प्रकाशरानातून चालताना...

प्रवास वर्णने आणि फोटोग्राफी विषयी लेख

  • Home
  • Posts RSS
  • Comments RSS

Friday, January 23, 2015

पूर्वांचल - मातृशक्तीचे विराट दर्शन - ५ - अजून थोडे पेनुर्सला

पूर्वांचल - मातृशक्तीचे विराट दर्शन - ५ - अजून थोडे पेनुर्सला 

३१- डिसेंबर - २०१३

आज सकाळी सकाळी डॉ आओम (Aiom Sdam) यांच्या घरी बसून चहा पिता पिता पुष्कळ गप्पा मारल्या.  डॉ. चे आई बाबाही घरात होते पण बाबा थोडे बुजरे होते , ते आमच्याशी काही बोललेही नाहीत आणि ओळखही करून घेतली नाही. इथल्या मातृसत्ताक पद्धतीप्रमाणे असे घडणे सहजच असावे बहुधा. ही मुलगी कोल्हापुरच्या मेडीकल कॉलेज मध्ये शिकायला होती. कोल्हापूर म्हटल्यावर आमच्या गप्पा फार रंगल्या. कोल्हापूरहून सुट्टीवर इथे घरी यायला पाच सहा दिवस प्रवासातच जायचे म्हणे.  भारतातल्या भारतात एका ठिकाणाहून दुसरीकडे जायला इतका वेळ लागावा?   वास्तविक पहाता तिथले शिक्षण पूर्ण झाल्यावर तीला सहजच शहरातच राहावेसे वाटणे, तिथेच प्रॅक्टीस कराविशी वाटणे किती सोपे होते. पण तीने असा विचार केला नाही. आपल्या इथल्या दुर्गम गावातल्या लोकांना औषधपाणी देण्यासाठी ती आपल्या गावात परत आली आणि आता इथे आपली डॉक्टरकी करते. इथे असलेली सोयींची वानवा, एकुणच आरोग्याविषयी हेळसांड, कुपोषण, गरिबी यासगळ्या मुळे इथे आरोग्याचे अनेक प्रश्न असणार. आपल्या मुळ गावाला न विसरता त्यांच्या सेवेसाठी परत येणाऱ्या या मुलीबाबत अपार आदर मनात दाटून आला.    इथल्या सेन खासी जनजाती संघटनेची ती अध्यक्षाही आहे.    

डॉ आओम आणि त्यांचे वडील - उबदार शेगडीजवळचा सकाळचा निवांत चहा 


काल भेटलेल्या फोर्सिला आणि तेरेसा यांना आज परत भेटायचे होते.  आमची गाडी आणि बाकीचे मेंबर थोड्याच वेळात आले आणि आम्ही निघालो एका अति दुर्गम गावात  किंवा वस्तीत म्हणा हवंतर. त्या घाटातल्या रस्त्यावरून जाताना मधेच एखाद दोन सुमो, ट्रॅक्स अशा गाड्या दिसल्या, माणसांनी खचाखच भरलेल्या. एकेका गाडीत पंधरा सोळा पेक्षाही जास्त माणसं म्हणे ! शिवाय गाडीच्या बाहेर मागच्या रॉड उभे राहुनही प्रवास करणारे काहीजण असायचे. इथे प्रवासासाठी काहीच सोयी नाहीत, वहान नाहीत. मग अशा मिळतील त्या खासगी वाहानातून माणसं जा ये करतात.  रहात असलेल्या वस्तीतून नुसतं कामाला जवळच्या शहरात किंवा गावाला जायचं म्हटलं तरी डोंगर दर्या ओलांडून तासंतास चालावं लागतं. अशा गाडीने गेले तरी शंभर दोनशे रुपये खर्च होणार, ते कसे परवडणार?  अतिशय खडतर आयुष्य आहे इथलं.  

अशाच एका वस्तीच्या ठिकाणी गाडी थांबली.  आसपास छोटी छोटी, पत्रे, बांबू किंवा तशाच एका प्रकाराने बनवलेली घरं होती. एक मोठी वीरगळ दिसली. त्याच्या जवळच बायका इतक्या थंडीत कपडे धूत होत्या.  आता हे लिहिताना आठवले की तिथे  एक अगदी छोटेसे पोस्ट ऑफिस दिसले होते. या पोस्ट ऑफिसात पत्रे येत असतील का आणि इथे टाकलेली पत्रे कुठे जात असतील का अशी एक शंका आम्हाला आली होती इतकं ते दुरावस्थेत होतं.  पण हे आता लवकरच कळेल. या नवीन वर्षी मी जी काही पोस्टकार्ड पोस्ट केली त्यातलं एक योक्सीच्या जेसिमा यांना होतं  तर एक फोर्सिला आणि तेरेसा यांना. १९ तारखेलाच जेसिमा यांचा मेसेज आला की त्यांना पत्र पोहोचलं. आता वाट बघतेय ती यांच्या उत्तराची!  जाताजाता एक गम्मत सांगाविशी वाटली.  या पत्रांबरोबर अजून एक पत्र मी जपानला मैत्रिणीला पाठवले होते. तिला ते १४ जाने. लाच मिळाले. मात्र भारतातील एक पत्र त्यानंतर पाच दिवसांनी!  मघा लिहिलं तसं घरी पोचायला पाच दिवस लागणे ,  देशातल्या देशात पत्र पोहोचायला इतका वेळ लागणे यावरून आपले देशांतर्गत कम्युनिकेशन किती अप्रगत आहे याचा पुरावा मिळतो. प्रगत राष्ट्र होण्यासाठी अजून खूप मजल दरमजल करायची आहे !         

घरे 

वीरगळ



तर हे सगळे मागे टाकून आम्ही एका बंद खोलीशी येऊन थांबलो.  तिथे ट्रायबोर उभे होते. यांची पहिली ओळख कालच झाली होती. काल त्यांनी आणि त्यांच्या नविनच लग्न झालेल्या बायकोने आम्हाला जेवण करून वाढले होते. हे इथले हिन्दीचे प्रोफेसर. आपल्या फावल्या वेळेत समाजसेवेला वाहून घेतलेले. इथे बाहेरून जे समाजसेवक किंवा कुणी कार्यकर्ते येतात त्यांना इथली भाषा माहित नसते.  मग इथल्या लोकांशी संवाद कसा साधायचा? अशा वेळी ट्रायबोर यांचे हिंदीचे ज्ञान उपयोगी येते.  फोर्सिलाशी थोडेफार इंग्रजी हिन्दी वापरून आमचा संवाद शक्य होता. पण इथल्या बाकी लोकांनी बोललेला एकही शब्द कळत नव्हता.  इथे या वस्तीत ट्रायबोरचे माहेर आहे. आणि आज इथेच फोर्सिला आपले आरोग्य विषयक जागरूकतेचे काम करणार होती. तिच्या या मिटिंगचे आम्हाला फोटो काढायचे होते. 

त्या बंद खोलीचा दरवाजा उघडून आत गेल्यावर ती शाळेची खोली होती असे लक्षात आले. फोर्सिला नेहेमी मिटिंग घेते तेव्हा बहुतांश वेळी गप्पा मारत लोकांशी बोलते, क्वचित काही चार्ट वगैरे असतील पण शक्यतो नाहीच. पण असे फोटो काढले तर तिच्या कामाविषयी कल्पना कशी येणार म्हणुन  मी तिला तिथल्या फळ्यावर काहीतरी चित्र काढून मग बोलायला सांगितले. पण तिला तिथे चित्र काढता येत नव्हते. ती इथे मुख्यत्वे स्त्रीयांचे आरोग्य, अनेक बाळंतपणामुळे होणारे त्रास, कुपोषण  याविषयी बोलते. पण याविषयावर फळ्यावर चित्र कसे काढणार हा प्रश्नच होता. मग मी शेवटी म्हटलं की नेहेमीची स्वच्छता आणि जेवण यावर आपण चित्र काढु. तशी ती हसून म्हणाली की हे सगळं आता गावातल्या लोकांना सांगून सांगून माहिती झालं आहे! किती छान ! आपल्या या प्रौढ विद्यार्थ्यांना काही गोष्टी येतात हे सांगताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता.   पण आम्हाला कुणालाच दुसरे चित्र जमणारे नव्हते म्हणुन शेवटी बेसिक हायजिन या विषयावर मी पटापट चित्र काढलं आणि मग हात पुसून त्यांचे फोटो काढायला घेतले!  चित्र काढताना एका ठिकाणी माझं स्पेलिंग चुकल्यावर मी दुरुस्त करायच्या आत फोर्सिलाने हसून मला चूक दाखवून दिली होती. फोटोग्राफरला इतरही बरेच रोल निभावावे लागतात त्याचं हे एक उदाहरण. 

फोर्सिला -  आरोग्य या विषयावर जागरूकता निर्माण करण्याचे महत्वाचे काम 

फोर्सिला गावकऱ्यासोबत चर्चा करताना  


हे शुट आटोपून आम्ही  ट्रायबोरच्या घरी म्हणजे अंगणात गेलो. त्यांचे घर खूपच छोटे होते, इतके सगळे जण पाठीवरच्या मोठाल्या पोत्यांसह तिथे जाण्यापेक्षा अंगणात थांबलो. तिथे पाळलेल्या मधमाश्या होत्या, आसपास  केरसुणी बनवण्याची झुडपे होती. त्या अंगणात बसून ट्रायबोरने आम्हाला एक पारंपारिक गाणेही म्हणुन दाखवले.  घरातून  लाल चहा आला. आणि बरोबर खायला बशीतून चक्क साधा भात आला होता. आम्ही तो वेगळा नाश्ता एन्जॉय केला.  एकदा मनात वाटुन गेलंच की घरात खायला दुसरं काही नसेल पण पाहुण्यांना उपाशी कसं पाठवायचं म्हणुन आम्हाला भात दिला असेल तर?  मग आता दुपारचे जेवण असेल ना त्यांच्यासाठी? या प्रश्नाचे खरे उत्तर मिळाले असते तर कदाचित त्रास झाला असता म्हणुन कदाचित आम्ही या प्रश्नाचा उच्चारच तेव्हा केला नाही.           
ट्रायबोरच्या माहेरी


परतताना मुख्य रस्त्यांवर चालत येत होतो तेव्हा काही शाळकरी वयाच्या मुलांचे फोटो काढत होते. ती मुलेही जरा लाजरी होती पण त्यांना आमच्याकडे बघायचे कुतुहलही होते.  इथून आम्ही निघालो ते दुसर्या वस्तीकडे. तिथे फोर्सिलाची शाळा होती. ही जागा खूपच सुंदर होती. एका पठारावर मोठे मोकळे माळरान आणि तिथून वर डोंगरावर वसलेले एक गाव. त्या डोंगराखालीच फोर्सिलाची शाळा!  इथल्या दुर्गम भागात शाळांची कमी आहेच. क्वचित काही ठिकाणी मिशनरी शाळा असतात पण त्यातून तिथल्या पारंपारिक जनजातीविषयी, त्यांच्याच संस्कृतीविषयी काही शिकवलं जात नाही. म्हणुन फोर्सिलाने स्वत:ची शाळा उभी केली. सुरुवातीची दोनेक वर्ष तर एकही पैसा मोबदला न घेता ती या शाळेत जीवाचे रान करत होती. इथे एका ठिकाणाहून दुसरी कडे जाण्याचे कष्ट, वेळ, आणि खर्च विचारात घेतले, इथले एकुणच राहणीमान लक्षात घेतले तर या कामाचे मोठेपण जाणवते.   ती आणखी एका शाळेतही शिक्षिका म्हणुन काम करते . आता तिच्या शाळेला सेकंडरी स्कूलची मान्यताही मिळाली आहे. आम्ही गेलो तेव्हा शाळेला सुट्टी होती पण आपली शिक्षिका आली म्हटल्यावर तिथली आसपासची विविध वयोगटाची मुलं तिथे आली. त्यांच्याशी फोर्सिलाने गप्पा मारल्या. आशिषही त्या मुलांशी खेळले. आम्ही मात्र हे क्षण टिपायचे आपले काम करत राहीलो. 
शाळेचे ठिकाण , डाव्या कोपर्यात शाळा आहे. 

दोन वेगळ्या दुनिया - एक फोर्सिला आणि तिच्या गावकऱ्यांची आणि दुसरी मिशनरीजची ( याबद्दल पुढच्या लेखात )

पत्र्याची जुनी शाळा आणि नैव बांधकाम सुरु असलेली पांढरी इमारत 

फोर्सिला विद्यार्थ्यांसोबत 



इथून पुन्हा आम्ही कालच्या घरी परतलो.  हे घर आणि हे पेनुर्सला गाव कुठे आहे माहितेय? चेरापुंजी आपल्या सगळ्यानीच ऐकलं असेल.  आणि हजारो पर्यटक तिथे जाऊनही आले असतील. त्या चेरापुंजीच्या समोर दुरवर आणि जरा अधिक उंचीवर   अजून एक पठार आहे. तिथे हे गाव. आम्हाला या घरातून दूरवर चेरापुंजी दिसत होते, मध्ये मात्र खोल खोल दरी!    तर या घरात रात्री गस्त घालणारी टिम आणि तेरेसा आमची वाट बघत होत्या.  हे घर खरंतर तेरेसा यांच्या भावाचं होतं, ज्याला आम्ही नंतर आसाममध्ये भेटलो.  इथे बडबड्या पण कणखर अशा तेरेसा यांच्याशी आशिष यांच्या मदतीने गप्पा मारल्या. तेरेसा या बचतगटाच्या माध्यमातून इतर अनेक कामे करतात. ठिकठिकाणच्या स्त्रियांसाठी फ़ळांपासुन टिकाऊ पदार्थ बनवण्याचे ट्रेनिंग घेतात. पण त्यांचे आणखी एक काम अचंबित करणारे आहे.  या भागात तशी जंगले भरपूर आहेत.  मात्र त्यामुळेच काही ठिकाणी महाग आणि उपयोगी लाकडाची प्रचंड आणि अनिर्बंध लाकूडतोड सुरु होती.  सीमारेषा जवळ असल्याने या लाकडाची तस्करीही होत असण्याशी शक्यता होतीच.  एक काळ असा आला की माणसाच्या मृत्युनंतर अंतिम संस्कारासाठीही आसपास चांगली लाकडे मिळायला मारामार व्हायला लागली आणि मग मात्र तेरेसा यांना हे थांबवावसं वाटलं.  आपले हे जंगल आपणच सांभाळले नाही तर आपल्याला भविष्यात फार त्रास होईल हे त्यांना लक्षात आले. त्यांनी आपल्या बचतगटामार्फत इथेही काम करायचे ठरवले. एका एका  छोट्या गटाला ठराविक जंगलाचा काही भाग ठरवून देण्यात आला. त्या भागातल्या जंगलाची, तिथल्या झाडांची जबाबदारी त्या गटाची!  या राखीव जंगलातली झाडे तोडण्यावर निर्बंध आणले.  या गटांच्या परवानगी शिवाय एकही झाड तोडणे अशक्य बनले!  काय दरारा असेल या स्त्रियांचा बघा.  गावातले लोकही यावेळी त्यांच्या साथीला आले किंवा किमान त्यांनी केलेले नियम पाळायला लागले.  याबद्दल बोलून झाल्यावर तेरेसा आम्हाला त्यांच्या जंगलात घेऊन जाते म्हणाल्या. तितक्यात संजय आणि आशिषने सुज्ञपणे ते टाळले. आम्हाला कळेना की असे का टाळताहेत, मग ते जंगल कुठे आहे असे विचारल्यावर तेरेसा यांनी  एका दिशेने हात दाखवत  "इथे जवळच, या चार पाच टेकड्या पार केल्यावर"  असे उत्तर दिले आणि आम्ही तिघींनी सुस्कारा सोडला. संजय आणि आशिष यांना वेळेकडे लक्ष ठेवून रात्रीच्या आत आम्हाला पुढच्या मुक्कामाला न्यायचे होते. जंगलात गेलो असतो तर इथेच पुन्हा मुक्काम करावा लागला असता हे नक्की.  

जंगलाबद्दल ओढ असणाऱ्या तेरेसा यांनी त्यांचे अजून एक रूप दाखवले. या घराच्या वरच्या अंगाला त्यांचे घर होते. त्या घरात त्यांनी आणि त्यांच्या भाचीने  किर्पलांगने  ( बहुतेक भाची) तयार केलेले ग्रीन हाउस दाखवले. इतक्या थंडीत आणि बोचऱ्या वार्यातही इथे सुंदर रंगीबेरंगी फुले उमलली होती.  अतिशय सुंदर आणि  लहानशी किर्पलांग रोपांची काळजी घेण्यात गुंतली होती.  किर्पलांग आत्ता दहावीत होती आणि नंतर आयएएस करायचा तीचा प्लान होता.   
ग्रीन हाऊस 

फुलराणी 



जायच्या आधी या ग्रुपचा एक फोटो आम्हाला घ्यायचा होताच पण त्यांनाही आमचा फोटो हवा होता. त्यासाठी त्या चक्क जय्यत तयारीनिशी पाठी लावायला त्यांच्या संस्थेचे फ्लेक्सही घेऊन आल्या होत्या.  मग तिथल्या पायरीवर बसून आमचे आणि त्यांचेही फोटोसेशन झाले. त्यातल्या  एका आज्जीने माझा हात घट्ट धरला आणि मला तिच्या बाजूला बसवले. माझे केस वगैरे जरा नीट करून माझ्या खांद्याभोवती हात ठेवून फोटो काढुन घेतला. तीला हिंदी , इंग्रजीचा अजिबात गंध नव्हता त्यामुळे तिने असं का केलं हे तिला विचारताच आलं नाही.  

तेरेसा यांच्या बचतगटातील काहीजणी 
     

या सगळ्यांना बाय बाय करून आम्ही पुढे निघालो.  आमच्या बरोबर  ट्रायबोर  आणि त्यांची बायको होते. एका ठिकाणी छोट्याशा खानावळी जेवलो.  हे बहुधा आमचे पहिले बाहेरचे जेवण होते.  इतके दिवस रोज कुणा ना कुणाच्या घरातच जेवत होतो. इथे  ट्रायबोरला सोडलं आणि आमची गाडी पुढे शिलॉंगच्या दिशेने निघाली.    

इतक्या दिवसात आम्ही कुठेच थांबुन निसर्गचित्रण करायचा हट्ट केला नव्हता. पण आज अजून दुपार होती त्यामुळे एका पॉइंटला तरी थांबुयात असा घोशा कुमार, मी, वेदिका आणि संघमित्रा या चौघांनीही लावला आणि शेवटी संजय आणि आशिषने ' अगदी दहाच मिनीटे हां' असे म्हणत याला मान्यता दिली. ही वेळ खरतर भर दुपारची. सूर्य इतक्या 'डोंबलावर' आल्यावर काय शूट करणार तरिही आम्ही उतरलो.  दोन्ही बाजूला दुरवर पसरलेले उंचच उंच डोंगर आणि मध्ये खोल दरी.  जवळचे डोंगर हिरवे तर दूरचे निळसर होत गेलेले.   त्या दरीत ठिपक्याएवढ्या चार पाच घराचं एक चिमुकलं गावही दिसत होतं. दरीतून वाहाणारा भन्नाट वारा.  त्या वारयावरच वहात येणारं नाजुक किणकिणल्या सारखं संगीत, बहुधा चर्चचे असावे असे. अतिशय रम्य आणि शांत ठिकाण.  पुन्हा कधी इथे येईन ना येईन,  मात्र इथली ही काही मिनीटे अगदी छान, शांत वाटले.   पण आमचा दहा मिनिटांचा वेळ संपला तसे आमचेच थोडे फोटो काढून मार्गस्थ झालो. 
दुर्गम रस्ते 

निळ्या डोंगरांचे मेघालय 
आम्ही तिघी 


आजचा आमचा मुक्काम होता शिलॉंगमध्ये. संध्याकाळी सूर्य मावळायच्या आतच आम्ही शिलॉंगला पोहोचलो.  वळणदार, आखीव रेखीव, टुमदार शहर.  रस्त्याच्या दुतर्फा उंचच उंच  पाइन सारखे वृक्ष, टुमदार घरे, स्वच्छ रस्ते आणि या सगळ्यांना एका करड्या शिस्तीत  ठेवणारी आर्मीची कनटोनमेण्ट्स, क्वार्टर्स आणि कार्यालये.  या शहरात देशी / परदेशी पर्यटकही बरेच दिसले. आज आम्ही अरबिंदो आश्रममध्ये रहाणार होतो. खरं सांगायचं तर इथे रहाणे तसे महागडे होते. पण शिलॉंग सारख्या पर्यटकांच्या शहरात स्वस्त पर्याय उपलब्ध असणे फार कठीण.  हा आश्रम मात्र अतिशय सुंदर आणि निसर्गाने नटलेला होता. आम्हाला साध्या रूम्सच हव्या होत्या पण उपलब्धतेनुसार मिळाली ती एक छोटी सुंदर बंगली, आश्रमाच्या अगदी टोकाला असणारी.  माननीय अडवानीजी आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी हे शिलॉंग भेटीच्या वेळीस इथेच राहीले होते असेही ऐकले.  इथे पोहोचलो तर एखाद्या प्रवाहाचा बारीक पण खळाळणारा आवाज येत होता. बंगलीच्या समोरच एक गुलाबी फुलांचे चेरी किंवा सफरचंदाचे झाड होते.  वा! मस्त ठिकाण. 

आज आम्हाला संध्याकाळ मोकळी होती. रूम मध्ये गेल्या गेल्या आधी गरम पाण्याची सोय बघितली.  मस्त गरम पाण्याने आंघोळी केल्या.  आमच्या राहायच्या रूम्स  वरच्या मजल्यावर आणि खाली हॉल होता. मी माझा लॅपटॉप आणि वही घेऊन हळूच खाली आले आणि निवांत लिहित बसले.  अशा ठिकाणी शांततेत बसून लिहायचा आनंद काही औरच होता. 

रात्री जेवणे झाल्यावर मस्त गप्पा मारत,  खरं सांगायचं तर ऐकत बसलो. आशिषकडे या ठिकाणाच्या, इथल्या लोकांच्या  अनेक सुरस आणि रम्य कथा होत्या, आठवणी होत्या.  शिवाय संजयही  दहा एक वर्षापूर्वी काही आठवडे इथे राहिले असल्यामुळे त्या दोघांच्या गप्पा आणि आठवणी ऐकणे आमच्यासाठी आनंददायक होते.  इथल्या कंपाउण्ड बाहेरच्या दुसर्याच एका  जगात सरत्या वर्षाची ही रात्र पार्ट्या आणि नशेने धुंद झालेली होती.  त्या नशेचे, त्या जल्लोषाचे जराही सावट मात्र माझ्या मनावर नव्हते. वर्षाची सरती संध्याकाळ इतक्या सुंदर ठिकाणी, इतक्या शांततेत घालवल्यावर उद्याच्या पहाटेचे स्वप्न आशादायक असणारच होते!       

आजचा प्रवास



  
  
    

Posted by Swapnali Mathkar at 11:07 AM
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: असम, जागतिक महिला दिन, पूर्वांचल, मेघालय, विद्युल्लता प्रदर्शन 2014, समाज

No comments:

Post a Comment

Newer Post Older Post Home
Subscribe to: Post Comments (Atom)

Total Pageviews

Copyright Protected

All content is copyright protected. You are not authorized to use, copy any content in any way without written permission from the Auther, Swapnali Mathkar. ब्लॉग कॉपीराईट अधिकार सुरक्षित
कॉपीराईट: स्वप्नाली मठकर
Copyright: Swapnali Mathkar
MyFreeCopyright.com Registered & Protected

About Me

Swapnali Mathkar
View my complete profile

Followers

Archives

  • ►  2025 (3)
    • ►  March (3)
  • ▼  2015 (8)
    • ►  October (1)
    • ►  September (1)
    • ►  March (1)
    • ▼  January (5)
      • पूर्वांचल - मातृशक्तीचे विराट दर्शन - ५ - अजून थोड...
      • पूर्वांचल - मातृशक्तीचे विराट दर्शन - ४ - धाडसी मह...
      • पूर्वांचल - मातृशक्तीचे विराट दर्शन - ३ - योक्सीची...
      • पूर्वांचल - मातृशक्तीचे विराट दर्शन - २
      • पूर्वांचल - मातृशक्तीचे विराट दर्शन - १
  • ►  2014 (11)
    • ►  December (1)
    • ►  November (1)
    • ►  July (1)
    • ►  March (3)
    • ►  January (5)
  • ►  2013 (6)
    • ►  December (1)
    • ►  November (4)
    • ►  August (1)
  • ►  2012 (5)
    • ►  December (1)
    • ►  November (2)
    • ►  June (1)
    • ►  May (1)
  • ►  2011 (11)
    • ►  December (1)
    • ►  October (3)
    • ►  August (1)
    • ►  June (3)
    • ►  May (2)
    • ►  January (1)
  • ►  2010 (11)
    • ►  December (1)
    • ►  November (1)
    • ►  October (1)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
    • ►  July (2)
    • ►  June (4)

Categories

'फ' फोटोचा (2) ११-मार्च-२०११ (1) २०१० दिवाळी अंक (1) 2011 (1) 2014 (1) A Bomb Dome (1) Ameka Creations (1) Apple (1) Atomic Bomb (1) baby blue-eyes (1) Binny Yanga (1) bokeh (1) camera (1) collarwali (1) depth of field (1) Diwali Ank (2) Diwali Ank 2011 (1) Diwali Ank 2012 (1) Diwali Ank 2014 (1) dustproof (1) europe (1) fa fotocha (2) Four Elements (1) freezproof (1) hiroshima (2) hitachinaka koen (2) ikebaana (1) ISO (1) itsukushima (1) Little Boy (1) megapixel war (1) miyajima (1) Motherhood redefined (1) Nemophila (1) Paris (1) Pench (1) Photography workshop (1) rome (1) Safari (1) Second world war (1) Selection for photography exhibition in UK (1) shockproof (1) Steve Jobs (1) Tadoba (3) The Photo Saga (1) Tigress (1) Tulip (1) waterproof (1) XUV500 (1) अणुउर्जा (1) अणुबॉम्ब (1) असम (5) अ‍ॅपर्चर (1) आटोमीक बॉम्ब डोम (1) आयएसओ (1) इकेबाना (1) इतिहास (1) इत्सुकुशिमा (1) उपग्रह (1) उपग्रह प्रक्षेपण यान (1) एस एल आर (2) कापसाची म्हातारी (1) कास पुष्प पठार (1) कुनीदेशातल्या कथा (1) कॅमेरा (9) कॅमेर्‍याच कार्य (1) कॅमेर्‍याची काळजी (2) खरेदी (1) जपान (1) जपानी कला (1) जागतिक महिला दिन (6) ट्युलिप (1) ठाणे महापौर पुरस्कार (1) ठाणे महापौर पुरस्कार २०१० (1) डस्टप्रुफ (1) डेफ्थ ऑफ फिल्ड (1) डॉ. अब्दुल कलाम (1) ड्रोसेरा इंडीका (1) तंत्रज्ञान (1) तमसो मा ज्योतिर्गमय (1) तोरी (1) त्सुनामी (1) द फोटो सागा २०१४ (1) दवबिंदू (1) दिवाळी अंक २०१३ (1) दिवाळीअंक (1) दिवाळीअंक 2012 (1) नभा सावर सावर (1) नविन वर्ष (1) नेताजी सुभाषचंद्र बोस (1) नेमोफिला (1) पश्चिमेकडुन पूर्वेकडे (1) पारितोषिक (1) पूर्वांचल (6) पॅरिस (1) प्रकाशचित्रे प्रदर्शन (1) प्रजासत्ताक दिन परेड (1) प्रदर्शन (1) प्रवास (1) फिल्टर (1) फुलांची रचना (1) फोटोग्राफी (9) फोटोग्राफी कार्यशाळा (1) फ्रिजप्रुफ (1) बालकथा (1) बोके (1) भटकंती (1) भुकंप (1) भुवनेश्वर (1) मदर्स ऑफ नॉर्थ ईस्ट (1) मरीन ड्राईव्ह (1) महायुद्ध (1) मियाजीमा (1) मॅग्निट्युड ९.० (1) मेगापिक्सेल वॉर (1) मेघालय (5) मोईराङ (1) रोम (1) लेखन (1) विद्युल्लता (1) विद्युल्लता प्रदर्शन (1) विद्युल्लता प्रदर्शन 2014 (4) विमर्श (1) वॉटरप्रुफ (1) शटरस्पीड (1) शिंगवाला उंदीर (1) शॉकप्रुफ (1) समाज (1) सॅटेलाईट (1) स्टीव्ह जॉब्स (1) स्लाईडशो (1) हिरोशिमा (2)
©प्रकाशरानातून चालताना... ©Swapnali Mathkar
© Template Design by Template Lite
Thanks to Blogger Templates | Converted to Blogger by Falcon Hive.com | Distributed by Deluxe Templates