफीला वाहिलेला पहिला मराठी दिवाळीअंक



भारतात आल्यावर प्रकाशचित्रण क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं आहे असं मनात होतं. काय ते नक्की ठरवलं नव्हतं आणि कळतही नव्हतं.  इतर अनेक गोष्टी करतानाच ठाण्यातल्या 'फोटो सर्कल सोसायटी' या संस्थेची मेंबर होण्याच्या उद्देशानेच 'फोटो सर्कल सोसायटी'ने आयोजित केलेल्या एका व्याख्यानाला गेले. 'फोटो सर्कल सोसायटी' दरवर्षी 'आविष्कार फोटोग्राफी स्पर्धा'  आयोजित करते.  तिथे दरवर्षी मी स्पर्धक म्हणून प्रवेशिका पाठवत असे. पण तरीही तिथले कुणी मला पाहिलेलं नव्हतं. त्यामुळे ओळखण्याचा प्रश्नच नव्हता.  पण जेव्हा मी माझे  नाव सांगितलं तेव्हा मला ओळखणारे लोक पाहून मला खरंच धक्का बसला होता. त्यादिवशी अनेक फोटोग्राफर्सना भेटून मस्त वाटलं.

त्यानंतरच्या पुढच्या  मिटिंगच्या आधी डोक्यात आलं की इतके सगळे फोटोग्राफर्स आहेत, तर सगळ्यांनी एकत्र मिळून फोटोग्राफी वरती एक दिवाळीअंक काढता येईल का? ही कल्पना सुचल्यावर "फोटो सर्कल सोसायटी"च्या कार्यकारी सदस्यांना  एसएमएस करणार होते. मग विचार केला 'उगाच कशाला ! कुणाला आवडणार नाही . जाऊदे.'  पण तरीही जेव्हा पुढच्या मिटिंगला गेले तेव्हा "फोटो सर्कल सोसायटी"चे सरचिटणीस   संजय नाईक यांच्याशी  बोलताना सहज बोलून गेले. त्यांना ही कल्पना तेव्हाच आवडली.  मला वाटलं कल्पना दिली, आपलं काम संपलं. 
आता जमलं तर एक लेख नक्की देऊ अंकात ! 

पण एक दोन दिवसात रात्री त्यांचा फोन आला आणि एकदम 'या कामाची जबाबदारी तू घे. तुझी कल्पना  आहे त्यामुळे तुला करता येईल' असंच त्यांनी सांगितलं. मी तेव्हा काहीशी गोंधळून जबाबदारी टाळण्याचाही प्रयत्न केला पण तो व्यर्थ ठरला. 
मला या क्षेत्राचा काहीही अनुभव नसला तरी सॉफ्टवेअर क्षेत्रातला  प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा आणि प्रोजेक्ट प्लानिंगचा  बराच अनुभव होता. एकदा शिकलेले कधीच व्यर्थ जात नाही या उक्तीप्रमाणेच तो अनुभव इथे कामी आला.  या कामाला एखाद्या प्रोजेक्ट प्रमाणेच मानून पहिली टास्कलिस्ट  आणि रफ टाईमलाईन  प्लान बनवला. वेळापत्रकानुसार लग्गेच काम चालू केलं तरच वेळेवर होणार होतं.  तो प्लान "फोटो सर्कल सोसायटी"चे सरचिटणीस संजय नाईक आणि अध्यक्ष प्रवीण देशपांडे  यांना पाठवला आणि आमची पहिली मिटिंग ठरली. 

पहिल्याच मिटिंगमध्ये फोटो सर्कल सोसायटीची वेबसाईट सांभाळणाऱ्या संजय जाधव यांच्याशी   अनेक तांत्रिक मुद्द्यांवर चर्चा  करून  काही मुद्दे स्पष्ट करुन टाकले. सगळ्यात पहिला मुद्दा हा की लेख पाठवणारा फोटोग्राफरच असला पाहिजे. फोटोग्राफी या विषयातल्या तांत्रिक मुद्द्यांवर असलेले लेख नको तर फोटो काढताना फोटोग्राफरचे विचार आणि अनुभव शब्दबद्ध करणारे लेख असावेत हे ठरले.  तसंच सगळं काम आटोक्यात रहाण्यासाठी  लेख फक्त निमंत्रित फोटोग्राफर्सकडूनच मागवायचे आणि दोन मुलाखती नक्की घ्यायच्या हे ही ठरले. तेव्हाच अंकासाठी कुठले तंत्रज्ञान वापरायचे इ. गोष्टीही ठरवल्या.     नावासाठी आमच्याच ग्रुपकडून सजेशन्स मागवली  आणि चार दिवसात निनावी प्रोजेक्टला एक नाव मिळालं  'फ' फोटोचा.   प्रवीण देशपांडे यांनी सुचवलेले नाव सगळ्यांनाच आवडले आणि त्याच्या पुढच्या काही दिवसात आकृती माहिमकरने मस्तपैकी  बोधचिन्हही करून दिले.  

तिथून पुढे मुलाखती, लेखांसाठी, फोटोसाठी  फॉलोअप, काही इंग्रजी लेखांचे भाषांतर, काही नवोदीत लेखकांसाठी लेखन सहाय्य, मुद्रितशोधन, फोटो निवड असे भरपूर काम सुरु झाले. माझ्या नेहेमीच्या ऑनलाईन मित्रमैत्रिणींसाठी मी जणूकाही गायबच झाले होते. खूप दिवसात कुणाशीच बोलणे नाही, मायबोलीवर,  फेसबुकवर लॉगीन  नाही ! ब्लॉगवर नवे लेखन नाही.  बहुतेक जणांना वाटले असणार की मी भारतात येऊन ऑनलाईन  व्हायचे विसरलेच.  

या गेल्या तीन महिन्यात अनेक मान्यवर फोटोग्राफर्सना भेटले, त्यांच्याशी बोलले, खूप काही नवीन शिकले. एरवी मला यातल्या कुणालाच भेटता येण्याची  काही शक्यता नव्हती, इतक्या कमी वेळात तर अजिबातच नाही.  या सगळ्याच मान्यवर लोकांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. सगळेच जण  बोलायला इतके साधे आणि सरळ होते की त्यांच्याशी बोलणं हाच एक वेगळा अनुभव होता. 

त्याही पुढचे पाऊल म्हणजे फोटो सर्कलचे  कार्यकारिणी आणि सदस्य यांचे होते. त्या सगळ्यांनीच या कामासाठी प्रचंड सहकार्य केलेय. जाहिराती गोळा करण्यापासून ते मुद्रितशोधन केलेले लेख इकडून तिकडे पोहोचवण्यापर्यंत अनेक प्रकारची मदत त्यांनी केली. मुख्य म्हणजे मी तशी नवीन असूनही सगळ्यांनीच माझ्या कामावर आणि आमच्या टीमवर विश्वास ठेवला!    त्या एकमेकांवरच्या विश्वासातून आणि सहकार्यातूनच आजचा आमचा 'फ' फोटोचा हा फोटोग्राफीला वाहिलेला पहिलावहिला मराठी दिवाळीअंक नावाजलेले प्रकाशचित्रकार श्री. शिरीष कराळे  यांच्या हस्ते प्रकाशित झाला.             

अजून एका उल्लेखाशिवाय हा लेख अपुरा राहील. तो म्हणजे मायबोली.कॉम  हे संकेतस्थळ आणि तिथले व ब्लॉगवरचे  माझे वाचक / लेखक मित्रमैत्रिणी. मी काहीतरी लिहायला सुरुवात केली याचं पूर्ण श्रेय त्यांना. मी लिहिलेलं मोडकंतोडकं  सगळंच त्यांनी वाचून नेहेमी मला प्रोत्साहन दिलं आणि अजून लिहायला पाठबळ दिलं. त्यांच्यामुळेच हे  वेगळे काम करण्याची हिम्मत मला मिळाली.    

'फ' फोटोचा या दिवाळीअंकाचे पहिलेच वर्ष असल्याने अंकात काही चुका, दोष असतीलच, नव्हे आहेतच. पण त्या चुकांसहीत हा फोटोग्राफीला वाहिलेला पहिलावहिला मराठी दिवाळीअंक 'फ' फोटोचा तुम्हा रसिकांसाठी सादर आहे.  फोटोग्राफी क्षेत्रातल्या एका नव्या व्यासपिठावर तुमचे सगळ्यांचेच स्वागत आहे.