प्रकाशरानातून चालताना...

प्रवास वर्णने आणि फोटोग्राफी विषयी लेख

  • Home
  • Posts RSS
  • Comments RSS

Sunday, July 25, 2010

फोटोग्राफी : फिल्टर्स

मी SLR फोटोग्राफी सुरु केली तेव्हा फिल्टर म्हणजे काय ते माहीतच नव्हतं. एकदा भावाने रंगीत फिल्टर आणून दिले मला. दोघानाही हे कसे वापरायचे ते माहीत नाही पण उत्साह दांडगा होता. त्या फिल्टर किट मध्ये निळा, पिवळा, लाल, हिरवा आणि केशरी असे रंग होते. आता ते तसेच लेन्स पुढे लावून काढले कि त्याच रंगात न्हालेला फोटो यायचा. आम्ही तसेच काही रंगीत फोटो काढले आणि नंतर तो फिल्टर किट फारसा वापरेनासा झाला. मग पुढे बऱ्याच दिवसानी आम्हाला कळल कि ते रंगीत फिल्टर कृष्णधवल फोटोग्राफी साठी असतात. पण आम्ही कधीहि त्याने कृष्णधवल फोटोग्राफी केली नव्हती!

एकदा कुठूनतरी आम्हाला एक फिल्टरच ब्रोशर मिळालं. त्यातले तऱ्हेतऱ्हे फिल्टर पाहून तर मला अस झालेलं कधी एकदा हे मिळतायेत आपल्याला. पण त्यांच्या किमतीही अफाट होत्या डॉलर मध्ये लिहिलेल्या. आणि आमच्या माहितीप्रमाणे ते सगळे फिल्टर मुंबईमध्ये मिळतही नव्हते.  बाबांच्या एका मित्राने सर्क्युलर पोलरायाझर फिल्टर घ्यायला सांगितला तो हि वापरायचे पण तसे फारसे फायदे घेतेवेळी माहीत नव्हतेच.

मग जस जस वाचन वाढलं आणि फोटोग्राफी वाढली तसतस बऱ्याच गोष्टी नीट कळायला लागल्या. पुढे जपानला आल्यावर तर मी कॅमेऱ्याच्या दुकानात तासंतास असायचे नुसत बघत. तेव्हा जपानी वाचता येत नव्हतं तरी नुसत बघायचं काय आहे ते. आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे कुठल्याही कॅमेऱ्याचे मॉडेल हाताळून बघता यायचे. अजूनही ती दुकान माझी आवडती वेळ घालवायची जागा आहेत.

तुम्हीही कधी दिव्यांच्या जागी ताऱ्यांप्रमाणे दिसणारे, मधेच इंद्रधनुष्य असणारे, एकाच फोटोमध्ये एकच व्यक्ती अनेकवेळा दिसणारे (मल्टीपल एक्स्पोजर), कधी नुसते निगेटिव्ह प्रमाणे दिसणारे फोटो बघितले असतील ना. किंवा अगदी उठावदार इंद्रधनुष्य, गडद निळ आकाश, सुंदर मोरपिशी समुद्र असलेले फोटोही बघितले असतील. हि सगळी बहुतेकवेळा फिल्टरची कमाल. बहुतेकवेळा अशासाठी कि फोटो एडीट करूनही असे काही इफेक्ट मिळवता येतात.

फिल्टर म्हणजे काय बर? तर कॅमेऱ्याचा चष्माच. जसा चष्मा लावाल तस चित्र दिसेल. हे फिल्टर कॅमेऱ्याच्या लेन्सच्या समोर लावायचे कि हवा तो इफेक्ट मिळतो. आतापर्यंत ज्याना फिल्टरबद्दल माहीती नाही त्यांची उत्सुकता फारच ताणली असेल ना? मग चला तर फिल्टरच्या दुनियेत एक छोटासा फेरफटका मारुयात.

फिल्टरमध्ये वापरण्याच्या पद्धतीप्रमाणे दोन मुख्य प्रकार असतात. स्क्र्यु इन आणि स्क्वेअर.

स्क्र्यु इन फिल्टर :
हे गोल फिल्टर असतात. कॅमेऱ्याच्या लेन्सचा सगळ्यात बाहेरचा भागाला स्क्र्यु सारखे थ्रेड असतात. त्यावर हे फिल्टर बाटलीच्या झाकणासारखे फिरवून बसवता येतात. म्हणजे लेन्सचा जितका व्यास (डायमीटर) असतो तीतकाच फिल्टरचापण व्यास असावा लागतो. मग तुमच्या कडे जास्त लेन्स असतील तर प्रत्येक लेन्स साठी एक फिल्टर घ्यावा लागतो.
सगळे फिल्टर प्रत्येक उपलब्ध लेन्सच्या व्यासाच्या मापाचे फिल्टर विकत मिळतात. त्यामुळे तुमच्या लेन्स चा व्यास बघुन त्यानुसार फिल्टर घ्यावा. लेन्स समोरून बघितली तर तिच्या कडेवर व्यास लिहिलेला असतो.
फोटो कोकीन च्या साईट वरून  http://www.cokin.com/ico7-p1.html

स्क्वेअर फिल्टर:
हे फिल्टर नावाप्रमाणे चौरस असतात. या फिल्टरसाठी एक फिल्टर होल्डर मिळतो. तो कॅमेऱ्याच्या लेन्स वर बसवायचा. आणि त्यात हे फिल्टर बसवायचे. याचा फायदा असा कि फिल्टर महाग असतात. प्रत्येक लेन्स साठी एक फिल्टर घेणे फार महागात पडते. त्याऐवजी एकच चौरस फिल्टर घेऊन तो सगळ्या लेन्स साठी वापरता येतो. यात फक्त प्रत्येक लेन्स साठी एक अडाप्टर रिंग घ्यावि  लागते
आणी ती फारच स्वस्त असते. ती वेगवेगळ्या साइज मधे उपलब्ध असते.



फोटो कोकीन च्या साईट वरून  http://www.cokin.fr/ico15-A.html

तर आता कुठल्या प्रकारचे फिल्टर असतात आणि त्यांचे उपयोग काय हा हि प्रश्न येणारच ना मनात.

एन डी फिल्टर (नॅचरल डेन्सिटी फिल्टर):
तुम्ही कधी कधी सकाळपासून प्रवास करून भर दुपारी तुमच्या इप्सित स्थळी एखाद्या धबधब्याजवळ पोहोचता. तिथे तुम्हाला फोटोग्राफी करायची असते. पण बाहेर बघाव तर भगभगीत दुपार. धबधब्यामधल पाणी अगदी प्रकाशाने न्हाऊन निघालेलं असतं. अशावेळी तसेच फोटो काढलेत तर काय होत बर? धबधबा नुसता पांढराफेक (ओव्हर एक्सपोज) येतो. किंवा तुम्हाला पाण्याच्या मृदू धारा दाखवायच्या असतात पण प्रकाशामुळे शटरस्पीड (याबद्दल मी नंतर पुढच्या लेखात लिहीन) कमी करता येत नाही आणि फोटोत पाण्याचे शिंतोडे दिसत रहातात. अशावेळी कामी येतो तो एन डी फिल्टर.
हा फिल्टर कॅमेऱ्या येणारा प्रकाश कमी करतो पण रंग मात्र बदलत नाही. हा फिल्टर वापरून तुम्हाला भगभगीत दुपारी सुध्दा चांगले फोटो काढता येतील.
यात तीन शेड असतात. एन डी फिल्टर २ (१ स्टॉप ), एन डी फिल्टर ४(२ स्टॉप) आणि एन डी फिल्टर ८ (३ स्टॉप). एन डी फिल्टर ८. हा सगळ्यात जास्त गडद असतो.

एन डी फिल्टर वापरून दुपारी काढलेला हां धबधब्याचा फोटो (अकिकावा )

ग्रॅजुएटेड एन डी फिल्टर:
कधी कधी काय होत कि आकाश तेवढ खूप पांढर असतं पण खालचा भाग जस जमीन डोंगर इ. कमी प्रकाशात असतं यावेळी पूर्ण एन डी फिल्टर वापरला तर खालचा भाग गडद काळा (अंडर एक्सपोज) होण्याची शक्यता असते. अशा वेळी हे फिल्टर वापरता येतात. यात फिल्टर वरती गडद असून खालपर्यंत फिकट होत जातात. सूर्यास्त सूर्योदय असे फोटो काढायला असे फिल्टर उपयोगी ठरतात.

यु व्ही फिल्टर:
कॅमेऱ्यामध्ये वापरण्यात येणारी फिल्म यु व्ही रेज सेन्सिटिव्ह (अतिनील किरणे) असते. म्हणजे या किरणांमुळे फोटोवर परिणाम होऊ शकतो. जेव्हा वातावरणात यु व्ही रेज (अतिनील किरणे) जास्त असतात. तेव्हा काढलेले फोटो निळसर येतात. म्हणून हे फिल्टर वापरण्यात आले. या फिल्टर मुळे यु व्ही किरणे थांबवली जाऊन फोटो मध्ये निळसर झाक येत नाही.
पण डिजीटल कॅमेऱ्या मध्ये हि भिती नाही. कारण डिजीटल कॅमेऱ्यामधला सेन्सर यु व्ही रेज सेन्सिटिव्ह नसतो. त्यामुळे डिजीटल कॅमेरा वापरणाऱ्यानी हां फिल्टर घेण्याची गरज नाही.
बरेचजण लेन्सचा धुळीपासून आणि चरे पडण्यापासून बचाव करायला यु व्ही फिल्टर वापरतात. अगदी वापरायचाच असेल तर डिजीटल कॅमेरा वापरणाऱ्यानी नुसता प्रोटेक्तीव्ह फिल्टर वापरला तरी चालतो.

रंगीत फिल्टर:
वर म्हटल्याप्रमाणे हे रंगीत फिल्टर कृष्णधवल फोटोग्राफी मध्ये वापरले जातात. फोटोचा गडदपणा (Contrast ), वैगरेचा योग्य परिणाम साधण्यासाठी वापरतात.
हे हि आता डिजीटल कॅमेऱ्यामध्येच कृष्णधवल फोटोग्राफीची सुविधा असल्याने डिजीटल फोटोग्राफी मध्ये वेगळे फिल्टर असण्याची गरज नाहीये.

पोलारायझर फिल्टर (CPL): किमयागार
फोटोमध्ये दिसणार गडद नीळ आकाश, अगदी पारदर्शक मोरपिशी रंगाचा समुद्र, सुंदर रंगीत इंद्रधनुष्य, अगदी उठावदार रंग अस काही असलं कि फोटो अगदी मनात घर करतो कि नाही? हि सगळी किमया बऱ्याच वेळा या फिल्टरची असते बर. हे फिल्टर निळ्या आकाशाला अधिकच गडद बनवतात. पांढरे ढग आणि आकाशातल contrast वाढवतात त्यामुळे ढग अगदी उठावदार दिसतात. आकाशातल्या इंद्रधनुष्याचे रंग देखील हां फिल्टर अगदी उठावदार दाखवतो. तलाव समुद्र याचा फोटो काढताना पाण्यावर प्रकाश परावर्तीत होऊन पाणी चमकत आणि फोटोच एक्स्पोजर चुकवतो. पण हा फिल्टर असेल तर मात्र या चमकणाऱ्या पाण्याला थांबवता येते.
एवढच काय पण अगदी काचेच्या खिडकीतून काढलेल्या फोटोमध्ये सुद्धा मधली काच न् दाखवण्याची जादुगिरी हां फिल्टर करू शकतो. अस नक्की काय बर असतं याट जरा माहिती करून घेऊयात.
या फिल्टरमध्ये पोलराइज्ड प्रकाश फिल्टर करण्याची किंवा हवा असल्यास जाऊ देण्याची क्षमता असते. म्हणजे नेमक काय तर. पाणी किंवा धातूच्या वस्तूवर प्रकाश पडल्यावर जो प्रकाश परावर्तीत होतो तो जशाच्या तसा कॅमेऱ्याच्या लेन्स मधून जाऊ देण्यासाठी किंवा गरज पडल्यास थांबवण्यासाठी हां फिल्टर वापरतात.
फार कठीण वाटतय का हे वाचायला? म्हणजे बघा तुम्ही एखाद्या तलावाचा फोटो काढताय आणि त्या तलावाच पाणी प्रकाशामुळे खुपच चमकतंय. अशा वेळी हां फिल्टर नीट वापरला तर त्या पाण्याची चमक घालवून फोटो काढता येतो.

आपल्या ऑटोफोकस कॅमेर्यामध्ये शक्यतो सर्क्युलर पोलारायझर फिल्टर (CPL) वापरतात. तो स्क्र्यु इन प्रकारचा असतो.
या सर्क्युलर पोलारायझर फिल्टर मध्ये एक गोल फिरणारी रिंग असते. फिल्टर लेन्सला पुढे घट्ट लावल्यावर हि रिंग फिरवता येते आणि या रिंग ने पोलराइज्ड प्रकाश फिल्टर करता (थांबवता) येतो किंवा हवा तेव्हा जाऊ देता येतो.

जेव्हा सूर्य किंवा प्रकाश स्त्रोत आपल्या लेन्स च्या ९० अंशामध्ये असतो तेव्हा या फिल्टर च काम जास्तीत जास्त क्षमतेने होत. म्हणजे जर आपण फोटो काढताना सूर्य आपल्या उजवी किंवा डावीकडे असेल तर जास्तीत जास्त पोलारायझिंग इफेक्ट मिळतो.
हे डिजीटल किंवा फिल्म दोन्हीमध्ये अगदी उपयुक्त प्रकारचे फिल्टर आहेत.या फिल्टरने कॅमेऱ्यात पोचणारा  प्रकाश कमी होतो ( १ ते २ स्टॉप ) त्यामुले कमी प्रकाश असलेल्या ठिकाणी वापरता येत नाही.

बसच्या काचेच्या खिडकीतून काढलेला फोटो. काच आहे अस अजिबात वाटत नाहिये.  (माउन्ट फूजी )

फिल्टर शिवाय काढलेला फोटो. पानी आणि झाडांचे रंग कसे आहेत ते बघा (कावागुची को )

हाच फिल्टर लावून काढलेला फोटो. रंग किती ताजेतवाने आणि पाण्यात प्रकाश परावर्तन नाहीच. (कावागुची को )

फिल्टर शिवाय काढलेला फोटो. पानि आकाश आणि झाडांचे रंग कसे आहेत ते बघा (कावागुची को )

हाच फिल्टर लावून काढलेला फोटो. रंग किती ताजेतवाने आणि आकाशातले ढग अगदी उठावदार. (कावागुची को )

इन्द्र धनुष्याचे रंग कसे खुललेत ना. (घरातून दिसणारे पोर्ट)


डीफ्युझींग फिल्टर:
स्व्प्नामधले असल्यासारखे देखावे, चमकणार उबदार दिसणार उन , चेहेऱ्याभोवती असणारी आभा, आणि चमकदार चेहेरा या आणि अशा इफेक्टचा जनक आहे हां फिल्टर. हां फिल्टर लेन्स मध्ये जाणारा प्रकाश डीफ्युझ करतो. त्यामुळे चेहेऱ्याला एक प्रकारची आभा दिसते. किंवा पानातून सांडणार उन अगदी चांदण्या प्रमाणे मंद चमकत. स्वप्नाचा फिल्टर म्हणाना याला.
फक्त एक लक्षात ठेवायचं म्हणजे या फिल्टरने फोटोचा शार्पनेस जातो.

गूढ़ रम्य जंगल फिल्टर सोबत (विंड केव्ह्स )

चांदण्याची पाने. (विंड केव्ह्स )

फुलाभोवतिची आभा, अशीच चहर्याभोवातिही येते. (अजिसाई फुले )

क्लोजअप फिल्टर:
या फिल्टरने अगदी छोट्या वस्तूचे खूप जवळून फोटो काढता येतात. macroफोटोग्राफी करण्यासाठी हे वापरतात. यात तीन नंबरचे फिल्टर असतात आणि सहसा ते किट मध्ये उपलब्ध असतात.
क्लोजअप फिल्टर ने घेतलेली चेरिची फुले.
ट्रिक फोटोग्राफीचे फिल्टर्स:
नसलेलं इंद्रधनुष्य दाखवायला, एकाच फोटोत एकाच व्यक्तीची अनेक रूप दाखवायला, रस्त्यांवरचे दिवे चांदण्याप्रमाणे चमकवायला, जुने असावे असे दिसणारे सेपिया फोटो काढायला, धुक्याचा भास आणायला असे अनेक फिल्टर मिळतात. डिजीटल कॅमेऱ्यामध्ये या सगळ्याची गरज फारशी नाही आता. कारण हवे असलेले सगळे इफेक्ट नंतर प्रोसेसिंग करून मिळवता येतात.

हे फिल्टर वापरताना लक्षात ठेवायची सगळ्यात महत्वाची गोष्ट.
-बरेच वेळा काही जण महागड्या लेन्स कॅमेरे खरेदी करतात. मग त्या महागड्या लेन्सना प्रोटेक्शन म्हणून एखादा स्वस्त यूव्ही / प्रोटेक्टर फिल्टर लावतात. पण लक्षात घ्या फिल्टर हां प्रकाश फिल्टर करण्यासाठी असतो. हे स्वस्त फिल्टर चांगल्या प्रकारे प्रकाश फिल्टर करत नाहीत (डीफ्राक्शन् इ. जास्त असते,सूक्ष्म चरे असतात). आणि जर तुमच्या महागड्या लेन्स पर्यंत पोचणारा प्रकाश आधीच खराब असेल तर चांगले फोटो येण्याची शक्यता कमीच नाहीका?
म्हणून फिल्टर वापरताना तडजोड करू नका.
-चांगल्या कंपनीचे (होया, केंको, कोकीन  इ.) फिल्टर घ्या.
-आणि फिल्टर नीट तपासून घ्या. मला एकदा अगदी चांगल्या आणि नवीन फिल्टर मध्ये असा त्रास झालेला आहे. आधी तो फिल्टर लावल्यावर फोकसिंग ला त्रास होत होता. आणि एक दिवस चक्क फिल्टर ची काच त्याच्या रिंग मधून खाली पडली. ती काच त्या रिंग मध्ये हलत असल्याने फोकसिंग पण चुकत होत. तर अशा गोष्टी बघून फिल्टर घ्या.
-दोन तीन फिल्टर एकावर एक लावून शक्यतो वापरू नका, त्यामुळे प्रकाशाची क्वालिटी खराब होते. म्हणजे तुमचा आधी प्रोटेक्टर फिल्टर लावला असेल तर शक्यतो त्यावरच एन डी फिल्टर पण लावून् फोटो काढू नका, आधीचा फिल्टर काढून मग दुसरा लावा.

चला तर मग तुमच्या लेंसला कुठला चष्मा हवाय ते ठरवा बर.
Posted by Swapnali Mathkar at 7:12 AM 7 comments
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: कॅमेरा, फिल्टर, फोटोग्राफी

Friday, July 2, 2010

फोटोग्राफी: जादूचा मंत्र

तुझे फोटो म्हणजे काय प्रश्नच नाही. मस्तच असतात.
कसे काय जमत तुला असे फोटो काढायला?
अस ऐकायला मिळालं कि कस वाटेल तुम्हाला?  आणि अशी प्रतिक्रिया नेहेमीच मिळाली तर कस वाटेल? नेहेमी नेहेमी अस कौतुकाचे शब्द लाभले तर खरच छानच वाटेल ना?
हि काय जादू आहे का म्हणून काय विचारता?  खरच हे अगदी बऱ्यापैकि शक्य आहे.  विश्वास बसत नाहीये का? चला तर मीच तुम्हाला एक जादू शिकवते? जादू जी तुमची फोटोग्राफी लक्षणीयरित्या बदलेल. आणि तुम्हाला तुम्ही काढलेल्या फोटोबद्दल हमखास पावती मिळत जाईल.हो अगदी तुमचा कोणताही कॅमेरा असला ना तरीही.
आहात ना तय्यार? मंत्र सांगते ह आता.
अरेच्चा असे हसताय काय? मंत्रबिन्त्र सगळ खोट आहे म्हणता?
आता तुमचा विश्वासच नसेल तर राहील. पण हि जादू मात्र खरी आहे हां.
मला नक्की माहितेय आता तुमची उत्सुकता तुम्हाला शांत राहू देत नाहीये. हो ना?
तर मन्त्र असा आहे कि


प्रकाशरानातून चालताना
चौकटी चौकटीची जागा ठरवा
काय हव पेक्षा काय नको
अन कस हव पेक्षा कस नको
याची तुम्हीच तुम्हाला आठवण करा.

हा कदाचित सगळ्यात महत्वाचा आणि अगदी प्राथमिक धडा आहे कुठल्याही दृश्य कलेचा. कम्पोझिशन- तुमच्या फोटोची चौकट.
खरोखरच याबद्दलची जाणीव वाढली तर तुमचे फोटो बदलतील.  काय काय गोष्टी लक्षात घ्याव्या याचा हा छोटासा गोषवारा. काही गोष्टी  सुटल्याहि असतील माझ्याकडून, पण  जेवढे आठवते ते सगळे लिहायचा प्रयत्न केलाय.

"फोटो काढताना अर्जुन बनू नका."
म्हणजे काय तर तुमच्या त्या फ्रेममध्ये नक्की काय काय येतय ते सगळ बघा. बऱ्याचदा फोटो काढण्याच्या घाईत आपण अगदी अर्जुनसारखे होतो. अर्जुनाला जसा पोपटाचा डोळा दिसत होता तसा  ज्याचा फोटो काढायचाय ते टारगेटच फक्त आपल्याला दिसत. आजुबाजूला कुठेच बघत नाही आपण आणि ते लक्ष्य दिसल्यावर धनुर्धारी अर्जुनासारखे बाण मारून..आपलं बटण दाबून मोकळे होतो. नंतर फोटो बघितला कि त्या फोटोमध्ये असंख्य नको असलेल्या गोष्टी दिसतात. फुलाचा फोटो काढला आणि मधे आलेल पान दिसलच नाही आणि फुलाचा काही भाग फोकस मध्ये नसलेल्या पानाने झाकला गेला. आता हा नक्की कसला फोटो, पानाचा कि फुलाचा? मित्रांच्या ग्रुपचा फोटो काढला आणि मध्ये एक भलामोठ झाडांच खोड आलंय. सुंदर धबधब्याचा फोटो काढलात पण त्याच फोटोमध्ये खाली पाण्याजवळ माणसांनी केलेला कचरा घाण आलंय. म्हणजे "माणसांनी केलेला कचरा" हाच विषय असेल तेव्हा काढलेल्या फोटोचा एंगल वेगळा असेल बर.
तर हे "फ्रेम मध्ये बघणं" अगदी महत्वाच. तुम्ही व्ह्यू फाईंडर मधून बघताना सर्व बाजू, फ्रेमच्या चारीही कडा बघा. कुठली गोष्ट नजरेला खटकतेय का? ती गोष्ट फोटोमध्ये येणार नाही याची काळजी घेतली तर तुम्ही काढलेला फोटो कसला आहे ते सांगावे लागणार नाही.

"तुम्हाला हव आहे ते सगळ येतंय ना फोटोमध्ये?"
माणसांचे फोटो काढताना त्याचे हात पाय डोकी निर्दयपणे कापत नाही ना आपण याकडे लक्ष ठेवा. हे सुद्धा  "फ्रेम मध्ये बघणं" याच सदरात मोडतं फक्त जरा वेगळ्या पद्धतीने. वरची होती निगेटिव्ह टेस्ट "काय नको ते बघा", आणि हि आहे पोझिटिव्ह टेस्ट "काय हवं ते बघा". निसर्ग प्रकाशचित्रणामध्ये सुद्धा हे अगदी गरजेच बर. धबधब्याचा उगमाचा भागच कापलात किंवा झाडाच्या खोडाचा खालचा भागच कापलात तर कदाचित तो फोटो कायम काहीतरी राहून गेल्यासारखा वाटत राहील. (याला अपवाद असतातच म्हणा.पण अशावेळी फोटोचा एंगल वेगळा, आणि फोटोग्राफरला काय दाखवायचं हे वेगळ असतं. मी सुद्धा काढलेत असे फोटो.)
बघाना या धबधब्याचा फोटो. कितीही चांगला वाटला तरी तो असा मधेच पाण्याचा प्रवाह काही बरा वाटत नाहीये. पण या पूर्ण धबधब्याचा फोटो पाहिला कि मग त्याच्या सौंदर्याचा अंदाज येतो.


"गिचमिड टाळा"

खूप गोष्टी एकाच फोटोमध्ये दाखवण्याचा अट्टाहासहि नको. नेमक आणि हव तेवढंच फ्रेममध्ये ठेवा. त्याने तुम्हाला काय दाखवायचंय हे योग्यपणे कळेल.या बाहुल्यांच्या फोटोत खूप बाहुल्या आहेत पण एकही धड दिसत नाहीये. हेच त्याचा खालचा फोटो पाहिला तर मात्र एकदम छान वाटतय कि नाही?






"झूम इन झूम आउट - पायांनी "
होत काय कि तुम्ही एखाद्या प्रेक्षणीय स्थळी जाता. चालता चालता मध्येच एखाद फार छान दृश्य दिसत. तुम्ही पटकन तो फोटो घेता आणि पुढे जाता. मग त्या ठिकाणाला भेट दिलेल्या सगळ्यांकडेच तोच फोटो त्याच एंगल असतो. तुम्ही काढलेल्या फोटोत काय नवीन वाटणार मग? त्यापेक्षा तेच दृश्य जरा पुढे, मागे जाऊन बघा. वाट वाकडी करून दुसरीकडे जाऊन बघा. खाली बसून , उंच दगडावर चढून बघा. नक्कीच तुम्हाला काहीतरी वेगळ , सुंदर गवसेल, जे बऱ्याच इतरांना कधी दिसलच नव्हतं. अस काही गवसण्याचा आणि ते कॅमेऱ्यामध्ये पकडायचा आनंद काही औरच.  आणि हे फोटो मग मित्रमैत्रीणीना दाखवायचा आनंदही और.  अगदी नेहेमीची ठिकाण सुद्धा अशी काही वेगळी दिसतील ना कि तुम्हालाही विश्वास बसणार नाही.   

"उंटावरून शेळ्या हाकणे"
असते ना हि सवय बऱ्याच जणांना? फोटोग्राफीत हे मधेच कुठे आलं अस वाटतय का वाचून? मग मला सांगा बर लहान मुलांचे फोटो काढताना तुम्ही खाली वाकून/ बसून काढता कि आहात तसे उभे राहून काढता? हे असे वरून काढलेले फोटो तुम्हाला मुलांच्या विश्वात घेऊन जात नाहीत. मुलांचे हावभाव, गोंडसपणा काही काही दिसत नाही त्यात. हत्तीवर बसलेल्या राजाने तुछ्चतेने खालच्या सैनिकांकडे बघाव तस काहीस वाटत. तुम्हाला मुलांचे खरे रूप टीपायचेय ना? मग त्यांच्याएवढे व्हा. त्यांच्या नजरेच्या पातळीत बसून फोटो काढा आणि बघा ते कसे येतात ते. 





अगदी हेच प्राण्यांचे आणि पक्षांचे फोटो काढतानापण लागू होत. वरून काढलेले असे फोटो तुम्हाला त्या सब्जेक्टच्या जवळ पोहोचू देतच नाहीत. डोळ्यातले भाव दिसत नाहीत तोपर्यंत एरवी माणससुद्धा कळत नाहीत आपल्याला. मग फोटोमध्ये कशी कळणार ती?  म्हणून डोळ्यातले हे भाव, ती चमक (कॅचलाईट म्हणतात त्याला) फोटोत दिसली पाहिजे. हे हरणांचे फोटो बघितलेत कि मला काय म्हणायचय ते कळेल.





"क्लोजअप टू मच"
जवळून फोटो काढायच्या नादात हे कळतच नाही , अगदी फोटो बघितल्यावर सुद्धा काय चुकलय ते कळत नाही बऱ्याच जणांना. म्हणजे फोटो चांगला नाही हे कळते पण काय चांगल नाही हे कळत नाही. हे अगदी जवळून काढलेले फोटो चेहेऱ्याला मजेशीर बनवतात. म्हणजे नाक जरा जास्तच मोठ वाटत, गाल ,कान जरा जास्तच मागे वाटतात. पोईंट एन्ड शूट कॅमेऱ्याने किंवा वाईड एंगल लेन्सने हे असे फोटो येतात. मुद्दामहून मजेशीर दाखवण्यासाठी अल्ट्रा वाईड एंगल लेन्सने  असे फोटो काढतात सुद्दा. पण नेहेमीचे फोटो असे काढत नाहीत कुणी, आणि तुम्ही कोणाचे काढलेत तर त्यांना आवडणारहि नाहीत. विनोदी दिसायला किती जणांना आवडेल नाहीका?


"रूल ऑफ थर्ड - एक त्रीतीयान्शाचा मंत्र "
याला नियम म्हणण्यापेक्षा मंत्रच म्हणेन मी. नियम म्हटला कि तो पाळण्याची बंधन आली. पण हा मंत्र लक्षात ठेवायचा आहे. हवा तिथे आणि हवा तसा वापरायचा, नसेल पटत तिथे विसरायचा. हे जाणून बुजून विसरण सुद्धा गरजेच असत कधीकधी. तर काय आहे हां मंत्र? वाचलात कि काहीसा कठीण वाटेल कदाचित, पण अंगवळणी पडला कि काही वाटणार नाही.
तुमच्या चौकटीचे म्हणजे फ्रेम जी व्ह्यू फाईंडर मध्ये दिसते तिला दोन उभ्या आणि दोन आडव्या अशा इमेजीनरी रेषांनी विभागायाच, या फोटोमध्ये दाखवलंय तस. मग फ्रेमचे नऊ समान भाग होतील. आता तुमचा सब्जेक्ट किंवा फोटोचा मुख्य विषय या चार रेषांच्या कोणत्याही छेदनबिंदु वर येईल असा किंवा चार पैकी एखाद्या रेषेवर ठेवून फोटो काढा. काय साध्य होणार याने? तुमचा विषय जर फोटोच्या मधोमध असेल तर जीवनहीन दिसतो, किंबहुना त्यात काहीही विशेष आहे अस बहुधा वाटतच नाही. त्यातल चैतन्य दिसून येत नाही. तोच विषय जर वर सांगितल्या प्रमाणे या विशिष्ठ रेषा किंवा त्यांच्या छेदनबिंदूवर ठेवला तर एकदम ड्रामेटिक इफेक्ट (योग्य मराठी शब्द सुचत नाहीये) साधतो.
या खालच्या फोटोमध्ये बघा हां पहिला फोटो अगदी निरस वाटतोय. पण फ्रेमची नित विभागणी करून रेषांनी खोली दाखवल्यावर त्यालाच एक वेगळ परिमाण लाभते.


रूल ऑफ थर्ड चे उत्तम उदाहरण









जर तुमच्या फोटोमध्ये पाणी आणी आकाश असेल तर ते मधोमध विभागु नका. जर त्यावेळी आकाश जास्त सुंदर असेल तर फोटोचे दोन भाग आकाश आणि एक भाग पाणी दाखवा. किंवा पाणी खूप सुंदर दिसत असेल तर दोन भाग पाणी आणि एक भाग आकाश अस ठेवा. बघा खालचा फोटो.





आता हा मंत्र विसरायचा केव्हा तर तुम्हाला विषयामधली सममितीच (सिमिट्री) दाखवायची आहे तेव्हा. किंवा अगदी खरच फोकस बिंदू वेगळ्या ठिकाणी ठेवल्याने तुमच्या फोटोचा अर्थ, सुंदरता बदलणार असेल तेव्हा खुशाल हे नजरेआड करा. शेवटी आपल साध्य आहे सुंदर फोटो काढायचं, कोणीतरी केलेले नियम पाळायचं नाही.
खालच्या या फोटोमध्ये मला या या चिन्हाची सममिती दाखावायाचीय. आणि त्या स्तुपामध्ये पूर्ण स्तूप समोरून दाखवायचाय त्यामुळे यादोन्ही फोटोमध्ये रूळ ऑफ थर्ड ओव्हररुल्ड!





"चौकटीचे तुकडे"
चौकटीला अगदी समांतर जाणाऱ्या रेषांनी फ्रेम विभागु नका. हे अगदी दोन तुकडे केल्यासारख दिसत. त्या रेषा तिरप्या जातील अस बघा. या फोटोमधल ते लाकडाच कुंपण तिरक्या रेषांमुळे फ्रेम विभागात नाहीये बघा




पण यातही मेख अशी कि क्षितीज रेषा नेहेमी समांतर ठेवावी नाहीतर फोटो अगदी पडल्यासारखा दिसतो. बघाना खालच्या फोटोतला समुद्र कसा पडेल असा वाटतंय ना.

आणि हा आकाश कंदिलाचा फोटो. मधोमध असलेला कंदील फारसा सुंदर नाही वाटत पण तोच वेगळ्या प्रकारे काढलेला फोटो त्या कंदिलाच्या शेपटाची मनमोहक हालचाल दाखवतो.





"गिव्ह मी सम स्पेस - प्रत्येक विषयाला त्याचा एक अवकाश द्या "
कोणाचा बाजूने फोटो काढलात आणि अगदी फ्रेम मध्ये पूर्ण भरून टाकलत तर त्या सब्जेक्टजी नजर फोटोच्या बाहेर जाते. म्हणजे तो फोटोच्या बाहेर बघतोय अस वाटायला लागत. मग तुमचा फोटो पाहणाऱ्याची नजर सुद्धा आपसूकच फ्रेमच्या बाहेर जाते आणि तुमच्या फोटो मधला इंटरेस्ट कमी होतो. असा बघणाऱ्याची नजर चौकटीच्या बाहेर नेणाऱ्या कलाकृती म्हणून मान्यता पावत नाहीत. तुमचा फोटो असा असला पाहिजे कि बघणाऱ्याची नजर त्या चौकटीच्या आत अगदी बांधली गेली पाहिजे. चौकटीच्या कडाकडूनही नजर वारंवार मुख्य फोकस बिंदू कडे वळली पाहिजे.
म्हणून डोळ्यांच्या समोर जिथे तुमचा सब्जेक्ट बघतोय तिथे एक मोकळ अवकाश ठेवा. हे अवकाशच त्या फोटोला आणखी पूर्णता देईल.
या बालभिक्षुच्या फोटोमध्ये त्याच्या चेहेऱ्यासमोर एक स्पेस आहे मोकळे अवकाश आहे. त्यामुळे वारंवार त्याच्या चेहेऱ्याकडे नजर जाते. खरतरं त्याच ते लाल वस्त्र जास्त आकर्षक आहे. तरीही त्याचा चेहेरा हाच मुख्य फोकस पोईंट ठरतोय फोटोमध्ये.













"नसलेली चौकट निर्माण करा."

काही काही वेळा मुद्दाम चौकटी'सदृश्य आकार दाखवावे लागतात. त्यामुळे फोटोची एक बंदिस्त चौकट दिसते. आणि ती बघणाऱ्याला आपल्या फोटोमध्ये अगदी बांधून ठेवते. त्याची नजर फोटोच्या बाहेर जाऊ न देता परत परत फोटोच्या मुख्य भागात फिरत राहील अशी व्यवस्था करते. खालच्या या फोटो बघा या झाडाचे खोड व फांदी हे चौकटीचे काम करतंय. आणि त्यामुळे नजर फोटोत फिरत रहाते.




तर या अशा काही गोष्टी कदाचित तुम्हाला उपयोगी पडतील. यातले बदल केल्याने तुमच्या फोटोंना दाद मिळाली तर मला जरूर सांगायला या.
Posted by Swapnali Mathkar at 10:09 AM 5 comments
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: कॅमेरा, फोटोग्राफी

Wednesday, June 16, 2010

फोटोग्राफी : कॅमेरा खरेदी

अग मी दोन आठवड्यांनी स्कीइंगला जाणार आहे. मला कॅमेरा घ्यायचाय. चलशील का माझ्या बरोबर?
२ महिन्यापूर्वीच जपान मध्ये आलेला माझा एक ऑफिसमधला एक सहकारी विचारात होता.
कॅमेऱ्याच्या दुकानात जायच म्हटल्यावर मी एका पायावर तय्यार. तरी त्याला एकदा विचारलं कसला कॅमेरा घ्यायचा विचार करतोयस. माझ्या अपेक्षेप्रमाणे तो डीजीकॅम घेईल असे वाटले मला होते.
आता एसेलारच घेईन म्हणतो.एसेलारने कसले छान फोटो येतात. बाकी कॅमेऱ्याना काही मजा नाही.
आतापर्यंत कुठलाच कॅमेरा कधीही न वापरता त्याच अगदी ठाम  मत होत. मी त्याला पॉईंट एन्ड शूट किंवा  डीजीकॅम कडे वळवायचा केविलवाणा प्रयत्न फुकटच गेला.
दुसऱ्या दिवशी आम्ही लंच टाईममध्ये बिक कॅमेरा म्हणून एका मोठ्या दुकाना जाऊन कॅननचा डिजीटल एस एल आर घेऊन आलो.
त्याच्या पुढच्या आठवड्यात एक दिवस ऑफिस मध्ये जरा कॅमेरा शिकवणी पण करून झाली. नंतर तो स्कीइंगला जाऊन वैगेरे आला.
परत ऑफिसला आल्यावर त्याला फोटोबद्दल विचारलं तर अगदी वैतागलेला.
अग कसल काय सगळे फोटो नुसते गडद आलेत. आणि माझा एकपण फोटो नाहीये त्यात.
अरे मग काढायला द्यायच ना कोणालातरी म्हणजे तुझा फोटो पण आला असता. इति मी
हो ना पण तो नवीन कॅमेरा कोणालाच धड माहीत नाही कसा वापरायचा तो, मग नाहीच काढले फोटो. परत तो गळ्यात अडकवून मला  स्कीइंग पण करता येईना. शेवटी ठेवूनच दिला बेगेत.
माझ्या अगदी मनात येऊन सुद्धा आधीच वैतागलेल्या त्याला "तरी मी तुला सांगत होते..." प्रकारचा डायलॉग मारून अजून त्रस्त केला नाही. फार जवळचा मित्र असता तर अशी संधी अजिबात सोडली नसती हे हि खरं.
याच मित्राने आणखी तीन चार वेळा तो कॅमेरा कुठे कुठे घेऊन जायचा प्रयत्न केला. याच्या आवडी भन्नाट होत्या ट्रेकिंग, कयाकिंग, हायकिंग वैगेरे. प्रत्येक ठिकाणी त्याला तो कॅमेरा म्हणजे गळ्यात लोढणच वाटल. शेवटी त्याने एक छोटासा  डीजीकॅम घेतला जो आता त्याच्या स्पोर्ट्स मध्ये त्याला साथ देतो.   

पण हे बऱ्याच वेळा घडत कि नाही? आपल्याला कुठेतरी नवीन ठिकाणी जायचं असतं आणि अगदी शेवटच्या क्षणी आपण कॅमेरा खरेदी करतो. मग कॅमेरा वापरायचा माहीत नसला तर मनस्ताप होतो, नवीन ठिकाणाचे धड फोटोही येत नाहीत आणि वर स्कीइंग वैगेरे सारख्या गोष्टीमध्ये तर त्याची अडचणच होते.
कपडे विकत घेताना पण आपण बघतो ना आपल्याला काय शोभेल? काय वापरता येईल? मग कॅमेरा खरेदी करताना सुद्धा या गोष्टी बघायला नको का? आता माझ्या सांगण्याचा उद्देश एस एल आर कॅमेरा घेऊ नये असा नाहीये. तर आपल्याला वापरता येईल असा सुयोग्य कॅमेरा घ्यावा असा आहे.
म्हणजे या माझ्या मित्रासारख जर तुम्हाला कुठे नवीन ठिकाणी नवीन गोष्ट स्पोर्ट्स इ. करायला जायचं असेल तर तेव्हा नवीन एस एल आर कॅमेरा घेऊन जाऊन निराशाच पदरी येणार. त्यापेक्षा मग डीजीकॅम घेतलेला केव्हाही चांगला.
तुमची मुळात जर फोटोग्राफीची आवड नसेल तर एक कॅमेरा त्याच्या लेन्स, आणि अजून जे काय साहित्य लागत ते सगळ घेऊन प्रवास करणे हायकिंग करणे हा एक त्रास होऊन बसतो.
म्हणून कॅमेरा घ्यायचा ठरवताय मग जरा या बाबींकडे लक्ष द्या

तुमच्या कडे कॅमेरा कधीच नव्हता आणि आता पहिल्यांदाच घ्यायचाय
मग साधा फिल्मचा पॉईंट एन्ड शूट कॅमेरा सुद्धा चालेल. कोणत्याही घरगुती प्रसंगाचे ट्रीपचे फोटो नीट काढता येतात वापरायला सोपा एकदम. फिल्म असल्याने फोटो काढून झाले कि फिल्म डेव्हेलेप्मेंटला स्टुडीयोमध्ये दिली कि काम झालं.
तुम्हाला कॉम्प्युटर वापरता येत नसला तर फिल्मवाला कॅमेरा उत्तमच.फक्त फिल्मवाला कॅमेरामध्ये काढलेले फोटो डेव्हेलप झाल्याशिवाय कसे आलेत ते कळत नाही.
डीजीकॅम सुद्धा  पॉईंट एन्ड शूट भागातच येतो. पण डीजीकॅम घेतलात तर तुमच्याकडे कॉम्प्युटर असणे आणि तो नीट वापरता येणे जरुरीचे आहे. डीजीकॅम मध्ये काढलेले फोटो मागेच डीजीकॅमच्या स्क्रीन वर बघता येतात हा सगळ्यात महत्वाचा फायदा. नवीन डीजीकॅममध्ये बरयाच सोई पण असतात. म्हणजे टच स्क्रीन, ओटो फोकस,ऑतो फ्लाश इ. बरेच काही.
Canon Cybershot,Sony ixy, Nikon Coolpix, Casio  यातले नवीन मॉडेल बघुन घेता येईल. घेताना जरा  मेमरी कार्डकडे लक्ष द्या. सोनी साठी स्पेशल कार्ड लागतात ते महाग असतात. बटरीकडे लक्ष द्या, काही काही मध्ये आपले पेन्सिल सेल पण चालतात. त्याना वेगळा चार्जर लागत नाही.  
अजून वरच्या ऑप्शन मध्ये एस एल आर लाईक कॅमेरा पण येतो. हा एस एल आर सारखा दिसतो. पण याच्या लेन्स बदलता येन नाहीत. हलका असतो. तरीही याची रेंज बरीच असते म्हणजे जवळचे लांबचे असे फोटो काढता येतात (10X zoom, 18x zoom etc). हे कॅमेरे जरा महाग असतात.
यातहि बरीच नवीन मॉंडेल असतात याची काही उदाहरणे म्हणजे Panasonic Lumix, Panasonic FZ,Canon S5 IS,Canon PowerShot, Nikon P80,Sony H50,Olympus SP-590

तुमच्या कडे पॉईंट एन्ड शूट कॅमेरा आहेच पण एक एस एल आर पण घ्यायचाय, असाच केव्हातरी वापरायला.
नक्की घ्याच कारण हौसेला मोल नसत. एस एल आर कि डिजीटल एस एल आर हे सर्वस्वी तुमच्या कॉम्प्युटर वापरता येण्यावर,आणि बजेटवर अवलंबून आहे. कॅनन कि निकॉन हा वादहि व्यर्थ आहे. दोन्ही मध्ये चांगले कॅमेरे आहेत आणि लेन्स पण आहेत तुम्ही शक्यतो कंझ्युमर सिरीज# मधले कॅमेरे बघा. हे सगळ्यात स्वस्त रेंज मध्ये उपलब्ध असतात.  कंझ्युमर सिरीजमध्ये कॅमेऱ्याबरोबर एक लेन्सहि किट मध्ये असते त्यामुळे खरेदी सोपी आणि स्वस्त पडते.
साधारण कॅनन नवीन मॉडेल अशी आहेत  canon EOS 350D /EOS Rebel(अमेरिकन मॉडेल )/EOS Kiss(जपान मॉडेल), EOS 300X, EOS 1000D
निकॉन Nikon F आणि Nikon D सिरीज मध्येपण बरेच आहेत Nikon F6,Nikon F75,Nikon D3000,Nikon D60

तुमची मुळ आवड फोटोग्राफी नाही पण कॅमेरा तुमच्या छंदामध्ये उपयोगी आहे
ट्रेकिंग, कयाकिंग, हायकिंग अस काही छंद असेल तर डीजीकॅम बेस्ट आहे. तो इतका लहान असतो ती बाळगण्याचा त्रास होत नाही.
पण जर झूम वैगेरे हवे असेल तर वर सांगितलेल्या प्रमाणे एस एल आर लाईक कॅमेरा घेता येईल. हलका असल्याने नेणे खूप त्रासाचे नाहीये, आणी लेन्सचा पसारा पण न्यायला लागत नाही.  


तुम्हाला फोटोग्राफीची खूप हौस आहे आणि फोटोग्राफी शिकायची आहे. सध्याचा पॉईंट एन्ड शूट ने क्रिएटिव्ह फोटोग्राफी करता येत नाहीये.
तुमच्याकडे जर आधीच एक एस एल आर असेल तर तुम्हाला सुरुवातीला काहीही घ्यायची गरज नाही.
नसेल तर मात्र आधी बजेट ठरवा. जर ते खूप कमी असेल तर फिल्म एस एल आर घेणे उत्तम. काही जुने मॉंडेलचे पूर्ण मेकॅनिकल कॅमेरे खुप स्वस्त मिळू शकतात. यात सगळे कंट्रोल तुम्हालाच ठरवायला लागतात यामुळे सुरुवातीला चांगले फोटो येणे जड जाते. फोटोग्राफीची खरच आवड आणि लाईट, शटरस्पीड याबद्दल खूप काही शिकावं लागत पण जे शिकाल ते अगदी पक्क होऊन जाईल.
मी जवळपास अकरा वर्षापुर्वी याच वळणावर होते. मला तस यात काही सांगणार कोणीच नव्हत. पण मी ठरवल होत कि नोकरी लागल्यावर जेव्हा एका महिन्याच्या पगारात कॅमेरा बसेल एवढा पगार होईल तेव्हा एस एल आर घ्यायचाच. आयटी भाग्यामुळे तो योग लगेचच आला. पण त्यावेळी इंटरनेटवर शोधणे वगेरे काहीच धड माहित नव्हते. मी आणि चुलत दादा दोघ मिळून बॉम्बेसेंट्रललं गेलो पैसे घेऊन. एका दुकानात जाऊन त्याने जे दोन चार कॅमेरे दाखवले त्यातला एक घेऊन आलो. तो कॅननचा होता. मी बहुतेक इतक्या मठ्ठपणे कॅमेरा घेतला कि त्या दुकानदाराला मी अगदी लक्षात राहिले. १०वर्षानी माझा लहान भाऊ त्याच दुकाना गेल्यावर नावावरून त्याने ओळखले आणि भावाला विचारले होते कि तुमच्या बहिणीने इथूनच घेतला होता न कॅमेरा!    
मी घेतलेला ऑटो आणि मन्युअल दोन्ही मोड वाला होता. आता जवळपास सगळे एस एल आर कॅमेरे असेच असतात. यामुळे अगदी काही येत नसेल तरी ऑटो मोड मध्ये फोटो काढता येतात. पण असा केला तर खरतर यात आणि पॉईंट एन्ड शूट मध्ये मग फार फरक रहातच नाही.
फिल्म कॅमेऱ्याचा एक तोटा असा कि फिल्म डेव्हलपमेंटचा खर्च, आणि ठेवायची जागा. मी फिरायला गेल्यावर इतके फोटो काढायचे कि प्रत्येक ट्रीपवरून आल कि ५/६ रोल असायचेच. ते घरात ठेवायला जागा पण होईना.
सहसा या वेळी जो कॅमेरा घेतला जातो तोच ब्रांड नंतरहि वापरण चालू राहत. कारण त्या अनुषंगाने आपण इतर लेन्स इ. हळूहळू खरेदी करतोच. त्यामुळे तुमचा काही चोइस असा असेलच तर त्या कंपनीचा घ्या. पण जर पुढे तुम्हाला काही स्पेशालिटी करावीशी वाटली तर ब्रांड बदलताही येतो त्यामुळे खूप काळजी करून नका.
बजेट जास्त असेल तर डिजीटल एस एल आर घेता येईल    
Nikon D3000,Nikon D90, Nikon D6,
canon EOS 20D, 30D, 40D, 5D, 350D 
असे बरेच ऑप्शन आहेत आणि दरवर्षी नवीन येत असतात.

डिजीटल एस एल आर घेताना लक्षात ठेवायची एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही फोटो काढलेत कि ते कॉम्प्युटरवर डाउनलोड करावे लागतात. त्यानंतर ते प्रोसेस म्हणजे  raw format मधून jpg मध्ये  convert  करावे लागतात.
हे त्रासदायक वाटत असेल तर  फोटो काढतानाच jpg काढण्याचा एक ऑप्शन असतो कॅमेऱ्या मध्ये तो चालू करून ठेवावा. 

तुमच्या कडे एक एस एल आर कॅमेरा आहेच पण आता अपग्रेड करायचाय
इथे मात्र तुम्हाला बराच विचार करावा लागेल. सगळ्यात महत्वाच म्हणजे तुम्हाला अपग्रेड का करायचंय?
म्हणजे "माझ्या मित्राकडे हा नवीन कॅमेरा आहे त्याने मस्त येतात त्याचे फोटो. माझ्या कॅमेऱ्याने येत नाहीत म्हणून मला त्याच्याकडे असलेलाच कॅमेरा घ्यायचा आहे" अस काहीस वाटत असेल तर ते म्हणजे नाचता येईना... अस आहे.
जर तुम्हाला तुमचे फोटो चांगले येत नाहीत असे वाटत असेल तर कॅमेरा बदलून काहीच उपयोग नाही. कारण त्या नवीन कॅमेऱ्याच्या मागे उभे रहाणारे तुम्ही जुनेच असणार. त्यापेक्षा ते पैसे फोटोग्राफीच्या कोर्स किंवा पुस्तकांसाठी साठी घाला. तुमच नक्की कुठे चुकत ते माहिती करा.
जर तुम्हाला तुमच्या कॅमेर्यामधल्या त्रुटी जाणवायला लागल्यात आणि त्यामुळे फोटो काढताना अडचण होतेय असा वाटल कि मात्र बदलण गरजेच ठरत.अशा वेळी नवीन कॅमेरा म्हणजे नवीन बाजारात आलेल मॉंडेलच असेल असा नाही. तुमच्या गरजेला जे योग्य असेल ते  मॉंडेल घ्याव.
म्हणजे तुम्हाला  स्पोर्ट्स फोटोग्राफी आवडते आणि तुमच्याकडे कॅनन 10D आहे. छान फोटो येतात पण बऱ्याचवेळा नेमका हायलाईट निसटून जातोय कारण कॅमेरा एवढा चपळाईने (३ फ्रेम पर सेकंद) फोटो काढू देत नाही. मग तुम्हाला  ज्या कॅमेऱ्या मध्ये जास्त  फ्रेम पर सेकंद असतात असा कॅमेरा घेणे उपयुक्त ठरेल.   
किंवा तुम्हाला बर्ड फोटोग्राफी आवडते तुमच्या कडे एक निकॉन कॅमरा आहे. याने हि फोटो मस्त येतायेत. पण  तुमचा फोकस खूप वेळा बरोबर येत नाही. नीट फोकस राहिला तर अजून छान फोटो येतील अशा वेळी नवीन आलेला 51 point focus आणि  focus followup  वाला कॅमेरा घेण फायद्याच होईल.
अगदी तुम्हाला खांद्याला इजा झालीये आणि तुम्ही जड कॅमेरे उचलू शकत नाही अशावेळी वजनाने हलके असलेले कंझ्युमर कॅमेरा घेताना वाईट वाटू नये.
असे अपग्रेड करताना बहुतेकदा प्रोझ्युमर कॅमेरे# किंवा प्रोफेशनल कॅमेरे# मध्ये केले जाते. 
अजून एक अपग्रेड करायचं कारण म्हणजे डीजीटल वर्ल्ड मधले मेगापिक्सेल
बरेचजण या रेस मध्ये धावताहेत. नवीन १०मेगापिक्सेल कॅमेरा आला कि आधीचा ८चा सोडून तो घ्यायचा मग १२ चा आला कि परत बदलायचा. खरतर तुम्ही तुमचे फोटो कुठेही विकत नसाल, किंवा A4 पेक्षा मोठ प्रिंटहि काढत नसाल तर ८ मेगापिक्सेल च्या वर धावायची गरज नाहीये. या मेगापिक्सेल रेस आणि प्रिंट बद्दल पण सांगेनच मी नंतर केव्हातरी.

एस एल आर च्या पेक्षा अजून एक वेगळ जग सुद्धा आहे बर का. ते म्हणजे मिडीयम फॉर्मेट आणि लार्ज फॉर्मेट फोटोग्राफी. आपल्या  एस एल आर  च्या निगेटिव्ह किंवा सेन्सर ची साईज ३५मिमि अशी (खरतर 24x36mm) म्हटली जाते. मिडीयम फॉर्मेट ची फिल्म साईज असते 4x5इंचापेक्षा कमी पण ३५मिमि पेक्षा जास्त.  तर या लार्ज फॉर्मेट ची फिल्म साईज असते 4x5इंच किंवा 8x10इंच किंवा मोठीच. 
मोठे मोठ बिलबोर्ड, जाहिराती यासाठी लार्ज फॉर्मेट फोटोग्राफी वापराली जाते पण याविषयावर अजून काही माहिती देण्याची माझी अजूनतरी पात्रता नाहीये. हा एक फॉर्मेट मला पण हाताळून बघायचाय कधीतरी.

आता हे एवढ लिहण्याने तुमच्या ज्ञानात भर पडली कि गोंधळात ते माहीत नाही. पण हि माहिती कुठेतरी, कोणालातरी उपयोगी होईल हि अपेक्षा.
कुठलाही कॅमेरा घ्या,पण तो हातात आल्यावर पहिली गोष्ट कुठली कराल तर त्याचे manual किमान चार वेळा वाचून काढा. आगदि पाठ केलात तरी चालेल.
त्यानंतर काय कराल तर कॅमेऱ्याची सगळी बटन कुठे कुठे आहेत ते नीट बघा. हे इतक छान आलं पाहिजे कि अंधारात कॅमेरा हातात असेल तरी  न बघता नुसत हातांना कळल पाहिजे कुठच बटन कुठ आहे ते.

#कंझ्युमर कॅमेरा म्हणजे जे सगळे सहज वापरू शकतील, वजनाला हलके ( plastic body) कॅमेरे. यात सर्वसामान्य ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न असतो. सेन्सर साईज छोटा असतो त्याला APS-C किंवा Crop body (कॅमेर्याचा बोलीभाषेत )  अस पण म्हणतात. (या सेन्सर साईज बद्दल पुन्हा केव्हातरी लिहेन)  
#प्रोझ्युमर कॅमेरा म्हणजे ज्यांना फोटोग्राफीची खूप हौस आहे थोडीफार फोटोग्राफीची येतेही. हे अगदीच नवशिके नसतात अशांसाठी असलेले कॅमेरे. यातले कॅमेरे जड  Magnesium alloy body  असलेले, थोडफार weather sealing असलेले, सहसा जास्त  फ्रेम पर सेकंद असलेले असे असतात.फुल फ्रेम सेन्सर किंवा APS-C. किमतही जास्त असते.  
#प्रोफेशनल कॅमेरा म्हणजे ज्यांचा  फोटोग्राफी हाच व्यवसाय आहे त्यांच्यासाठीचे कॅमेरे. किमत खुपच जास्त असते. Magnesium alloy body, weather sealing असतेच. पण आणखी स्पेशालिटीसुद्धा असतात (vertical grip, १००% viewfinder, फुल फ्रेम सेन्सर ).
Posted by Swapnali Mathkar at 7:29 PM 3 comments
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: कॅमेरा, खरेदी, फोटोग्राफी

Friday, June 11, 2010

फोटोग्राफी: कॅमेर्‍याची काळजी भाग २


आपण कॅमेरा सर्वसाधारणपणे वापरतो तो पिकनिक किवा घरातले फोटो काढण्यासाठी. जेव्हा बाहेर कॅमेरा नेतो तेव्हा काही वेळा थोडी काळजी घेतली तर कॅमेऱ्याचे आयुष्य बऱ्यापैकी वाढते.
हि विशिष्ट काळजी घ्यायची ठिकाण म्हणजे समुद्रकिनारे, धबधबे, नदीकिनारे, वाळवंट / वाळू असलेले भाग,अतिशय थंड किवा अतिशय गरम ठिकाणे. हे म्हणजे जवळपास बऱ्याच पिकनिकच्या जागा.
तुम्ही नक्की म्हणत असाल कि मग काय कॅमेरा बाहेर न्यायलाच नको कि काय. पण जरा काही गोष्टी लक्षात ठेवल्या तरी पुरेत आपल्या कॅमेऱ्याची काळजी घ्यायला.
समुद्रकिनारे, नदीकिनारे , वाळवंट / वाळू असलेले भाग: 
इथे कॅमेऱ्याला खारट हवा, खारट पाणी आणी वाळू या तिन्ही गोष्टींचा सामना करायला लागतो. या तिन्ही गोष्टीं कॅमेऱ्यासाठी वाईटच.
वाळूमुळे कॅमेऱ्याच्या लेन्सला, सेन्सरला चरे पडू शकतात. हि बारीक वाळू अडकून कॅमेऱ्याच्या मेकॅनिझम मध्ये बिघाड होऊ शकतो. म्हणजे शटर अडकणे वैगरे होऊ शकते.
म्हणून कुठलाही कॅमेरा सरळ वाळूत खाली न ठेवणे हि अगदी महत्वाची गोष्ट. एस एल आर कॅमेरा असेल तर लेन्स बदलताना अगदी उघड्यावर आणी वाऱ्याच्या दिशेला उभ राहून न करता आडोसा बघुन वारा येणार नाही अशा ठिकाणी बदलावी. म्हणजे वाळूचे कण आत जाणार नाहीत. इथे लेन्स वर यूव्ही फिल्टर लावला तर चांगल म्हणजे लेन्सच्या पुढच्या भागावर चरे पडणार नाहीत.समुद्रकिनाऱ्यावरच्या फोटोग्राफी साठी आणखीही उपयोगी फिल्टर आहेत पण ते आपण नंतर केव्हातरी बघू. तो बराच मोठा विषय आहे.
शक्यतो कुठल्याही कॅमेऱ्यावर समुद्राचे पाणी उडू देऊ नये. उडले तर लगेच पुसून शक्यतो प्यायच पाणी मऊ कापडावर टाकून त्याने कॅमेरा हलकेच पुसून घ्यावा, मग क्लिनिंग लीक्विडने पुसावा. समुद्राचे पाणी खारट असल्याने ते सुकले कि क्षार (salts) जमा होतात.हे कॅमेऱ्यासाठी किवा इतर कुठल्याही इलेक्ट्रोनिक वस्तूंसाठी अतिशय खराब.
पण समजा तुमचा कॅमेरा समुद्राच्या पाण्यात अगदी पडलाच आणि अगदी पूर्ण बुडालाच तर काय कराल? सगळ्यात आधी उचलून घाईने जमेल तितक्या लवकर त्याची बॅटरी काढून टाका. मग त्याला तसाच नेऊन अजिबात न सुकवता साध्या पाण्यात बुडवा नाहीतर नळाखाली धरा (पाण्याची धार हळू ठेवा). साध्या पाण्याने सगळे क्षार निघून जातील. नंतर तो कॅमेरा स्वच्छ मऊ कापडाने पुसून कोरडा करा. लेन्स काढून आत पाणी गेलय का ते पण बघा. आत असलेल पाणीसुद्धा पुसा पण सेन्सर किंवा शटरला हात आणि कापड लावू नका. कापडाचे सूक्ष्म धागे सेन्सरला चिकटतात आणि शटर मध्ये अडकू शकता. मग कॅमेरा कॅप लावून कोरडा करायला ठेवा. चालू करून बघायची अजिबात घाई करू नका निदान चार पाच दिवस तरी. एवढे झाले कि, लवकरात लवकर (अगदी त्याच दिवशी वैगेरे गेलं नाहीत तरी चालेल, ट्रीपवरून घरी गेलात कि मग गेलात तरी चालेल) सर्विस सेंटर मध्ये घेऊन जा. कॅमेरा चालू झाला असला तरी एकदा चेक करून घ्या.
धबधबे , बोटिंग करताना: 
धबधब्याजवळ जाताना, किंवा बोटिंग करताना एकदोन साध्या प्लेस्टिकच्या पिशव्या नक्की जवळ बाळगा. पिशवीला खालच्या बंद टोकाला एक मोठ भोक पाडा, ज्यातून लेन्सचा पुढचा भाग जरासा बाहेर येईल. मग कॅमेरा पिशवीत घालून भोकातून लेन्सचा काही बाहेर काढा. आता पिशवीच्या मोकळ्या भागातून तुम्हाला व्ह्यू फाईंडर दिसेल, पण कॅमेऱ्यावर पटकन पाणी पडणार नाही. (फोटो खाली दिले अाहेत.)
अशाच प्रकारे अगदी हलक्या पावसात किंवा डोंगरांवर ढगांतून चालतानापण अशी पिशवी वापरता येते.
इथेही कॅमेरा ओल्याजागी वैगरे ठेवू नका.
पिशवीला खालच्या बंद टोकाला एक मोठ भोक पाडा / कापा.

कॅमेरा पिशवीत घालून भोकातून लेन्सचा काही बाहेर काढा.
पिशवीच्या मोकळ्या भागातून तुम्हाला व्ह्यू फाईंडर दिसेल.

अतिशय थंड ठिकाणे:
म्हणजे अगदी बर्फ असणारी ठिकाणे. या ठिकाणी सहसा बॅटरी लवकर संपते म्हणून जास्तीची बॅटरी किंवा चार्जर घेऊन जायला हवाच.
पुन्हा अशा ठिकाणी जी रेस्टोरंट वैगेरे असतात तिथे हिटर लावून अगदी उबदार केलं असतं.तुम्ही बाहेर फोटो काढलेत आणि तसाच हातात कॅमेरा धरून आत गेलात कि कॅमेऱ्यावर बाष्पं (Condensation) जमतं. आणि काच धुसर दिसायला लागते. हे बाष्प कॅमेऱ्याच्या आतल्या बाजूलापण जमू शकत. त्यामुळे कॅमेरा खराब होऊ शकतो किंवा तात्पुरता बंद पडू शकतो. लेन्स वरच बाष्प पुसल तरी थोडावेळ थांब्ल्यावरच कमी होतं.
हे होऊ नये म्हणूनपण एकदोन साध्या प्लेस्टिकच्या पिशव्या ठेवाव्या. तुम्ही आत जायच्या आधीच कॅमेरा या पिशवीत ठेवून पिशवी बंद करून मग आत जावे. यामुळे कॅमेऱ्यावर बाष्पं जमत नाही.
अतिशय गरम ठिकाणे: 
या अशा ठिकाणीही बॅटरी लवकर संपते म्हणून जास्तीची बॅटरी किंवा चार्जर घेऊन जायला हवाच.
तुम्ही सगळ्यांनीच लहानपणी भिंगाने कापूस जाळायचा प्रयोग केला असाल. कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये अशी अनेक भिंगे एकत्र ठेवलेली असतात. त्यामुळे बाहेर उन्हात तसाच ठेवणार असलात तर लेन्स काढून / कॅप लावून ठेवा. नाहीतर आत ऊन जाऊन शटर / सेन्सर अति उष्णतेने जळू किंवा खराब होऊ शकतो. कॅमेऱ्यावर टॉवेल वैगेरे झाकलात तरी बर होईल.
फोटो काढत नसाल तेव्हा कॅमेरा बॅगेत ठेवा.
फोटो काढताना स्वत: शक्यतो एखादी कॅप घाला. यामुळे तुम्ही कॅमेऱ्यातून बघताना व्ह्यू फाईंडरवर किंवा डिजीटल कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर सावली पडेल आणि दृश्य नीट दिसेल.
आता कॅमेरा प्रवासातून नेण्याबद्द्ल एक दोन गोष्टी:
शक्यतो कॅमेऱ्यासाठी असलेली बॅग वापरा. याला नीट कुशानिंग असते.
खूप लांबचा किंवा खराब रस्त्यांवरचा प्रवास असेल तर एसएलआर कॅमेऱ्याची लेन्स काढून, लेन्स आणि कॅमेर्याला कॅप लावून वेगळी ठेवा. खूप हलल्यामुळे किंवा धक्के बसल्याने कॅमेरा ते लेन्सची जोडणी (camera mount) खराब होऊ शकते. किंवा बॅग खूप आपटली तर कॅमेऱ्याला लावलेली लेन्स तुटू सुद्धा शकते.
चेक इन बॅगेत कॅमेरा टाकू नका. डीजीकॅम वैगेरे छोटे कॅमेरे चालतील पण एसएलआर नाही.
क्लिनिंग किट,ब्लोअर नेहेमी जवळ ठेवा.
Posted by Swapnali Mathkar at 4:52 AM 0 comments
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: कॅमेरा, कॅमेर्‍याची काळजी, फोटोग्राफी

Wednesday, June 9, 2010

फोटोग्राफी: कॅमेर्‍याची काळजी


अग मला अगदी भुताटकी झाल्यासारख वाटतय.
का ग?
हे बघ ना परवाच्या पिकनिकचे फोटो. बहुतेक फोटोत हे कायतरी लांबट काळपट काय दिसतेय तेच काळात नाहीये. आणी हे दिवसाचे भूत आहे कि काय कोण जाणे. रात्रीच्या फोटोत काही प्रोब्लेम नाहीये.
************
आपल्या पैकी बऱ्याच जणांकडे कॅमेरा असेल. असेल म्हणजे असणारच. अगदी एस एल आर (SLR Single Lens Reflect Camera) नसला तरी पॉइंट एंड शूट वाला डिजीटल किंवा फिल्मवाला तरी नक्कीच. कॅमेरा खरतर किती नेहेमी वापरला जातो. पण त्याच्या साफ सफाई कडे फारसे लक्ष दिले जातेच असे नाही. मग एक दीवस केव्हातरी फोटोवर ठिपके डाग दिसायला लागतात. कधीकधितर अगम्य असे अजून काय काय फोटोत दिसायला लागते. भुताटकी कि काय असा वाटायला लागत. आणि मग हे असे वरचे संवाद झडतात.
हि सगळी किमया बहुतेकवेळा कॅमेरा साफ नसल्यालेच घडलेली असते. तुमच्या घरातल्या फर्निचरवर जशी धूळ बसते तशीच ती कॅमेऱ्यावर पण बसते. पण कॅमेऱ्यावर आणखीही इतर गोष्टींचा परिणाम होतो.
मग आपला कॅमेरा कसा बर नीट ठेवायचा?
तुमचा पॉइंट एंड शूट (बघून नुसते बटन दाबायचा) कॅमेरा असेल तर काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्यात तरी पुरे आहेत.
पण एस एल आर किंवा एस एल आर लाईक कॅमेरा असेल तर मात्र बरीच काळजी घेण आवश्यक आहे. अशी काळजी घेऊन भुताटकी नक्कीच थांबवता येईल आणि तुमचे फोटोपण चांगले येत रहातील.
कॅमेराची लेन्स हि बऱ्याच प्रकारची भिंगं एकत्र जुळवून बनवली असते. प्रकाश नीट आणि हवा तेवढाच कॅमेरात जावा यासाठी लेन्सवर खूप केमिकल आवरणाचा मुलामा (coating) असतो. खराब वापरण्याने, कसेही पुसण्याने ते खराब होतं आणि फोटोंची प्रत खराब होते.
त्यामुळे कॅमेराची काळजी घेताना, वापरताना काही सावधानता बाळगायला हवी.
धूळ आणि तत्सम:
कॅमेरा गळ्यात घालून फिरताना त्यावर धूळ हि बसणारच. नको असेल त्यावेळी लेन्स कव्हर लाऊन ठेवणे. कॅमेरा कसाही कुठेही खाली न ठेवणे या गोष्टी गरजेच्या आहेत.
तरीही लेन्स च्या पुढच्या भागावर बारीक कण तंतू इत्यादी बसताच आणि ते काढणं फारच सोपं. नुसत्या ब्लोअर (हवेचा हातांना दाबता येणारा छोटा पंप) ने ती काढता येते.
पण कॅमेरात आतमध्येहि बऱ्याच वेळा धूळ जाते. हे कस कळतं तर तुमच्या फोटोमध्ये धुसर ठिपके दिसतात. डिजीटल फोटो असेल तर कॉम्पुटर स्क्रीन वर फोटो एकदम मोठा करून सगळी कडे बघितलत तर सगळ्या फोटोत ठराविक ठिकाणी हेच धुसर डाग दिसतात.
अशा वेळी सहसा कॅमेऱ्याची लेन्स काढावि. कॅमेरा मेन्यू मधे मिरर लॉक अशा प्रकारचा एक ऑप्शन असतो. त्याने मिरर लॉक करावा. (कॅमेरा मन्युअल नीट वाचले तर याची नक्की माहिति मिळेल.) मिरर लॉक केले की सेन्सर दिसतो. मग कॅमेरा उलटा करुन म्हणजे सेन्सरचा (डिजीटल कॅमेऱ्याचा) भाग जमिनी कडे करून हळुवार पणे ब्लोअरने फुंकून टाकावी. हे करताना अगदी हळुवार पणे करणे नाहीतर सेन्सर खराब होऊ शकतो. एवढ्या एका उपायाने पण बराच फरक पडेल. कुठ्ल्याहि परिस्थितीत डिजिट्ल कॅमेर्‍याच्या सेन्सरला हात लाउ नये. ब्लोअर कॅमेर्‍याच्या अगदि आतल्या भागात पण नेऊ नये. शक्य तितका बाहेर ठेवावा. मिरर अचानक बंद झाल्यास ब्लोअरवर आपटुन मिरर खराब होइल. 
ब्लोअर म्हणून एअर डस्टर जे मिळत ते अजिबात वापरू नये.त्याने सेन्सर दुरुस्त न होण्याइतके खराब होईल. ते कॉम्प्युटर वैगेरे साठिच असते.
कधी कधी लेन्स च्या पुढच्या भागावर बारीक कण तंतू अस काहीतरी चिकटून बसत. त्या साठी मात्र कॅमेऱ्याच क्लिनिंग लिक्विड मिळत ते वापरावं. कॅमेऱ्याच क्लिनिंग किट मध्ये हे लिक्विड, एक कापड किंवा क्लिनिंग पेपर मिळतात तेच वापरावे. इतर कोणत्याही कापडाने लेन्स वर चरे, ओरखडे पडण्याची दाट शक्यता असते
तर हे लिक्विड टाकून त्या कापडाने हळुवार गोलाकार हात फिरवत लेन्स पुसून काढावी. जास्त जोरात न केलेले उत्तम.
काहीवेळा जर लेन्स बऱ्याच वेळा बदलत असाल तर कधी कधी लेन्स आणि कॅमेरा जिथे जुळतात (lens mount) तिथे कचरा जमू शकतो. किवा तळहाताचे तेल, घाम त्या जोडणीच्या (joints) ठिकाणी जमू शकते.
यामुळे कॅमेरा कधीकधी लेन्स लावून सुद्धा लावलेली नाही असा संदेश देतो (lens not detected) किंवा फोटो काढता काढता कॅमेरा बंद पडू शकतो. यावर उपाय म्हणजे हात स्वच्छ करून मगच लेन्स बदलणे. आणि खूप वाऱ्याच्या, धुळीच्या ठीकाणी शक्यतो लेन्स न बदलणे.
तरीहि अस झालच तर त्याच क्लिनिंग लिक्विड आणि कापडाने हे जोडणीचे भाग हळुवार साफ करायचे. हे पण अगदी हळुवार करणे गरजेचे आहे. त्या भागांवर सोन्याचा मुलामा असतो तो निघाला किंवा त्यावर चरे पडले तर लेन्स कॅमेऱ्याला नीट जोडली जाणार नाही.
फंगस अर्थात बुरशी:
आश्चर्य वाटल का? पण हा खूपवेळा दिसणारा प्रकार आहे. मुळात बुरशी येते कशी तर हवेतून. हवेत बुरशीची ण दिसणारी बीजं तरंगत असतातच. ती बीजं ओलसर ठिकाणी पडली कि त्याची वाढ होते आणि बुरशी दिसायला लागते. म्हणून कॅमेरातही ती हवेतूनच येते. कॅमेरा किंवा लेन्स च्या आतल्या वाजुला आली असेल तर साफ करणे महा त्रासाचे असते. इंटरनेट वर बुरशी साफ करायचे बरेच उपाय सापडतीलाही पण ती माहितगार माणसाकडून किंवा सर्विस सेंटर कडून साफ करून घेणे चांगले.
बुरशी आलीये हे कस कळतं तर कॅमेरयामध्ये किंवा लेन्स मध्ये पांढरट पिवळट तंतू सारखे काहीतरी दिसायला लागते. नीट बघितल तर त्याला अतिशय सूक्ष्म आडवे आडवे तंतू पण दिसतात. ती अगदी घट्ट काचेला किंवा लेन्सला चिकटलेली असते. फोटोत पण भुताटकी दिसायला लागते. काळपट , रात्रीच्या फोटोत जाणवून येत नाही. पण दिवसाचे , निळ्या आकाशाच्या फोटोमध्ये लगेचच दिसते.
बहुतेक वेळा हि आल्यावर उपाययोजना करण्यापेक्षा येउ नये म्हणून प्रतिबंध करणे उत्तम.
सगळ्यात सोपा आणि बिन खर्चाचा उपाय म्हणजे कॅमेरा नेहेमी वापरत असावा. खूप दिवस बंद करून ठेवलेल्या कॅमेऱ्यात बुरशी होण्याची शक्यता जास्त असते. अगदी फोटो काढायचे नसेल तरी महिन्यातून एकदा नुसताच बाहेर काढून काही क्लिक कराव्या.
बुरशी वाढते ओलाव्यावर. म्हणून कॅमेरा ठेवल्याजागी ओलसरपणा दमटपणा नसावा. कॅमेऱ्याची बग ओली झाल्यास चांगली वाळवून मगच वापरावी. खाण्याचे पदार्थ असलेल्या बॅगेमध्ये कॅमेरा ठेवू नये.
आर्द्रता (humidity) नियंत्रित ठेवण्यासाठी कपाटे (cellar) मिळतात. पण ती फार महाग असतात.बरेच कॅमेरे आणि लेन्स असतील तर ठीक आहे.
पण इतरहि काही उपाय आहेत आर्द्रता कमी करण्यासाठी.
कॅमेरा बंद कपाटात ठेवून ज्या कप्प्यात ठेवला असेल तिथे एक बल्ब लावून ठेवायचा. यामुळे कप्पा गरम राहातो व आर्द्रता कमी होऊ शकते.
कॅमेऱ्याच्या दुकानात एक सिलिका जेल (Silica gel) मिळते. नावात जेल म्हटल तरी ते खडे असतात. साधारणपणे निळसर झाक असलेले आणि पारदर्शक असतात. नवीन घेतलेल्या बुटात , लेदर पर्स मध्ये पण याच्या चिमुकल्या पुड्या असलेल्या तुम्ही बघितल्या असणार. तेच हे सिलिका जेल.
पण ते असे चिमुटभर आणून उपयोग नाही. बऱ्याच प्रमाणात आणून आणून एका कापडात पुरचुंडी बाधून या कप्प्यात ठेवायचं. हे जेल हवेतली आर्द्रता (humidity) शोषून घेतं. पाणी साठवून त्याचा रंग बदलतो आणि ते अपारदर्शक पांढरट अस होतं. अस झाल कि एकदिवस कडक उन्हात वाळवायाच. मग परत ते पहिल्यासारख पारदर्शक बनतं. याला जेल रिजनरेट / रिस्टोर म्हणतात. एकदा विकत घेतलेले जेल बराच काळ रिजनरेट करत अस वापरता येतं.
काही वेळा पांढर जेलपण मिळत. हे जेल रंग बदलत नाही पण त्याच्या वजनावरून त्याच्यात पाणी शोषलं गेलय कि नाही हे ठरवता येत. पाणी शोषलं गेल असेल तर त्याच वजन अर्थातच वाढतं.मग रिजनरेट केल्यावर वजन कमी होतं.
आणखी एक उपाय मी बऱ्याच वर्षापूर्वी ऐकलेला आठवतो. तो म्हणजे ओव्याची पुरचुंडी (कॅरोम सीड्स) कप्प्यात ठेवायची. ओव्यात असलेल्या कुठल्याशा द्रव्याने बुरशीची वाढ बंद होते म्हणे. पण मी हा उपाय कधी केलेला नाही. अजून पर्यंत तरी माझ्या कॅमेऱ्यात बुरशी झाली नाहीये. ज्याना बुरशीचा त्रास असेल त्यांनी करून मला नक्की सांगा काय होत ते.
बघा हे उपाय करून तुमच्या कॅमेऱ्यातल्या बुरशीला आणि धुळीला टाटा करता येतोय का!
अजुन काही गोष्टींबद्दल पुढच्या वेळेला लिहायचा प्रयत्न करेन.
Posted by Swapnali Mathkar at 4:49 AM 0 comments
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: कॅमेरा, कॅमेर्‍याची काळजी, फोटोग्राफी

Friday, June 4, 2010

प्रकाशरानातून चालताना...

प्रकाशरानातून जाताना
         हवे तसे चालत रहावे.
हवी तिथे चौकट आखुन
         प्रकाशाचे चित्र निर्मावे

प्रकाशाच्या या रानामध्ये
         अंधाराचीहि साथ असावी.
अंधाराशिवाय प्रकाशाला
         अर्थपूर्ण मिती नसावी



प्रकाशाची रानफुले
        क्षणाक्षणाला पहात जावी.
गंध नुसताच मनात भरून 
        फुलं चौकटीत बांधुन घ्यावी.


निळ्या सावळ्या ढगांनाही मग
        प्रकाशाची किनार यावी.
ढगांसकट पक्षांनाही 
        माझ्या चौकटीची ओढ लागावी.
Posted by Swapnali Mathkar at 5:47 PM 0 comments
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Newer Posts Home
Subscribe to: Posts (Atom)

Total Pageviews

Copyright Protected

All content is copyright protected. You are not authorized to use, copy any content in any way without written permission from the Auther, Swapnali Mathkar. ब्लॉग कॉपीराईट अधिकार सुरक्षित
कॉपीराईट: स्वप्नाली मठकर
Copyright: Swapnali Mathkar
MyFreeCopyright.com Registered & Protected

About Me

Swapnali Mathkar
View my complete profile

Followers

Archives

  • ▼  2025 (3)
    • ▼  March (3)
      • Tadoba Pench Safari - 10-March
      • Tadoba Pench Safari - 9th March
      • Tadoba Pench Safari Photos - 8th March
  • ►  2015 (8)
    • ►  October (1)
    • ►  September (1)
    • ►  March (1)
    • ►  January (5)
  • ►  2014 (11)
    • ►  December (1)
    • ►  November (1)
    • ►  July (1)
    • ►  March (3)
    • ►  January (5)
  • ►  2013 (6)
    • ►  December (1)
    • ►  November (4)
    • ►  August (1)
  • ►  2012 (5)
    • ►  December (1)
    • ►  November (2)
    • ►  June (1)
    • ►  May (1)
  • ►  2011 (11)
    • ►  December (1)
    • ►  October (3)
    • ►  August (1)
    • ►  June (3)
    • ►  May (2)
    • ►  January (1)
  • ►  2010 (11)
    • ►  December (1)
    • ►  November (1)
    • ►  October (1)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
    • ►  July (2)
    • ►  June (4)

Categories

'फ' फोटोचा (2) ११-मार्च-२०११ (1) २०१० दिवाळी अंक (1) 2011 (1) 2014 (1) A Bomb Dome (1) Ameka Creations (1) Apple (1) Atomic Bomb (1) baby blue-eyes (1) Binny Yanga (1) bokeh (1) camera (1) collarwali (1) depth of field (1) Diwali Ank (2) Diwali Ank 2011 (1) Diwali Ank 2012 (1) Diwali Ank 2014 (1) dustproof (1) europe (1) fa fotocha (2) Four Elements (1) freezproof (1) hiroshima (2) hitachinaka koen (2) ikebaana (1) ISO (1) itsukushima (1) Little Boy (1) megapixel war (1) miyajima (1) Motherhood redefined (1) Nemophila (1) Paris (1) Pench (1) Photography workshop (1) rome (1) Safari (1) Second world war (1) Selection for photography exhibition in UK (1) shockproof (1) Steve Jobs (1) Tadoba (3) The Photo Saga (1) Tigress (1) Tulip (1) waterproof (1) XUV500 (1) अणुउर्जा (1) अणुबॉम्ब (1) असम (5) अ‍ॅपर्चर (1) आटोमीक बॉम्ब डोम (1) आयएसओ (1) इकेबाना (1) इतिहास (1) इत्सुकुशिमा (1) उपग्रह (1) उपग्रह प्रक्षेपण यान (1) एस एल आर (2) कापसाची म्हातारी (1) कास पुष्प पठार (1) कुनीदेशातल्या कथा (1) कॅमेरा (9) कॅमेर्‍याच कार्य (1) कॅमेर्‍याची काळजी (2) खरेदी (1) जपान (1) जपानी कला (1) जागतिक महिला दिन (6) ट्युलिप (1) ठाणे महापौर पुरस्कार (1) ठाणे महापौर पुरस्कार २०१० (1) डस्टप्रुफ (1) डेफ्थ ऑफ फिल्ड (1) डॉ. अब्दुल कलाम (1) ड्रोसेरा इंडीका (1) तंत्रज्ञान (1) तमसो मा ज्योतिर्गमय (1) तोरी (1) त्सुनामी (1) द फोटो सागा २०१४ (1) दवबिंदू (1) दिवाळी अंक २०१३ (1) दिवाळीअंक (1) दिवाळीअंक 2012 (1) नभा सावर सावर (1) नविन वर्ष (1) नेताजी सुभाषचंद्र बोस (1) नेमोफिला (1) पश्चिमेकडुन पूर्वेकडे (1) पारितोषिक (1) पूर्वांचल (6) पॅरिस (1) प्रकाशचित्रे प्रदर्शन (1) प्रजासत्ताक दिन परेड (1) प्रदर्शन (1) प्रवास (1) फिल्टर (1) फुलांची रचना (1) फोटोग्राफी (9) फोटोग्राफी कार्यशाळा (1) फ्रिजप्रुफ (1) बालकथा (1) बोके (1) भटकंती (1) भुकंप (1) भुवनेश्वर (1) मदर्स ऑफ नॉर्थ ईस्ट (1) मरीन ड्राईव्ह (1) महायुद्ध (1) मियाजीमा (1) मॅग्निट्युड ९.० (1) मेगापिक्सेल वॉर (1) मेघालय (5) मोईराङ (1) रोम (1) लेखन (1) विद्युल्लता (1) विद्युल्लता प्रदर्शन (1) विद्युल्लता प्रदर्शन 2014 (4) विमर्श (1) वॉटरप्रुफ (1) शटरस्पीड (1) शिंगवाला उंदीर (1) शॉकप्रुफ (1) समाज (1) सॅटेलाईट (1) स्टीव्ह जॉब्स (1) स्लाईडशो (1) हिरोशिमा (2)
©प्रकाशरानातून चालताना... ©Swapnali Mathkar
© Template Design by Template Lite
Thanks to Blogger Templates | Converted to Blogger by Falcon Hive.com | Distributed by Deluxe Templates