काही वर्षापूर्वीच म्हणजे जेव्हा डिजीटल कॅमेर्याचे युग चालू झाले नव्हते तेव्हा नेहेमीच्या फोटो प्रिंटिंग दुकानातले बरेचजण सहज फुकटात सल्ला द्यायचे. ४०० आयएसओ वाली फिल्म घ्या छान फोटो येतात. मग काहीच माहीत नसलेले काहीजण ती फिल्म घ्यायचेच. आता दुकानदारानेच सांगितली म्हणजे चांगली असणारच हो! कधी त्याने काढलेले फोटो छानच यायचे आणि कधी कधी मात्र पांढरे पडायचे. असं का व्हायचं बरं ?
त्यासाठी फिल्मस्पीड म्हणजे नेमकं काय ते बघावं लागेल.
फिल्मस्पीड म्हणजे फोटोफिल्म प्रकाशाला किती सेन्सिटीव्ह आहे याचे मोजमाप आहे. ज्या फिल्मची प्रकाश सेन्सिटिव्हिटी कमी असते ती स्लो फिल्म तर ज्या फिल्मची प्रकाश सेन्सिटिव्हिटी जास्त असते ती फास्ट फिल्म. ५०, १०० या स्लो फिल्म तर २००, ४००, १६०० या फास्ट फिल्म. हो, हो. आता तुम्ही नक्कीच म्हणाल कि स्लो फास्ट अशी नावं सांगून काय होतं? तर फास्ट फिल्म म्हणजे या फिल्मवर अगदी बारीकसा प्रकाशही लगेच नोंद केला जातो. त्या उलट स्लो फिल्मवर प्रकाशाची नोंद व्हायला प्रकाश जास्त असावा लागतो. किंवा बारीकसा प्रकाश नोंद करण्यासाठी जास्त वेळ शटर उघडे ठेवावे लागते.
मग समजा, एखादा घरातला समारंभ आहे. तर प्रकाश अर्थातच कमी असणार. मग शटर स्पीड कमी होणार आणि कमी प्रकाशातले फोटो हललेले किंवा काळपट येणार. तुम्ही जास्त आयएसओ असलेली जसे २०० किंवा ४०० वाली फिल्म घेतली तर फास्ट शटर स्पीड मुळे हललेले(ब्लर) फोटो यायचे प्रमाण कमी होऊन कमी प्रकाशातही चांगले फोटो येतील. पण समजा हीच फिल्म घेऊन तुम्ही दुपारच्या रणरणत्या उन्हात फोटो काढायला गेलात कि काय होईल? खूप प्रकाश असल्याने कॅमेर्याला शटर स्पीड खूप वाढवावा लागेल. पॉईंट आणि शूट कॅमेर्यात इतका जास्त शटर स्पीड जात नसेल तेव्हा फोटो ओव्हर एक्सपोज होऊन पांढरट येतील. म्हणूनच त्या वरच्या उदाहरणात काही जणांचे फोटो छान आणि काहींचे बिघडलेले का आले ते आता तुमच्या लक्षात आलेच असेल.
त्यामुळे फोटो काढायचे म्हणून फिल्म विकत घेताना या फिल्मने नक्की कुठले फोटो काढणार ते आधीच विचार करून ठेवावे लागायचे. आणि त्यानुसार फिल्म स्पीड घ्यायला लागायचा. एखाद वेळी फास्ट फिल्म कॅमेर्यात भरलेली असायची तेव्हा नेमका आकाशाचा फोटो काढायचा चान्स येणे असे प्रकारही व्हायचे माझ्याबाबतीत. पण आता डिजीटल युगाने या प्रश्नाची वासलात लावलेली आहे.
बऱ्याच डिजीटल कॅमेर्यात आणि डीएसएलआर मधे हवे तेव्हा आयएसओ बदलण्याची सोय दिलेली असते. ओह, पण डिजीटल कॅमेर्यात तर फिल्मच नाही मग फिल्मस्पीड कुठून आला? डिजीटल कॅमेर्यात सेन्सर किती सेन्सिटिव्ह आहे याचे मोजमाप म्हणजे हा स्पीड. म्हणजे जर आयएसओ ४००, ६४० असा ठेवला तर फास्ट शटर स्पीड मधे फोटो घेणे शक्य होते. आणि कमी स्पीड केलात कि तुलनेने जास्त शटर स्पीड ठेवता येतो / ठेवावा लागतो. मग नेहेमीच जास्त आयएसओ का बरं नाही ठेवायचा? मग नेहेमी फास्ट शटरस्पीड मिळेल कि नाही? तर त्यालाही कारणं आहेत.
जास्त आयएसओ म्हणजे सेन्सर जास्त सेन्सिटिव्ह. मग तो हवा असलेला प्रकाश पकडताना नको असलेला प्रकाशही पकडतो आणि फोटोमध्ये नॉइज दिसतो. नॉइज म्हणजे फोटोत अतिशय बारीक रंगीत किंवा साधेच अनेक ठिपके दिसतात. यामुळे फोटोची क्लॅरिटी, शार्पनेस कमी होतो. फिल्ममधेही जास्त आयएसओ मुळे ग्रेनी फोटो मिळतात. फिल्ममधला हा ग्रेनीनेस काही वेळा फोटोच्या विषयाची गरज म्हणुनही मुद्दाम मिळवला जातो.
काही डिजीटल कॅमेर्यात आणि डीएसएलआरमध्ये ऑटो आयएसओ असा ऑप्शन असतो. त्यात कॅमेरा हवे ते शटर स्पीड मिळवण्यासाठी आपोआप आयएसओ बदलतो. अगदी अंधाऱ्या जागी, म्युझियम मध्ये वगैरे फोटो काढताना हे चांगले आहे पण खूप जास्त आयएसओ असला तर मात्र फोटो फारसे बघण्या- दाखवण्यासारखे रहात नाहीत. फार फार तर फोटो हुकला नाही याचे समाधान मिळते.
प्रयोग-
तुम्ही यावेळी प्रयोग करताना अॅपर्चर कायम ठेवा. आयएसओ बदलून वेगवेगळ्या आयएसओला शटर स्पीड कसा बदलतो ते स्वतः प्रयोग करून पहा. जसजसा आयएसओ वाढवू तसा शटर स्पीडही वाढत जातो.
मेगापिक्सेल वॉर -
डिजीटल कॅमेर्यात वर सांगितल्याप्रमाणे नको असलेल्या प्रकाशाने नॉइज येतोच. शिवाय अजून काही कारणांनी तो वाढू शकतो. कॅमेर्याच्या सेन्सर मध्ये पिक्सेल्स (म्हणजे प्रकाशबिंदु म्हणू हवं तर)असतात. एक एक पिक्सेलचा (प्रकाशबिंदुचा) प्रकाश जोडून पूर्ण डिजीटल इमेज बनवली जाते. पण हे पिक्सेल्स एकमेकांच्या इतके जवळ असतात कि त्याचाही एकमेकांना इंटरफिअरन्स होतो.
आता साध्या डिजीटल कॅमेर्याच्या किंमती कमी ठेवायच्या असतात आणि सेन्सर फार महाग असतो. हे गणित सोडवायला साध्या डिजीटल कॅमेर्याचे सेन्सर खुपच लहान केलेले असतात. त्यामुळे त्यांचे पिक्सेल्सही अगदी सूक्ष्म असतात. अशा सूक्ष्म आणि एकमेकांना चिकटून असलेल्या पिक्सेल मुळे नॉइज वाढतो.
कॅमेर्याचा सिग्नल(चांगला प्रकाश) टू नॉइज रेशो काढून तो कॅमेरा जास्तीत जास्त किती आयएसओ पर्यंत फोटो काढू शकतो हे ठरवलं जातं. म्हणून काही कॅमेर्यात आयएसओ ८०० पर्यंतच वाढवता येतं तर काही कॅमेर्यात २५६०० इतके जास्त सुद्धा असू शकते.
आता समजा एक कॅमेरा ६ मेगापिक्सेल आहे. तोच कॅमेरा ८ मेगापिक्सेल करायला काय करावे लागेल? एकतर ८ मेगा पिक्सेल्स मावणारा मोठा सेन्सर घ्यावा लागेल. पण त्यामुळे किंमत वाढणार. शिवाय मोठा सेन्सर म्हणजे मोठी जागा आणि तुलनेने कॅमेरा मोठा होणार. मग काय केले जाते? तर आहे त्याच ६ मेगापिक्सेलवाल्या सेन्सरच्याच मापाच्या सेन्सरमध्ये ८ मेगा पिक्सेल घुसवले जातात. तेवढ्या जागेत घुसवण्यासाठी पिक्सेल आणखी बारीक केले जातात. पण बारीक पिक्सेल म्हणजे परफॉर्मन्स कमी, नॉइजही तुलनेने जास्त.
म्हणजे तुम्ही भले १२ मेगा पिक्सेलचा कॅमेरा जास्त पैसे देऊन विकत घ्याल पण त्याने काढलेल्या फोटोची क्वालिटी ८ मेगापिक्सेलवाल्या कॅमेर्यापेक्षा चांगली असण्याची शक्यता फारच कमी. म्हणुन जास्त मेगा पिक्सेलच्या मागे जाण्यात फारसा अर्थ नाही. नेहेमीच्या घरातल्या फोटो करता खरेतर ५ मेगापिक्सेलही पुरेसे आहे. फार फार तर आठ मेगा पिक्सेल! त्यावर असलेल्याचा काही फायदा नाही. ८ मेगापिक्सेलने काढलेले फोटो तुम्ही सहज ए४ साईज मध्ये किंवा मोठेही प्रिंट करू शकता. आपण नेहेमीसाठी कितीवेळा अशा मोठ्या आकाराचे प्रिंट वापरतो त्याचा विचार तुम्हीच करा.
हम्म, तुम्ही विचारालच आता डीएसएलआर बद्दल. कंझ्युमर डीएसएलआर क्रॉप सेन्सरचे असतात. म्हणजे सेन्सरचा आकार साध्या डिजीटल कॅमेर्यापेक्षा मोठा पण ३५ मिमी वाल्या फिल्मपेक्षा छोटा असतो. क्रॉप सेन्सरमुळे कॅमेर्याचा आकार छोटा व्हायला मदत होते. शिवाय किंमत आटोक्यात रहाते. क्रॉप सेन्सरमुळे जितकी इमेज ३५ मिमीवाल्या फिल्मवर आली असती, त्यापेक्षा छोटी इमेज नोंदवली जाते. अर्थात प्रो कॅमेर्यापेक्षा फोटो क्वालिटी थोडी कमी होते पण साध्या डिजीटल कॅमेर्यापेक्षा बरीच चांगली असते. प्रोझ्युमर कॅमेर्यामध्ये बऱ्याचवेळा प्रो कॅमेर्याच्या क्वालिटीचा पण क्रॉप सेन्सर वापरला जातो आणि प्रो कॅमेर्यामध्ये ३५मिमि फिल्मच्या आकाराचा सेन्सर वापरला जातो. त्याला फुलफ्रेम कॅमेरा असेही म्हटले जाते. प्रो कॅमेर्याच्या मोठा सेन्सर, मॅग्नेशियम अलॉय बॉडी, डिझाईन, वेदर सिलिंग इत्यादी फिचरमुळे त्याची किमत वाढते. मोठ्या आकाराच्या सेन्सरमुळे बहुतेक डीएसएलआर मध्ये जास्त मेगा पिक्सेल असले तरी नॉइज तुलनेने कमी दिसतो. मात्र प्रो कॅमेरे बऱ्याच जास्त मेगा पिक्सेलचे असले तरी क्वालिटी उत्तम असते. हे कॅमेरे खूप जास्त आयएसओलासुद्धा वापरण्यायोग्य चांगल्या इमेजेस देऊ शकतात.
तुम्ही तुमच्या कॅमेर्यामध्ये आयएसओ रेंज किती आहे हे आता वाचून बघा. नंतर वेगवेगळ्या आयएसओला कसे फोटो येतात, शटरस्पीड कसा बदलतो तेही प्रयोग करून करायला हरकत नाही.
अधिक -
गेले अनेक दिवस हा लेख लिहून तयार होता. पण मला फोटो टाकायला वेळ नव्हता. आता अजूनही पुढचे एखाद दोन महिने वेळ मिळण्याची शक्यता कमीच आहे. म्हणून तसाच लेख इथे देत आहे. हा लेख फोटो नसले तरी चालण्यासारखा आहे असे वाटतेय.
----------
*** सर्व फोटोग्राफ आणि लेखन कॉपीराईट प्रोटेक्टेड आहे. लेखिकेकडुन लिखित पूर्व परवानगीशिवाय हा लेख पूर्णत: किंवा अंशत: इतर कुठेही वापरता किंवा प्रकाशित करता येणार नाही. ****
शुद्धलेखन सहाय्यासाठी मेघनाचे मनापासून आभार.
शुद्धलेखन सहाय्यासाठी मेघनाचे मनापासून आभार.
खूप छान आणि उपयुक्त माहिती...फोटोची गरज नाहीये आम्हालाच आमच्या क्यामेरावर शिकायची गरज आहे..:)
ReplyDeleteआणि हो शुद्धलेखन इ. ची काळजी घेतली जातेय हे खरच उल्लेखनीय आहे नाही तर पुष्कळजण आम्हाला मराठी स्पेलिंग नीट येत नाही म्हणून टांग मारतात...:) त्याबद्दल तुम्हा दोघींचं पुन्हा एकदा अभिनंदन...:)