Sunday, December 14, 2014

'फ फोटोचा' २०१४ आणि 'द फोटो सागा' २०१४ - प्रकाशन

नमस्कार,

फोटो सर्कल सोसायटी, ठाणे गेले दोन वर्ष फोटोग्राफीला वाहीलेला मराठी दिवाळी अंक 'फ फोटोचा' प्रकाशित करत आहे. २०१४ हे या दिवाळी अंकाचे तिसरे वर्ष. दरवर्षी या अंकाचे प्रकाशन ठाणे महापौर चषक स्पर्धेच्या बक्षिस समारंभाच्या दिवशी ठाणे महापौरांच्या हस्ते होते. ( यावर्षी निवडणुकांच्या कारणास्तव बक्षिस समारंभ उशिरा झाला आणि त्यामुळे या अंकाचे प्रकाशनही आम्ही दिवाळीत करु शकलो नाही, त्याबद्दल दिलगीर आहोत)

काल १४ डिसें रोजी ठाण्याच्या महापौरांच्या हस्ते 'फ फोटोचा' हा दिवाळी अंक प्रकाशित झाला आहे. या वर्षी एक वेगळा प्रयोग म्हणुन आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा अंक पोचावा म्हणुन हा अंक मराठी बरोबरच इंग्रजीमधेही प्रकाशित करण्यात आला.

इंग्रजीत अंक प्रकाशित करणे हे एक वेगळे आव्हान होते कारण ललित प्रकारच्या लेखांचे इंग्रजी अनुवाद कसे होतील याबद्दल थोडी शंका होती. इंग्रजी अंकाचे हे पहीलेच वर्ष असल्याने अंकात चुका राहुन गेल्या असतीलच, किंवा काही ठिकाणी अनुवाद योग्य वाटत नसेल. पण एक पहिला प्रयत्न म्हणुन वाचक नक्कीच दोन्ही अंक वाचुन त्यांच्या प्रतिक्रीया आमच्यापर्यंत पोहोचवतील याची खात्री आहे.

यावर्षी जेष्ठ इंडस्ट्रियल फोटोग्राफर हरी महिधर , प्रख्यात फॅशन फोटोग्राफर विक्रम बावा यांच्या मुलाखती, आयडीयाज्@वर्कचे प्रशांत गोडबोले, सिनेमॅटोग्राफर संदीप यादव यांची मनोगते, अतुल धामणकर, युवराज गुर्जर, बैजू पाटील, गिरपाटील, डॉ. सुधीर गायकवाड अशा प्रख्यात वन्यजीव प्रकाशचित्रकारांचे लेख आणि स्लाईड शोज, किशोर साळी, ज्योती राणे यांचे वेगळ्या प्रकारच्या प्रकाशचित्रण आणि कला यासंबधीचे लेख, वारी या विषयाचे स्वप्नील पवार आणि रेखा भिवंडीकर यांचे रेखलेले शब्दचित्र, सुभाष जिरंगे, अंकिता वनगे, मेघना शहा यांचे लेख, तन्मय शेंडे यांची अमेरिकेतील लँडस्केप्स, योगेश जगताप यांची लाहौलस्पिती येथील लँडस्केप्स, नंदिनी बोरकर यांची ऑस्ट्रेलीयावारी, स्वप्नाली मठकर यांचे फुजी पर्वताचे शब्दचित्र, संघमित्रा बेंडखळे यांनी साकारलेला मणिपुर येथील इमा बाजार, जॉयदिप मुखर्जी आणि सायली घोटीकर यांची स्ट्रीट फोटोग्राफी, इंद्रनील मुखर्जी यांचा फोटोजर्नालिझम मधील नितीमत्ता असा वेगळ्या विषयावरील लेख या अंकात वाचायला मिळतील.

यावर्षी फोटोग्राफी जगतातील तीन महत्वपूर्ण तारे निखळले. श्री. गोपाळ बोधे, श्री. अधिक शिरोडकर आणि श्री के. जी. महेश्वरी या तिन्ही दिग्गजांना श्रद्धांजली वाहणारे आणि त्यांच्या आठवणी सांगणारे बिभास आमोणकर, प्रविण देशपांडे आणि मिलिंद देशमुख यांचे लेखही या अंकात वाचता येतील.


मराठी दिवाळी अंक - फ फोटोचा
Marathi Magazine



इंग्रजी अंक - द फोटो सागा - इन्स्पायरींग स्टोरीज ऑफ मास्टर फोटोग्राफर्स
English Magazine


सर्व लेखकांचे, अंकाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हातभार लावणार्‍या प्रत्येकाचे आणि आमच्या वाचकांचेही मनःपूर्वक आभार.
वाचकांच्या पोचपावतीशिवाय अंक अपूर्ण आहे त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया इथे किंवा खालील लिंक वर नक्की द्या.
http://fotocirclesociety.com/fa-diwalianka.php


धन्यवाद,
स्वप्नाली मठकर
(कार्यकारी संपादक )

Monday, November 17, 2014

पश्चिमेकडुन पूर्वेकडे - ४००० किमीचा प्रवास - भाग १

पश्चिमेकडुन पूर्वेकडे - जाऊन येऊन सुमारे ४००० किमीचा प्रवास - १

फेब्रुवारीमध्ये XUV500 गाडी घेतली तेव्हाच नवर्याने सांगितलं की त्याला गाडी घेउन ठाण्याहुन भुवनेश्वरला जायचे अाहे. लेकीची सुट्टी बघुन कधी जायचे ते ठरवु. तेव्हा मला वाटले की हा नुसता म्हणेल , खरच जाणार नाही कारण घरात ़फिरायची अावड फक्त मलाच अाहे. पण नाही. नवी गाडी जितकी चालवली तितका त्याचा जायचा इरादा पक्का होत गेला. अाणि माझी धाकधुक वाढायला लागली. दोघेही केवळ दोन वर्षापूर्वी गाडी शिकलेलो. तेव्हा आय१० होती पण त्यात सेफ्टी फिचर अजिबात नसल्याने लॉन्ग ड्राईव केला नव्हता. नवीन गाडीनेही अजून दोघांनीही २०० किमी पेक्षा जास्त मोठा पल्ला ड्राइव केलं नव्हतं. हा प्रवास १८०० किमीचा वन वे, इतकी गाडी चालवता येईल का अशी मला भिती होती. बरोबर सात वर्षाची लेक. ती पाठी एकटी बसुन कंटाळणार असेही वाटत होते. काही मायबोलीवरच्या मित्रमैत्रिणींशी बोलले. केदार कडुन थोडे इन्स्पिरेशन घेतले, त्याचाही सल्ला घेतला (केदार ने खरेतर महिंद्राकडुन काहितरी कमिशन घेतले पाहिजे कारण त्याच्या लेह लडाख ट्रिप बद्दल वाचूनच ही गाडी घ्यायचे मनात आले होते. ) अाणि माझ्या मनाची तयारी केली.

ठरल्याप्रमाणे आम्ही सकाळी साडेपाचला घर सोडले. जाताना नाशिक, धुळे, अमरावती, नागपूर, रायपुर, संबलपूर, भुवनेश्वर असा रस्ता घ्यायचा ठरवला होता. नागपूर आणि संबलपुर इथे रात्री मुक्काम करणार होतो त्यामुळे तिथल्या हॉटेल्सचे पत्ते शोधून ठेवले होते आणि जर नागपूरपर्यंत पोचलो नाहीच तर अमरावतीला मुक्काम करू असा विचार करून तिथलेही हायवेवरचेच हॉटेल शोधून ठेवले होते.

नाशिक आणि पुढे धुळे (NH3) पर्यंत अतिशय मस्त रस्ता! चार लेन, मध्ये डिवायडर वगैरे होता त्यामुळे पटापट पोहोचलो. धुळ्याच्या पुढे मात्र (NH6/ AH46) दुपदरी, बिना दुभाजकाचा रस्ता सुरु झाला आणि स्पीड कमी झाला. त्यात मध्ये मध्ये बरीच गावे लागतात तिथे गर्दी, ट्राफिकजाम होता. जळगावला पोहोचेपर्यंत जेवणाची वेळ होऊन गेली. तिथून पुढे भुसावळ, मलकापूर, खामगाव, अकोला अमरावती हा सगळा रस्ता तसाच दुपदरी, बिना दुभाजकाचा आणि प्रचंड मोठे खड्डे असलेला असा आहे. त्यातच दर थोड्या अंतरावर सारखे रम्बलर्स, तीन चार स्पीडब्रेकर्स येतात. मोठे मोठे मालवाहू ट्रक याच भागातून जातात. त्यामुळे इथे गाडी चालवणे त्रासदायक वाटले. बर्याच भागात रस्ता अगदी अरुंद होतो. पुढे ट्रक्टर वगैरे आला तर त्याला ओवरटेक करून पुढे जायला फार वेळ लागायचा. काही वेळेस तर ट्रकच्या दोन्ही बाजूंनी अर्धा अर्धा मीटर बाहेर आलेली मशिनरी घेऊन ट्रक जातात. असा एखादा ट्रक समोर आला तर झालंच कारण त्याच्या पुढे जायला जागाच उरत नाही.

नाही म्हणायला या सिझनमध्ये दोन्ही बाजूला बाजरीची टपटपीत कणसे आणि पिवळीधम्मक शेते दिसत होती. हे 'शेतात पिकलेलं सोनं' मी पहिल्यांदाच पाहिलं. एरवी कोकणात जाणार्याला डोंगरदर्या बघायची सवय असते , पण इथे दूरवर पसरलेली शेती आणि सपाट जमीन पाहून वेगळेच वाटत होते.

मात्र जसजसा उशीर व्हायला लागला तसतसं अंधारात अशा रस्त्यावरून गाडी हाकण धोक्याचं वाटायला लागलं. सहा साडेसहाला अगदीच अंधार झाला आणि नागपूर अजून बरेच दूर होते. अंधारात बाहेरचे काहीच दिसेना त्यामुळे लेकीची चीडचीड सुरु झाली. अंधारात बिना दुभाजकाच्या आणि मोठे मालवाहू ट्रक जाणार्या रस्त्यावर गाडी चालवणे ताणाचे वाटायला लागले. आता नवरा गाडी चालवत होता तरी मला टेन्शन फ्री रहाता येत नव्हतेच. आधी नवरा 'आपण नागपुरपर्यंत जाऊच, अमरावतीचे काही शोधू नकोस' असे म्हणत होता, आता मात्र त्यालाही वाटले की अमरावतीला रहाणे श्रेयस्कर आहे. काही वेळ तर मला असेही वाटून गेले की उगीच आलो गाडीने. असाच रस्ता असेल तर किती त्रासदायक आहे पोहोचणे! शेवटी अमरावतीला पोचायच्या आधीचा सुमारे १० किमीचा रस्ता अगदी गुळ्गुळीत आणि एक्प्रेसवे सारखा होता. पण या रस्त्याचे काम चालू आहे / टोलनाका अजून सुरु झाला नाही शिवाय या रस्त्यावर एकही गाडीही दिसेना. त्यामुळे पुढे रस्ता कसा असेल/ असेल की नाही याचा अंदाज बांधणे कठिणच होते. अमरावतीला पोहोचलो पण अंधारात या हायवे वरून शहरात प्रवेश करायला रस्ता दिसेना. गाडीचे जिपिएस नवा रस्ता दाखवत नाही , त्यामुळे ते जुन्या ठिकाणी ( जिथे आधी डावी वळणे असतील तिथे ) वळायला सांगत होते पण हायवेवर वळणच नव्हते! मग एका ठिकाणी एक्सिट घेऊन थांबलो. तो अमरावती एम आय डी सी भागाचा रस्ता होता. तिथे चिटपाखरुही नव्हते. मग तिथे चक्क हॉटेलचे नाव जिपिएस मध्ये शोधले आणि ते मिळालेही. आम्ही थांबलो होतो तिथून केवळ आठ किमी वर, आणि अगदी रस्त्यावरच होते. हॉटेलमध्ये पोहोचून खरच हुश्श झाले.

दुसऱ्या दिवशीचा प्रवास तसा लांबचा होता, शिवाय काल अमरावतीला थांबल्याने नागपुरपर्यंतचे दिडशे किमी वाढले. त्यामुळे आज रात्री उशिरापर्यंत गाडी चालवावी लागेल अशी मानसिक तयारी करुनच निघालो. रायपुर ते संबलपूर हा पट्टा पुर्ण जंगल आहे. मध्ये रहाण्यासारखे शहरच नाहीये त्यामुळे मुक्कामी पोहोचण्याशिवाय गत्यंतर नाहीच. एकदा हायवेवर लागले की खायला ( लेकीसाठी बिन तिखटाचे) काही मिळत नाही, त्यामुळे नाश्ता करून साडे आठला बाहेर पडलो. गाडीचे जिपिएस ETA ( Exprected Time of Arrival) रात्री एक असे दाखवत होते, तिथे काणाडोळा केला. हा अमरावतीपासून नागपूर पर्यंतचा रस्ता असा काही अफ़ाट आहे की बस्स! पोटातले पाणीही हलणार नाही असा गुळगुळीत, लांबच्या लांब सरळ पसरलेला, चौपदरी, तुरळक ट्रक सोडता काहीच वाहतूक नाही. अगदी मीही गाडी सहज १४०च्या स्पीडने पळवत होते. एण्ट्रीलेवलचा, अडथळे कमी असलेल्या कार रेसिंग गेम असल्यासारखे वाटत होते. कार रेसिंग मध्ये पॉइंट मिळतात इथे ETA कमी होतो. विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे अजून टोल सुरु झाला नव्हता, अगदी शेवटच्या टप्प्यात थोड्डासा टोल घेतला. नागपूरपासून २०किमी अलिकडे अंतरावर उजवीकडे जाणारा एक नागपूर बायपास रोड आहे. तो घेतला आणि खडखड चालू झाली. इथे सगळा रस्ता म्हणजे नुसते खड्डेच होते पण ते बारके असल्याने गाडीला फारसा त्रास न होता खडखड करत पण जरा कमी वेगाने जाता येत होतं. नंतर एक टप्पा मात्र अगदी ऑफरोडींग करावं तसा रस्ता (!) होता. मोठे मोठे पाणी आणि चिखलाने भरलेले खड्डे!, त्यात समोरून येणारे कंटेनर्स! एक कसरतच होती. आमच्या पुढे एक छोटी मारुती इंडिका गाडी होती. ती खड्ड्यात गेली तर आपली जायला काहीच हरकत नाही असे म्हणुन मी जात होते. एका ठिकाणी चिखलात मात्र गाडीची चाकं एक्स्ट्रा फ़्रिक्शन देत होती ते लक्षात आलं ( AWD मोड ?? ) पण हा भाग सोडला आणि मग पुन्हा पुढे भंडार्यापर्यंत छान रस्ता सुरु झाला.

भंडाऱ्याच्या पुढे मधेच चौपदरी, मधेच दुपदरी रस्ता आहे. पण ओवरऑल चांगलाच आहे. इथेच डावीकडे नागझिरा अभयारण्यचा फाटा लागतो, तिथून पुढे गेल्यावर उजवीकडे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानाचा फाटा लागतो. इथे आल्यावर मारुती चितमपल्लींची आठवण आलीच! या दोन्ही जंगलात एकदातरी जायचे आहे. मग रस्त्याचा काही भाग चक्क नवेगाव जंगलातूनच जातो. दोन्ही बाजूला गर्द झाडी. एरवी रस्ता ओलांडताना कुत्रे वगैरे दिसतात, तसे इथे माकडं दिसतात. काही ठिकाणी हरणं वगैरे प्राणी रस्ता ओलांडतात त्यामुळे हळु जा असे सांगणारे बोर्डही होते. आम्हाला माकडे आडवी गेलीच पण चक्क एक शॅमेलिअनही आडवा गेला.

इथून पुढे आपण महाराष्ट्र ओलांडून छत्तिसगडमध्ये प्रवेश करतो. इथेही रस्ता चांगला पण मोठे मोठे ट्रक आणि कंटेनर फार दिसतात. भिलाई स्टील प्लाण्ट जवळ आल्याचे हे द्योतक होते. अचानक एका ठिकाणी आम्ही काळा डांबरी रस्ता सोडुन गुलाबी छटेच्या डांबरी रस्त्यावरून जायला लागलो. आधी आम्हाला वाटलं की रस्त्यावर लाल माती सांडली असेल. पण मग लक्षात आलं की रस्ता बनवताना त्यातल्या गुलाबी खडीच्या मिश्रणामुळे हा रस्ताच गुलाबी दिसतो! भिलाई शहर अगदीच बकाल आणि खराब दिसत होतं. खूप वर्दळ असलेल्या , आणि उद्योगधंदे असणाऱ्या शहराला असतो तसा गर्दी आणि घाणीचा शाप याही शहराला होताच. शहरातला टोल लोकल वहानासाठी नव्हता हे पाहून ठाण्याहून मुंबईत जाताना आणि परततानाही टोल द्यावा लागतो या दुखा:वरची खपली निघाली ! जेवायची वेळ झाली होती पण इथे जेवण्याची इच्छा झाली नाही. भिलाई सोडुन रायपुर जवळ आल्यावर एका ठिकाणी जेवलो. जेवण चांगले, कमी तिखटाचे असेल अशी अजिबात अपेक्क्षा नव्हती पण सुदैवाने आमचा अपेक्षाभंग झाला आणि जेवण चविष्ठ निघाले ! याहूनही दुसरे सुदैव असे की इथे स्वच्छ रेस्टरूमही मिळाले.

रायपुर सोडुन आम्ही पुन्हा काळ्या डांबरी रस्त्यावर आलो. आता रस्ता खराब व्हायला लागला होता, ट्राफिक तर होतेच, रस्ताही दुपदरीच होता. गाडीचे जिपिएस NH6चा रस्ता दाखवत होते, तर फोनवर गुगल एका ठिकाणी NH6 सोडुन उजवीकडे NH217 वर वळायचा रस्ता दाखवत होता. गुगल नुसार हा रस्ता ५० किमी जास्तीचा होता मात्र याला वेळ कमी लागणार होता. हाच २१७ पुढे पुन्हा ६ ला मिळणार होता. आम्ही गुगलच्या ज्ञानावर विश्वास ठेवायचे ठरवले आणि महानदीवरचा पूल ओलांडल्यावर एका ठिकाणी उजवीकडे २१७ वळलो. अचानक रस्त्यावरच्या गाड्या अगदी कमी झाल्या. हा रस्ताही दुपदरी होता पण गाड्या कमी आणि खड्डेही कमी होते. दोन्ही बाजूंनी झाडीच दिसत होती. गाडीचे जिपिएस रिरुट करून प्रत्येक डाव्या वळणाला आम्हाला आता NH6साठी वळा असे सांगत होते पण गुगलने सांगितल्याप्रमाणे ८०किमी याच रस्त्यावर जायचे होते. हळुहळू आजूबाजूचे जंगल दाट झाले आणि सहा वाजताच काळोख झाला. इथे गुगलचा सिग्नलही गेला. आता काय करायचे असा प्रश्न पडला पण ८० किमीचे डोक्यात होते त्यामुळे तशीच गाडी चालवत राहिलो. अचानक समोरच्या गाड्यांचे नंबर ओडीशाचे दिसायला लागले आणि ओडिशा जवळ आलो हे लक्षात आलो. पुढच्या सगळ्या गावांची नावे उडिया भाषेत लिहिलेली. अक्षरं माहिती असली तरी मला पटापट वाचता येईनात! मधेच केव्हातरी गुगल सिग्नल येऊन जाऊन होता त्यामुळे लक्षात आले की गाडीच्या जिपिएसने आम्हाला योग्य वाटेवर लावायचे प्रयत्न सोडुन देऊन गुगलने दाखवलेली वाटच दाखवायला सुरुवात केली आहे, त्यामुळे थोडे बरे वाटले. इथे आम्हाला रस्त्यावरच्या धुळीचा फार त्रास झाला. काचेवर धुळ आणि बाष्प बसून नीट दिसत नव्हते. पाणी उडवून वायपरने पुसले तरी समोरून गाडी आली की तिच्या हेडलाईमुळे अगदीच धुसर दिसायचे. आता रस्त्यावर गाड्या अगदीच तुरळक झाल्या, मध्ये मध्ये गावं फारशी येईनात, आली तरी पाड्यासारखी दोन चार घरं असलेली वस्ती असायची. त्या वस्त्यांवरही इलेक्ट्रिसिटी नव्हतीच. एरवी संपूर्ण रस्ता दुतर्फा घनदाट जंगल असावे असे वाटले कारण काहीही दिसत नव्हते. गाडीच्या मिरर मध्ये मागचा रस्ताही दिसत नव्हता. गाडीचे हेडलाईट एकदम पॉवरफुल असल्याने रस्ता मात्र नीट दिसत होता.

८० किमीच्या वळणावर SH3 वर एकदा वळलो आणि अजून ११८ किमी याच रस्त्यावर असे गाडीने सांगितले. रस्ता खराब होता आणि आम्ही तेव्हा ३०च्या स्पीडने जात होतो. आम्ही दोघांनीही एकमेकाकडे पाहून ' अशा अंधारातून आणि रस्त्यावरून अजून ४ तास' असा एक हिशेब न बोलताच एकमेकाला सांगितला ! इतक्यात पुढे एक गाडी दिसली तिच्या पाठच्या काचेवर जगन्नाथाचे डोळे काढले होते. हे एक मात्र नोंद करण्यासारखे आहे महाराष्ट्रात गाडीवर गणपती किंवा साईबाबा दिसतात, ओरिसात गेलो की जगन्नाथ दिसतो, दक्षिणेत गेलो की बालाजी दिसतो! तर त्या गाडीच्या मागे मागे आम्ही जायला लागलो त्यामुळे खड्डे वगैरे त्या गाडीकडे बघून आधीच कळायचे आणि वेग कमी करता यायचा. आता मध्ये मध्ये चांगला रस्ता आणि मधेच खड्ड्यांचा भाग येत होता. इथे एका ठिकाणी खड्ड्यातून हळुच गाडी काढताना रस्त्याच्या बाजूला काहीतरी येऊन बसलं. आणि आम्ही नीट बघेपर्यंत ते उडालं तेव्हा पांढरे छोटे घुबड होते असं लक्षात आलं. बरेच अंतर आम्हाला सोबत करून ती जगन्नाथाची गाडी कुठेतरी वळुन गेली आणि त्या एकाकी निर्जन रस्त्यावर आमचीच गाडी उरली.

एका ठिकाणी दूर लाल झेंडे लावले होते आणि एक झाड रस्तात आडवे होते. 'हे नक्षलवादी असतील का? काय करुयात? थांबवावी लागेल गाडी?' असा नवर्याचा प्रश्न ! आमच्याकडे असाही काय उपाय होता ? मी थांबव म्हटलं. जवळ जाऊन आम्ही थांबलो. रापलेली, काळी, छोटा पंचासारखे काहीतरी गुंडाळलेली दोन चार माणसं होती. आमचा एमएच नंबर बघून ती माणसं आमच्याकडे काही क्षण नुसतीच बघत राहिली. मी नवर्याला म्हणाले काच उघड आणि उडीयात विचार काय झालं म्हणुन. तसे केल्यावर मात्र त्या माणसांच्या चेहृयावरचा ताण जाऊन किंचित हसू उमलले. आणि घडाघडा संबलपुरी उडिया भाषेत त्यांनी नवर्याला जे सांगितले ते मला अजिबात कळले नाही. पण त्याचा अर्थ असा होता की इथला ब्रिज खचला आहे आणि बाजुची काही झाडं तोडुन एक मातीचा खडबडीत रस्ता केला आहे त्यावरून जायचे आहे. फक्त काही मिटर असल्याने आणि आमची गाडी फार मोठी नसल्याने ती सहज जाईल. आम्ही दोघेही विश्वास ठेवावा की नाही अशा द्वंद्वात एखाद क्षण होतो इतक्यात त्या बाजूच्या रस्त्यावरून एक सेडान गाडी आली. त्यामुळे आम्हालाही धीर आला आणि आम्ही तो मातीचा रस्ता पार करून पुन्हा एकदा डांबरी रस्त्यावर लागलो.

शेवटी एकदाचे जंगलातले ते ११८ किमी संपले आणि आम्ही सोहेला गावाजवळ उजवीकडे वळून पुन्हा एकदा NH6 वर पोचलो. इथला रस्ताही खराब होता पण थोड्याच अंतरावर चांगला चौपदरी रोड सुरु झाला तो पार संबलपूर पर्यंत होता. रात्री रहाण्यासाठी आम्हाला संबलपूर मध्ये घुसावे लागणार होते. महानदीच्या गर्द काळोखाला उजवीकडे टाकत आम्ही बरेच शोधत शोधत संबलपुरच्या हॉटेलमध्ये पोचलो. इथल्या माणसांचे आदरातिथ्य पाहून एकाकी अंधार्या जंगलातून पुन्हा माणसात आल्याची भावना झाली! इथे आम्ही सुमारे साडे दहा वाजता पोचलो. इतका उशीर होईल हा अंदाज आला असल्याने रायपुर सोडल्यावर रस्त्यातूनच फोन करून हॉटेल बुकिंग आणि जेवण ऑर्डर करून ठेवले ते चांगले झाले.

तिसर्या दिवशी फक्त ३०० किमीचा प्रवास होता. त्यामुळे आरामात साडेनऊला निघालो. खाली येऊन काचा वगैरे साफ केल्या, काल वायपरचे पाणी संपले होते ते भरले. इतक्यात बाजुची एमएच नम्बरची गाडी दिसली! अर्थात त्यांच्याशी बोललोच. ते बंगाली कुटुंब पुण्यावरून कोलकत्याला निघाले होते. आपण NH6 मधेच स्किप केला तो चांगला होता की खराब ही एक उत्सुकता आम्हाला होतीच त्यामुळे त्यांना कालच्या रस्त्याबद्दल विचारलेच. तो NH6 वरून आला होता आणि वैतागला होता, म्हणे तिथे रस्ताच नव्हता, नुसते खड्डेच होते. तो आमच्याही खूप नंतर पोचला होता. मग आम्ही आमच्या रस्त्याबद्दल त्याला सांगितले आणि निघालो.

आजचा रस्ता अगदी आनंददायक होता. दुतर्फा घनदाट जंगल, सकाळचे सोनेरी ऊन आणि मस्त फ्रेश हवा ! NH42 रस्ता दुपदरीच असला तरी जास्त वाहानं नव्हती शिवाय खड्डेही नव्हते! या जंगलातुन मात्र संध्याकाळी उशिरा / रात्री प्रवास करणे धोक्याचे आहे. कटक जवळ NH5 घेऊन अतिविस्तिर्ण अशी महानदी पार केली. आणि भुवनेश्वर मध्ये पोहोचलो. अडीच दिवस आणि एकुण सुमारे १८०० किमी पार करून दुपारी तीन वाजता जेवायला घरात होतो!


काही नोंदी -
- गाडी असल्याचा मोठा ़फायदा म्हणजे कॅमेरा अाणि लेन्स घेता अाल्या पण मुक्कामी वेळेवर पोचायची गरज असल्याने फोटोसाठी जास्त थांबले नाही .
- पुर्ण वेळ तिघेही सीटबेल्ट लावूनच गाडी चालवली.
- लेकीसाठी एक मोठी उशी, पांघरुण, एक मोठे कापड बरोबर घेतले होते. उशी असल्याने सीटबेल्ट लावूनही ती व्यवस्थित झोपू शकली. कापडाने उन्हाच्या वेळेस मागच्या सीटसाठी सावली करता आली.
- गरजेची सगळी औषधे, कोरडा खाऊ , ज्युस, पाण्याच्या बाटल्या होते, पण कोरडा खाऊ फारसा संपला नाही. ज्यूस कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवून गार करून पिता आले.
- कार बॅटरीवर चालणारा हवेचा पंप घेतला ( गरज लागली नाही पण स्टेपनी बाहेर कशी काढायची याची माहिती करून घेतली नव्हती, जे अतिशय चुकीचे होते. परतीच्या प्रवासात ही चूक केली नाही)
- मोठी , दुरवर प्रकाश पोहोचेल अशी टॉर्च होती, २४० व्होल्ट कन्वर्टर मागवला होता पण तो निघेपर्यंत पोचलाच नाही.
माबोवर विचारुन बरीच नवी जुनी गाणी घेतली होती, त्यामुळे लेकीला मजा आली. या प्रवासात एरवी आम्ही ऐकत नाही अशीही गाणी तिने ऐकली आणि एन्जॉय केली.


XUV500 बद्दल -
- अतिशय कम्फर्टेबल गाडी
- दिवसभर बसूनही कोणालाच पाठीचा , गुढग्याचा त्रास झाला नाही. ( अडिचाव्या दिवशी पोहोचल्यावरही अजिबात थकवा नव्हता)
- सुमारे ९५०० किमी झाल्यावर गाडी एकदम जास्तच स्मूथ वाटायला लागली आहे ( आत्ता रीडिंग १२४०० आहे )
- हेडलाईट एकदम पॉवरफुल. तीव्र वळणावर जास्तीचा हेडलाईट लागतो ते सुरुवातीला कन्फ्युजिंग वाटते म्हणजे अचानक दुसरी गाडी आली की काय असे वाटते पण सवय झाल्यावर फार उपयोगी आहे.
- त्रुटी किंवा मिसिंग फिचर म्हणजे सीट अ‍ॅडजस्टमेंटचे दोन प्री सेट असायला हवेत. म्हणजे एक बटन दाबले की सेट केलेली उंची, मिरर पोझिशन, स्टेरिंग पोझिशन आपोआप येईल. दर दोन तीन तासांनी ड्रायवर बदलल्यावर सीट, मिरर अ‍ॅडजस्ट करावे लागते. ( ऑडी मध्ये असे फिचर आहे म्हणे )
- माझ्या उजव्या हाताला रेस्ट मिळत नाही. नवर्याला हा त्रास जाणवत नाही. नेहेमीच्या प्रवासात मलाही जाणवला नव्हता. दुरवरच्या प्रवासात जाणवला.
- महत्वाचा मुद्दा ज्याबद्दल सगळेच विचारतात - मी जाताना सुमारे ८०० किमी आणि येतानाही तेवढेच चालवले. रात्री आणि डिवायडर नसलेल्या रोडवर माझा स्पीड थोडा कमी होतो.

Tuesday, July 15, 2014

तीन बालकथांची चित्रमय पुस्तके

मनोविकास प्रकाशन तर्फे माझी तीन बालकथांची चित्रमय पुस्तके प्रकाशित झाली अाहेत. आजच्या महाराष्ट्र टाईम्स , संवाद पुरवणीमध्ये या पुस्तकांबद्दल वाचता येईल. या तिन्ही पुस्तकासाठी Rijuta Ghate (ऋजूता घाटे) यांनी अतिशय सुंदर आणि गोंडस चित्रे काढलेली अाहेत. या पुस्तकांबरोबर पुस्तकातल्या कथांवर आधारित चित्रांचे रंगीत स्टीकर देण्याचा एक नवा प्रयोग प्रकाशकांनी केला आहे .

पुस्तकांची नावे कापसाची म्हातारी, शिंगवाला उंदीर आणि कुनीदेशातल्या कथा अशी असुन ही पुस्तके पुस्तकांच्या दुकानात उपलब्ध आहेत तसेच मायबोली सारख्या वेब्साईट्स वरूनही उपलब्ध होत आहेत.



ही तीनही मायबोलीच्या खरेदीविभागातून विकत घेता येतील.

https://kharedi.maayboli.com/shop/kapasachi-mhatari.html

https://kharedi.maayboli.com/shop/kunideshataly-katha.html

https://kharedi.maayboli.com/shop/shingawala-undir.html
















Friday, March 14, 2014

मदर्स ऑफ नॉर्थ ईस्ट - स्लाईडशो, ठाणे

पूर्वांचलातल्या आमच्या प्रवासाचे अनुभव आणि तिथे भेटलेल्या कर्तबगार स्त्रियांच्या कार्यावर  आधारीत  स्लाईडशो 'मदर्स ऑफ नॉर्थ ईस्ट'. 
ठिकाण - कलाभवन, बिग बझार जवळ, कापुरबावडी, ठाणे
तारीख / वेळ - १६ मार्च २०१४, संध्याकाळी ५:३० वाजता 
प्रवेश विनामूल्य असला तरी आपली जागा आरक्षित करणे जरुरी आहे.  
९७०२५५२२३३ किंवा ९८१९९७७९०८ या  नंबरवर फोन करून जागा आरक्षित करता येईल.  



Monday, March 10, 2014

मॅग्निट्युड ९.० (तीन वर्षांनी)


११ मार्च २०११ रोजी जपानमध्ये झालेल्या भूकंप आणि त्सुनामीला आज तीन वर्षे पूर्ण झाली.  त्यावेळी मायबोली या वेबसाईटवर हा लेख लिहीला होता. आज तीन वर्षांनी तिथले बदल थोडक्यात  टिपून हा लेख इथे पुन्हा देत आहे.


--------------------------------------

दिवस - ११-मार्च-२०११
स्थळ - तोक्यो
१३:३०
ऑफिस मध्ये सेमिनार होतं. साधारण दीडशे बाहेरचे लोक शोरूम मध्ये आलेले. बॉसने माझे नेहेमीचे काम सोडून मला सेमिनारचे फोटो काढायला सांगितलं. आवडीचं काम पण नेहेमीचा कॅमेरा नव्हता म्हणून त्याचा एस ९५ घेतला. नेहेमीचा कॅमेरा नसल्याचं वाईट वाटलंच पण ते किती बरं झालं ते नंतर कळलंच
१४:४६
जरा हलतेय का बिल्डींग ? असं वाटलं. तसही मला खूप लगेच भूकंप जाणवतो. मी बोलेपर्यंत सगळ्यांनाच जाणवलं. बिल्डींग आधी हळूच झुलायला लागली मग काही सेकंदात जोरजोरात गोलाकार घुमायला लागली असं वाटलं. शोरूम मधली प्रोडक्ट्स सगळी धडधड खाली पडली. तरीही कोणी किंचाळल नाही. सगळे खुर्च्या सोडून खाली बसले. बिल्डिंगची रोटेशन जरा कमी झाली असं वाटतंय तोच एकदा जोरदार धक्का बसला. माझ्या डोक्यावरच असलेले वरचे लाईट्स साठी सिलिंग मधे असलेले दरवाजे खाड खाड उघडले आणि बिल्डिंग वरखाली धडाधडा हलायला लागली. एकदम रफ धावपट्टीवर विमान उतरताना कसं वाटतं तसच काही सेकंद वाटलं. मग बहुधा भूकंप थांबला पण बिल्डीगचे झुलणे हळूहळू होत होते. भूकंपामध्ये टिकाव धरण्यासाठी विशिष्ठ रचना केलेली असल्याने ते कमी व्हायला जास्त वेळ लागतो.
१४:४६ नंतर दोन तीन मिनिटे.
सगळे जरा उभे राहिले. बॉसने येऊन मला याचे व्हिडियो शुटींग नं करण्याबद्दल विचारलंच. तर मी त्या पडलेल्या सामानाचे फोटो काढले. अजुनही समोरच्या बिल्डिंग जोरदार झुलताना दिसत होत्या. आमच्या बिल्डिंगमधल्या सिक्युरिटीने तिथेच थांबायची अनाउन्समेंट केली. म्हणून तसेच थांबलो.
१४:४६ दुसऱ्या धक्क्यांम्तर अजून काही मिनिटे
डेस्क जवळ परत आले. नवर्याचा फोन लागेना.डेकेअरचा फोन लागेना. नेटवर बघितलं तर इवाते का कुठेतरी जपानी स्केलवर ७ दिसलं. सात म्हणजे इथे सगळ्यात जास्त !! म्हणजे भयानक काहीतरी झाल्याचा अंदाज आला. तोक्यो जपानी स्केल ५प्लस दिसलं. त्सुनामीची वॉर्निम्ग दिसली. नवऱ्याचा इमेल आला त्याला उत्तर दिलं आणि लगेच मायबोलीवर मंजिरीसाठी एक मेसेज टाकला. तेवढ्यात माझ्या बरोबर काम करणारा आत आला. तो जिन्यांवरून ११व्यामजल्यावर आला आणि खूप घाबरलेला दिसला. त्याने सांगितलं आत्ताच्या आत्ता खाली चला. या बिल्डीगला तडे गेलेत. तेवढ्यात पुन्हा एकदा तसाच व्हर्टिकल धक्का बसला आणि पुन्हा आमचे विमान लँड झालं. तेवढ्यात बिल्डिंग वाल्यांनी अनाउन्समेंट केली कि बाहेर जा.
नवऱ्याला एक इमेल टाकला आणि खाली निघालो. इतक्या टेन्शन मध्ये सुद्धा आमच्या स्टाफ ने सगळ्या १५० लोकांना जिन्याने सावकाश उतरायला मदत केली. कोणीच धक्काबुक्की धावपळ केली नाही. म्हातारे लोकही होते ते हळू हळू उतरले तरी त्यांच्या मागचे सगळे सावकाशीने खाली गेले.विचार केला तर १५० बाहेरचे आणि १५ स्टाफ असे १६५ लोक एका शोरूम मधे. एकच एक्झिट होतं. सगळे घाबरून धावायला लागले असते तर?
१५:२०
खाली उभे होतो. कोणाचेच फोन लागत नव्हते. सगळे टेन्शन मध्ये खाली उभे होते.
१५:३०
बिल्डिंग सिक्युरिटीने चेक करून सगळं सेफ असल्याचे सांगितलं. आणि बाकीचे सगळे लोक वर पुन्हा जायला लागले. माझा ऑफिसचा वेळ संपला असल्याने मी निघायचा विचार केला. पण नक्की कसे जावे हे कळेना. ट्रेन बंद असल्याचे कळलेच होते. इथून निघाले तर नंतर नवऱ्याशी काही सम्पर्क राहणार नाही म्हणून सरळ घरी जायला होत नव्हतं. मग त्याच्या ऑफिस पर्यंत चालत गेले. आणि तिथे खाली त्याला शोधले पण त्यांना खाली जायची ऑर्डर नव्हती. आणि फोनही लागत नव्हते.
१६:१०
फोन लागत नाही म्हणून तोक्यो स्टेशन मधे पब्लिक फोन शोधायला गेले. तर स्टेशन पूर्ण भरलेले. अजूनही मला कुठे काय किती झालेय याची फारशी कल्पना नव्हतीच. पण इथे अंदाज आलाच. फोनला खूप मोठी लाईन. तेवढ्यात थोडस इंटरनेट चालू आहे असे वाटले. म्हणून नवऱ्याला इमेल केला पण तो गेलाच नाही. नेट बहुतेक ब्लॉक झालं. मग पुन्हा त्याच्या ऑफिस मधे चालत गेले.
१६:५०
नवऱ्याला फोन करुन खाली बोलावले. त्याला अजून काम होतं पण बहुतेक त्याला बाहेरच्या गर्दीचा अंदाजही नव्हता. शेवटी खाली आला तो आणि आम्ही निघालो.
१७:००
बसने जाण्यासाठी बसच्या थांब्यावर गेलो तिथून रांगेचा शेवट शोधात निघालो. दोन रस्ते पार करून गेल्यावरही शेवट दिसेना तेव्हा तो नाद सोडून एका टॅक्सीच्या रांगेत उभी राहण्याची चूक केली. बराच वेळ उभे राहिल्यावरही अजून काही शे मीटर रांग होतीच.
१७:३०
चालत घरी जायचा निर्णय घेतला. स्टेशन मध्ये जाऊन पाणी घ्यावे असा विचार करून गेले तर सगळी दुकाने सामान संपल्याने बंद! शेवटी एका वेंडीग मशीन मध्ये पाणी मिळाले.
मग एका ठिकाणी फोन बुथ शोधून रांगेत उभे राहिलो. लेकीच्या डेकेअर मध्ये फोन लावला. तिथे सगळे आलबेल असेल अशी खात्री होतीच त्याप्रमाणे होतेच. तिथे लोकांना , मुलांना ट्रेन केलेलं असतंच त्याप्रमाणे सगळे मध्ये येऊन एकाजागी बसले. डोक्यावर काही पडणार नाही याची काळजी घेतली. इमारतीला काही झालं तर मुलांना पालकांनी कुठे भेटायचं हे ही सांगून ठेवलेलं असतंच. पण सगळे डेकेअरमध्येच होते. त्यामुळे काळजी नव्हती. त्यांनी मुलांना रात्रीचे जेवण वगरेही दिले.
१८:००
चालायला सुरुवात केली रस्त्यात प्रचंड गर्दी. पण तरी सगळे शांतपणे चालत होते.त्याच्या फोनवर नेट चालू होतं म्हणून रस्ता शोधायला जीपीएस उपयोगी पडलं. रस्त्यात सगळ्या गाड्याही थांबल्या होत्या. काही ठिकाणी दिवे नसल्याने अंधारही होता.
२१:००
लेकीला डेकेअर मधनं घेतलं. सगळ्या सेन्सेईचे हजारवेळा आभार मानले. काही सेन्सेई आज तिथेच रहाणार होते. अजूनही काही पालक पोचले नव्हते. सगळ्यांची चौकशी करून घरी आलो. दरवाजा उघडताना धाकधूक होती काय्य काय पडलं असेल असा विचार करत होतो. पण नशिबाने सगळं ठीकठाक होतं. कुठे काही पडलं नव्हतं. आल्यावर सगळ्यात आधी टीव्ही लावला आणि मग काय प्रचंड उत्पाथ झालाय याची कल्पना आली.
रात्री १ पर्यंत
बराच वेळाने घरी आणि इतर काही मैत्रिणीशी सम्पर्क झाला. बातम्या बघून भयंकर वाटत होतं. मध्येच केव्हातरी भूकंपाचे धक्के बसतच होते. रात्री झोपायला गेल्यावरही झोप येतच नव्हती बाहेरचे लाईट चालू ठेवले. ईव्हेंक्यूएशन ब्याग तयार करून दरवाजाजवळ ठेवली. कुठे जायचं त्याचा म्याप आधीच सिटी ऑफिस ने दिलेला तो काढून ठेवला.
चित्र- इंटरनेट वरून साभार ( भूकंप धक्क्यांची केंद्रे, पिवळा गोळा म्हणजे मुख्य धक्का ) 

चित्र- इंटरनेट वरून साभार


दुसरा दिवस सकाळ:
उठून आधी बातम्या लावल्या. पुन्हा अजून जास्त डीटेल्स आले होते. खेळण्यासारख्या दिसणाऱ्या गाड्या आणि बोटी वाहून जाताना बघायला भयानक वाटत होतं. गावच्या गावे अक्षरश: वाहून गेली होती.
सकाळीच दुकानात जाऊन थोडं आठवडयाच सामान आणलं. थोडं रेडी टू इट पण आणून ठेवलं. लाईट , ग्यास गेले तर काय खाणार असा विचार करून. सकाळीच हे सगळे करणे किती उपयोगी होतं ते कळलंच नंतर. नंतर सगळ्या दुकानात खडखडाट झाला होता.
पुन्हा एखादा धक्का बसत होताच. मध्येच केव्हातरी टीव्हीवर टिंग असा आवाज होऊन येणाऱ्या भूकंपाची नोटीस यायची आणि काही सेकंदात पुन्हा धक्का.
एका जवळच्या मैत्रिणीच्या आईबाबांचे घर सगळे वाहून गेले पण आईबाबा सुखरूप आहेत असंही कळलं.
दुसरा दिवस दुपार:
मला पहिल्यांदा अणुभट्टीची बातमी काहीच क्षण  टीव्हीवर दिसली . सगळ जपानी मध्ये असल्याने सुरुवातीला नीट कळत नव्हती. मग एका मैत्रिणीला भाषांतर करायला सांगितलं. तिने बऱ्याच गोष्टी सांगितल्या.
आधी फुकुशिमा दाई इची १बान मधे एक स्फोट झाला आणि धूर आला असा एक व्हिडियो टीव्हीवर दिसला. तो दोन वेळा दाखवल्यावर गायबच झाला. त्यामुळे जरा टेन्शन आलं. की नक्की काय लपवत आहेत ते कळेना. तो व्हिडियो नंतर दुसऱ्या दिवशी पर्यंत दाखवला नव्हता. शिवाय थोड्या वेळाने अजून एक फोटो. त्यात सकाळी ९ वाजताच्या फोटोत त्या प्लांट ची इमारत दिसत होती तर दुपारी चार च्या फोटोमधे फक्त त्याचा सांगाडा दिसत होता. मग बऱ्याच उलट सुलट इंग्रजी बातम्या, अनालिसीस वगरे ऐकून शेवटी संध्याकाळी एदानो यांची प्रेस कॉन्फरन्स झाली. त्यांनी स्फोट झाल्याची बातमी दिली. आणि आधी ३.५ किमी मध्ये धोका असल्याचे सांगितलं. नंतर ते १० किमी केलं. खरंतर हे प्लांट भूकंप झाल्यावर आपोआप थांबले होते. लाईट गेल्यावर बॅकअप डिझेल पॉवर वर शिफ्ट झाले होते. पण नंतर आलेल्या त्सुनामीने डिझेल पॉवर सप्लाय खराब झाला आणि प्लांटचे तापमान प्रचंड वाढले.
पुढचा सगळा वेळ टेन्शन मध्येच गेला. आता भूकंपाची भीती नव्हती फारशी. पण रेडीएशनचे काय ते कळत नव्हते.
रविवारी अजून एका रीअ‍ॅक्टर मध्ये स्फोट झाला आणि आग लागली. रेडीएशन थोडावेळा पुरते वाढले. आणि पुन्हा कमी झाले. आता २० किमी मधल्या लोकांना बाहेर काढलं आणि ३० किमी मधल्या लोकांना शक्यतो घरातच राहून ए.सी वगरे सगळे बंद ठेवायला सांगितले.
सगळ्या एव्हेक्युएट केलेल्या लोकांना खायला प्यायला फारसे मिळत नव्हते. एखादी ओनिगिरी, एक डोनट, एक बाटली पाणी असे जेवण. काही ठिकाणी थोडी बरी परिस्थिती होती तिथे सूप किंवा नुडल्स शिजवून मिळत होते. अशा परिस्थितीतही लोकं प्रत्येकी एक बेन्तो आणि एक बाटली पाणी हे आपले आपण घेत होते. उगीच कुनी खेचाखेची नाही. ओरबाडून घेणे नाही. कोणाची फारशी तक्रार नाही.
सतत काही तासांनी प्राईम मिनिस्टर कान किंवा एदानो यांची प्रेस. कॉन्फ असायची. काय करणार आहेत. काय परिस्थिती आहे याबद्दल ते नीट उत्तरे द्यायचे. शिवाय तोक्यो इले. पॉवर कंपनी काय करतेय, तिथे लोकं कसे प्रय्तन करत आहेत हे सांगायचे.
११तारखेचा भुकंप ९.० रिश्टर स्केलचा होता ही बातमीही आली. आधी ८.९ चा सांगितला होता.
अजुन साधारण १०००० लोकांचा ठावठीकाणा कळत नव्हता. साधारण ३००० मृत घोषीत केले होते. घरे, आणि इतर वित्तहानी तर अपरिमित होती.
आम्ही सगळा वेळ बातम्या बघण्यामध्ये बिझी असल्याने लेक प्रचंड वैतागलेली होती. त्यात मध्ये मध्ये येणारे भूकंपाच्या सुचना आणि काम थांबवून एका जागी बसणे यामुळेही तिला जरा भीती वाटत होती. तिच्या खेळातही , ब्लॉक्स च्या खेळण्यातही ती भूकंप भूकंप खेळत होती. बघून वाईट वाटत होतं, पण इथल्या सगळ्याच मुलांना असंच वाटणार ना!
सोमवार १४ मार्च-
नेहेमीसारखेच ऑफिसला गेलो. नेहेमीची कामं सुरु केली. पॉवरसेव्हिंग करण्यासाठी एलेव्हेटर, एस्कलेटर बंद होते. पण कुठे कोणाची तक्रार चिडचिड दिसलींच नाही. ट्रेनही बऱ्याच बंद होत्या. किंवा खूप कमी फ्रिक्वेन्सीने चालत होत्या. प्लेटफॉर्मवर जायला इतकी गर्दी होती कि रांगा अगदी पायऱ्या चढून वर तिकीट गेट्स च्या बाहेर आल्या होत्या. पण लोक शांतपणे रांगेत उभे होते.
ऑफिसमध्ये आवराआवरी करत असतानाच अजून एक भूकंपाचा धक्का बसला. त्या नंतर बॉसने ऑफिस चे शोरूम् आठ दिवस बंद ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी ऑफिस बंद ठेवायचा निर्णय घेतला.
ही अनिश्चितता बघून मग आम्ही दोघेही फोनवर बोललो. थोडे दिवस भारतात राहूयात का असा विचार करायला लागलो. हं निर्णय फारच कठीण होता. शिवाय सगळे आमचे जपानी मित्र मैत्रिणी इथे असताना सगळ्यांना सोडून जाणे पटत नव्हते. शेवटी रात्री पुन्हा एकदा बोलून निर्णय घ्यायचे ठरवले.खरंतर घरातूनही लेकी साठी प्रेशर येत होतं कि लगेच परत या.
घरी येऊन मंजिरी आणि नेरीमाशी बोलले. त्यांनीही सांगितले कि त्यांच्या ओळखीचे काहीजण परत जात होते. मग पुन्हा नवऱ्याला फोन केला तर त्याने नुकतेच तिकीट बुकही करून टाकलेले. त्या एजंटने सांगितले कि लगेच बुक केलेत तर १६चे मिळेल नाहीतर मग १८ /१९ चे मिळेल. हे ऐकून त्याने लगेच बुक करून टाकले. हा निर्णय घेतल्यावर रात्री दोघेही झोपू शकलो नाही. फारच वाईट वाटत होतं.
टीव्ही वरच्या बातम्या चालूच होत्या. आता बातम्यांचे स्वरूप जरा बदलून रेस्क्यू ऑपरेशन्स आणि इतर गोष्टी दाखवत होते.
मंगळवार १५ मार्च -
आज ऑफिस नव्हतेच. पण मग इतर लायब्ररीची पुस्तके परत देणे. नर्सरी मध्ये जाऊन सांगणे अशी कामं केली.सगळया भाज्या दुध वगरे नर्सरी मध्ये नेऊन दिले म्हणजे फुकट जाणार नाही. नर्सरी मध्ये सेन्सेईना वाईट वाटलं. आणि त्याहून जास्त वाईट मला वाटलं. पण शेवटी निर्णय घेतलेला होता. काही जपानी लोकही हिरोशिमा, किंवा ओसाका अशा लांबच्या शहरात निघाले होते.
पुन्हा मध्येच तोक्यो मध्ये थोडं रेडीएशन आढळल्याची बातमी आली. आजही प्रेस. कॉन्फ झाली.
दुपारी एअरपोर्ट वर जाण्यासाठी काही उपाय मिळत नव्हता. बसेस बंद होत्या. ट्रेन बंद होत्या. शेवटी एका ठिकाणी प्रीपेड टेक्सी केली.
संध्याकाळी एक मोठा भूकंपाचा धक्का बसला. तोक्यो मधेही बऱ्यापैकी जोरात वाटला. हा धक्का शिझुओका मध्ये होता. तिथेही थोडीफार हानी झाली.
बुधवार १६ मार्च -
सकाळ पासून धावपळ करतच होतो. साडे दहा वाजता ठरल्या प्रमाणे गाडी आली आणि आम्ही निघालो.
रस्त्यात गर्दी असेल असं वाटलं होतं. पण अजिबातच नव्हती. त्यामुळे लवकर पोचलो. आत घुसल्यावर मात्र क्षणभर दचकायलाच झालं. खूप गर्दी. बरेच लोकं पथारी पसरून चक्क झोपले होते. काही फ्लाईट्स कॅन्सल झाल्या होत्या.
तिथे पोचल्यावर थोड्याच वेळात पुन्हा एक भूकंप झाला. हाही वरखाली होणारा धक्का होता.
विमान वेळेवर सुटेल का याची जराशी धाकधूक होती. चेक इन आणि सिक्युरिटीसाठी प्रचंड मोठ्या रांगा होत्या. वेळेवर सगळं होऊन विमानात बसलो. टेक ऑफ झाला आणि थोड्यावेळाने किंचित टर्ब्युलन्स आला. तसं लेकीची पहिली रिएक्शन "ममा, भूकंप!"
गुरुवार १७ मार्च-
आमच्या परतण्याने घरातले सगळेच खुश!
दुपारी खेळताना लेकीने एक बोट बनवली आणि सांगितलं कि नवीन प्रकारची बोट आहे ती त्सुनामी मध्येही बुडत नाही!

१० एप्रिल २०११
आम्ही पुन्हा तोक्योमध्ये परतलो.  बाहेरचे खाणे, पाणी, विशिष्ठ भागातल्या भाज्या इत्यादीवर निर्बंध ठेवले पण इतर रोजच्या आयुष्यात काहीच फरक नव्हता.   पण सगळ्यांचीच नजर सतत फुकुशिमा आणि तिथल्या घडामोडींवर होती.   काही आठवड्यांनी आधी दडपलेल्या पण वेगवेगळ्या बातम्या येऊ लागल्या. १५ मार्चला केवळ वाऱ्याच्या दिशेमुळे तोक्यो बचावले होते ही त्यातलीच एक बातमी. किती खरे किती खोटे कोण जाणे. पण त्यादिवशी वारा तोक्योच्या दिशेने वाहात असता तर तोक्योमध्ये किरणोत्सर्ग खूप वाढला असता म्हणे. तोक्योसारखे शहर रिकामे करणे ही कल्पना सुद्धा शक्य नाहीये.      
अनेक गोष्टी लिहायच्या राहिल्यात.पण जसे आठवले तसे लिहीले.
इतक्या सगळ्या आपत्तीमधेही लक्षात रहाण्यासारख्या गोष्टी म्हणजे जपानी लोकांची सहनशीलता, आणि कुठल्याही परिस्थितीमधे नियम न तोडता रहाण्याची शिस्तप्रियता!
कुठच्याही दुकानात कुठेही लुटालूट नाही, कुठेही उगाच धक्काबुक्की नाही, उगाच दुसर्‍याला, सरकारला दोष देणे, आक्रोश करणे नाही.
जपान च्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशुन केलेल्या भाषणात दुसर्‍या महायुद्धा नंतरचा हा सर्वात कठीण प्रसंग आहे असे सांगुन लोकांना सहकार्याचे आवाहन केले.
आता परवाच कुठल्यातरी वर्तमान पेपर मधे वाचले की हे नुकसान भरुन काढायला अमुक वर्षे लागतील, इतके मनुष्यबळ लागेल वगैरे वगैरे. पण मला मनापासुन खात्री आहे की जपान लवकरच हे नुकसान भरुन काढून पुन्हा ती राख झालेली सगळी घरं तशीच्या तशी उभी करेल. आणि गेलेल्या माणसांच्या स्मृती मनात जपुनही पुन्हा एकदा जपान आपलं अस्तित्व सिद्ध करेल.  हे देशप्रेम, हि मानसिकता या लोकांनी कुठून आणली असेल?
-----------------------------
११ मार्च २०१४ 
आम्ही २०१२ मध्ये मुलीच्या शिक्षणासाठी परत भारतात आलो.  आज जपानमध्ये सर्वकाही आलबेल आहे / असेल असे वाटतेय. पण तीन वर्षात फुकुशिमाच्या अपघातामुळे तिथल्या गावातून विस्थापित झालेले लोक अजुनही विस्थापितांचेच आयुष्य जगात आहेत. तिथल्या ओसाड गावांमध्ये  किरणोत्सर्गाचे प्रमाण अजुनही बरेच आहेत. लोक आपले व्यवसाय, शेती सर्व सोडुन रहात आहेत.  तिथल्या सरकारने माहिती दडपून ठेवली असे आरोपही करत आहेत.  इथल्या लोकांचा अणूउर्जेला तीव्र विरोध आहे.  आणि जपान मधल्या अनेक अणुभट्ट्या बेमुदत बंदच आहेत.  
यातून उर्वरित जग काय धडा घेणार आणि कशी पावलं उचलणार हे येणारा काळच ठरवेल.  


Monday, March 3, 2014

निमंत्रण - विद्युल्लता २०१४ - फोटोस्टोरी प्रदर्शन

नमस्कार,

'विद्युल्लता' - जागतिक महिला दिनानिमित्त एक फोटोस्टोरी प्रदर्शन!  फोटो सर्कल सोसायटीच्या महिला प्रकाशचित्रकार ( सुमारे ५५) दरवर्षी विविध क्षेत्रात काम करणार्‍या महिलांना भेटुन त्यांचे कार्य चित्रीत करतात. जागतिक महिला दिनाच्या दिवशी त्या प्रकाशचित्रांचे प्रदर्शन भरवुन अशा यशस्वी महिलांना प्रकाशचित्रकारांकडुन एक प्रकारची मानवंदनाच दिली जाते.

२०१४ हे विद्युल्लता प्रदर्शनाचे तिसरे वर्ष. यावर्षी महाराष्ट्राबरोबरच पूर्वांचलातील चार राज्ये, असम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर या ठिकाणच्या सामाजिक, शैक्षणिक, कला आणि व्यावसायिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणार्‍या ३१ जणींना आमची यावर्षी कार्यरत असणारी सतरा जणींची टिम भेटली आणि त्यांचे प्रकाशचित्रण केले.

 त्यातीलच  आमची सहाजणांची छोटी टिम पूर्वांचलातला पंधरा दिवसात अडीचहजार किमी पेक्षा जास्त प्रवास करुन तिथल्या स्त्रियांना भेटुन, त्यांच्या घरी राहुन आली.  अतिशय दुर्गम भागात रहात असुनही हिरिरीने सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणार्‍या या चौदा स्त्रीयांना भेटुन आम्ही सगळेच भारावुन गेलो होतो.

त्या पूर्वांचलातल्या चौदाजणी आणि महाराष्ट्रातल्या सतरा जणींचे कार्य प्रकाशचित्रांच्या रुपाने विद्युल्लता या प्रदर्शनात पहाता येईल.  प्रदर्शनाचे उद्घाटन  ७ मार्च रोजी संध्याकाळी ५:३० वाजता कलाभवन, ठाणे येथे अरुणाचल प्रदेशच्या पद्मश्री बिन्नी यांगा यांच्या हस्ते होणार आहे.  हे प्रदर्शन ७ मार्च ते ९ मार्च या कालावधीत सकाळी १०:०० पासुन रात्री ७:०० वाजपर्यंत सर्वांनाच खुले आहे.


त्याचबरोबर या महिलांशी बोलताना, त्यांच्याबद्दल जाणुन घेताना आम्हाला ते अनुभव शब्दबद्ध करावेसे वाटले. या सगळ्यांच्या कार्याची माहिती, आमच्या पूर्वांचलातल्या प्रवासातले अनुभव हे पुस्तिका रुपाने या प्रदर्शनाच्या वेळेस प्रकाशित करणार आहोत. पूर्वांचलातल्या महिलांना महाराष्ट्रात चाललेले काम आणि इथल्यांना पूर्वांचलातल्या कार्याबद्दल माहिती असा दुहेरी उद्देश असल्याने ही पुस्तिका इंग्रजीमधुन तयार करण्यात आलेली आहे. ही पुस्तिका देणगीमूल्य रु.१०० फक्त या किमतीत प्रदर्शनाच्या ठिकाणी उपलब्ध होईल.

 प्रदर्शनाला नक्की या!

Wednesday, January 29, 2014

बेसिक फोटोग्राफी कार्यशाळा - ८ आणि ९ फेब, २०१४

ठाणे येथे बेसिक फोटोग्राफी कार्यशाळा - ८ आणि ९ फेब, २०१४



Sunday, January 26, 2014

प्रजासत्ताक दिन परेड - मरीन ड्राईव्ह

प्रजासत्ताक दिन परेड - मरीन ड्राईव्ह

अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध कार्यक्रम. प्रचंड गर्दी असूनही व्यवस्थित सुरक्षा चेक करूनच प्रवेश मिळाला.

















  

Saturday, January 25, 2014

कोलकता ते मोईराङ - व्हाया जर्मनी आणि तोक्यो ( नेत...

प्रकाशरानातून चालताना...: कोलकता ते मोईराङ - व्हाया जर्मनी आणि तोक्यो ( नेत...:
.............नंतर  जर्मन पाणबुडी आणि जपानी पाणबुडी यांनी एक ऐतिहासिक ट्रान्स्फर केली.   नेताजी सुभाषचंद्र बोस आणि अबिद हसन हे जर्मन पाणबुडीतले प्रवासी जपानी पाणबुडीत आणि U-180च्या बांधणीचे तांत्रिक शिक्षण घ्यायचे होते असे  दोन जपानी प्रवासी जर्मन पाणबुडीत आले.  दुसऱ्या महायुद्धात दोन वेगवेगळ्या देशाच्या पाणबुड्यांनी तिसऱ्याच देशाच्या माणसांची ट्रान्स्फर ही ऐतिहासिक म्हणावी अशीच...........  

Wednesday, January 22, 2014

कोलकता ते मोईराङ - व्हाया जर्मनी आणि तोक्यो ( नेताजींच्या जयंतीनिमित्त)


१९ जानेवारी १९४१, कोलकत्यातल्या एका बंगाली घरातून एक पठाण कारमधून बाहेर पडला आणि मजल दरमजल करत थेट अफगणीस्तानात पोहोचला. तिथल्या मित्रांच्या मदतीने मूकबधिर असल्याने नाटक वठवत सोविएत रशियाच्या सरहदीजवळ पोचला. तिथून पुन्हा एकदा इटालियन माणसाचे  वेषांतर करून  मॉस्कोला पोचला.   सोविएत रशिया कडून  भारताच्या स्वातंत्र्यासाठी मदत होईल अशी अपेक्षा होती, ती फोल ठरल्यावर तो तरुण थेट जर्मनीला  थडकला.  त्याकाळात जेव्हा दळणवळणाची साधने फारशी उपलब्ध नव्हती, सतत पकडले जाण्याचा धोका होताच तरीही इतका मोठा प्रवास करण्याचे धारिष्ट्य आणि दूरदृष्टी ठेवणारे नेताजी सुभाषचंद्र बोस! त्यांनी खूप वेगळे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी अगदी शब्दश: आकाशपाताळ एक केले. 

Credit : http://kishorekumar62.wordpress.com/tag/subash-chandra-bose/ 
All google maps taken from the http://kishorekumar62.wordpress.com blog posts.  



नेताजींनी जर्मनीत जाउन तिथल्या जर्मन लोकांच्या मदतीने आझाद हिंद रेडियोचे प्रसारण चालू केले.  हिटलरशी बोलणी करून भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात जर्मनीची मदत घ्यायची आणि ब्रिटिशांना हुसकावून लावायचे अशी त्यांची कल्पना होती.  
   
त्यांनी जर्मनीशी संधान साधायचा प्रयत्न सुरु केला. जर्मनी ब्रिटीशांच्या विरोधात असल्याने तिथून भारताच्या स्वातंत्र्यलढयासाठी नक्की मदत मिळेल असे त्यांना वाटत होते.  १९४३ पर्यंत नेताजी बर्लिन मध्ये होते मात्र तेव्हा हळूहळू जर्मनीचा पाडाव व्हायला लागला आणि जर्मन मदतीने स्वातंत्र्य मिळवण्याचे स्वप्न धुसर वाटू लागले.  त्याच सुमारास पूर्वेकडे जपानी सैन्याची धडक वाढत होती. जर्मनीतून जपानमध्ये जाउन तिथून मदत घ्यायची असे प्रयत्न नेताजींनी सुरु केले.

त्याकाळात पाणबुड्या अतिमहत्वाचे सामान वाहून नेण्यासाठी वापरल्या जात असत.  अशीच एक महत्वाकांक्षी जपानी पाणबुडी  I-29   मादागास्कर बेटाजवळून जाणार होती. तिचा कॅप्टन होता सबमरीन  फ्लोटीला  कमांडर मासाओ तेराओका.   त्याच वेळेस जर्मन पाणबुडी  U-180 ने अतिशय दूरवरचा प्रवास करत नेताजी मादागास्कर बेटाजवळ आले.  दोन्ही पाणबुड्या तिथे पोहोचल्या तेव्हा वातावरण खराब होते त्यामुळे सुमारे बारा तास थांबून राहावे लागले. नंतर  जर्मन पाणबुडी आणि जपानी पाणबुडी यांनी एक ऐतिहासिक ट्रान्स्फर केली.   नेताजी सुभाषचंद्र बोस आणि अबिद हसन हे जर्मन पाणबुडीतले प्रवासी जपानी पाणबुडीत आणि U-180च्या बांधणीचे तांत्रिक शिक्षण घ्यायचे होते असे  दोन जपानी प्रवासी जर्मन पाणबुडीत आले.  दुसऱ्या महायुद्धात दोन वेगवेगळ्या देशाच्या पाणबुड्यांनी तिसऱ्याच देशाच्या माणसांची ट्रान्स्फर ही ऐतिहासिक म्हणावी अशीच.  तिथून जपानी पाणबुडीने ते सबांग इथे उतरून नंतर  पुढे तोक्योमध्ये  पोहोचले.  

Credit : http://kishorekumar62.wordpress.com/tag/subash-chandra-bose/ 
All google maps taken from the http://kishorekumar62.wordpress.com blog posts.  


फोटो -  
जपानी पाणबुडीच्या खालाश्यांबरोबर नेताजी ( फोटो विकीपेडिया वरून
आधी सुमारे १९४१ साली इंडियन नॅशनल आर्मी स्थापन करायचा प्रयत्न जपानच्या इवाइची फुजीवारा आणि मोहन सिंग यांनी केले होते पण नंतर ते बंद पदले. नेताजी पूर्व आशियामध्ये पोचल्यानंतर पुन्हा एकदा अशा प्रकारच्या स्वातंत्र्य सेनेची गरज जाणवायला लागली आणि सिंगापूर मध्ये राश बिहारी बोस यांनी सगळी सूत्रे नेताजींच्या हातात सोपवली.  नेताजींनी लोकांना संघटीत करून देशासाठी लढण्यास प्रवृत्त केले.   इंडियन नॅशनल आर्मी मध्ये 'Rani of Jhansi Regiment'  हे स्त्रियांचे वेगळे युनिट होते आणि हे आशियामध्ये प्रथमच घडले होते.  जपानी सैन्य आणि  इंडियन नॅशनल आर्मीमधले पूर्व भारतातले स्वातंत्र्यसैनिक  भारताच्या अतिपूर्व भागात वेगाने मुसंडी मारत होते.  


Credit : http://kishorekumar62.wordpress.com/tag/subash-chandra-bose/ 
All google maps taken from the http://kishorekumar62.wordpress.com blog posts.  
आय एन ए चा मार्ग 


आय एन ए ने आपले पहिले पाल मणिपूर येथील मोईराङ येथे ठेवले.  मोईराङ , सर्वात प्रथम स्वतंत्र झालेला भारतीय प्रदेश ! स्वतंत्र भारतातले पहिले पाऊल!!  पहिला तिरंगा मानाने झळकताना पाहिला तो मोईराङने.        




सिंगापूर येथील स्मारकाची प्रतिकृती. या प्रतिकृतीचा पाहीला दगड नेताजींनी  ठेवला आहे असे त्यावर नमूद केलेले आहे.


  
आज तेच मोईराङ पाहीले, तिथला तिरंगा पाहीला  की  ऊर अभिमानाने भरून जातो. दूरदृष्ट्या आणि अतिशय साहसी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याविषयी अतीव आदर वाटून जातो.  तिथले म्युझियम बघताना, त्यांचे फोटो बघताना, त्यांच्या प्रवासाविषयी वाचताना भारून जायला होतं.  पण या भारून जाण्यालाही एक हळवी किनार आहे. मणिपूर , मोईराङ  हा भाग अजून शांत नाही. त्याची कारणे अनेक असतील , आहेतही. पण एक सामान्य नागरिक म्हणून मला मनापासून वाटतं की इथे शांतता नांदावी. 
नेताजी आणि त्यांच्यासारख्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या स्वातंत्र्याची, त्यांच्या बलिदानाची चाड राखत देशातल्या शांततेसाठी, एकात्मतेसाठी प्रयत्न करणे हे आपलेच  कर्तव्य आहे.  आज नेताजींच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करताना ही जाणीव नक्किच गरजेची आहे.           


                  

Saturday, January 11, 2014

Selection for photography exhibition in UK - Four Elements

Dear Friends, 

I am extremely happy to tell you that 15 of my images are selected for exhibitions (10 exhibitions in various locations From Jan-2014 to May,2014) in UK by 'The Photographic Angle'The Photographic Angle holds free exhibitions that travel across the UK transforming otherwise empty spaces into temporary galleries.  The Photographic Angle is linked to the Royal Photographic Society, and in conjunction with it, is responsible for funding a bursary for work in relation to environmental awareness.  The theme of this exhibition is 'Four Elements'.  TPA selects, prints the photos an display in the exhibitions on their own.  

You can see my statement on the website of  'The Photographic Angle'. 
Please click on the link below.  Go to fifth row from bottom, and third column. Click on the photo of Mount Fuji with it's reflection is in Yamanaka ko lake at sunrise and you can read my profile.   



I am planning to add some of these photos on my website later on.  

The schedule of exhibition is given below. My friends in UK, please visit the exhibition close to you and send me details. 

22nd Jan 2014 to 26th Jan 2014                 Portsmouth Forum One, Solent Business Park,Parkway, Whiteley
29th Jan 2014 2nd Feb 2014                      London Hamlyn House & Hill House, 21 Highgate Hill, N19 5LP
5th Feb 2014 9th Feb 2014                        Birmingham Quayside Tower, Broad Street, B12HF
19th Feb 2014 23rd Feb 2014                    London 12-13 Bruton Street, W1J 6QA
26th Feb 2014 2nd Mar 2014                     Maidenhead Bray House, Westcott Way, SL6 3QH
30th Apr 2014 4th May 2014                      Manchester Number One, First Street, Manchester, M15 4BB
7th May 2014 11th May 2014                     Solihull Fore 1 & 2, Huskisson Way, Solihull, B90 4EN
14th May 2014 18th May 2014                   Leeds 1 East Parade, LS12AJ
21st May 2014 25th May 2014                   Birmingham Fountain Court, SteelHouse Lane, B4 6DR
28th May 2014 1st Jun 2014                      Peterborough Lynchwood House, Peterborough Business Park, Lynchwood, PE2 6GG