Sunday, July 25, 2010

फोटोग्राफी : फिल्टर्स

मी SLR फोटोग्राफी सुरु केली तेव्हा फिल्टर म्हणजे काय ते माहीतच नव्हतं. एकदा भावाने रंगीत फिल्टर आणून दिले मला. दोघानाही हे कसे वापरायचे ते माहीत नाही पण उत्साह दांडगा होता. त्या फिल्टर किट मध्ये निळा, पिवळा, लाल, हिरवा आणि केशरी असे रंग होते. आता ते तसेच लेन्स पुढे लावून काढले कि त्याच रंगात न्हालेला फोटो यायचा. आम्ही तसेच काही रंगीत फोटो काढले आणि नंतर तो फिल्टर किट फारसा वापरेनासा झाला. मग पुढे बऱ्याच दिवसानी आम्हाला कळल कि ते रंगीत फिल्टर कृष्णधवल फोटोग्राफी साठी असतात. पण आम्ही कधीहि त्याने कृष्णधवल फोटोग्राफी केली नव्हती!

एकदा कुठूनतरी आम्हाला एक फिल्टरच ब्रोशर मिळालं. त्यातले तऱ्हेतऱ्हे फिल्टर पाहून तर मला अस झालेलं कधी एकदा हे मिळतायेत आपल्याला. पण त्यांच्या किमतीही अफाट होत्या डॉलर मध्ये लिहिलेल्या. आणि आमच्या माहितीप्रमाणे ते सगळे फिल्टर मुंबईमध्ये मिळतही नव्हते.  बाबांच्या एका मित्राने सर्क्युलर पोलरायाझर फिल्टर घ्यायला सांगितला तो हि वापरायचे पण तसे फारसे फायदे घेतेवेळी माहीत नव्हतेच.

मग जस जस वाचन वाढलं आणि फोटोग्राफी वाढली तसतस बऱ्याच गोष्टी नीट कळायला लागल्या. पुढे जपानला आल्यावर तर मी कॅमेऱ्याच्या दुकानात तासंतास असायचे नुसत बघत. तेव्हा जपानी वाचता येत नव्हतं तरी नुसत बघायचं काय आहे ते. आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे कुठल्याही कॅमेऱ्याचे मॉडेल हाताळून बघता यायचे. अजूनही ती दुकान माझी आवडती वेळ घालवायची जागा आहेत.

तुम्हीही कधी दिव्यांच्या जागी ताऱ्यांप्रमाणे दिसणारे, मधेच इंद्रधनुष्य असणारे, एकाच फोटोमध्ये एकच व्यक्ती अनेकवेळा दिसणारे (मल्टीपल एक्स्पोजर), कधी नुसते निगेटिव्ह प्रमाणे दिसणारे फोटो बघितले असतील ना. किंवा अगदी उठावदार इंद्रधनुष्य, गडद निळ आकाश, सुंदर मोरपिशी समुद्र असलेले फोटोही बघितले असतील. हि सगळी बहुतेकवेळा फिल्टरची कमाल. बहुतेकवेळा अशासाठी कि फोटो एडीट करूनही असे काही इफेक्ट मिळवता येतात.

फिल्टर म्हणजे काय बर? तर कॅमेऱ्याचा चष्माच. जसा चष्मा लावाल तस चित्र दिसेल. हे फिल्टर कॅमेऱ्याच्या लेन्सच्या समोर लावायचे कि हवा तो इफेक्ट मिळतो. आतापर्यंत ज्याना फिल्टरबद्दल माहीती नाही त्यांची उत्सुकता फारच ताणली असेल ना? मग चला तर फिल्टरच्या दुनियेत एक छोटासा फेरफटका मारुयात.

फिल्टरमध्ये वापरण्याच्या पद्धतीप्रमाणे दोन मुख्य प्रकार असतात. स्क्र्यु इन आणि स्क्वेअर.

स्क्र्यु इन फिल्टर :
हे गोल फिल्टर असतात. कॅमेऱ्याच्या लेन्सचा सगळ्यात बाहेरचा भागाला स्क्र्यु सारखे थ्रेड असतात. त्यावर हे फिल्टर बाटलीच्या झाकणासारखे फिरवून बसवता येतात. म्हणजे लेन्सचा जितका व्यास (डायमीटर) असतो तीतकाच फिल्टरचापण व्यास असावा लागतो. मग तुमच्या कडे जास्त लेन्स असतील तर प्रत्येक लेन्स साठी एक फिल्टर घ्यावा लागतो.
सगळे फिल्टर प्रत्येक उपलब्ध लेन्सच्या व्यासाच्या मापाचे फिल्टर विकत मिळतात. त्यामुळे तुमच्या लेन्स चा व्यास बघुन त्यानुसार फिल्टर घ्यावा. लेन्स समोरून बघितली तर तिच्या कडेवर व्यास लिहिलेला असतो.
फोटो कोकीन च्या साईट वरून  http://www.cokin.com/ico7-p1.html

स्क्वेअर फिल्टर:
हे फिल्टर नावाप्रमाणे चौरस असतात. या फिल्टरसाठी एक फिल्टर होल्डर मिळतो. तो कॅमेऱ्याच्या लेन्स वर बसवायचा. आणि त्यात हे फिल्टर बसवायचे. याचा फायदा असा कि फिल्टर महाग असतात. प्रत्येक लेन्स साठी एक फिल्टर घेणे फार महागात पडते. त्याऐवजी एकच चौरस फिल्टर घेऊन तो सगळ्या लेन्स साठी वापरता येतो. यात फक्त प्रत्येक लेन्स साठी एक अडाप्टर रिंग घ्यावि  लागते
आणी ती फारच स्वस्त असते. ती वेगवेगळ्या साइज मधे उपलब्ध असते.



फोटो कोकीन च्या साईट वरून  http://www.cokin.fr/ico15-A.html

तर आता कुठल्या प्रकारचे फिल्टर असतात आणि त्यांचे उपयोग काय हा हि प्रश्न येणारच ना मनात.

एन डी फिल्टर (नॅचरल डेन्सिटी फिल्टर):
तुम्ही कधी कधी सकाळपासून प्रवास करून भर दुपारी तुमच्या इप्सित स्थळी एखाद्या धबधब्याजवळ पोहोचता. तिथे तुम्हाला फोटोग्राफी करायची असते. पण बाहेर बघाव तर भगभगीत दुपार. धबधब्यामधल पाणी अगदी प्रकाशाने न्हाऊन निघालेलं असतं. अशावेळी तसेच फोटो काढलेत तर काय होत बर? धबधबा नुसता पांढराफेक (ओव्हर एक्सपोज) येतो. किंवा तुम्हाला पाण्याच्या मृदू धारा दाखवायच्या असतात पण प्रकाशामुळे शटरस्पीड (याबद्दल मी नंतर पुढच्या लेखात लिहीन) कमी करता येत नाही आणि फोटोत पाण्याचे शिंतोडे दिसत रहातात. अशावेळी कामी येतो तो एन डी फिल्टर.
हा फिल्टर कॅमेऱ्या येणारा प्रकाश कमी करतो पण रंग मात्र बदलत नाही. हा फिल्टर वापरून तुम्हाला भगभगीत दुपारी सुध्दा चांगले फोटो काढता येतील.
यात तीन शेड असतात. एन डी फिल्टर २ (१ स्टॉप ), एन डी फिल्टर ४(२ स्टॉप) आणि एन डी फिल्टर ८ (३ स्टॉप). एन डी फिल्टर ८. हा सगळ्यात जास्त गडद असतो.

एन डी फिल्टर वापरून दुपारी काढलेला हां धबधब्याचा फोटो (अकिकावा )

ग्रॅजुएटेड एन डी फिल्टर:
कधी कधी काय होत कि आकाश तेवढ खूप पांढर असतं पण खालचा भाग जस जमीन डोंगर इ. कमी प्रकाशात असतं यावेळी पूर्ण एन डी फिल्टर वापरला तर खालचा भाग गडद काळा (अंडर एक्सपोज) होण्याची शक्यता असते. अशा वेळी हे फिल्टर वापरता येतात. यात फिल्टर वरती गडद असून खालपर्यंत फिकट होत जातात. सूर्यास्त सूर्योदय असे फोटो काढायला असे फिल्टर उपयोगी ठरतात.

यु व्ही फिल्टर:
कॅमेऱ्यामध्ये वापरण्यात येणारी फिल्म यु व्ही रेज सेन्सिटिव्ह (अतिनील किरणे) असते. म्हणजे या किरणांमुळे फोटोवर परिणाम होऊ शकतो. जेव्हा वातावरणात यु व्ही रेज (अतिनील किरणे) जास्त असतात. तेव्हा काढलेले फोटो निळसर येतात. म्हणून हे फिल्टर वापरण्यात आले. या फिल्टर मुळे यु व्ही किरणे थांबवली जाऊन फोटो मध्ये निळसर झाक येत नाही.
पण डिजीटल कॅमेऱ्या मध्ये हि भिती नाही. कारण डिजीटल कॅमेऱ्यामधला सेन्सर यु व्ही रेज सेन्सिटिव्ह नसतो. त्यामुळे डिजीटल कॅमेरा वापरणाऱ्यानी हां फिल्टर घेण्याची गरज नाही.
बरेचजण लेन्सचा धुळीपासून आणि चरे पडण्यापासून बचाव करायला यु व्ही फिल्टर वापरतात. अगदी वापरायचाच असेल तर डिजीटल कॅमेरा वापरणाऱ्यानी नुसता प्रोटेक्तीव्ह फिल्टर वापरला तरी चालतो.

रंगीत फिल्टर:
वर म्हटल्याप्रमाणे हे रंगीत फिल्टर कृष्णधवल फोटोग्राफी मध्ये वापरले जातात. फोटोचा गडदपणा (Contrast ), वैगरेचा योग्य परिणाम साधण्यासाठी वापरतात.
हे हि आता डिजीटल कॅमेऱ्यामध्येच कृष्णधवल फोटोग्राफीची सुविधा असल्याने डिजीटल फोटोग्राफी मध्ये वेगळे फिल्टर असण्याची गरज नाहीये.

पोलारायझर फिल्टर (CPL): किमयागार
फोटोमध्ये दिसणार गडद नीळ आकाश, अगदी पारदर्शक मोरपिशी रंगाचा समुद्र, सुंदर रंगीत इंद्रधनुष्य, अगदी उठावदार रंग अस काही असलं कि फोटो अगदी मनात घर करतो कि नाही? हि सगळी किमया बऱ्याच वेळा या फिल्टरची असते बर. हे फिल्टर निळ्या आकाशाला अधिकच गडद बनवतात. पांढरे ढग आणि आकाशातल contrast वाढवतात त्यामुळे ढग अगदी उठावदार दिसतात. आकाशातल्या इंद्रधनुष्याचे रंग देखील हां फिल्टर अगदी उठावदार दाखवतो. तलाव समुद्र याचा फोटो काढताना पाण्यावर प्रकाश परावर्तीत होऊन पाणी चमकत आणि फोटोच एक्स्पोजर चुकवतो. पण हा फिल्टर असेल तर मात्र या चमकणाऱ्या पाण्याला थांबवता येते.
एवढच काय पण अगदी काचेच्या खिडकीतून काढलेल्या फोटोमध्ये सुद्धा मधली काच न् दाखवण्याची जादुगिरी हां फिल्टर करू शकतो. अस नक्की काय बर असतं याट जरा माहिती करून घेऊयात.
या फिल्टरमध्ये पोलराइज्ड प्रकाश फिल्टर करण्याची किंवा हवा असल्यास जाऊ देण्याची क्षमता असते. म्हणजे नेमक काय तर. पाणी किंवा धातूच्या वस्तूवर प्रकाश पडल्यावर जो प्रकाश परावर्तीत होतो तो जशाच्या तसा कॅमेऱ्याच्या लेन्स मधून जाऊ देण्यासाठी किंवा गरज पडल्यास थांबवण्यासाठी हां फिल्टर वापरतात.
फार कठीण वाटतय का हे वाचायला? म्हणजे बघा तुम्ही एखाद्या तलावाचा फोटो काढताय आणि त्या तलावाच पाणी प्रकाशामुळे खुपच चमकतंय. अशा वेळी हां फिल्टर नीट वापरला तर त्या पाण्याची चमक घालवून फोटो काढता येतो.

आपल्या ऑटोफोकस कॅमेर्यामध्ये शक्यतो सर्क्युलर पोलारायझर फिल्टर (CPL) वापरतात. तो स्क्र्यु इन प्रकारचा असतो.
या सर्क्युलर पोलारायझर फिल्टर मध्ये एक गोल फिरणारी रिंग असते. फिल्टर लेन्सला पुढे घट्ट लावल्यावर हि रिंग फिरवता येते आणि या रिंग ने पोलराइज्ड प्रकाश फिल्टर करता (थांबवता) येतो किंवा हवा तेव्हा जाऊ देता येतो.

जेव्हा सूर्य किंवा प्रकाश स्त्रोत आपल्या लेन्स च्या ९० अंशामध्ये असतो तेव्हा या फिल्टर च काम जास्तीत जास्त क्षमतेने होत. म्हणजे जर आपण फोटो काढताना सूर्य आपल्या उजवी किंवा डावीकडे असेल तर जास्तीत जास्त पोलारायझिंग इफेक्ट मिळतो.
हे डिजीटल किंवा फिल्म दोन्हीमध्ये अगदी उपयुक्त प्रकारचे फिल्टर आहेत.या फिल्टरने कॅमेऱ्यात पोचणारा  प्रकाश कमी होतो ( १ ते २ स्टॉप ) त्यामुले कमी प्रकाश असलेल्या ठिकाणी वापरता येत नाही.

बसच्या काचेच्या खिडकीतून काढलेला फोटो. काच आहे अस अजिबात वाटत नाहिये.  (माउन्ट फूजी )

फिल्टर शिवाय काढलेला फोटो. पानी आणि झाडांचे रंग कसे आहेत ते बघा (कावागुची को )

हाच फिल्टर लावून काढलेला फोटो. रंग किती ताजेतवाने आणि पाण्यात प्रकाश परावर्तन नाहीच. (कावागुची को )

फिल्टर शिवाय काढलेला फोटो. पानि आकाश आणि झाडांचे रंग कसे आहेत ते बघा (कावागुची को )

हाच फिल्टर लावून काढलेला फोटो. रंग किती ताजेतवाने आणि आकाशातले ढग अगदी उठावदार. (कावागुची को )

इन्द्र धनुष्याचे रंग कसे खुललेत ना. (घरातून दिसणारे पोर्ट)


डीफ्युझींग फिल्टर:
स्व्प्नामधले असल्यासारखे देखावे, चमकणार उबदार दिसणार उन , चेहेऱ्याभोवती असणारी आभा, आणि चमकदार चेहेरा या आणि अशा इफेक्टचा जनक आहे हां फिल्टर. हां फिल्टर लेन्स मध्ये जाणारा प्रकाश डीफ्युझ करतो. त्यामुळे चेहेऱ्याला एक प्रकारची आभा दिसते. किंवा पानातून सांडणार उन अगदी चांदण्या प्रमाणे मंद चमकत. स्वप्नाचा फिल्टर म्हणाना याला.
फक्त एक लक्षात ठेवायचं म्हणजे या फिल्टरने फोटोचा शार्पनेस जातो.

गूढ़ रम्य जंगल फिल्टर सोबत (विंड केव्ह्स )

चांदण्याची पाने. (विंड केव्ह्स )

फुलाभोवतिची आभा, अशीच चहर्याभोवातिही येते. (अजिसाई फुले )

क्लोजअप फिल्टर:
या फिल्टरने अगदी छोट्या वस्तूचे खूप जवळून फोटो काढता येतात. macroफोटोग्राफी करण्यासाठी हे वापरतात. यात तीन नंबरचे फिल्टर असतात आणि सहसा ते किट मध्ये उपलब्ध असतात.
क्लोजअप फिल्टर ने घेतलेली चेरिची फुले.
ट्रिक फोटोग्राफीचे फिल्टर्स:
नसलेलं इंद्रधनुष्य दाखवायला, एकाच फोटोत एकाच व्यक्तीची अनेक रूप दाखवायला, रस्त्यांवरचे दिवे चांदण्याप्रमाणे चमकवायला, जुने असावे असे दिसणारे सेपिया फोटो काढायला, धुक्याचा भास आणायला असे अनेक फिल्टर मिळतात. डिजीटल कॅमेऱ्यामध्ये या सगळ्याची गरज फारशी नाही आता. कारण हवे असलेले सगळे इफेक्ट नंतर प्रोसेसिंग करून मिळवता येतात.

हे फिल्टर वापरताना लक्षात ठेवायची सगळ्यात महत्वाची गोष्ट.
-बरेच वेळा काही जण महागड्या लेन्स कॅमेरे खरेदी करतात. मग त्या महागड्या लेन्सना प्रोटेक्शन म्हणून एखादा स्वस्त यूव्ही / प्रोटेक्टर फिल्टर लावतात. पण लक्षात घ्या फिल्टर हां प्रकाश फिल्टर करण्यासाठी असतो. हे स्वस्त फिल्टर चांगल्या प्रकारे प्रकाश फिल्टर करत नाहीत (डीफ्राक्शन् इ. जास्त असते,सूक्ष्म चरे असतात). आणि जर तुमच्या महागड्या लेन्स पर्यंत पोचणारा प्रकाश आधीच खराब असेल तर चांगले फोटो येण्याची शक्यता कमीच नाहीका?
म्हणून फिल्टर वापरताना तडजोड करू नका.
-चांगल्या कंपनीचे (होया, केंको, कोकीन  इ.) फिल्टर घ्या.
-आणि फिल्टर नीट तपासून घ्या. मला एकदा अगदी चांगल्या आणि नवीन फिल्टर मध्ये असा त्रास झालेला आहे. आधी तो फिल्टर लावल्यावर फोकसिंग ला त्रास होत होता. आणि एक दिवस चक्क फिल्टर ची काच त्याच्या रिंग मधून खाली पडली. ती काच त्या रिंग मध्ये हलत असल्याने फोकसिंग पण चुकत होत. तर अशा गोष्टी बघून फिल्टर घ्या.
-दोन तीन फिल्टर एकावर एक लावून शक्यतो वापरू नका, त्यामुळे प्रकाशाची क्वालिटी खराब होते. म्हणजे तुमचा आधी प्रोटेक्टर फिल्टर लावला असेल तर शक्यतो त्यावरच एन डी फिल्टर पण लावून् फोटो काढू नका, आधीचा फिल्टर काढून मग दुसरा लावा.

चला तर मग तुमच्या लेंसला कुठला चष्मा हवाय ते ठरवा बर.

Friday, July 2, 2010

फोटोग्राफी: जादूचा मंत्र

तुझे फोटो म्हणजे काय प्रश्नच नाही. मस्तच असतात.
कसे काय जमत तुला असे फोटो काढायला?
अस ऐकायला मिळालं कि कस वाटेल तुम्हाला?  आणि अशी प्रतिक्रिया नेहेमीच मिळाली तर कस वाटेल? नेहेमी नेहेमी अस कौतुकाचे शब्द लाभले तर खरच छानच वाटेल ना?
हि काय जादू आहे का म्हणून काय विचारता?  खरच हे अगदी बऱ्यापैकि शक्य आहे.  विश्वास बसत नाहीये का? चला तर मीच तुम्हाला एक जादू शिकवते? जादू जी तुमची फोटोग्राफी लक्षणीयरित्या बदलेल. आणि तुम्हाला तुम्ही काढलेल्या फोटोबद्दल हमखास पावती मिळत जाईल.हो अगदी तुमचा कोणताही कॅमेरा असला ना तरीही.
आहात ना तय्यार? मंत्र सांगते ह आता.
अरेच्चा असे हसताय काय? मंत्रबिन्त्र सगळ खोट आहे म्हणता?
आता तुमचा विश्वासच नसेल तर राहील. पण हि जादू मात्र खरी आहे हां.
मला नक्की माहितेय आता तुमची उत्सुकता तुम्हाला शांत राहू देत नाहीये. हो ना?
तर मन्त्र असा आहे कि


प्रकाशरानातून चालताना
चौकटी चौकटीची जागा ठरवा
काय हव पेक्षा काय नको
अन कस हव पेक्षा कस नको
याची तुम्हीच तुम्हाला आठवण करा.

हा कदाचित सगळ्यात महत्वाचा आणि अगदी प्राथमिक धडा आहे कुठल्याही दृश्य कलेचा. कम्पोझिशन- तुमच्या फोटोची चौकट.
खरोखरच याबद्दलची जाणीव वाढली तर तुमचे फोटो बदलतील.  काय काय गोष्टी लक्षात घ्याव्या याचा हा छोटासा गोषवारा. काही गोष्टी  सुटल्याहि असतील माझ्याकडून, पण  जेवढे आठवते ते सगळे लिहायचा प्रयत्न केलाय.

"फोटो काढताना अर्जुन बनू नका."
म्हणजे काय तर तुमच्या त्या फ्रेममध्ये नक्की काय काय येतय ते सगळ बघा. बऱ्याचदा फोटो काढण्याच्या घाईत आपण अगदी अर्जुनसारखे होतो. अर्जुनाला जसा पोपटाचा डोळा दिसत होता तसा  ज्याचा फोटो काढायचाय ते टारगेटच फक्त आपल्याला दिसत. आजुबाजूला कुठेच बघत नाही आपण आणि ते लक्ष्य दिसल्यावर धनुर्धारी अर्जुनासारखे बाण मारून..आपलं बटण दाबून मोकळे होतो. नंतर फोटो बघितला कि त्या फोटोमध्ये असंख्य नको असलेल्या गोष्टी दिसतात. फुलाचा फोटो काढला आणि मधे आलेल पान दिसलच नाही आणि फुलाचा काही भाग फोकस मध्ये नसलेल्या पानाने झाकला गेला. आता हा नक्की कसला फोटो, पानाचा कि फुलाचा? मित्रांच्या ग्रुपचा फोटो काढला आणि मध्ये एक भलामोठ झाडांच खोड आलंय. सुंदर धबधब्याचा फोटो काढलात पण त्याच फोटोमध्ये खाली पाण्याजवळ माणसांनी केलेला कचरा घाण आलंय. म्हणजे "माणसांनी केलेला कचरा" हाच विषय असेल तेव्हा काढलेल्या फोटोचा एंगल वेगळा असेल बर.
तर हे "फ्रेम मध्ये बघणं" अगदी महत्वाच. तुम्ही व्ह्यू फाईंडर मधून बघताना सर्व बाजू, फ्रेमच्या चारीही कडा बघा. कुठली गोष्ट नजरेला खटकतेय का? ती गोष्ट फोटोमध्ये येणार नाही याची काळजी घेतली तर तुम्ही काढलेला फोटो कसला आहे ते सांगावे लागणार नाही.

"तुम्हाला हव आहे ते सगळ येतंय ना फोटोमध्ये?"
माणसांचे फोटो काढताना त्याचे हात पाय डोकी निर्दयपणे कापत नाही ना आपण याकडे लक्ष ठेवा. हे सुद्धा  "फ्रेम मध्ये बघणं" याच सदरात मोडतं फक्त जरा वेगळ्या पद्धतीने. वरची होती निगेटिव्ह टेस्ट "काय नको ते बघा", आणि हि आहे पोझिटिव्ह टेस्ट "काय हवं ते बघा". निसर्ग प्रकाशचित्रणामध्ये सुद्धा हे अगदी गरजेच बर. धबधब्याचा उगमाचा भागच कापलात किंवा झाडाच्या खोडाचा खालचा भागच कापलात तर कदाचित तो फोटो कायम काहीतरी राहून गेल्यासारखा वाटत राहील. (याला अपवाद असतातच म्हणा.पण अशावेळी फोटोचा एंगल वेगळा, आणि फोटोग्राफरला काय दाखवायचं हे वेगळ असतं. मी सुद्धा काढलेत असे फोटो.)
बघाना या धबधब्याचा फोटो. कितीही चांगला वाटला तरी तो असा मधेच पाण्याचा प्रवाह काही बरा वाटत नाहीये. पण या पूर्ण धबधब्याचा फोटो पाहिला कि मग त्याच्या सौंदर्याचा अंदाज येतो.


"गिचमिड टाळा"

खूप गोष्टी एकाच फोटोमध्ये दाखवण्याचा अट्टाहासहि नको. नेमक आणि हव तेवढंच फ्रेममध्ये ठेवा. त्याने तुम्हाला काय दाखवायचंय हे योग्यपणे कळेल.या बाहुल्यांच्या फोटोत खूप बाहुल्या आहेत पण एकही धड दिसत नाहीये. हेच त्याचा खालचा फोटो पाहिला तर मात्र एकदम छान वाटतय कि नाही?






"झूम इन झूम आउट - पायांनी "
होत काय कि तुम्ही एखाद्या प्रेक्षणीय स्थळी जाता. चालता चालता मध्येच एखाद फार छान दृश्य दिसत. तुम्ही पटकन तो फोटो घेता आणि पुढे जाता. मग त्या ठिकाणाला भेट दिलेल्या सगळ्यांकडेच तोच फोटो त्याच एंगल असतो. तुम्ही काढलेल्या फोटोत काय नवीन वाटणार मग? त्यापेक्षा तेच दृश्य जरा पुढे, मागे जाऊन बघा. वाट वाकडी करून दुसरीकडे जाऊन बघा. खाली बसून , उंच दगडावर चढून बघा. नक्कीच तुम्हाला काहीतरी वेगळ , सुंदर गवसेल, जे बऱ्याच इतरांना कधी दिसलच नव्हतं. अस काही गवसण्याचा आणि ते कॅमेऱ्यामध्ये पकडायचा आनंद काही औरच.  आणि हे फोटो मग मित्रमैत्रीणीना दाखवायचा आनंदही और.  अगदी नेहेमीची ठिकाण सुद्धा अशी काही वेगळी दिसतील ना कि तुम्हालाही विश्वास बसणार नाही.   

"उंटावरून शेळ्या हाकणे"
असते ना हि सवय बऱ्याच जणांना? फोटोग्राफीत हे मधेच कुठे आलं अस वाटतय का वाचून? मग मला सांगा बर लहान मुलांचे फोटो काढताना तुम्ही खाली वाकून/ बसून काढता कि आहात तसे उभे राहून काढता? हे असे वरून काढलेले फोटो तुम्हाला मुलांच्या विश्वात घेऊन जात नाहीत. मुलांचे हावभाव, गोंडसपणा काही काही दिसत नाही त्यात. हत्तीवर बसलेल्या राजाने तुछ्चतेने खालच्या सैनिकांकडे बघाव तस काहीस वाटत. तुम्हाला मुलांचे खरे रूप टीपायचेय ना? मग त्यांच्याएवढे व्हा. त्यांच्या नजरेच्या पातळीत बसून फोटो काढा आणि बघा ते कसे येतात ते. 





अगदी हेच प्राण्यांचे आणि पक्षांचे फोटो काढतानापण लागू होत. वरून काढलेले असे फोटो तुम्हाला त्या सब्जेक्टच्या जवळ पोहोचू देतच नाहीत. डोळ्यातले भाव दिसत नाहीत तोपर्यंत एरवी माणससुद्धा कळत नाहीत आपल्याला. मग फोटोमध्ये कशी कळणार ती?  म्हणून डोळ्यातले हे भाव, ती चमक (कॅचलाईट म्हणतात त्याला) फोटोत दिसली पाहिजे. हे हरणांचे फोटो बघितलेत कि मला काय म्हणायचय ते कळेल.





"क्लोजअप टू मच"
जवळून फोटो काढायच्या नादात हे कळतच नाही , अगदी फोटो बघितल्यावर सुद्धा काय चुकलय ते कळत नाही बऱ्याच जणांना. म्हणजे फोटो चांगला नाही हे कळते पण काय चांगल नाही हे कळत नाही. हे अगदी जवळून काढलेले फोटो चेहेऱ्याला मजेशीर बनवतात. म्हणजे नाक जरा जास्तच मोठ वाटत, गाल ,कान जरा जास्तच मागे वाटतात. पोईंट एन्ड शूट कॅमेऱ्याने किंवा वाईड एंगल लेन्सने हे असे फोटो येतात. मुद्दामहून मजेशीर दाखवण्यासाठी अल्ट्रा वाईड एंगल लेन्सने  असे फोटो काढतात सुद्दा. पण नेहेमीचे फोटो असे काढत नाहीत कुणी, आणि तुम्ही कोणाचे काढलेत तर त्यांना आवडणारहि नाहीत. विनोदी दिसायला किती जणांना आवडेल नाहीका?


"रूल ऑफ थर्ड - एक त्रीतीयान्शाचा मंत्र "
याला नियम म्हणण्यापेक्षा मंत्रच म्हणेन मी. नियम म्हटला कि तो पाळण्याची बंधन आली. पण हा मंत्र लक्षात ठेवायचा आहे. हवा तिथे आणि हवा तसा वापरायचा, नसेल पटत तिथे विसरायचा. हे जाणून बुजून विसरण सुद्धा गरजेच असत कधीकधी. तर काय आहे हां मंत्र? वाचलात कि काहीसा कठीण वाटेल कदाचित, पण अंगवळणी पडला कि काही वाटणार नाही.
तुमच्या चौकटीचे म्हणजे फ्रेम जी व्ह्यू फाईंडर मध्ये दिसते तिला दोन उभ्या आणि दोन आडव्या अशा इमेजीनरी रेषांनी विभागायाच, या फोटोमध्ये दाखवलंय तस. मग फ्रेमचे नऊ समान भाग होतील. आता तुमचा सब्जेक्ट किंवा फोटोचा मुख्य विषय या चार रेषांच्या कोणत्याही छेदनबिंदु वर येईल असा किंवा चार पैकी एखाद्या रेषेवर ठेवून फोटो काढा. काय साध्य होणार याने? तुमचा विषय जर फोटोच्या मधोमध असेल तर जीवनहीन दिसतो, किंबहुना त्यात काहीही विशेष आहे अस बहुधा वाटतच नाही. त्यातल चैतन्य दिसून येत नाही. तोच विषय जर वर सांगितल्या प्रमाणे या विशिष्ठ रेषा किंवा त्यांच्या छेदनबिंदूवर ठेवला तर एकदम ड्रामेटिक इफेक्ट (योग्य मराठी शब्द सुचत नाहीये) साधतो.
या खालच्या फोटोमध्ये बघा हां पहिला फोटो अगदी निरस वाटतोय. पण फ्रेमची नित विभागणी करून रेषांनी खोली दाखवल्यावर त्यालाच एक वेगळ परिमाण लाभते.


रूल ऑफ थर्ड चे उत्तम उदाहरण









जर तुमच्या फोटोमध्ये पाणी आणी आकाश असेल तर ते मधोमध विभागु नका. जर त्यावेळी आकाश जास्त सुंदर असेल तर फोटोचे दोन भाग आकाश आणि एक भाग पाणी दाखवा. किंवा पाणी खूप सुंदर दिसत असेल तर दोन भाग पाणी आणि एक भाग आकाश अस ठेवा. बघा खालचा फोटो.





आता हा मंत्र विसरायचा केव्हा तर तुम्हाला विषयामधली सममितीच (सिमिट्री) दाखवायची आहे तेव्हा. किंवा अगदी खरच फोकस बिंदू वेगळ्या ठिकाणी ठेवल्याने तुमच्या फोटोचा अर्थ, सुंदरता बदलणार असेल तेव्हा खुशाल हे नजरेआड करा. शेवटी आपल साध्य आहे सुंदर फोटो काढायचं, कोणीतरी केलेले नियम पाळायचं नाही.
खालच्या या फोटोमध्ये मला या या चिन्हाची सममिती दाखावायाचीय. आणि त्या स्तुपामध्ये पूर्ण स्तूप समोरून दाखवायचाय त्यामुळे यादोन्ही फोटोमध्ये रूळ ऑफ थर्ड ओव्हररुल्ड!





"चौकटीचे तुकडे"
चौकटीला अगदी समांतर जाणाऱ्या रेषांनी फ्रेम विभागु नका. हे अगदी दोन तुकडे केल्यासारख दिसत. त्या रेषा तिरप्या जातील अस बघा. या फोटोमधल ते लाकडाच कुंपण तिरक्या रेषांमुळे फ्रेम विभागात नाहीये बघा




पण यातही मेख अशी कि क्षितीज रेषा नेहेमी समांतर ठेवावी नाहीतर फोटो अगदी पडल्यासारखा दिसतो. बघाना खालच्या फोटोतला समुद्र कसा पडेल असा वाटतंय ना.

आणि हा आकाश कंदिलाचा फोटो. मधोमध असलेला कंदील फारसा सुंदर नाही वाटत पण तोच वेगळ्या प्रकारे काढलेला फोटो त्या कंदिलाच्या शेपटाची मनमोहक हालचाल दाखवतो.





"गिव्ह मी सम स्पेस - प्रत्येक विषयाला त्याचा एक अवकाश द्या "
कोणाचा बाजूने फोटो काढलात आणि अगदी फ्रेम मध्ये पूर्ण भरून टाकलत तर त्या सब्जेक्टजी नजर फोटोच्या बाहेर जाते. म्हणजे तो फोटोच्या बाहेर बघतोय अस वाटायला लागत. मग तुमचा फोटो पाहणाऱ्याची नजर सुद्धा आपसूकच फ्रेमच्या बाहेर जाते आणि तुमच्या फोटो मधला इंटरेस्ट कमी होतो. असा बघणाऱ्याची नजर चौकटीच्या बाहेर नेणाऱ्या कलाकृती म्हणून मान्यता पावत नाहीत. तुमचा फोटो असा असला पाहिजे कि बघणाऱ्याची नजर त्या चौकटीच्या आत अगदी बांधली गेली पाहिजे. चौकटीच्या कडाकडूनही नजर वारंवार मुख्य फोकस बिंदू कडे वळली पाहिजे.
म्हणून डोळ्यांच्या समोर जिथे तुमचा सब्जेक्ट बघतोय तिथे एक मोकळ अवकाश ठेवा. हे अवकाशच त्या फोटोला आणखी पूर्णता देईल.
या बालभिक्षुच्या फोटोमध्ये त्याच्या चेहेऱ्यासमोर एक स्पेस आहे मोकळे अवकाश आहे. त्यामुळे वारंवार त्याच्या चेहेऱ्याकडे नजर जाते. खरतरं त्याच ते लाल वस्त्र जास्त आकर्षक आहे. तरीही त्याचा चेहेरा हाच मुख्य फोकस पोईंट ठरतोय फोटोमध्ये.













"नसलेली चौकट निर्माण करा."

काही काही वेळा मुद्दाम चौकटी'सदृश्य आकार दाखवावे लागतात. त्यामुळे फोटोची एक बंदिस्त चौकट दिसते. आणि ती बघणाऱ्याला आपल्या फोटोमध्ये अगदी बांधून ठेवते. त्याची नजर फोटोच्या बाहेर जाऊ न देता परत परत फोटोच्या मुख्य भागात फिरत राहील अशी व्यवस्था करते. खालच्या या फोटो बघा या झाडाचे खोड व फांदी हे चौकटीचे काम करतंय. आणि त्यामुळे नजर फोटोत फिरत रहाते.




तर या अशा काही गोष्टी कदाचित तुम्हाला उपयोगी पडतील. यातले बदल केल्याने तुमच्या फोटोंना दाद मिळाली तर मला जरूर सांगायला या.