Friday, January 23, 2015

पूर्वांचल - मातृशक्तीचे विराट दर्शन - ५ - अजून थोडे पेनुर्सला

पूर्वांचल - मातृशक्तीचे विराट दर्शन - ५ - अजून थोडे पेनुर्सला 

३१- डिसेंबर - २०१३

आज सकाळी सकाळी डॉ आओम (Aiom Sdam) यांच्या घरी बसून चहा पिता पिता पुष्कळ गप्पा मारल्या.  डॉ. चे आई बाबाही घरात होते पण बाबा थोडे बुजरे होते , ते आमच्याशी काही बोललेही नाहीत आणि ओळखही करून घेतली नाही. इथल्या मातृसत्ताक पद्धतीप्रमाणे असे घडणे सहजच असावे बहुधा. ही मुलगी कोल्हापुरच्या मेडीकल कॉलेज मध्ये शिकायला होती. कोल्हापूर म्हटल्यावर आमच्या गप्पा फार रंगल्या. कोल्हापूरहून सुट्टीवर इथे घरी यायला पाच सहा दिवस प्रवासातच जायचे म्हणे.  भारतातल्या भारतात एका ठिकाणाहून दुसरीकडे जायला इतका वेळ लागावा?   वास्तविक पहाता तिथले शिक्षण पूर्ण झाल्यावर तीला सहजच शहरातच राहावेसे वाटणे, तिथेच प्रॅक्टीस कराविशी वाटणे किती सोपे होते. पण तीने असा विचार केला नाही. आपल्या इथल्या दुर्गम गावातल्या लोकांना औषधपाणी देण्यासाठी ती आपल्या गावात परत आली आणि आता इथे आपली डॉक्टरकी करते. इथे असलेली सोयींची वानवा, एकुणच आरोग्याविषयी हेळसांड, कुपोषण, गरिबी यासगळ्या मुळे इथे आरोग्याचे अनेक प्रश्न असणार. आपल्या मुळ गावाला न विसरता त्यांच्या सेवेसाठी परत येणाऱ्या या मुलीबाबत अपार आदर मनात दाटून आला.    इथल्या सेन खासी जनजाती संघटनेची ती अध्यक्षाही आहे.    

डॉ आओम आणि त्यांचे वडील - उबदार शेगडीजवळचा सकाळचा निवांत चहा 


काल भेटलेल्या फोर्सिला आणि तेरेसा यांना आज परत भेटायचे होते.  आमची गाडी आणि बाकीचे मेंबर थोड्याच वेळात आले आणि आम्ही निघालो एका अति दुर्गम गावात  किंवा वस्तीत म्हणा हवंतर. त्या घाटातल्या रस्त्यावरून जाताना मधेच एखाद दोन सुमो, ट्रॅक्स अशा गाड्या दिसल्या, माणसांनी खचाखच भरलेल्या. एकेका गाडीत पंधरा सोळा पेक्षाही जास्त माणसं म्हणे ! शिवाय गाडीच्या बाहेर मागच्या रॉड उभे राहुनही प्रवास करणारे काहीजण असायचे. इथे प्रवासासाठी काहीच सोयी नाहीत, वहान नाहीत. मग अशा मिळतील त्या खासगी वाहानातून माणसं जा ये करतात.  रहात असलेल्या वस्तीतून नुसतं कामाला जवळच्या शहरात किंवा गावाला जायचं म्हटलं तरी डोंगर दर्या ओलांडून तासंतास चालावं लागतं. अशा गाडीने गेले तरी शंभर दोनशे रुपये खर्च होणार, ते कसे परवडणार?  अतिशय खडतर आयुष्य आहे इथलं.  

अशाच एका वस्तीच्या ठिकाणी गाडी थांबली.  आसपास छोटी छोटी, पत्रे, बांबू किंवा तशाच एका प्रकाराने बनवलेली घरं होती. एक मोठी वीरगळ दिसली. त्याच्या जवळच बायका इतक्या थंडीत कपडे धूत होत्या.  आता हे लिहिताना आठवले की तिथे  एक अगदी छोटेसे पोस्ट ऑफिस दिसले होते. या पोस्ट ऑफिसात पत्रे येत असतील का आणि इथे टाकलेली पत्रे कुठे जात असतील का अशी एक शंका आम्हाला आली होती इतकं ते दुरावस्थेत होतं.  पण हे आता लवकरच कळेल. या नवीन वर्षी मी जी काही पोस्टकार्ड पोस्ट केली त्यातलं एक योक्सीच्या जेसिमा यांना होतं  तर एक फोर्सिला आणि तेरेसा यांना. १९ तारखेलाच जेसिमा यांचा मेसेज आला की त्यांना पत्र पोहोचलं. आता वाट बघतेय ती यांच्या उत्तराची!  जाताजाता एक गम्मत सांगाविशी वाटली.  या पत्रांबरोबर अजून एक पत्र मी जपानला मैत्रिणीला पाठवले होते. तिला ते १४ जाने. लाच मिळाले. मात्र भारतातील एक पत्र त्यानंतर पाच दिवसांनी!  मघा लिहिलं तसं घरी पोचायला पाच दिवस लागणे ,  देशातल्या देशात पत्र पोहोचायला इतका वेळ लागणे यावरून आपले देशांतर्गत कम्युनिकेशन किती अप्रगत आहे याचा पुरावा मिळतो. प्रगत राष्ट्र होण्यासाठी अजून खूप मजल दरमजल करायची आहे !         

घरे 

वीरगळ



तर हे सगळे मागे टाकून आम्ही एका बंद खोलीशी येऊन थांबलो.  तिथे ट्रायबोर उभे होते. यांची पहिली ओळख कालच झाली होती. काल त्यांनी आणि त्यांच्या नविनच लग्न झालेल्या बायकोने आम्हाला जेवण करून वाढले होते. हे इथले हिन्दीचे प्रोफेसर. आपल्या फावल्या वेळेत समाजसेवेला वाहून घेतलेले. इथे बाहेरून जे समाजसेवक किंवा कुणी कार्यकर्ते येतात त्यांना इथली भाषा माहित नसते.  मग इथल्या लोकांशी संवाद कसा साधायचा? अशा वेळी ट्रायबोर यांचे हिंदीचे ज्ञान उपयोगी येते.  फोर्सिलाशी थोडेफार इंग्रजी हिन्दी वापरून आमचा संवाद शक्य होता. पण इथल्या बाकी लोकांनी बोललेला एकही शब्द कळत नव्हता.  इथे या वस्तीत ट्रायबोरचे माहेर आहे. आणि आज इथेच फोर्सिला आपले आरोग्य विषयक जागरूकतेचे काम करणार होती. तिच्या या मिटिंगचे आम्हाला फोटो काढायचे होते. 

त्या बंद खोलीचा दरवाजा उघडून आत गेल्यावर ती शाळेची खोली होती असे लक्षात आले. फोर्सिला नेहेमी मिटिंग घेते तेव्हा बहुतांश वेळी गप्पा मारत लोकांशी बोलते, क्वचित काही चार्ट वगैरे असतील पण शक्यतो नाहीच. पण असे फोटो काढले तर तिच्या कामाविषयी कल्पना कशी येणार म्हणुन  मी तिला तिथल्या फळ्यावर काहीतरी चित्र काढून मग बोलायला सांगितले. पण तिला तिथे चित्र काढता येत नव्हते. ती इथे मुख्यत्वे स्त्रीयांचे आरोग्य, अनेक बाळंतपणामुळे होणारे त्रास, कुपोषण  याविषयी बोलते. पण याविषयावर फळ्यावर चित्र कसे काढणार हा प्रश्नच होता. मग मी शेवटी म्हटलं की नेहेमीची स्वच्छता आणि जेवण यावर आपण चित्र काढु. तशी ती हसून म्हणाली की हे सगळं आता गावातल्या लोकांना सांगून सांगून माहिती झालं आहे! किती छान ! आपल्या या प्रौढ विद्यार्थ्यांना काही गोष्टी येतात हे सांगताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता.   पण आम्हाला कुणालाच दुसरे चित्र जमणारे नव्हते म्हणुन शेवटी बेसिक हायजिन या विषयावर मी पटापट चित्र काढलं आणि मग हात पुसून त्यांचे फोटो काढायला घेतले!  चित्र काढताना एका ठिकाणी माझं स्पेलिंग चुकल्यावर मी दुरुस्त करायच्या आत फोर्सिलाने हसून मला चूक दाखवून दिली होती. फोटोग्राफरला इतरही बरेच रोल निभावावे लागतात त्याचं हे एक उदाहरण. 

फोर्सिला -  आरोग्य या विषयावर जागरूकता निर्माण करण्याचे महत्वाचे काम 

फोर्सिला गावकऱ्यासोबत चर्चा करताना  


हे शुट आटोपून आम्ही  ट्रायबोरच्या घरी म्हणजे अंगणात गेलो. त्यांचे घर खूपच छोटे होते, इतके सगळे जण पाठीवरच्या मोठाल्या पोत्यांसह तिथे जाण्यापेक्षा अंगणात थांबलो. तिथे पाळलेल्या मधमाश्या होत्या, आसपास  केरसुणी बनवण्याची झुडपे होती. त्या अंगणात बसून ट्रायबोरने आम्हाला एक पारंपारिक गाणेही म्हणुन दाखवले.  घरातून  लाल चहा आला. आणि बरोबर खायला बशीतून चक्क साधा भात आला होता. आम्ही तो वेगळा नाश्ता एन्जॉय केला.  एकदा मनात वाटुन गेलंच की घरात खायला दुसरं काही नसेल पण पाहुण्यांना उपाशी कसं पाठवायचं म्हणुन आम्हाला भात दिला असेल तर?  मग आता दुपारचे जेवण असेल ना त्यांच्यासाठी? या प्रश्नाचे खरे उत्तर मिळाले असते तर कदाचित त्रास झाला असता म्हणुन कदाचित आम्ही या प्रश्नाचा उच्चारच तेव्हा केला नाही.           
ट्रायबोरच्या माहेरी


परतताना मुख्य रस्त्यांवर चालत येत होतो तेव्हा काही शाळकरी वयाच्या मुलांचे फोटो काढत होते. ती मुलेही जरा लाजरी होती पण त्यांना आमच्याकडे बघायचे कुतुहलही होते.  इथून आम्ही निघालो ते दुसर्या वस्तीकडे. तिथे फोर्सिलाची शाळा होती. ही जागा खूपच सुंदर होती. एका पठारावर मोठे मोकळे माळरान आणि तिथून वर डोंगरावर वसलेले एक गाव. त्या डोंगराखालीच फोर्सिलाची शाळा!  इथल्या दुर्गम भागात शाळांची कमी आहेच. क्वचित काही ठिकाणी मिशनरी शाळा असतात पण त्यातून तिथल्या पारंपारिक जनजातीविषयी, त्यांच्याच संस्कृतीविषयी काही शिकवलं जात नाही. म्हणुन फोर्सिलाने स्वत:ची शाळा उभी केली. सुरुवातीची दोनेक वर्ष तर एकही पैसा मोबदला न घेता ती या शाळेत जीवाचे रान करत होती. इथे एका ठिकाणाहून दुसरी कडे जाण्याचे कष्ट, वेळ, आणि खर्च विचारात घेतले, इथले एकुणच राहणीमान लक्षात घेतले तर या कामाचे मोठेपण जाणवते.   ती आणखी एका शाळेतही शिक्षिका म्हणुन काम करते . आता तिच्या शाळेला सेकंडरी स्कूलची मान्यताही मिळाली आहे. आम्ही गेलो तेव्हा शाळेला सुट्टी होती पण आपली शिक्षिका आली म्हटल्यावर तिथली आसपासची विविध वयोगटाची मुलं तिथे आली. त्यांच्याशी फोर्सिलाने गप्पा मारल्या. आशिषही त्या मुलांशी खेळले. आम्ही मात्र हे क्षण टिपायचे आपले काम करत राहीलो. 
शाळेचे ठिकाण , डाव्या कोपर्यात शाळा आहे. 

दोन वेगळ्या दुनिया - एक फोर्सिला आणि तिच्या गावकऱ्यांची आणि दुसरी मिशनरीजची ( याबद्दल पुढच्या लेखात )

पत्र्याची जुनी शाळा आणि नैव बांधकाम सुरु असलेली पांढरी इमारत 

फोर्सिला विद्यार्थ्यांसोबत 



इथून पुन्हा आम्ही कालच्या घरी परतलो.  हे घर आणि हे पेनुर्सला गाव कुठे आहे माहितेय? चेरापुंजी आपल्या सगळ्यानीच ऐकलं असेल.  आणि हजारो पर्यटक तिथे जाऊनही आले असतील. त्या चेरापुंजीच्या समोर दुरवर आणि जरा अधिक उंचीवर   अजून एक पठार आहे. तिथे हे गाव. आम्हाला या घरातून दूरवर चेरापुंजी दिसत होते, मध्ये मात्र खोल खोल दरी!    तर या घरात रात्री गस्त घालणारी टिम आणि तेरेसा आमची वाट बघत होत्या.  हे घर खरंतर तेरेसा यांच्या भावाचं होतं, ज्याला आम्ही नंतर आसाममध्ये भेटलो.  इथे बडबड्या पण कणखर अशा तेरेसा यांच्याशी आशिष यांच्या मदतीने गप्पा मारल्या. तेरेसा या बचतगटाच्या माध्यमातून इतर अनेक कामे करतात. ठिकठिकाणच्या स्त्रियांसाठी फ़ळांपासुन टिकाऊ पदार्थ बनवण्याचे ट्रेनिंग घेतात. पण त्यांचे आणखी एक काम अचंबित करणारे आहे.  या भागात तशी जंगले भरपूर आहेत.  मात्र त्यामुळेच काही ठिकाणी महाग आणि उपयोगी लाकडाची प्रचंड आणि अनिर्बंध लाकूडतोड सुरु होती.  सीमारेषा जवळ असल्याने या लाकडाची तस्करीही होत असण्याशी शक्यता होतीच.  एक काळ असा आला की माणसाच्या मृत्युनंतर अंतिम संस्कारासाठीही आसपास चांगली लाकडे मिळायला मारामार व्हायला लागली आणि मग मात्र तेरेसा यांना हे थांबवावसं वाटलं.  आपले हे जंगल आपणच सांभाळले नाही तर आपल्याला भविष्यात फार त्रास होईल हे त्यांना लक्षात आले. त्यांनी आपल्या बचतगटामार्फत इथेही काम करायचे ठरवले. एका एका  छोट्या गटाला ठराविक जंगलाचा काही भाग ठरवून देण्यात आला. त्या भागातल्या जंगलाची, तिथल्या झाडांची जबाबदारी त्या गटाची!  या राखीव जंगलातली झाडे तोडण्यावर निर्बंध आणले.  या गटांच्या परवानगी शिवाय एकही झाड तोडणे अशक्य बनले!  काय दरारा असेल या स्त्रियांचा बघा.  गावातले लोकही यावेळी त्यांच्या साथीला आले किंवा किमान त्यांनी केलेले नियम पाळायला लागले.  याबद्दल बोलून झाल्यावर तेरेसा आम्हाला त्यांच्या जंगलात घेऊन जाते म्हणाल्या. तितक्यात संजय आणि आशिषने सुज्ञपणे ते टाळले. आम्हाला कळेना की असे का टाळताहेत, मग ते जंगल कुठे आहे असे विचारल्यावर तेरेसा यांनी  एका दिशेने हात दाखवत  "इथे जवळच, या चार पाच टेकड्या पार केल्यावर"  असे उत्तर दिले आणि आम्ही तिघींनी सुस्कारा सोडला. संजय आणि आशिष यांना वेळेकडे लक्ष ठेवून रात्रीच्या आत आम्हाला पुढच्या मुक्कामाला न्यायचे होते. जंगलात गेलो असतो तर इथेच पुन्हा मुक्काम करावा लागला असता हे नक्की.  

जंगलाबद्दल ओढ असणाऱ्या तेरेसा यांनी त्यांचे अजून एक रूप दाखवले. या घराच्या वरच्या अंगाला त्यांचे घर होते. त्या घरात त्यांनी आणि त्यांच्या भाचीने  किर्पलांगने  ( बहुतेक भाची) तयार केलेले ग्रीन हाउस दाखवले. इतक्या थंडीत आणि बोचऱ्या वार्यातही इथे सुंदर रंगीबेरंगी फुले उमलली होती.  अतिशय सुंदर आणि  लहानशी किर्पलांग रोपांची काळजी घेण्यात गुंतली होती.  किर्पलांग आत्ता दहावीत होती आणि नंतर आयएएस करायचा तीचा प्लान होता.   
ग्रीन हाऊस 

फुलराणी 



जायच्या आधी या ग्रुपचा एक फोटो आम्हाला घ्यायचा होताच पण त्यांनाही आमचा फोटो हवा होता. त्यासाठी त्या चक्क जय्यत तयारीनिशी पाठी लावायला त्यांच्या संस्थेचे फ्लेक्सही घेऊन आल्या होत्या.  मग तिथल्या पायरीवर बसून आमचे आणि त्यांचेही फोटोसेशन झाले. त्यातल्या  एका आज्जीने माझा हात घट्ट धरला आणि मला तिच्या बाजूला बसवले. माझे केस वगैरे जरा नीट करून माझ्या खांद्याभोवती हात ठेवून फोटो काढुन घेतला. तीला हिंदी , इंग्रजीचा अजिबात गंध नव्हता त्यामुळे तिने असं का केलं हे तिला विचारताच आलं नाही.  

तेरेसा यांच्या बचतगटातील काहीजणी 
     

या सगळ्यांना बाय बाय करून आम्ही पुढे निघालो.  आमच्या बरोबर  ट्रायबोर  आणि त्यांची बायको होते. एका ठिकाणी छोट्याशा खानावळी जेवलो.  हे बहुधा आमचे पहिले बाहेरचे जेवण होते.  इतके दिवस रोज कुणा ना कुणाच्या घरातच जेवत होतो. इथे  ट्रायबोरला सोडलं आणि आमची गाडी पुढे शिलॉंगच्या दिशेने निघाली.    

इतक्या दिवसात आम्ही कुठेच थांबुन निसर्गचित्रण करायचा हट्ट केला नव्हता. पण आज अजून दुपार होती त्यामुळे एका पॉइंटला तरी थांबुयात असा घोशा कुमार, मी, वेदिका आणि संघमित्रा या चौघांनीही लावला आणि शेवटी संजय आणि आशिषने ' अगदी दहाच मिनीटे हां' असे म्हणत याला मान्यता दिली. ही वेळ खरतर भर दुपारची. सूर्य इतक्या 'डोंबलावर' आल्यावर काय शूट करणार तरिही आम्ही उतरलो.  दोन्ही बाजूला दुरवर पसरलेले उंचच उंच डोंगर आणि मध्ये खोल दरी.  जवळचे डोंगर हिरवे तर दूरचे निळसर होत गेलेले.   त्या दरीत ठिपक्याएवढ्या चार पाच घराचं एक चिमुकलं गावही दिसत होतं. दरीतून वाहाणारा भन्नाट वारा.  त्या वारयावरच वहात येणारं नाजुक किणकिणल्या सारखं संगीत, बहुधा चर्चचे असावे असे. अतिशय रम्य आणि शांत ठिकाण.  पुन्हा कधी इथे येईन ना येईन,  मात्र इथली ही काही मिनीटे अगदी छान, शांत वाटले.   पण आमचा दहा मिनिटांचा वेळ संपला तसे आमचेच थोडे फोटो काढून मार्गस्थ झालो. 
दुर्गम रस्ते 

निळ्या डोंगरांचे मेघालय 
आम्ही तिघी 


आजचा आमचा मुक्काम होता शिलॉंगमध्ये. संध्याकाळी सूर्य मावळायच्या आतच आम्ही शिलॉंगला पोहोचलो.  वळणदार, आखीव रेखीव, टुमदार शहर.  रस्त्याच्या दुतर्फा उंचच उंच  पाइन सारखे वृक्ष, टुमदार घरे, स्वच्छ रस्ते आणि या सगळ्यांना एका करड्या शिस्तीत  ठेवणारी आर्मीची कनटोनमेण्ट्स, क्वार्टर्स आणि कार्यालये.  या शहरात देशी / परदेशी पर्यटकही बरेच दिसले. आज आम्ही अरबिंदो आश्रममध्ये रहाणार होतो. खरं सांगायचं तर इथे रहाणे तसे महागडे होते. पण शिलॉंग सारख्या पर्यटकांच्या शहरात स्वस्त पर्याय उपलब्ध असणे फार कठीण.  हा आश्रम मात्र अतिशय सुंदर आणि निसर्गाने नटलेला होता. आम्हाला साध्या रूम्सच हव्या होत्या पण उपलब्धतेनुसार मिळाली ती एक छोटी सुंदर बंगली, आश्रमाच्या अगदी टोकाला असणारी.  माननीय अडवानीजी आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी हे शिलॉंग भेटीच्या वेळीस इथेच राहीले होते असेही ऐकले.  इथे पोहोचलो तर एखाद्या प्रवाहाचा बारीक पण खळाळणारा आवाज येत होता. बंगलीच्या समोरच एक गुलाबी फुलांचे चेरी किंवा सफरचंदाचे झाड होते.  वा! मस्त ठिकाण. 

आज आम्हाला संध्याकाळ मोकळी होती. रूम मध्ये गेल्या गेल्या आधी गरम पाण्याची सोय बघितली.  मस्त गरम पाण्याने आंघोळी केल्या.  आमच्या राहायच्या रूम्स  वरच्या मजल्यावर आणि खाली हॉल होता. मी माझा लॅपटॉप आणि वही घेऊन हळूच खाली आले आणि निवांत लिहित बसले.  अशा ठिकाणी शांततेत बसून लिहायचा आनंद काही औरच होता. 

रात्री जेवणे झाल्यावर मस्त गप्पा मारत,  खरं सांगायचं तर ऐकत बसलो. आशिषकडे या ठिकाणाच्या, इथल्या लोकांच्या  अनेक सुरस आणि रम्य कथा होत्या, आठवणी होत्या.  शिवाय संजयही  दहा एक वर्षापूर्वी काही आठवडे इथे राहिले असल्यामुळे त्या दोघांच्या गप्पा आणि आठवणी ऐकणे आमच्यासाठी आनंददायक होते.  इथल्या कंपाउण्ड बाहेरच्या दुसर्याच एका  जगात सरत्या वर्षाची ही रात्र पार्ट्या आणि नशेने धुंद झालेली होती.  त्या नशेचे, त्या जल्लोषाचे जराही सावट मात्र माझ्या मनावर नव्हते. वर्षाची सरती संध्याकाळ इतक्या सुंदर ठिकाणी, इतक्या शांततेत घालवल्यावर उद्याच्या पहाटेचे स्वप्न आशादायक असणारच होते!       

आजचा प्रवास



  
  
    

Tuesday, January 20, 2015

पूर्वांचल - मातृशक्तीचे विराट दर्शन - ४ - धाडसी महिलांच्या गावात

पूर्वांचल - मातृशक्तीचे विराट दर्शन - ४ - धाडसी महिलांच्या गावात 

३० डिसेंबर २०१३ 

रात्र तशी फारच कुडकुडत गेली होती. सकाळीच सामान आवरून, बॅगा घेऊन आम्ही तिघी बंगल्याच्या बाहेर आलो.  थोड्याच वेळात इतर तिघेही आले आणि आम्ही आमचे सारथी गोविंदजी यांची वाट बघत थांबलो.  सारथ्याचे नाव गोविंद असणे हा काय सुरेख योगायोग आहे पहा. 

 तोपर्यंत आम्ही आजुबाजूला पहायला लागलो तर समोरच्या डोंगरउतारावर पसरलेले सुरेखसे गाव दिसले, जोवाई!  या सुंदर टुमदार गावाबद्दल बरेच काही ऐकले होते पण आज याची देही ते पहाणार होतो. आत्ता गप्पा मारता मारता संघमित्रा म्हणाली 'रात्री काय थंडी होती ना, मला सहनच होत नव्हती. शेवटी मी मधेच उठून जोरात  फेऱ्या घालायला लागले, त्यामुळे अंगात जरा ऊब आली आणि मग मी झोपले'  हे ऐकून मी वेड्यासारखी हसत बसले.  इतरांना कळेच ना की मला अचानक असं काय झालं. माझं हसू आवरल्यावर मी घडलेला किस्सा सांगितला. तर रात्री मलाही थंडी वाजत होती म्हणुन मी पांघरूण डोक्यावर घेऊन झोपले होते, अजून थंडी वाजल्यावर टोपीही  कान आणि डोळ्यावर ओढुन घेतली. मधेच केव्हातरी मला कुणीतरी चालतंय असा आभास झाला. मित्रा किंवा वेदिका असेल असा मी विचार केला.  एकदा पांघरूण काढून बघावं असं वाटलं पण म्हटलं नको केवढी थंडी आहे बाहेर. अर्धवट झोपेत वेळेचा काही अंदाज येत नाही त्यामुळे काही वेळात पावलांचा आवाज जोरात येतोय असे वाटले.  मग डोक्यात आले की अरे हा तर इन्स्पेक्शन बंगलो आहे, सहसा असे बंगले गावापासून दूर असतात आणि अशा ठिकाणी भुते वगैरेही असण्याची वंदता असतात. आता इथेही असेल एखादे भूत.  म्हटलं असेनात का भूत तर भूत. बिचारे चालतेच आहे ना एकटे  मग जाऊदे. असंही आपण उठून काय करणार? पांघरुण काढलं तर आपल्यालाच थंडी वाजेल , भुताला काय! इतका लॉजिकल(!) विचार करून मी वर असेही ठरवले की हे काही बाकी कोणाला सांगायला नको. बाकीचे भुताला घाबरले तर काय घ्या!  अजून इतक्या दिवसाचा प्रवास बाकी आहे. आपण हे आपल्याकडेच ठेवू. मग पावलांचा आवाज ऐकता ऐकता पुन्हा गाढ झोपले.  आता हा किस्सा सांगितल्यावर मात्र सगळ्यांनाच हसू कोसळले.  तितक्यात आमचे सारथी आले आणि मला वेड्यात काढायचा प्रसंग टळला गेला. 

आज आम्ही जोवाईतल्या एप्रिलदा बारे यांना भेटणार होतो.  छोट्या छोट्या रस्त्यावरून गाडी कौशल्याने वळवत जाताना कुठुनतरी हमकल्ला आम्हाला जॉईन झाला. एव्हाना गाडीतल्या आमच्या जागा जवळपास फिक्स झाल्या होत्या. पुढे आशिष आणि सारथी. मध्ये संजय , मी आणि संघमित्रा.  तिला हाताचा आणि मानेचा त्रास होता त्यामुळे तीला उजव्या हाताला सपोर्ट हवा असायचा. मागे वेदिका आणि कुमार, त्यांच्या बाजूला काही हँडबॅगा. माझी, संघमित्राची  हँडबॅग आमच्या पायाशी.  आता गाडीत कुणी जास्तीचं आलं तर मात्र मी मागे बसायचे. मागे तीन जण बसले की हात हलवायलाही जागा उरायची नाही पण तरी आम्ही गोंधळ घालायचोच.  

इथे या गावातली सगळी घरं फार सुरेख होती. रंग तर आपण कधीच विचार करणार नाही असे. जांभळी, पोपटी, आकाशी, गुलाबी, किरमिजी, पिवळी, अगदी सगळ्या रंगांची घरं. नुकतीच रंगवून काढली असावीत इतकी सुंदर , स्वच्छ.  त्यांना काचेच्या खिडक्या, पांढरे लेसचे पडदे. घराच्या सभोवती कुंपण आणि कुंपणाच्या आता विविध फुलझाडे. काय रेखीव दृश्य होते!  या इथल्या घरातच थोडे दिवस राहावं असा आम्हाला सगळ्यांनाच वाटलं पण व्यक्त करून दाखवलं ते कुमारने. झालं! कुमारला चिडवायला सगळ्यांना संधीच मिळाली. एरवी कुमार उत्स्फूर्तपणे सगळ्यांच्या विकेट काढण्यात पटाईत, इतका की तो गाडीत असेल तर दुसरी कसलीच करमणुकीच्या साधनांची गरज नाही. शेवटी आपणच त्याला गप्प राहयाला सांगू. पण आता मात्र सगळ्यांनी त्याला चिडवायला सुरुवात केली. इथेच थोडे दिवस रहा आणि इथली मुलगी शोध,  मग तुला इथेच राहता येईल असे म्हणुन पुढच्या अख्ख्या ट्रिपला त्याला पिडले होते. 
जोवाई इथली सुंदर, नीटनेटकी  घरे 

उंच सखल जोवाई 


एप्रिलदा बारे

गाडी एप्रिलदा बारे यांच्या घरासमोर थांबली, आम्ही आमची तोंड बंद करून फोटोग्राफरच्या मोड मध्ये शिरलो आणि आमचे काम सुरु केले.  या जोवाई गावात रहाणाऱ्या एप्रिलदा बारे या गेले अनेक वर्ष  'सेन राय अप्पर प्रायमरी स्कूल' या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत.  आपल्या शाळेतील मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणुन त्या सतत झटत असतात. त्यासाठी विविध ठिकाणी कार्यशाळा घेणे, कार्यानुभव सहली आयोजित करणे, मुलांना विज्ञानाभिमुख करणे इत्यादी अनेक उपक्रम त्या त्यांच्या शाळेत राबवतात.  
एप्रिलदा बारे -  त्यांच्या घराच्या वर्हांडयामधे 


मुलांच्या शिक्षणाकडे त्यांचे अगदी काटेकोरपणे लक्ष असते. मुलांनी शाळा बुडवू नये, त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी त्या प्रयत्नशील असतात. एका ठराविक इयत्तेनंतर मुलांचे शाळागळतीचे प्रमाण वाढत चालले आहे असे त्यांना लक्षात आले. त्याची कारणे शोधल्यावर त्यांना जाणवले की आत्यंतिक गरिबीमुळे  मुले उपजीविकेसाठी काही ना काही काम करतात. त्यामुळे शाळेसाठी वेळ देणे त्यांना जमत नाही आणि अशा मुलांचे शिक्षण बंद पडते.  त्यामुळे अशा मुलांनीही पुढे शिकावे म्हणून त्यांनी कमी फी असलेल्या रात्रशाळा सुरु करायचे ठरवले. दुलोङ येथे पहिली KSAR रात्र शाळा सुरु केली. शिक्षण प्रवाहातून बाजूला पडलेल्या मुलांना गोळा करून शाळेत यायची गोडी लावायचे मोठे काम त्यांनी सुरु केले.   ज्या मुलांना हा रात्रशाळेचा हा खर्चही परवडत नाही त्यांच्यासाठी फुकट शिक्षण आणि इतर सुविधा त्या उपलब्ध करून देतात. एप्रिलदा बारे यांना मुलांच्या शिक्षणासाठी अजुनही अनेक उपक्रम राबवायचे आहेत  असेही त्यांनी सांगितले. 
 एप्रिलदा यांच्या शाळेचे नविन बांधकाम सुरु आहे. 

मुख्याध्यापिकेच्या खुर्चीवरून 


इथून पुढे आम्ही त्यांच्या शाळेत गेलो तिथे त्यांचे फोटो सेशन केले, त्यांच्या मुलीशी म्हणजे सिलिकीशी आमची ओळख झाली.  इथल्या मुली अगदी कणखर आणि आपले निर्णय आपण घेणाऱ्या वाटल्या.  इथे मुलगा मुलगी भेदभावही फारसा नसावा किंवा मातृसत्ताक पद्धतीमुळे मुलीच जास्त डॉमिनेटींग असाव्यात असे वाटले. अगदी पहिल्यांदाच एखाद्या मुलाला भेटल्यावर सुद्धा  मुलीने त्याच्या पाठीवर थाप मारून बोलण्याचा मोकळेपणा इथे दिसला आणि खूप आवडला देखील.   

इथून त्यांच्याबरोबरच निघून आम्हाला जोवाई गावातल्या एका कार्यक्रमाला पोचायचे होते.  नेमकी आजच  इथला स्वातंत्र्यवीर 'यु किआंग नांगबा' यांची एकशेपन्नासावी पुण्यतिथी होती.  त्यानिमित्त इथल्या एका पवित्र टेकडीवर , त्यांच्या स्मारकाला भेट देऊन फुले वाहायची प्रथा होती. एरवीच्या दिवशी सर्व लोकाना या टेकडीवर प्रवेश नसतो पण आजचा दिवस अपवाद. आम्हीही तिथे पोहोचलो. असले कार्यक्रम म्हणजे , मंडप, मोठाले स्पिकर्स, भाषणं, गाणी असा सगळा भपका असतो आपल्याकडे. पण इथे मात्र अगदी उलट चित्र होतं.   मोजकी लोकं तिथे त्या दगडी स्मारका भोवती जमली होती.  थोड्याच वेळात त्या गावातले प्रतिष्टीत मान्यवर लोक आले, त्यात काल भेटलेले हर्क्युलसही होते. अतिशय सुरेख सजवलेले फुलांचे वेगळ्या प्रकाराचे गुच्छ त्यांनी स्मारकाला अर्पण केले आणि इथला कार्यक्रम संपला.  खाली गावात त्यानिमित्त भाषणे असणार होती म्हणे पण आम्ही तिथे थांबलो नाही. हा साधासा समारंभ मात्र खूप भावला.
'यु किआंग नांगबा' यांचे टेकडीवरील स्मारक 

'यु किआंग नांगबा' यांचे नदीकाठाचे स्मारक 

त्यानंतर गावातल्या अजून एका घरी डकार कुटुंबात आणि नवीनच उघडलेल्या केकच्या दुकानात आम्हाला आमंत्रण होते.  तिथे भेटी दिल्या. इथे एक वेगळीच गंमत झाली.  आमच्या बरोबर 'हमकल्ला' होता. त्याला कुणीतरी नाव विचारल्यावर त्याने ते सांगितले.  पण ते इथले मेघालयातले नाव आहे असे म्हणे त्या लोकांना वाटलेच नाही. त्यामुळे त्यांना तोही आमच्या बरोबर महाराष्ट्रातून आलाय असं वाटलं. बराच वेळाने खरी परिस्थिती समजल्यावर सगळ्यांना हसता हसता पुरेवाट झाली होती.   सकाळपासुन तीनवेळा लाल चहा प्यायलो आणि पुढच्या प्रवासाला निघालो.  रस्त्यात गल्ल्यांमध्ये दिसणार्या भाजीवाल्या आणि फ़ळवाल्या फोटो काढण्यासाठी खुणावत होत्या पण तिथे न थांबता निघालो. गावात गर्दी असल्याने वेळ जाईल म्हणुन थोडं बाहेर पडुन जेवू असे संजय आणि आशिषने ठरवले.  तिथेच आमची जरा चूक झाली!  पुन्हा एकदा मध्ये एक नदीकाठचे स्मारक लागते तिथे काही मिनीटे जाउन आलो आणि रस्त्याला लागलो.  

गावाबाहेर पडल्यावर मात्र खाण्यापिण्याचे एकही दुकान दिसेना. पुढे दिसेल, पुढे दिसेल असा विचार करून आम्ही जात राहिलो. आज बांग्लादेशाच्या सीमेनजीक असलेल्या एका दुर्गम गावी लवकरात लवकर पोचायचे होते. पण मध्ये मध्ये इतक्या ठिकाणी भेटी आणि थांबे होत गेले की उशीर होईल असे वाटत होते. त्यात मध्ये एका 'स्मित' नावाच्या गावात तिथल्या राजाला , हो खराखुरा राजाच, त्याला भेटायचे होते.  आम्ही जाऊन त्यांच्या पारंपारिक पद्धतीने बांधलेल्या लाकडी घरासारख्या राजवाड्यासमोर उभे राहिलो. राजाला यायला वेळ होता.  दुपार उलटून गेल्याने पोटात कावळे ओरडत होते. मग सर्व्हायवलसाठी आणलेली ड्रायफ़्रुटची पिशवी उघडली आणि  ते खात वाट बघत राहिलो.  राजा घोड्यावरून वगैरे येईल का, उंची कपडे घातलेले असतील का अशा चित्रविचित्र कल्पना करता ठेवून आम्ही तिथे उभे होतो. बराच वेळाने आम्हाला आत बोलावले गेले. आमच्या सार्या अपेक्षांवर पाणी फिरवत राजेसाहेब,
'स्मित' गावचे राजे डॉ. बलजित सिंग सीएम 

राजवाडा

डॉ. बलजित सिंग सिएम,    नेहेमीचे कपडे, मफलर वगैरे गुंडाळून आले. आमच्याशी गप्पा मारल्या, आमच्या प्रोजेक्ट बद्दल माहिती दिली. हा राजा अगदी साधा पण तितकाच कणखर वाटला. तिथल्या स्थानिक जनतेबद्दल त्यांना अपार प्रेम होतं ते त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं.    


आता मात्र आम्हाला खरच उशीर झाला होता. पोटातले कावळे ओरडून ओरडून मरायला टेकले होते, पण खायची सोय सापडत नव्हती. आमचे सारथी गोविंदजीही आता वैतागलेले वाटत होते.  त्यात आताचा रस्ता अतिशय भयंकर वळणांचा. खाली पाहिले तर नजर ठरणार नाही अशी खोल दरी. बराचवेळ आसपास एकही गाव दिसले नव्हते.   एखाद क्षणाचा जरी अंदाज चुकला तर गाडी सरळ खाली जायची. चिडलेला ड्रायवर हा एक अतिशय भयानक प्रकार. गोविंदजीचे इतक्या दोन दिवसातले ड्रायविंग आणि आजचे ड्रायविंग यात फरक जाणवत होता, चिडून अतिशय रफ गाडी चालवत होते. प्रत्येक वळणावर आमच्या काळजाचा ठोका चुकत होता.  जर इथे काही झालंच तर आम्ही नक्की कुठे पडलो आहोत हे बाहेरच्या जगात लोकांना कळायलाच अनेक दिवस जातील असे अनेको विचार मनात यायला लागले.  गाडीत आमच्याकडे मुड हलका करायला म्युझिकही नव्हतं.  आम्ही सगळेच चुपचाप बसून बाहेर बघत राहिलो.  अचानक रस्त्यावर डावीकडे एका चढावावर गाडी चढली ( आदल्या रात्रीही डावीकडचाच चढाव होता हा योगायोग) आणि एका घरासमोर थांबली. इथे काहीजण आमची वाट बघत थांबले होते त्यांना घेतलं जरा पाच मिनीटात फ्रेश झालो आणि पुन्हा चढाव उतरून रस्त्यावरून पुढे निघालो.   अगदी अंधारत आले तेव्हा एका मोडक्या शाळेजवळ गाडी थांबली.  इथे भेटणार होतो इथल्या शाळेतल्या शिक्षिका फोर्सिला डकार यांना. 

फोर्सिला डकार

बांग्लादेशाच्या सीमेनजीक असलेले पेनुर्सला नावाचे हे एक दुर्गम गाव.   इतक्या दुर्गम भागात शिक्षणाचा अभाव आणि त्याविषयी गोडी नसणे हे नेहेमीचेच आहे.  फोर्सिला स्वत: या गावातल्याच असुनही त्यांनी हे प्रश्न ओळखले. इथल्या मुलांना शिकवणे गरजेचे आहे हे जाणुन त्यांनी इथे सर्वप्रथम शाळा सुरु केली. सुरुवातीची दोन वर्षेतर फोर्सिला एकही पैसा स्वत:साठी न घेता शाळा चालवत होत्या.  ही शाळा अतिशय दुर्गम भागात होती त्यामुळे ती बघायला आम्ही दुसऱ्या दिवशी जाणार होतो.  
पण फोर्सिला यांना आणखी भेडसावणारा प्रश्न म्हणजे मुलांच्या कुपोषणाचा. इथला कष्टकरी वर्ग दिवसभर बाहेर कामात मग्न असतो. मुलांना वेळेवर आणि चांगले जेवणखाण मिळणं कठीणच. म्हणुन त्या रोज संध्याकाळी मुलांना दुध आणि बिस्किटांचे वाटप करतात. स्वत:च्या खिशात पैसे नसताना शंभरएक मुलांसाठी रोज दुध बिस्किटाची सोय करणे किती कठिण असेल?  आज आम्ही उशिरा पोचलो होतो त्यामुळे मुलं बिचारी वाट बघत होती. फोर्सिलाने मुलांना दुध आधीच दिले होते पण बिस्कीट अजून वाटायची होती. ते कळल्यावर आम्हाला आम्ही जेवायला थांबून वेळ फुकट न घालवल्याबद्दल जरा बरंच वाटलं.  

मुलांबरोबर फोर्सिला डकार ( यांचे बाकीचे फोटो नंतरच्या लेखात येतील )


इथे आजुबाजूला काहीच नसल्याने, रस्त्यावर दिवेही नसल्याने खूपच अंधार वाटायला लागला. आता फोटो कसे काढणार हा एक प्रश्न होता. मग पटापट गाडीचे हेडलाईट लावले.  दोन फ्लॅश जोडले, रिफ्लेक्टर काढले आणि त्या प्रकाशात शूट करायचा प्रयत्न केला. फ्लॅश  सिंक झाले नाहीत आणि फक्त एकदाच एका वेळेला दोन्ही फायर झाले आणि बंद पडले, मग पुढचे काही फोटो गाडीच्या प्रकाशात घेतले. आता अंधारात इथे जास्त थांबता येणार नव्हते त्यामुळे लगेच निघालो दुसर्या एका धाडसी महिलेला भेटायला. मघाशी ज्या घरी पाच मिनीट थांबलो होतो तिथेच.   मधेच एका ठिकाणी केळी मिळाली ती घेतली आणि पोटात ढकलली. 

तेरेसा खोङथॉ -  

तेरेसा खोङथॉअतिशय दुर्गम असा हा पेनुर्सला भाग वळणा वळणांच्या घाटरस्त्याने इतर भागाशी जोडला असला तरी इथे फारसे पर्यटक येत नाहीत. दळणवळणाची साधने अगदीच अपुरी आहेत. तसे  हे गाव बाङलादेशाच्या सीमेपासून अगदी काही किलोमीटर अंतरावर आहे.  आणि यामुळेच इथे घुसखोरी, रात्रीची वाटमारी , दरोडेखोरी अशा प्रश्नांचे प्रमाणही लक्षणीय आहे. तेरेसा यांना आपल्या गावातली ही असुरक्षितता खटकली आणि त्यावर उपाय योजण्याचे त्यांनी ठरवले.  उपाय काय? तर बचत गटाच्या सत्तरएक महिला आहेत, त्यांचे सात सात चे गट करायचे. आणि या एकेका गटाने रात्रीची रोज गस्त घालायची.  गस्त कुठे तर आम्ही आत्ता ज्या रस्त्यांनी दिवसा,गाडीने  जायला टरकत होतो तसल्याच रस्त्यावरून! रस्त्यावर एकही दिवा नाही, घरंही एकमेकांपासून दूर दूर. इथे गस्त घालायची ही कसली भन्नाट योजना होती !. पण या स्त्रिया डगमगल्या नाहीत आणि मागे तर मुळीच हटल्या नाहीत.  त्यांनी गस्त घालायचे काम सुरु केले.  बांग्लादेश आणि भारताच्या सीमेनजीक अशी गस्त घालणे किती जिगरबाजीचे काम असेल?  हातात स्वसंरक्षणार्थ फक्त तर एक काठी आणि एक टॉर्च!   पण आज त्यांच्या प्रयत्नांना यश आलंय. गावातली दरोडेखोरी, चोर्यामार्या कमी झाल्यात! 

 हे काम ऐकूनच अंगावर काटा आला, यांना मदत करणे जाऊदेत पण या स्त्रियांच्या कामाला न्याय देईल असा किमान फोटोतरी मला काढता येईल? काय केलं , कसा फोटो काढला म्हणजे यांचं हे काम मी जगापुढे आणु शकेन असा एक कोलाहल माझ्या मनात माजला आणि तेवढ्यात डोक्यात एक कल्पना चमकून गेली.  मघासच्या चढावाच्या आधीच गाडी थांबवली. तेरेसा आणि त्यांच्या इतर सहकारी तिथेच थांबल्या होत्या. संजयला म्हटलं गाडीच्या हेडलाइट मध्ये सीलहाउट घेतेय तुम्ही इथेच गाडी थांबवा.  गोविंदजीना खरंतर वर घराजवळ नेऊन थांबवायची होती पण मी लक्ष दिले नाही. मला इथेच हवा तो कोन मिळणार होता.  वैतागलेल्या गोविंदजीकडे दुर्लक्ष करून गाडीचा अँगल अ‍ॅडजस्ट करून घेतला व  गाडीचे हेडलाईट सुरु  ठेवून गाडी तिथेच थांबवायला लावली. वेदिका आणि संघमित्राला घेऊन खाली उतरले.  तेरेसा आणि इतर स्त्रियांना त्या गाडीच्या प्रकाशात उभे केले आणि पुढचा थोडा वेळा  वेगवेगळे कोन साधत शुट केले. तिथल्या काही जणांना या शूटचा रिझल्ट काय असणार हे कळलं नसावं पण माझ्यासाठी हा फार सफलतेचा क्षण होता.  बाहेरची बोचरी थंडी, दिवसभराचे श्रम, सक्तीचा उपवास सगळे काही विसरून हा फोटो काढायचा क्षण मी जगले.  हे आटोपून वरच्या घरात परतलो.  आणि मग कॅमेरावरचा एक सिलेक्टेड  फोटो  संजयला दाखवला. फोटो बघून संजयने 'या फोटोसाठी आणि त्याच्या कल्पनेसाठी माझ्याकडुन तू मागशील ते देईन' अशी दाद दिली आणि मला हा फोटो हवा तसा आल्याची खात्री पटली!  अजून आशिषना  आम्ही नक्की कसे शुट केले याची कल्पना नसावी असे वाटले त्यामुळे त्यांनाही तो फोटो दाखवला आणि त्यांनाही आमच्या फोटोग्राफर्सच्या आनंदात सहभागी करून घेतले. 

रात्रीची गस्त!

(हा फोटो प्रदर्शनात मोठे प्रिंट करून लावला होता आणि जवळपास प्रत्येकाने त्याला दाद दिली. तसेच लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीने अर्धपान भरून हा फोटो छापला होता.)     

इथे अजून जेवण व्हायला वेळ होता त्यामुळे मी आणि कुमार बाहेर आलो. उपवासाच्या पित्ताने माझं डोकं संध्याकाळपासून ठणकत होतं ते आता अगदी चढलं.  बाहेर प्रचंड थंडी पण आकाश बघावं तर रत्नांनी मढलेलं.  चक्क दूधगंगाही आकाशात दिसत होती. तार्यांचे फोटो काढायचे म्हणुन घरापासून दूर कॅमेरा ट्रायपॉड वर लावून बसून राहिलो.  बराच वेळाने लक्षात आले की इथे कुत्रे आहेत आणि अंधारात त्यांचा कॅमेराला धक्का लागू शकतो. मग कॅमेराच्या बाजूला जाऊन उभे राहिलो. बाहेर खरतर तिथे फारच बोचरा वारा होता. मधेमधे बाकीचे बाहेर येऊन आम्हाला थंडीत न थांबण्याबद्दल सांगत होते. पण इथले तारांगण बघणे जास्त सुखदायक होते त्यामुळे बाहेरच थांबलो.   शेवटी जेवण तयार झाले तसे आम्हाला राहवले नाही आणि आम्ही कॅमेरा घेऊन आत आलो. इतक्या वेळात घरातले लाईट जाणे , मग दुरवरच्या दुसर्या घरातून अर्धा स्वयंपाक करणे वगैरे प्रकारही घडले. 

जेवताना फ़रसबीच्याचिरून उकडलेल्या तुकड्यांवर काळे तिळ वाटुन घालून एक चटणी केली होती. दिसायला काळी, कशीतरी दिसली तरी अगदी चविष्ठ होती. इतर मेनू नेहेमीसारखाच चवदार. खूप भूक होती पण पित्तामुळे मला अगदी मोजकंच जेवता आलं.  
जेवण झाल्यावर आमची सोय दुरवरच्या एका डॉच्या घरी करण्यात आली होती. आम्ही तिघी तिथे गेलो.  डॉ म्हंजे गावातले एखादे भारदस्त व्यक्तिमत्व असेल असे वाटले होते पण ती एक छोटीशी, नाजुकशी  मुलगी होती. आधीच रात्र झाल्याने आणि माझे डोकेही दुखत असल्याने रात्री आमचे बोलणे मात्र झाले नाही.  गोळी घेऊन मी लगेचच झोपायला गेले. आजचा दिवस फार घडामोडींचा होता तसाच समाधान देणाराही होता ही जाणीव मात्र सुखद होती.  उद्या या वर्षातला शेवटचा दिवस, कोणते अनुभव घेऊन येणार कोण जाणे…  

आजचा प्रवास
खाली सीमा दिसते ती भारत आणि बांग्ला देश यांच्यामधील सीमा आहे 

           

   
      


         

Monday, January 19, 2015

पूर्वांचल - मातृशक्तीचे विराट दर्शन - ३ - योक्सीची राणी लक्ष्मीबाई

२९ डिसेंबर २०१३ - योक्सीची राणी लक्ष्मीबाई 

प्रवासात असताना माझी झोप तशी पहाटे लवकरच मोडते. त्यामुळे भल्या पहाटे जाग आली, बाहेर किंचित तांबडं फुटलं असावं असं वाटलं, पण उठून पडदा उघडून कोण बघेल? . थंडीमुळे दुलईतून बाहेर यावेसे वाटत नव्हते. रात्री केव्हातरी मधेच उठुन मी ती निखारयाची शेगडी किचनमध्ये नेऊन ठेवली होती, बहुधा खोलीत कार्बन मोनोक्साईड जमेल या भितीने असावे.  काही वेळाने उठले आणि माझं आवरायला घेतलं. गरम पाणी मिळण्याची शक्यता वाटत नव्हती त्यामुळे आंघोळीला बुट्टीच होती. बर्फासारख्या गार पाण्याने ब्रश केलं, हातपाय धुतले.  कपडे बदलले की झाले फ्रेश!  तोपर्यंत घरातले इतरही उठले होते.

बाहेर लख्ख उजाडून सोनेरी किरणं पसरली होती.   आता या सकाळच्या प्रकाशात हे घर फ़ारच सुंदर दिसत होते. सफरचंदी गालांची चिमुकली काका आणि मेबानकिरीही उठून इकडे तिकडे पळत होते.   बाकीचे लोक आटपे पर्यंत मी  या दोघांच्या मागे फिरून त्यांचे फोटो काढत होते. त्यांना एकाच वेळी लाज वाटत होती, मज्जाही वाटत होती आणि माझ्या कॅमेरात काय दिसतंय याची उत्सुकताही होती.  थोड्याच वेळा  वाफ़ाळता लाल चहा प्यायलो, राईस केक्स खाल्ले. आणि या कुटुंबाचे, त्यांच्या सुंदर घरासमोर एक ग्रुप फोटो सेशन केले. आता इथून पुढे सगळे टप्पे कामाचे असणार होते. या घराला आणि कुटुंबाला टाटा करून आम्ही निघालो योक्सी या खेड्याकडे. 'हमकल्ला' आज आमच्याबरोबर असणार होता. 

डावीकडची 'काका' आणि उजवीकडचा 'मेबानकिरी'. मधल्याच नाव सांगितलच नाही   

आ तिघांबरोबर त्यांची मोठी बहिण। ही चक्क एक दुकान सांभाळते म्हणे! 

सुंदर घर आणि कुटुंब 


जेसीमा सुचियाङ - 

योक्सी हे गाव मुठलाँग च्या पुढे काही किमी अंतरावर, फार तर अर्धा तास लागला असेल पोहोचायला.  पण जातानाचा रस्ता फार सुरेख वळण वळणांचा होता. बाजूच्या झाडाच्या फांद्यातून दिसणारी सकाळची तिरपी सोनेरी किरणं, अतिशय स्वच्छ हवा आणि गारवा. अगदी फ्रेश होऊन गेलो.  योक्सी गावात रस्त्याच्या दुतर्फा थोडीफार घरं दिसत होती. एक छोटेसे दुकानही दिसले.  पोचल्या पोचल्या तिथल्या बायका आमच्याशी बोलायला आल्या. म्हणजे भाषेचा अडसर तसा होताच पण आशिष मदतीला होते. शिवाय काही जणींना मोडकं तोडकं हिन्दीही येत होतं.  त्यातल्याच एक होत्या जेसिमा सुचियाङ.  यांना भेटायला आम्ही इथवर आलो होतो.  बुटक्याशा, गोल हसर्या चेहर्याच्या जेसिमाकडे पाहिल्यावर ही स्त्री किती समाजसेवा करत असेल याचा अंदाज येणं कठीण आहे.
 जेसीमा सुचियाङ.

किचन मधली तयारी   


गेल्या गेल्या आधी आम्हाला जेसिमाच्या घरचा पाहूणचार झाला. लाल चहा आणि एक काबुली चणे वगैरे घातलेली भाजी. ती छोट्या वाट्यतुन दिली गेली. इथे आम्ही बिनधास्त त्यांच्या किचनमध्ये शिरून किचन मध्ये काम करणाऱ्या बायकांचे फोटो काढले.  मग चहा पिता पिता जेसिमाशी गप्पा मारल्या आणि त्यातून त्यांच्याबद्दल बरंच काही जाणून घेता आलं. 

त्यांच्या या छोट्याशा खेड्यात अतिशय गरीब परिस्थिती आणि शिक्षणाचा अभाव होता, शाळेसारख्या सुविधाही उपलब्ध नव्हत्या .  असे असतानाही जेसिमा यांनी शिक्षणाचे महत्व ओळखले होते.  त्यांनी स्वत:चे शालेय शिक्षण दुसऱ्या गावात राहून इतरांच्या घरातली कामे करून पूर्ण केले. त्यानंतर स्वत:च्या भावंडांनाही शिकवले. त्यांची एक बहिण आता महाराष्ट्रात शालेय शिक्षण घेत आहे. तेवढ्यावरच न थांबता आपल्या गावातली शाळेची गरज ओळखुन तिथे जेसिमा यांनी शाळा आणि रात्रशाळा सुरु केली आहे. आताच्या जुन्या शाळेची इमारत पुरेशी पडत नाही हे जाणवल्यावर नवीन इमारत उभारण्याचे काम सुरु केले आहे. त्या स्वत: आणि शाळेतल्या इतर शिक्षिका अतिशय आत्मियतेने मुलांना शिकवतात.   

आम्ही गेलो त्या काळात खरतर शाळेला सुट्टी असते. पण खास आम्ही येणार म्हणुन जेसिमाने गावातल्या मुलांना युनिफोर्म घालून शाळेत बोलावले होते.  या घरांपासून गाडीने थोडं पुढे गेल्यावर तीन चार मिनीटात शाळा आली. शाळा म्हणजे काय तर छोट्या छोट्या दोन चार खोल्या  असलेली एक  बैठी इमारत आणि त्याच्या बाजूलाच लाकडाच्या फळ्यांनी उभारलेली लॉग हाऊस सारखी एक खोली. आमचा आजचा वर्ग या खोलीतच भरणार होता. लाकडाची खोली असली तरी फळ्यांमध्ये फटी होत्या. बाहेरच्या गोठवणार्या थंडीत किंवा मेघालयातल्या कोसळनाऱ्या पावसात मुले कशी बसत असतील असे वाटुन गेले.  आज मात्र मुलांसाठी मजेचाच दिवस होता. शाळेत इतके आमच्यासारखे चित्रविचित्र पाहुणे आले आहेत म्हटल्यावर त्यांना मजा येणारच. मुलांनी गाणी म्हणून दाखवली, इतर थोडा अभ्यास केला आणि आम्ही या वर्गाचे फोटो काढले.   बाहेर येऊन पाहिलं तर ही गर्दी जमली होती. सगळ्या बचत गटातल्या बायका, मुलांच्या आया बाहेर बसून मजा बघत होते. बहुधा खूप दिवसांनी गावात काहीतरी वेगळं घडत असावं.


   
मेघालयातल्या सगळ्या गावात मातृसत्ताक पद्धती असली तरिही मुली शिक्षण न घेता लवकर लग्न करतात आणी लहान वयातच घर, संसार, मुलेबाळे या चक्रात अडकतात. त्यातुनच दारिद्र्यही वाढत रहातं. याला आळा घालायचा असेल तर शिक्षणाबरोबरच या स्त्रिया स्वत:च्या पायावर उभ्या रहायला हव्या होत्या. त्यामुळे गावातल्या स्त्रियांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जेसिमा यांनी बचतगट स्थापन केले. या बचतगटामार्फत हळदीची शेती आणि व्यवसाय, कापड दुकान इत्यादी व्यवसाय सुरु करून यशस्वीपणे चालवत आहेत.  मघाशी बघितलेलं  ते कापड दुकान या बचत गटाचेच होते.  आम्ही पुन्हा एकदा त्या दुकानात गेलो, तिथले फोटो घेतले. मग हळदीची शेती बघायला गेलो.  हळदीच शेत खरतर जरा दूर आहे आणि तिथली हळद आधीच काढली होती. आम्हाला दाखवायला म्हणुन घरामागच्या तुकड्यावरची हळद तेवढी ठेवली होती. आम्ही तिथे पोचलो तर बायका भराभरा कुदळी वगैरे मारून जमिनीतून हळद वर काढण्यात गुंतल्या होत्या.

बचत गटाचे कापड दुकान 

हळदीची शेती 


इथल्या हळदीत कुराकोमीन नावाच्या द्रव्याचे प्रमाण जगात सर्वात जास्त आहे. त्यामुळे इथल्या हळदीला मागणीही भरपूर आहे. हे कुरकोमीन औषधे आणि कॉस्मेटीक्स बनवण्यासाठी उपयोगी येते.  पण इथून कमी भावात हळद विकत घेऊन त्यातून उत्तम प्रकारचे कुरकोमीन काढुन कंपन्या स्वत: फायदा मिळवतात हे आता इथल्या लोकांच्या लक्षात यायला लागले आहे त्यामुळे इथेच कुरकोमीन काढायची किंवा त्याचे प्रमाण मोजायची प्रोसेस सुरू करण्याबद्दल ते जागरूक होत आहेत.    

त्यानंतर जेसिमा यांनी बचत गटाची नेहेमीची सभा घेतली. हे सगळे  आटपेपर्यंत दुपार होऊन गेली होती. मग जेसिमाच्याच घरी बसून तिथल्या इतर लोकांबरोबर जेवलो.  वाफाळता भात , वरण, मिक्स भाज्या आणि बटाट्याचे काप. साधारण कालसारखाच मेन्यु पण प्रत्येक घराची चव मात्र न्यारीच.    

जेवण आटपून निघताना जेसिमा बोलता बोलता म्हणाल्या की त्यांना झाशीच्या राणी लक्ष्मीबाईच्या जीवनावर आधारीत एक सिरियल चालू आहे ती फार आवडते. झाशीच्या राणीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांना काम करायचे आहे .  त्यांचा 'तरुणांच्या हाती भविष्य '  असण्यावर खूप विश्वास आहे. जर आजच्या तरुण पिढीला योग्य प्रकारे शिकवलं, चांगले संस्कार केले तर ही पिढी आपल्या समाजाचा नक्की उद्धार करेल असे त्यांना वाटते आणि त्यासाठी त्या स्वत:ही प्रयत्न करत आहेतच.  

या योक्सीच्या राणी लक्ष्मीबाईला वंदन करून आम्ही निघालो  आमच्या पुढच्या मुक्कामाच्या दिशेने, म्हणजे जोवाईच्या दिशेने.  जाताना पुन्हा ज्या रस्त्याने आलो होतो तिथूनच परत जायचे होते.  काल येताना एका कुटुंबाने आम्हाला भेटायचे आणि चहाचे आमंत्रण दिले होते. त्यामुळे त्यांच्याकडे थोडावेळ थांबलो. त्या बाईंच्या कोळशाच्या खाणी आहेत !  बाजारात दुकानंही आहेत. बाई स्वत: या सगळ्यावर देखरेख करतात आणि गावात त्यांची जरब आहे असे कळले. त्यांना इंग्रजी हिन्दी फारसे येत नाही मात्र परदेशात फिरायचे असे ठरवून मस्तपैकी फिरून आल्या आहेत, त्या फिरतीचे फोटोही आम्हाला दाखवले गेले.

कोळश्याच्या खाणीच्या मालकिणबाई  


पुन्हा एकदा आमचा प्रवास सुरु झाला.  आम्ही त्या वळणावळणांच्या रस्त्याने जोवाईत पोचायला पाच वाजून गेले , आणि अंधार होत आला. हे गाव खूप सुंदर आहे असे ऐकले होते पण संध्याकाळी फारसे काही दिसत नव्हते. गावातले रस्ते मात्र चढ उताराचे आणि अतिशय अरुंद आहेत. गोविंदजीनी एका अवघड अशा अरुंद वळणावर पहिल्याच फटक्यात गाडी बाहेर काढली आणि संजयने त्यांना लगेच एक कौतुकाची थाप दिली! 

इथे आम्हाला आमंत्रण होते इथल्या एका श्रीमंत आणि प्रतिष्ठीत घरातून. रिभालांग आणि हर्क्युलस यांचे घर बाहेरून पहाताक्षणीच हरखून जावे इतके सुंदर होते.  आतही अगदी विचारपूर्वक केलेली लाकडाची उंची सजावट लक्ष वेधून घेत होती. हे उमदे आणि हसरे कुटुंब आमच्या स्वागताला हजर होते.  स्वागत अर्थातच लाल चहा घेऊन झाले. एव्हाना संघमित्रा कोरा चहा पिउन कंटाळली होती पण करते काय? चहा शिवाय तर राहू शकत नाही!  देखण्या रिभा ने आम्हाला सगळे घर फिरून दाखवले. आणि मग किचन मध्ये गेलो. नीटनेटक्या स्वच्छ किचन मध्ये मदतनीसांबरोबर काम करत ती आमच्याशी गप्पा मारत होती. त्यांची आणखी एक नातेवाईक, जी मुंबईत रहायला असायची ती ही आली होती त्यामुळे आमच्या भरपूर गप्पा झाल्या.  वेदिकाचे लक्ष घराच्या इंटेरियरकडे तर संघमित्राची आवड किचन मध्ये.   मधेच आम्हाला त्यांच्या लग्नाचे अल्बम आणि इतर अनेक फोटो दाखवले. खरतर हा फोटो बघायचा कार्यक्रम जरा कंटाळवाणाच होतो. यजमानांना त्याच्या फोटोबद्दल कमालीचे कौतुक असते , त्याबद्दल अनेक गोष्टी सांगायच्या असतात पण आपण बघताना आपली त्याच्याशी नाळ जुळत नाही.  हे फोटो वगैरे बघून झाल्यावर बर्याच वेळाने जेवण तयार झाले.  आज रीभाने त्यांच्या बगिच्यामधून ताज्या ताज्या खुडून आणलेल्या भाज्यांचे रंगीबेरंगी आणि सुंदर सलाड केले होते.  आणखी ही एक दोन असे वेगळे पदार्थ होते.  बाकी वरण भात आणि इतर भाज्या हा मेनू तसा सारखा असला तरी पुन्हा इथली चव मात्र वेगळी होती.  शिवाय सजावट इतकी सुरेख की त्यामुळेच जेवावेसे वाटेल. सलाडची चव  अप्रतिम होती! इथे कुणाकडेही जेवणात किंवा इतरही प्रसंगी सहसा गोड पदार्थ नसतोच.  काही साखर असेल ती.   जेवून पुन्हा एक गप्पांचा फड जमला पण थोड्या वेळाने आम्हाला उठावेच लागले कारण दुसर्या दिवशीचे कार्यक्रम आणि प्रवास समोर होता.  

आज जोवाईतला मुक्काम इन्स्पेक्शन बंगलो मध्ये होता. तिथे पोचलो तर इमारत बाहेरून छान दिसत होती. मात्र आत गेल्यावर खोल्यांची अवस्था  यथातथाच होती. शिवाय खोल्या जमिनीपेक्षा थोड्या खालच्या लेवलला असल्याने खोलीत अधिक गार होते. काल समाधानाने भरलेल्या उबदार घरात राहिल्यावर आजची ही थंड पडलेली खोली कठीण जाणार हे आत्ताच आमच्या लक्षात आले.  पांघरुणंही तशी मोजकीच होती.  पण गरम पाण्यासाठी बादलीत ठेवायचा हिटर असणे ही एक मोठीच सोय होती.  आमच्या रूम मधला हिटर चालला नाही , मग तो बदलून आणणे वगैरे प्रकार झाले आणि शेवटी एकदाचे प्रत्येकीला बादलीभर गरम पाणी मिळाले.  आंघोळी आटपून आम्ही आमच्या रोजच्या फोटो डाउनलोड कामाला सुरुवात केली. फोटो डाऊनलोड होईपर्यंत मी वाहित्त वहीत आजच्या महत्वाच्या  नोंदी केल्या. सकाळी जेसिमाशी बोलताना केलेल्या नोंदी एकदा नजरे खालून घातल्या.  या सगळ्या स्त्रियांबद्दल मिळालेली महिती व्यवस्थित लिहून काढायची असं मी आधीच ठरवलं होत त्यामुळे सगळी नावं, नोंदी करून घेतल्या.  योक्सीहून निघताना फोटो आणि या नोंदी तेवढ्या घेउन यायच्या होत्या पण तिथल्या दिलदार लोकांनी पिशव्या भरून हळदही आमच्या हातात ठेवली होती आणि तीचे पैसे द्यायला गेलो तर घेतलेही नव्हते. ते आठवून मला अगदी कसेनुसे वाटले.   

थोड्या वेळाने, अपुरी पांघरूणे असल्याने आणलेले जाकिट, स्वेटर इत्यादी घालून आम्ही  कुडकुडत निद्रादेवीची आराधना करू लागलो.  रात्री या थंडीमुळे कुडकुडत, विविध अ‍ॅनालिसीस करत मी एक अगदी सॉलिड अनुभव घेणार आहे हे तेव्हा मला कसे माहीत असणार? 



प्रवासाचा मार्ग



Saturday, January 17, 2015

पूर्वांचल - मातृशक्तीचे विराट दर्शन - २

पूर्वांचल - मातृशक्तीचे विराट दर्शन - २

विमानतळापासून निघून गुवाहाटी मधल्या धुळ भरलेल्या रस्त्यामधून आमचा प्रवास सुरु झाला.  मध्ये मध्ये दिसणार्या ओळखीच्या वास्तू, युनिवर्सिटी यांची माहिती आशिष आम्हाला देत होते.  मधेच युनिवर्सिटीच्या गेटजवळ त्यांचा एक मित्र त्यांना भेटायला आला होता. अरुणजींनी माझ्याकडे एक जाडजूड पुस्तक दिले होते, जे मी पहाटेच आशिषकडे देऊन टाकले होते. ते पुस्तक घेण्यासाठी तो मित्र आला आणि त्याने काही गरम कपड्यांची एक पिशवी गाडीत देऊन ठेवली! न जाणो आम्हाला लागली तर म्हणुन! 

शहराच्या थोडं बाहेर आलो तसं धुळ कमी वाटायला लागली. रस्त्याच्या बाजूला बर्याच पाणथळ जागा जागोजागी दिसत होत्या. इथलं साठलेलं पाणी लालसर रंगाच दिसत होतं, बहुधा जमिनीत लोह जास्त असावं.  त्या पाणथळ जागांच्या पलिकडे बांबूच्या झाडीमागे छोटी छोटी घरं. काही सिमेंटने बांधलेली, काही चक्क बांबूनी बांधलेली. सिमेंटच्या घरांना जमिनी पासूनचा दोन तीन फुटाचा भाग पूर्ण सिमेण्टचा तर वरचा थोडा वेगळा दिसत होता. बांबूची घर तर जमिनीपासून उंचावरच बांधली होती. खालची दलदल, प्रचंड पावसात साठणारे पाणी यापासून बचाव करण्यासाठी ही अशी घरं!  मुख्य रस्त्यावरून घरांच्या बाजूला जायचं तर पाणथळ भाग ओलांडावा लागेल , त्यासाठी नाजुकसे, दिसणारे बांबूचे इवले इवले ब्रिज होते. दुरून बघताना सुंदर दिसत असले तरी त्यावरून चालत जायला धास्तीच वाटेल इतके नाजुक.  

हळुहळू हे मागे टाकून आमची गाडी डोंगर चढायला लागली.  थंडी थोडी वाढली आणि थोडे धुकेही जाणवायला लागले. या सगळ्याच रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरु होते. त्यामुळे प्रचंड धुळ होती. मला धुळीची एलर्जी असल्यामुळे तो त्रास पहिल्याच दिवशी उद्भवू नये अशी मनोमन विनवणी करत की नाकाला रुमाल बांधून ठेवला होता.  दुपारच्या जेवणासाठी आम्ही  'नाँगपो' इथे थोडासा वेळ  थांबलो. पहिल्याच दिवशी जेवायला कुठे थांबता येईल याची कल्पना नसल्याने आम्ही आदल्या रात्री करून आणलेले डबे उघडले. डब्यासाठी काय करून न्यायचे हे आमचे ठरले नव्हते पण योगायोगाने आम्ही तिघींनीही मेथी पराठेच नेले होते! मग तीन घरांच्या चवीचे पराठे आणि गरमागरम चहा घेतला.  निघायच्या आधीच असम मध्ये रहाणार्या दोन मायबोलीकर मैत्रिणींचा फोन नंबर घेऊन ठेवला होता. मायबोलीवरून ओळख झाली असली की हक्काने आणि आपुलकीने बोलता येतं असा नेहेमीचा अनुभव. त्यापैकी एकीशी एअरपोर्टवरुनच बोलणं झालं होतं, इथे येऊन दुसरीशी बोलले.  दोघींनीही अगदी आवर्जून काही मदत लागली तर हक्काने सांग असं बजावलं.  मग थोडं आमचंच फोटोसेशन केलं आणि पुढे निघालो. इथे रस्तोरस्ती फळविक्रेत्या स्त्रियांच्या टपर्या दिसत होत्या. केशरी, गुलाबी हिरवट अशा रंगछ्टा असलेली अननसे जवळपास सगळ्याच ठिकाणी सजवून मांडुन ठेवलेली दिसली.  प्रत्येक वळणावर काहितरी नवीन दिसायचं आणि आम्हाला थांबायची इच्छा व्हायची पण आमच्या पुढचे टारगेट रात्री लवकरात लवकर मेघालयात पोहोचणे हे होते. शिवाय ठाण्यातून निघतानाच आम्हाला स्ट्रिक्ट वॉर्निंग होती की उगाच कुठल्याही रस्त्यावर थांबून फोटोग्राफी करायची नाही.  हे वेळ आणि सुरक्षा या दोन्ही दृष्टीकोनातून सांगितले असल्याने आम्ही तोंड बंद करून गुपचूप बाहेर बघत होतो.  
'नाँगपो' इथला टी ब्रेक,  मी एका मायबोली मैत्रिणीशी फोनवर बोलतेय.  फोटो : कुमार जयवंत  


हळुहळू थंडी वाढली, साडेचारलाच अंधार झाल्यासारखे वाटायला लागले आणि काही वेळात अगदी काळोख झाला.  हिवाळ्यात इथे फारच लवकर अंधार होतो त्यामुळेच लवकरात लवकर पोचणे जरूर होते. मेघालयातला हा तसा घाटरस्ताच होता. बर्याच वेळाने आम्ही मुठलॉंगला पोहोचलो. रस्त्यावरून डावीकडे एका चढावावर गेटमधून गाडी आत शिरली. आणि एक अगदी तरुण हसतमुख मुलगा आमच्या स्वागताला येऊन उभा राहिला. तोमी सुचियाङ. आज आमचा मुक्काम याच्या घरी होता. आम्ही गाडीतून उतरलो आणि गारठलोच! बाहेर प्रचंड थंडी होती. गाडीत एकमेकाला चिकटून बसल्याने आम्हाला कोणालाच ती जाणवली नव्हती पण आता अगदी कुडकुडायाला लागलो.  कसेबसे सामान घेऊन आत गेलो तर तोमीने पटापटा गरम कोळशाची शेगडीच समोर आणुन ठेवली आणि आम्ही सभोवती शेकायला बसलो.  थोड्याच वेळात गरमगरम लाल चहा समोर आला आणि त्याच्या बरोबर राइस केक्स. लाल चहा म्हणजे कोरा चहा पण तितकासा उकळलेला नसतो त्यामुळे फारसा कडु लागत नाही. इथे दुधाची कमतरता असल्याने सगळीकडे असाच लाल चहा प्यायला जातो.  उबदार शेगडीजवळ खात आणि चहा पीत  आल्याआल्याच आमच्या गप्पा रंगल्या.      
तोमी आणि हमकल्ला  सोबत, अवघ्या काही मिनिटापूर्वी आम्ही अनोळखी होतो!

या फोटोत माझेही हात हवे होते असे राहून राहून वाटते  



तोमीचे इलेक्ट्रोनिक्सचे दुकान होते. त्याचा मावसभाऊ 'हमकल्ला' तोही असाच अगदी हसतमुख आणि पोरगेलासा. हा मुलगा काही वर्ष ठाण्यात राहून शिकला होता आणि नंतर  मेकॅनिकल इंजिनीअर झाला होता. त्याला थोडं मराठीही येत होतं ते पाहून तर आम्हाला फारच आश्चर्य वाटलं.  पुढचे दोन दिवस तो आमच्या टिममधला, मराठी मुलगा म्हणुनच वावरत होता!.    तितक्यात आतून तोमीची आई आणि हमाकल्लाची आई आली. दोघींची तोंडं पान खाऊन रंगलेली. आत्ताही त्यांच्या तोंडात पान किंवा सुपारी होतीच. आता पुढचे काही दिवस हे दृश्य आम्हाला सवयीचे करून घ्यावे लागणार होते म्हणा.    त्यांच्या मागून लपत छपत आणखी दोन तीन वेगवेगळ्या वयाची मुलं आली.   एक गोबर्या गोबर्या गालाची इवलीशी 'काका' आणि दुसरा अगदी उत्सुक डोळ्यांचा 'मेबानकिरी', आणि अजून एकजण नंतर पुढे आलाच नाही.  ती तिघे वाकून चोरून आमच्याकडे बघत होते. मी हळुच खिशातून चॉकलेट्स काढुन त्यांच्या पुढे धरली आणि आमची थोडी गट्टी  झाली म्हणजे भाषा तर फारशी समजत नव्हती पण त्यांची भिती मात्र पळाली.                              

 हे घर हमकल्लाच्या आईचे आणि मावशीचे !  इथे मेघालयात एक अनोखी प्रथा आहे, मातृसत्ताक पद्धत.  लग्न झाले की मुलगा आपल्या आईवडलांचे घर सोडुन बायकोच्या घरी रहायला येतो.  घरात भरपूर मुलं असतात पण आईवडलांना सांभाळायची जबाबदारी सगळ्यात लहान लेकीची. त्याचे कारणही मजेदार! ती सगळ्यात लहान असल्याने जास्त दिवस आईबाबांकडे लक्ष देऊ शकेल म्हणून. मग रहाते घर तिच्या नावावर होणार. बाकीच्या मुलींनी आपापली घर बनवायची. मुलं आपली बायकोच्या घरी नांदायला जाणार.  या एका कारणासाठी इथल्या लोकांचे मला फ़ारच कौतुक वाटले. आपल्याकडेही अशी प्रथा यावी असे मनापासून वाटले ते वेगळेच.  पण इथे सहसा घरातली आणि बाहेरची , शेतीची कामेही सगळी बायकाच करतात. पुरुष फारसे काही काम करत नाहीत. आणि बायका अगदी धडाडीच्या , कणखर वाटल्या.  

हे घर अतिशय  सुंदर आणि नीटनेटके होते.  आम्ही बसलो होतो त्या हॉलला मोठी काचेची तावदानं, त्याला सुंदर पांढरे लेसचे पडदे, समोरच्या भिंतीवर एक मोठे शोकेस होते. त्यात अनेक वस्तू, वेगवेगळे फोटो वगैरे ठेवले होते. त्यात एक मामाचा म्हणजे 'माहे' चा फोटोही होता. असा फोटो इथे सगळीकडेच असतो म्हणे. किचनमध्ये भांडी अगदी चकाचक आणि एकावर एक रचून ठेवलेली होती. चुलीवरचा धूर घराबाहेर निघून जावा म्हणुन उंच घराबाहेर काढलेले एक धुरांडे सगळीकडे असते.   नंतर आम्हाला कळले की इथे सगळ्यांचीच घरे अशी सुंदर आणि नेटकी असतात. 

थोडा वेळाने मला आठवलं की मघाशी गाडीतून उतरलो तेव्हा आकाश अतिशय सुंदर, खचाखच चांदण्यांनी भरलेलं दिसत होतं.  आपल्याकडे शहरात इतक्या चांदण्या कधीच दिसत नाहीत पण तिथे अक्षरश:  चांदण्याचा सडा पसरला होता. तेव्हाच याचा फोटो काढूयात असे वाटले पण इतक्या थंडीत कॅमेरा बाहेर काढला नव्हता. आता  त्या आकाशाचा फोटो काढायला म्हणुन मी बाहेर निघाले तर हमकल्ला म्हणाला की आपण गच्चीवर जाऊन पाहू. घराचे वरचे बांधकाम अजुनही चालू होते, शिडीवरून वगैरे जावे लागणार होते. मग मी, वेदिका , हमकल्ला हातात ट्रायपॉड, कॅमेरा घेऊन वर निघालो. घराच्या मागच्या भागात गुडुप्प अंधार, तिथेच ती शिडी लावली होती. आता विचार केला तर आश्चर्य वाटेल पण आम्ही बिनधास्त त्या आताच तासाभरापूर्वी भेटलेल्या मुलांवर विश्वासून आणि त्यांचाच हात पकडून ती शिडी चढुन वरच्या दाट अंधार्या मजल्यावर गेलो. पण इथल्या या मुलांनी इतक्या पटकन आपलेसे केले की असा काही विचार करावासा वातालाक नव्हता.  तिथल्या सिमेंट आणि इतर गोष्टीमधून अंधारातच वाट काढून उघड्या गच्चीत पोचलो. आमच्या मागोमाग कुमार आणि इतरही आले.  भराभरा  ट्रायपॉड लावला, कॅमेरा लावून तो वर वळवणार इतक्यात आकाशाकडे लक्ष गेले. हाय रे देवा! आकाश राखाडी ढगांनी आच्छादले होते.  अगदी एखादीही चांदणी दिसत नव्हती! फोटोग्राफीमध्ये एखादा क्षण वाया घालवला तर तो पुन्हा येत नाही हे पुन्हा एकदा जाणवले.   तो ट्रायपॉड काढून आमची वरात पुन्हा खाली आली. 

आम्ही खाली आलो तोपर्यंत जेवण तयार झाले होते.   आम्ही थेट किचनमधेच गेलो. इथे पुर्वांचलात मांसाहारी जेवण नेहेमीचे आहे आणि बर्याच प्रकारचे प्राणी खाल्ले जातात.  त्यामुळे आमही सगळेच जण पूर्ण शाकाहारी आहोत असेच सांगितले होते. आज जेवायला लाल तांदळाचा भात, वरण आणि दोन तीन प्रकारच्या भाज्या होत्या. शिवाय तोमीची आई किचनच्या मधोमध एक स्टोव्ह ठेवून त्यावर बटाट्याच्या सळ्या तळत होती.  त्या स्टोव्हच्या उबेत बाकी काही जण आणि छोटी काका , तिचा भाऊ वगैरेही होते.  संजय आणि आशिष सोडले तर आमच्या सगळ्यांसाठी पूर्वांचलातले जेवण जेवण्याचा हा पहिलाच अनुभव होता.  तो गरम वाफ़ाळता लाल भात अतिशयच चविष्ठ होता. असा लाल भात आम्हाला नंतरही चाखायला मिळाला नाही. पोटोबा तृप्त करून आम्ही तिथेच गप्पा मारत बसलो.  तोमी आणि हमकल्लाच्या आया एका हाताने सुपारी कातरत काहीबाही सांगत होत्या आणि आम्ही ऐकत होतो.  आम्हालाही सुपारी खायचा आग्रह झाला. पण ही सुपारी चांगलीच लागते असे ऐकून होतो आणि ती टाळण्याबद्दल सल्लाही आधीच मिळाला होता त्यामुळे नागवेलीचे नुसते पान तेवढे आम्ही घेतले.  



जेवणानंतरचा कार्यक्रम - पान सुपारी 


थोड्यावेळाने आम्हाला किचनच्या बाजूलाच एक खोली दिली त्यात आम्ही तिघी होतो आणि इतर तिघे दुसर्या एका बाहेरच्या खोलीत होते. एका मुलीने रूममध्ये कोळशाची शेगडी आणुन ठेवली. आणि उबदार दुलई पांघरुन मी दिवसभरात कुठून कुठे आलो याची उजळणी करत राहिले.  केवळ दोन तीन तासात हे घर, त्यातल्या माणसांनी इतका जीव लावला की आपण पहिल्यांदाच भेटतोय हे जाणवू नये याचं आश्चर्य वाटलं. तसं म्हटलं तर ही फक्त एक सुरुवात होती. उद्यापासून आमचे खरे काम सुरु होणार होते आणि असे अजून अनेक अनुभव आमची वाट बघत होते.