कसे काय जमत तुला असे फोटो काढायला?
अस ऐकायला मिळालं कि कस वाटेल तुम्हाला? आणि अशी प्रतिक्रिया नेहेमीच मिळाली तर कस वाटेल? नेहेमी नेहेमी अस कौतुकाचे शब्द लाभले तर खरच छानच वाटेल ना?
हि काय जादू आहे का म्हणून काय विचारता? खरच हे अगदी बऱ्यापैकि शक्य आहे. विश्वास बसत नाहीये का? चला तर मीच तुम्हाला एक जादू शिकवते? जादू जी तुमची फोटोग्राफी लक्षणीयरित्या बदलेल. आणि तुम्हाला तुम्ही काढलेल्या फोटोबद्दल हमखास पावती मिळत जाईल.हो अगदी तुमचा कोणताही कॅमेरा असला ना तरीही.
आहात ना तय्यार? मंत्र सांगते ह आता.
अरेच्चा असे हसताय काय? मंत्रबिन्त्र सगळ खोट आहे म्हणता?
आता तुमचा विश्वासच नसेल तर राहील. पण हि जादू मात्र खरी आहे हां.
मला नक्की माहितेय आता तुमची उत्सुकता तुम्हाला शांत राहू देत नाहीये. हो ना?
तर मन्त्र असा आहे कि
प्रकाशरानातून चालताना
चौकटी चौकटीची जागा ठरवा
काय हव पेक्षा काय नको
अन कस हव पेक्षा कस नको
याची तुम्हीच तुम्हाला आठवण करा.
हा कदाचित सगळ्यात महत्वाचा आणि अगदी प्राथमिक धडा आहे कुठल्याही दृश्य कलेचा. कम्पोझिशन- तुमच्या फोटोची चौकट.
खरोखरच याबद्दलची जाणीव वाढली तर तुमचे फोटो बदलतील. काय काय गोष्टी लक्षात घ्याव्या याचा हा छोटासा गोषवारा. काही गोष्टी सुटल्याहि असतील माझ्याकडून, पण जेवढे आठवते ते सगळे लिहायचा प्रयत्न केलाय.
"फोटो काढताना अर्जुन बनू नका."
म्हणजे काय तर तुमच्या त्या फ्रेममध्ये नक्की काय काय येतय ते सगळ बघा. बऱ्याचदा फोटो काढण्याच्या घाईत आपण अगदी अर्जुनसारखे होतो. अर्जुनाला जसा पोपटाचा डोळा दिसत होता तसा ज्याचा फोटो काढायचाय ते टारगेटच फक्त आपल्याला दिसत. आजुबाजूला कुठेच बघत नाही आपण आणि ते लक्ष्य दिसल्यावर धनुर्धारी अर्जुनासारखे बाण मारून..आपलं बटण दाबून मोकळे होतो. नंतर फोटो बघितला कि त्या फोटोमध्ये असंख्य नको असलेल्या गोष्टी दिसतात. फुलाचा फोटो काढला आणि मधे आलेल पान दिसलच नाही आणि फुलाचा काही भाग फोकस मध्ये नसलेल्या पानाने झाकला गेला. आता हा नक्की कसला फोटो, पानाचा कि फुलाचा? मित्रांच्या ग्रुपचा फोटो काढला आणि मध्ये एक भलामोठ झाडांच खोड आलंय. सुंदर धबधब्याचा फोटो काढलात पण त्याच फोटोमध्ये खाली पाण्याजवळ माणसांनी केलेला कचरा घाण आलंय. म्हणजे "माणसांनी केलेला कचरा" हाच विषय असेल तेव्हा काढलेल्या फोटोचा एंगल वेगळा असेल बर.
तर हे "फ्रेम मध्ये बघणं" अगदी महत्वाच. तुम्ही व्ह्यू फाईंडर मधून बघताना सर्व बाजू, फ्रेमच्या चारीही कडा बघा. कुठली गोष्ट नजरेला खटकतेय का? ती गोष्ट फोटोमध्ये येणार नाही याची काळजी घेतली तर तुम्ही काढलेला फोटो कसला आहे ते सांगावे लागणार नाही.
"तुम्हाला हव आहे ते सगळ येतंय ना फोटोमध्ये?"
माणसांचे फोटो काढताना त्याचे हात पाय डोकी निर्दयपणे कापत नाही ना आपण याकडे लक्ष ठेवा. हे सुद्धा "फ्रेम मध्ये बघणं" याच सदरात मोडतं फक्त जरा वेगळ्या पद्धतीने. वरची होती निगेटिव्ह टेस्ट "काय नको ते बघा", आणि हि आहे पोझिटिव्ह टेस्ट "काय हवं ते बघा". निसर्ग प्रकाशचित्रणामध्ये सुद्धा हे अगदी गरजेच बर. धबधब्याचा उगमाचा भागच कापलात किंवा झाडाच्या खोडाचा खालचा भागच कापलात तर कदाचित तो फोटो कायम काहीतरी राहून गेल्यासारखा वाटत राहील. (याला अपवाद असतातच म्हणा.पण अशावेळी फोटोचा एंगल वेगळा, आणि फोटोग्राफरला काय दाखवायचं हे वेगळ असतं. मी सुद्धा काढलेत असे फोटो.)
बघाना या धबधब्याचा फोटो. कितीही चांगला वाटला तरी तो असा मधेच पाण्याचा प्रवाह काही बरा वाटत नाहीये. पण या पूर्ण धबधब्याचा फोटो पाहिला कि मग त्याच्या सौंदर्याचा अंदाज येतो.
"गिचमिड टाळा"
खूप गोष्टी एकाच फोटोमध्ये दाखवण्याचा अट्टाहासहि नको. नेमक आणि हव तेवढंच फ्रेममध्ये ठेवा. त्याने तुम्हाला काय दाखवायचंय हे योग्यपणे कळेल.या बाहुल्यांच्या फोटोत खूप बाहुल्या आहेत पण एकही धड दिसत नाहीये. हेच त्याचा खालचा फोटो पाहिला तर मात्र एकदम छान वाटतय कि नाही?
"झूम इन झूम आउट - पायांनी "
होत काय कि तुम्ही एखाद्या प्रेक्षणीय स्थळी जाता. चालता चालता मध्येच एखाद फार छान दृश्य दिसत. तुम्ही पटकन तो फोटो घेता आणि पुढे जाता. मग त्या ठिकाणाला भेट दिलेल्या सगळ्यांकडेच तोच फोटो त्याच एंगल असतो. तुम्ही काढलेल्या फोटोत काय नवीन वाटणार मग? त्यापेक्षा तेच दृश्य जरा पुढे, मागे जाऊन बघा. वाट वाकडी करून दुसरीकडे जाऊन बघा. खाली बसून , उंच दगडावर चढून बघा. नक्कीच तुम्हाला काहीतरी वेगळ , सुंदर गवसेल, जे बऱ्याच इतरांना कधी दिसलच नव्हतं. अस काही गवसण्याचा आणि ते कॅमेऱ्यामध्ये पकडायचा आनंद काही औरच. आणि हे फोटो मग मित्रमैत्रीणीना दाखवायचा आनंदही और. अगदी नेहेमीची ठिकाण सुद्धा अशी काही वेगळी दिसतील ना कि तुम्हालाही विश्वास बसणार नाही.
"उंटावरून शेळ्या हाकणे"
असते ना हि सवय बऱ्याच जणांना? फोटोग्राफीत हे मधेच कुठे आलं अस वाटतय का वाचून? मग मला सांगा बर लहान मुलांचे फोटो काढताना तुम्ही खाली वाकून/ बसून काढता कि आहात तसे उभे राहून काढता? हे असे वरून काढलेले फोटो तुम्हाला मुलांच्या विश्वात घेऊन जात नाहीत. मुलांचे हावभाव, गोंडसपणा काही काही दिसत नाही त्यात. हत्तीवर बसलेल्या राजाने तुछ्चतेने खालच्या सैनिकांकडे बघाव तस काहीस वाटत. तुम्हाला मुलांचे खरे रूप टीपायचेय ना? मग त्यांच्याएवढे व्हा. त्यांच्या नजरेच्या पातळीत बसून फोटो काढा आणि बघा ते कसे येतात ते.
अगदी हेच प्राण्यांचे आणि पक्षांचे फोटो काढतानापण लागू होत. वरून काढलेले असे फोटो तुम्हाला त्या सब्जेक्टच्या जवळ पोहोचू देतच नाहीत. डोळ्यातले भाव दिसत नाहीत तोपर्यंत एरवी माणससुद्धा कळत नाहीत आपल्याला. मग फोटोमध्ये कशी कळणार ती? म्हणून डोळ्यातले हे भाव, ती चमक (कॅचलाईट म्हणतात त्याला) फोटोत दिसली पाहिजे. हे हरणांचे फोटो बघितलेत कि मला काय म्हणायचय ते कळेल.
"क्लोजअप टू मच"
जवळून फोटो काढायच्या नादात हे कळतच नाही , अगदी फोटो बघितल्यावर सुद्धा काय चुकलय ते कळत नाही बऱ्याच जणांना. म्हणजे फोटो चांगला नाही हे कळते पण काय चांगल नाही हे कळत नाही. हे अगदी जवळून काढलेले फोटो चेहेऱ्याला मजेशीर बनवतात. म्हणजे नाक जरा जास्तच मोठ वाटत, गाल ,कान जरा जास्तच मागे वाटतात. पोईंट एन्ड शूट कॅमेऱ्याने किंवा वाईड एंगल लेन्सने हे असे फोटो येतात. मुद्दामहून मजेशीर दाखवण्यासाठी अल्ट्रा वाईड एंगल लेन्सने असे फोटो काढतात सुद्दा. पण नेहेमीचे फोटो असे काढत नाहीत कुणी, आणि तुम्ही कोणाचे काढलेत तर त्यांना आवडणारहि नाहीत. विनोदी दिसायला किती जणांना आवडेल नाहीका?
"रूल ऑफ थर्ड - एक त्रीतीयान्शाचा मंत्र "
याला नियम म्हणण्यापेक्षा मंत्रच म्हणेन मी. नियम म्हटला कि तो पाळण्याची बंधन आली. पण हा मंत्र लक्षात ठेवायचा आहे. हवा तिथे आणि हवा तसा वापरायचा, नसेल पटत तिथे विसरायचा. हे जाणून बुजून विसरण सुद्धा गरजेच असत कधीकधी. तर काय आहे हां मंत्र? वाचलात कि काहीसा कठीण वाटेल कदाचित, पण अंगवळणी पडला कि काही वाटणार नाही.
तुमच्या चौकटीचे म्हणजे फ्रेम जी व्ह्यू फाईंडर मध्ये दिसते तिला दोन उभ्या आणि दोन आडव्या अशा इमेजीनरी रेषांनी विभागायाच, या फोटोमध्ये दाखवलंय तस. मग फ्रेमचे नऊ समान भाग होतील. आता तुमचा सब्जेक्ट किंवा फोटोचा मुख्य विषय या चार रेषांच्या कोणत्याही छेदनबिंदु वर येईल असा किंवा चार पैकी एखाद्या रेषेवर ठेवून फोटो काढा. काय साध्य होणार याने? तुमचा विषय जर फोटोच्या मधोमध असेल तर जीवनहीन दिसतो, किंबहुना त्यात काहीही विशेष आहे अस बहुधा वाटतच नाही. त्यातल चैतन्य दिसून येत नाही. तोच विषय जर वर सांगितल्या प्रमाणे या विशिष्ठ रेषा किंवा त्यांच्या छेदनबिंदूवर ठेवला तर एकदम ड्रामेटिक इफेक्ट (योग्य मराठी शब्द सुचत नाहीये) साधतो.
या खालच्या फोटोमध्ये बघा हां पहिला फोटो अगदी निरस वाटतोय. पण फ्रेमची नित विभागणी करून रेषांनी खोली दाखवल्यावर त्यालाच एक वेगळ परिमाण लाभते.
रूल ऑफ थर्ड चे उत्तम उदाहरण
जर तुमच्या फोटोमध्ये पाणी आणी आकाश असेल तर ते मधोमध विभागु नका. जर त्यावेळी आकाश जास्त सुंदर असेल तर फोटोचे दोन भाग आकाश आणि एक भाग पाणी दाखवा. किंवा पाणी खूप सुंदर दिसत असेल तर दोन भाग पाणी आणि एक भाग आकाश अस ठेवा. बघा खालचा फोटो.
आता हा मंत्र विसरायचा केव्हा तर तुम्हाला विषयामधली सममितीच (सिमिट्री) दाखवायची आहे तेव्हा. किंवा अगदी खरच फोकस बिंदू वेगळ्या ठिकाणी ठेवल्याने तुमच्या फोटोचा अर्थ, सुंदरता बदलणार असेल तेव्हा खुशाल हे नजरेआड करा. शेवटी आपल साध्य आहे सुंदर फोटो काढायचं, कोणीतरी केलेले नियम पाळायचं नाही.
खालच्या या फोटोमध्ये मला या या चिन्हाची सममिती दाखावायाचीय. आणि त्या स्तुपामध्ये पूर्ण स्तूप समोरून दाखवायचाय त्यामुळे यादोन्ही फोटोमध्ये रूळ ऑफ थर्ड ओव्हररुल्ड!
"चौकटीचे तुकडे"
चौकटीला अगदी समांतर जाणाऱ्या रेषांनी फ्रेम विभागु नका. हे अगदी दोन तुकडे केल्यासारख दिसत. त्या रेषा तिरप्या जातील अस बघा. या फोटोमधल ते लाकडाच कुंपण तिरक्या रेषांमुळे फ्रेम विभागात नाहीये बघा
आणि हा आकाश कंदिलाचा फोटो. मधोमध असलेला कंदील फारसा सुंदर नाही वाटत पण तोच वेगळ्या प्रकारे काढलेला फोटो त्या कंदिलाच्या शेपटाची मनमोहक हालचाल दाखवतो.
"गिव्ह मी सम स्पेस - प्रत्येक विषयाला त्याचा एक अवकाश द्या "
कोणाचा बाजूने फोटो काढलात आणि अगदी फ्रेम मध्ये पूर्ण भरून टाकलत तर त्या सब्जेक्टजी नजर फोटोच्या बाहेर जाते. म्हणजे तो फोटोच्या बाहेर बघतोय अस वाटायला लागत. मग तुमचा फोटो पाहणाऱ्याची नजर सुद्धा आपसूकच फ्रेमच्या बाहेर जाते आणि तुमच्या फोटो मधला इंटरेस्ट कमी होतो. असा बघणाऱ्याची नजर चौकटीच्या बाहेर नेणाऱ्या कलाकृती म्हणून मान्यता पावत नाहीत. तुमचा फोटो असा असला पाहिजे कि बघणाऱ्याची नजर त्या चौकटीच्या आत अगदी बांधली गेली पाहिजे. चौकटीच्या कडाकडूनही नजर वारंवार मुख्य फोकस बिंदू कडे वळली पाहिजे.
म्हणून डोळ्यांच्या समोर जिथे तुमचा सब्जेक्ट बघतोय तिथे एक मोकळ अवकाश ठेवा. हे अवकाशच त्या फोटोला आणखी पूर्णता देईल.
या बालभिक्षुच्या फोटोमध्ये त्याच्या चेहेऱ्यासमोर एक स्पेस आहे मोकळे अवकाश आहे. त्यामुळे वारंवार त्याच्या चेहेऱ्याकडे नजर जाते. खरतरं त्याच ते लाल वस्त्र जास्त आकर्षक आहे. तरीही त्याचा चेहेरा हाच मुख्य फोकस पोईंट ठरतोय फोटोमध्ये.
"नसलेली चौकट निर्माण करा."
काही काही वेळा मुद्दाम चौकटी'सदृश्य आकार दाखवावे लागतात. त्यामुळे फोटोची एक बंदिस्त चौकट दिसते. आणि ती बघणाऱ्याला आपल्या फोटोमध्ये अगदी बांधून ठेवते. त्याची नजर फोटोच्या बाहेर जाऊ न देता परत परत फोटोच्या मुख्य भागात फिरत राहील अशी व्यवस्था करते. खालच्या या फोटो बघा या झाडाचे खोड व फांदी हे चौकटीचे काम करतंय. आणि त्यामुळे नजर फोटोत फिरत रहाते.
तर या अशा काही गोष्टी कदाचित तुम्हाला उपयोगी पडतील. यातले बदल केल्याने तुमच्या फोटोंना दाद मिळाली तर मला जरूर सांगायला या.
really good information about photography and guidance for the mind set for good photography, about angle, composition, background, content, framing etc. this type of writing is almost non existent in marathi especially the entertaining flowing language, this should be made in to a book with addition of all other topics.
ReplyDeletekeep it up.
chaoo on maayboli http://www.maayboli.com/user/7511
चाउ
ReplyDeleteतुमच्या प्रतिसादाबद्दल आभार :)
हो हे लिखाण मराठीट फारच कमी झालंय, अस मला पण वाटत. त्यामुळेच अजून बरेच काही लिहायच ठरवलं आहे.
तुमच्या सारखे वाचक असतील तर लिहायला मजा येते
:)
सुंदर लेख आहे. महत्वाचे म्हणजे साध्या सोप्या मराठीतून बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या... धन्यवाद्
ReplyDeleteसुंदर लेख आहे. महत्वाचे म्हणजे साध्या सोप्या मराठीतून बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या... धन्यवाद्
ReplyDeleteसुंदर लेख आहे. महत्वाचे म्हणजे साध्या सोप्या मराठीतून बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या... धन्यवाद्
ReplyDelete