Thursday, October 27, 2011

नभा सावर सावर



मायबोली दिवाळी अंक २०११ मध्ये प्रकाशित झालेला लेख.
------------------------------------------------------------------


अगदी बाळपणी आईच्या कडेवरून जाताना त्या आभाळाकडे पहिल्यांदा लक्ष गेलं असणार माझं. ते ही आमच्याबरोबर उडणाऱ्या चांदोमामाला बघायला. तेव्हा आभाळापेक्षा चांदोबाचेच आकर्षण असावे.  देवबाप्पा कुठे असतो? पाऊस कुठून पडतो? ढग कुठे असतात? वीज कुठून चमकते? चांदण्या कुठे असतात? चंद्र सूर्य कुठे असतात? असल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे जेव्हा 'आकाशात!' अशा शब्दात मिळायला लागली तेव्हा मात्र आकाशाबद्दलचं कुतूहल वाढत गेलं.

लहानपणी मुंबईजवळच्या एका दूरच्या उपनगरात राहिल्याने पूर्ण मोकळे विस्तीर्ण आकाश मात्र सहज वाट्याला आले नाही. बाल्कनीतून दृष्टीला पडलेला तो छोटासा चौकोनी निळा तुकडा म्हणजे आकाश असेच मानून चालले होते बराच काळ. त्याच निळ्या तुकड्यातले पांढरे शुभ्र ढग हे पुन्हा एकदा आकाशाकडे पहाण्याचे कारण. त्या ढगातले आकार शोधात खेळायचा खेळ कितीतरी वेळा खेळला असेल तेव्हा. पुढे गच्चीवर जाण्याची मिळालेली परवानगी, क्वचित कधीतरी झालेले समुद्रावरचे फिरणे यामुळे माझ्या आकाश या संकल्पनेच्या कक्षा हळूहळू रुंदावत गेल्या. केव्हातरी गोव्याच्या समुद्रकिनारी दिसलेले पावसाने ओथंबलेले आकाश ही विस्तीर्ण आकाशाची पहिली आठवण ठरावी.

शिकण्यासाठी मुंबईपासून दूर आल्यावर मोकळं आभाळ दिसणे ही तितकीशी दुर्मिळ गोष्ट नाही हे जाणवले! आकाशातले पडणारे तारे पहात मैत्रिणींबरोबर जागवलेल्या रात्री, पहाटे पहाटे पायऱ्यावर बसून अभ्यासाच्या नावाखाली पेंगुळताना पाहिलेला निळ्याशार क्षितिजावरचा चांदीसारखा चमकणारा नुकताच उगवलेला चंद्र, वळवाच्या पावसानंतर रुपेरी कडांचे ढग असलेले आकाश, गुलमोहोराच्या लालबुंद फुलांच्या मधूनच डोकावणारे आकाशाचे कवडसे अशा अनेक आठवणी आकाशाला आणि त्या फुलपाखरी जीवनाला एकत्र बांधतात.

नंतर असंख्य घरे बदलली पण आकाश मात्र सदोदित  साथीला होतं. घराच्या कुठल्यातरी एका खिडकी, बाल्कनी मधून तरी ते दिसत राहिलं, खुणावत राहिलं. जपानमध्ये आल्यावर मात्र मी नशीबवान ठरले. इतक्या दाटीवाटीने वसलेल्या या शहरातही मला मोकळं विस्तीर्ण आकाश दिसणारी घरं मिळाली. त्यापैकी एक घर तर कायम लक्षात राहिल असे. पश्चिमेला काचेची मोठी मोठी तावदाने. त्यातही एक त्रिकोणी कोपरा घरापासून पुढे आलेला त्याला दोन्ही बाजूंनी काचा. आणि महत्वाचं म्हणजे समोर अथांग पसरलेले आकाश. पार दूरच्या क्षितिजापर्यंत आणि फुजी पर्वतापर्यंत मध्ये एकही उंच इमारत नाही. अहाहा! त्या त्रिकोणी कोपऱ्यात उभे राहिले कि आजूबाजूला फक्त अथांग आकाशच दिसे.

या घरातून आकाशाची इतकी विलोभनीय रूपे दिसली कि आकाशाने अगदी वेडच लावलं. कधी पहाटे पहाटे निळे गुलाबी आकाश आणि उडणारे पाखरांचे थवे दिसत. कधी फुजीपर्वताच्या माथ्यावर पडणारी केशराची किरणे दिसत . कधी ढगांशी लपाछपी करणारा मिश्कील निळा कृष्ण दिसे. कधी निळाशार अथांग पसरलेला सागर भासे, तर कधी सोनकेशराने न्हाऊन गेलेली सांज दिसे. कधी कधी मात्र दिवस दिवस वाट पाहून सुद्धा एखादा निळा कवडसाही दिसणे दुरापास्त होई. येणारा प्रत्येक दिवस एक नवीन रूप, नवीन छटा घेऊन येई. सकाळी उठल्यावर पहिल्यांदा खिडकी उघडून त्या निळाईचे आणि फुजीचे दर्शन घेत एक मोकळा श्वास घेऊन दिवसाची सुरुवात करण्यासारखे सुख नाही.

शक्य असतं तर हे घर कधी सोडलंच नसतं. पण सगळ्याच गोष्टी थोडीच आपल्या हातात असतात. त्यानंतरही दोनदा घरं बदलून झाली. या दोन्ही वेळा उगवतीला असेच मोकळे विस्तीर्ण आकाश. यावेळी पार अगदी समुद्रापर्यंत! पहाटे उठल्यावर उगवत्या सूर्यनारायणाचे दर्शन घेत दिवस चालू करायचा. आकाशाचा उगवतीचा रंगही दररोज नवा! कुठून इतके रंग आणतो तो एक देवच जाणे.

इथे डोंगरादऱ्यात फिरायला गेले कि या आकाशाचे नखरे विचारूच नका. गुलाबी साकुराच्या फुलांआडून दिसणारे निळेभोर आकाश, पोपटी पालवी कडे कौतुकाने पहाणारे ढगाळलेले आकाश, आणि रक्तवर्णी मोमिजीच्या पानातून दिसणारे निळेशार आकाश एकच असले तरी त्याची एक वेगळी कहाणी असते. तुम्ही लक्ष देऊन पाहाल, ऐकाल तर ते सांगेलही तुमच्या कानात. उंच उंच कड्यांच्याही वर असलेले आकाश या पर्वतांशी कोणते हितगुज करत असते तेच जाणे.
स्वतःचे रूप पाण्यात निरखायची भारी हौस आहे या आभाळाला. जरा कुठे पाणी दिसलं कि गेलंच हे डोकावायला.  मात्र  क्षितिजापर्यंत पसरलेल्या सरोवरात डोकावून पहाताना ते पाणीच केव्हा आकाशरूप होते हे त्या पाण्यालाही कळत नसावे.  झुंजुमुंजू व्हायच्या आधीच एकट्याने अशा, शांत निश्चल तळ्याच्या काठी बसावे. मग ते आकाश तळ्यात उतरून तुमच्याशी गुजगोष्टी करते. मात्र पहाटेचा थंड वारा सुटला, पाखरांची किलबिल वाढायला लागली  कि भानावर येऊन तळ्यातून चटदिशी निघून जाते. अशा कितीतरी पहाट मी त्या आभाळाशी गप्पा मारण्यात घालवल्या आहेत.  कधी पांढऱ्याशुभ्र बर्फाचे अप्रूप वाटून त्या मऊ बर्फाला स्पर्श करायला आभाळ डोंगरमाथ्यावर उतरते. मी जाऊन कधी पाहिले नाही पण तिथे आभाळाच्या पाऊलखुणा नक्की असणार अशी मला खात्री आहे. कधी त्या बर्फाचा हेवा वाटून तसलेच पांढरेशुभ्र ढग आणते निळ्या अंगणात खेळायला.   कधी सांजेची सोनेरी किरणं घेऊन तरूशिखरांवर  उतरते आणि तिथल्या पक्षांना आमंत्रण देऊन जाते. 

ट्रेनने दूरवरचे परतीचे प्रवास करताना संध्याकाळच्या, गर्द निळ्या, पावसाने ओथंबलेल्या आकाशाने गावातल्या घरा, शेतांवर निळी पाखर घातलेली पाहाणे म्हणजे एक दुर्मिळ योग. त्या तशा संध्याकाळ पहाण्यासाठी मी कितीही वेळ प्रवास करायला तयार होईन. अशा प्रवासात सगळे प्रवासी दमून भागून झोपलेले असतात. ही संधी साधून ते आकाश गुपचूप खाली उतरते. तुम्ही जागे राहिलात, त्याची वाट पहात राहिलात कि ते तुमचीही विचारपूस केल्यावाचून राहात नाही.

एकदा नभाशी नाते जडले कि ते सगळीच गुपितं तुम्हाला सांगायला लागते, तुमची सुख दुःख वाटून घेते!  आयुष्याच्या प्रवासभर तुमच्या साथीला थांबते. लहानपणी चांदोबा, चांदण्या दाखवते. कापसाच्या ढगांचे आकार दाखवून हसवते. कधी मिश्कीलपणा करायला दिवसभर काळ्या मेघांच्या आड लपून राहते. तुम्ही खट्टू होऊन परतायला लागलात कि हळूच एक निळा तुकडा दाखवून तुम्हाला खुणावते, चिडवते आणि पुन्हा सुख दुःखाची लपाछपी खेळायला लागते. कधी शांततेचा निळा डोह दाखवते  तर कधी संकटांच्या बिजलीचे रौद्ररूप दाखवते. कधी धुरकटलेले, राखाडी, निस्तेज, दुःखी दिसते तर कधी आनंदाचे इंद्रधनु घेऊन येते. कधी तेजोनिधीची सुवर्णझळाळी लेऊन उत्कर्षाची स्वप्न दाखवते तर कधी  गूढ गंभीर सांजेचे रूप लेऊन  शेवटाचा प्रवास दाखवते.
इतके सगळे साज लेऊनही त्या निळाईत न्हालेले आकाश! निळा रंग परमात्म्याचा. निळा रंग कृष्णाचा. निळा रंग नभाचा !
मनही ही असेच आकाशासारखे. अथांग! गूढ! गहन! शेवटच्या श्वासानंतर त्या निळ्या कृष्णात विलीन होणारे!



नीलवर्णी आभाळाचे, जडे नाते केशराशी 
मोहरल्या दिशा दाही, धरणी सुवर्णाच्या राशी.



पंच पंच उषःकाली, घेती पाखरे भरारी 
प्रकाशाचं लेणं तुला ,नभ केशरी केशरी.




पाण्यातले रूप तुझे, पाण्यालाही निळी काया.
बिंब कोण? रूप कोण? अवघीची तुझी माया.



मेघ खेळती अंगणी, किरणांचा लपंडाव 
हळदुले पडे ऊन, कुठे सावलीचा ठाव.



दाट मेघांच्या आडून, नभं बघते लाजून  
रंग तुझा मन निळा, कसा र्‍हायचा  लपून?


शुभ्र कापसाचे थवे, धरी फेर अंतराळी.
निळ्या आकाशाचे गाणे, वारा नेई रानोमाळी.   


नभा सावर सावर, रंग तुझा सांडला रे
तुझे निळाईचे देणे,कान्हा झाली धरणी रे!


मज लाविलेसी वेडू, नभा तुझ्या किती छटा?
तुझ्याप्रती पोहोचती, साऱ्या मोक्षरूपी वाटा.






Wednesday, October 12, 2011

आयएसओ आणि मेगापिक्सेल वॉर



काही वर्षापूर्वीच म्हणजे जेव्हा डिजीटल कॅमेर्‍याचे युग चालू झाले नव्हते तेव्हा नेहेमीच्या फोटो प्रिंटिंग दुकानातले बरेचजण सहज फुकटात सल्ला द्यायचे. ४०० आयएसओ वाली फिल्म घ्या छान फोटो येतात. मग काहीच माहीत नसलेले काहीजण ती फिल्म घ्यायचेच. आता दुकानदारानेच सांगितली म्हणजे चांगली असणारच हो! कधी त्याने काढलेले फोटो छानच यायचे आणि कधी कधी मात्र पांढरे पडायचे. असं का व्हायचं बरं ?

त्यासाठी फिल्मस्पीड म्हणजे नेमकं काय ते बघावं लागेल.

फिल्मस्पीड म्हणजे फोटोफिल्म प्रकाशाला किती सेन्सिटीव्ह आहे याचे मोजमाप आहे. ज्या फिल्मची प्रकाश सेन्सिटिव्हिटी कमी असते ती स्लो फिल्म तर ज्या फिल्मची प्रकाश सेन्सिटिव्हिटी जास्त असते ती फास्ट फिल्म.  ५०, १०० या स्लो फिल्म तर २००, ४००, १६०० या फास्ट फिल्म. हो, हो. आता तुम्ही नक्कीच म्हणाल कि स्लो फास्ट अशी नावं सांगून काय होतं?  तर फास्ट फिल्म म्हणजे या फिल्मवर अगदी बारीकसा प्रकाशही लगेच नोंद केला जातो. त्या उलट स्लो फिल्मवर प्रकाशाची नोंद व्हायला प्रकाश जास्त असावा लागतो. किंवा बारीकसा प्रकाश नोंद करण्यासाठी जास्त वेळ शटर उघडे ठेवावे लागते.

मग समजा, एखादा घरातला समारंभ आहे. तर प्रकाश अर्थातच कमी असणार. मग शटर स्पीड कमी होणार आणि कमी प्रकाशातले फोटो हललेले किंवा काळपट येणार. तुम्ही जास्त आयएसओ असलेली जसे २०० किंवा ४०० वाली फिल्म घेतली तर फास्ट शटर स्पीड मुळे हललेले(ब्लर) फोटो यायचे प्रमाण कमी होऊन कमी प्रकाशातही चांगले फोटो येतील. पण समजा हीच फिल्म घेऊन तुम्ही दुपारच्या रणरणत्या उन्हात फोटो काढायला गेलात कि काय होईल? खूप प्रकाश असल्याने कॅमेर्‍याला शटर स्पीड खूप वाढवावा लागेल. पॉईंट आणि शूट कॅमेर्‍यात इतका जास्त शटर स्पीड जात नसेल तेव्हा फोटो ओव्हर एक्सपोज होऊन पांढरट येतील.  म्हणूनच त्या वरच्या उदाहरणात काही जणांचे फोटो छान आणि काहींचे बिघडलेले का आले ते आता तुमच्या लक्षात आलेच असेल.

त्यामुळे फोटो काढायचे म्हणून फिल्म विकत घेताना या फिल्मने नक्की कुठले फोटो काढणार ते आधीच विचार करून ठेवावे लागायचे. आणि त्यानुसार फिल्म स्पीड घ्यायला लागायचा. एखाद वेळी फास्ट फिल्म कॅमेर्‍यात भरलेली असायची तेव्हा नेमका आकाशाचा फोटो काढायचा चान्स येणे असे प्रकारही व्हायचे माझ्याबाबतीत. पण आता डिजीटल युगाने या प्रश्नाची वासलात लावलेली आहे.

बऱ्याच डिजीटल कॅमेर्‍यात आणि डीएसएलआर मधे हवे तेव्हा आयएसओ बदलण्याची सोय दिलेली असते. ओह, पण डिजीटल कॅमेर्‍यात तर फिल्मच नाही मग फिल्मस्पीड कुठून आला? डिजीटल कॅमेर्‍यात सेन्सर किती सेन्सिटिव्ह आहे याचे मोजमाप म्हणजे हा स्पीड. म्हणजे जर आयएसओ ४००, ६४० असा ठेवला तर फास्ट शटर स्पीड मधे फोटो घेणे शक्य होते. आणि कमी स्पीड केलात कि तुलनेने जास्त शटर स्पीड ठेवता येतो / ठेवावा लागतो. मग नेहेमीच जास्त आयएसओ का बरं नाही ठेवायचा? मग नेहेमी फास्ट शटरस्पीड मिळेल कि नाही? तर त्यालाही कारणं आहेत.

जास्त आयएसओ म्हणजे सेन्सर जास्त सेन्सिटिव्ह. मग तो हवा असलेला प्रकाश पकडताना नको असलेला प्रकाशही पकडतो आणि फोटोमध्ये नॉइज दिसतो. नॉइज म्हणजे फोटोत अतिशय बारीक रंगीत किंवा साधेच अनेक ठिपके दिसतात. यामुळे फोटोची क्लॅरिटी, शार्पनेस कमी होतो. फिल्ममधेही जास्त आयएसओ मुळे ग्रेनी फोटो मिळतात. फिल्ममधला हा ग्रेनीनेस काही वेळा फोटोच्या विषयाची गरज म्हणुनही मुद्दाम मिळवला जातो.

काही डिजीटल कॅमेर्‍यात आणि डीएसएलआरमध्ये ऑटो आयएसओ असा ऑप्शन असतो. त्यात कॅमेरा हवे ते शटर स्पीड मिळवण्यासाठी आपोआप आयएसओ बदलतो. अगदी अंधाऱ्या जागी, म्युझियम मध्ये वगैरे फोटो काढताना हे चांगले आहे पण खूप जास्त आयएसओ असला तर मात्र फोटो फारसे बघण्या- दाखवण्यासारखे रहात नाहीत. फार फार तर फोटो हुकला नाही याचे समाधान मिळते.

प्रयोग-

तुम्ही यावेळी प्रयोग करताना अ‍ॅपर्चर कायम ठेवा. आयएसओ बदलून वेगवेगळ्या आयएसओला शटर स्पीड कसा बदलतो ते स्वतः प्रयोग करून पहा. जसजसा आयएसओ वाढवू तसा शटर स्पीडही वाढत जातो.


मेगापिक्सेल वॉर -

डिजीटल कॅमेर्‍यात वर सांगितल्याप्रमाणे नको असलेल्या प्रकाशाने नॉइज येतोच. शिवाय अजून काही कारणांनी तो वाढू शकतो.  कॅमेर्‍याच्या सेन्सर मध्ये पिक्सेल्स (म्हणजे प्रकाशबिंदु म्हणू हवं तर)असतात. एक एक पिक्सेलचा (प्रकाशबिंदुचा) प्रकाश जोडून पूर्ण डिजीटल इमेज बनवली जाते. पण हे पिक्सेल्स एकमेकांच्या इतके जवळ असतात कि त्याचाही एकमेकांना इंटरफिअरन्स होतो.

आता साध्या डिजीटल कॅमेर्‍याच्या किंमती कमी ठेवायच्या असतात आणि सेन्सर फार महाग असतो. हे गणित सोडवायला साध्या डिजीटल कॅमेर्‍याचे सेन्सर खुपच लहान केलेले असतात. त्यामुळे त्यांचे पिक्सेल्सही अगदी सूक्ष्म असतात. अशा सूक्ष्म आणि एकमेकांना चिकटून असलेल्या पिक्सेल मुळे नॉइज वाढतो.

कॅमेर्‍याचा सिग्नल(चांगला प्रकाश) टू नॉइज रेशो काढून तो कॅमेरा जास्तीत जास्त किती आयएसओ पर्यंत फोटो काढू शकतो हे ठरवलं जातं. म्हणून काही कॅमेर्‍यात आयएसओ ८०० पर्यंतच वाढवता येतं तर काही कॅमेर्‍यात २५६०० इतके जास्त सुद्धा असू शकते.

आता समजा एक कॅमेरा ६ मेगापिक्सेल आहे. तोच कॅमेरा ८ मेगापिक्सेल करायला काय करावे लागेल? एकतर ८ मेगा पिक्सेल्स मावणारा मोठा सेन्सर घ्यावा लागेल. पण त्यामुळे किंमत वाढणार. शिवाय मोठा सेन्सर म्हणजे मोठी जागा आणि तुलनेने कॅमेरा मोठा होणार. मग काय केले जाते? तर आहे त्याच ६ मेगापिक्सेलवाल्या सेन्सरच्याच मापाच्या सेन्सरमध्ये ८ मेगा पिक्सेल घुसवले जातात. तेवढ्या जागेत घुसवण्यासाठी पिक्सेल आणखी बारीक केले जातात. पण बारीक पिक्सेल म्हणजे परफॉर्मन्स कमी, नॉइजही तुलनेने जास्त.

म्हणजे तुम्ही भले १२ मेगा पिक्सेलचा कॅमेरा जास्त पैसे देऊन विकत घ्याल पण त्याने काढलेल्या फोटोची क्वालिटी ८ मेगापिक्सेलवाल्या कॅमेर्‍यापेक्षा चांगली असण्याची शक्यता फारच कमी. म्हणुन जास्त मेगा पिक्सेलच्या मागे जाण्यात फारसा अर्थ नाही. नेहेमीच्या घरातल्या फोटो करता खरेतर ५ मेगापिक्सेलही पुरेसे आहे. फार फार तर आठ मेगा पिक्सेल! त्यावर असलेल्याचा काही फायदा नाही. ८ मेगापिक्सेलने काढलेले फोटो तुम्ही सहज ए४ साईज मध्ये किंवा मोठेही प्रिंट करू शकता. आपण नेहेमीसाठी कितीवेळा अशा मोठ्या आकाराचे प्रिंट वापरतो त्याचा विचार तुम्हीच करा.

हम्म, तुम्ही विचारालच आता डीएसएलआर बद्दल. कंझ्युमर डीएसएलआर क्रॉप सेन्सरचे असतात. म्हणजे सेन्सरचा आकार साध्या डिजीटल कॅमेर्‍यापेक्षा मोठा पण ३५ मिमी वाल्या फिल्मपेक्षा छोटा असतो. क्रॉप सेन्सरमुळे कॅमेर्‍याचा आकार छोटा व्हायला मदत होते. शिवाय किंमत आटोक्यात रहाते. क्रॉप सेन्सरमुळे जितकी इमेज ३५ मिमीवाल्या फिल्मवर आली असती, त्यापेक्षा छोटी इमेज नोंदवली जाते. अर्थात प्रो कॅमेर्‍यापेक्षा फोटो क्वालिटी थोडी कमी होते पण साध्या डिजीटल कॅमेर्‍यापेक्षा बरीच चांगली असते. प्रोझ्युमर कॅमेर्‍यामध्ये बऱ्याचवेळा प्रो कॅमेर्‍याच्या क्वालिटीचा पण क्रॉप सेन्सर वापरला जातो आणि प्रो कॅमेर्‍यामध्ये ३५मिमि फिल्मच्या आकाराचा सेन्सर वापरला जातो. त्याला फुलफ्रेम कॅमेरा असेही म्हटले जाते. प्रो कॅमेर्‍याच्या मोठा सेन्सर, मॅग्नेशियम अलॉय बॉडी, डिझाईन, वेदर सिलिंग इत्यादी फिचरमुळे त्याची किमत वाढते.  मोठ्या आकाराच्या सेन्सरमुळे बहुतेक डीएसएलआर मध्ये जास्त मेगा पिक्सेल असले तरी नॉइज तुलनेने कमी दिसतो. मात्र प्रो कॅमेरे बऱ्याच जास्त मेगा पिक्सेलचे असले तरी क्वालिटी उत्तम असते. हे कॅमेरे खूप जास्त आयएसओलासुद्धा वापरण्यायोग्य चांगल्या इमेजेस देऊ शकतात.

तुम्ही तुमच्या कॅमेर्‍यामध्ये आयएसओ रेंज किती आहे हे आता वाचून बघा. नंतर वेगवेगळ्या आयएसओला कसे फोटो येतात, शटरस्पीड कसा बदलतो तेही प्रयोग करून करायला हरकत नाही.

अधिक -
गेले अनेक दिवस हा लेख लिहून तयार होता. पण मला फोटो टाकायला वेळ नव्हता. आता अजूनही पुढचे एखाद दोन महिने वेळ मिळण्याची शक्यता कमीच आहे. म्हणून तसाच लेख इथे देत आहे. हा लेख फोटो नसले तरी चालण्यासारखा आहे असे वाटतेय.


----------

*** सर्व फोटोग्राफ आणि लेखन कॉपीराईट प्रोटेक्टेड आहे. लेखिकेकडुन लिखित पूर्व परवानगीशिवाय हा लेख पूर्णत: किंवा अंशत: इतर कुठेही वापरता किंवा प्रकाशित करता येणार नाही.      ****
      
शुद्धलेखन सहाय्यासाठी मेघनाचे मनापासून आभार.

Thursday, October 6, 2011

आय फॉर आयफोन...

स्टीव्हन पॉल जॉब्स, एक कॉलेज शिक्षण अर्धवट सोडलेला हिप्पी आयुष्य जगणारा मुलगा तंत्रज्ञानाच्या विश्वात इतकी उलथापालथ घडवेल असा कुणी त्यावेळी विचारही केला नसावा. वयाच्या १९व्या वर्षी स्वतःच्या शोधात भारतात आलेल्या आणि 'निम करोली' बाबाच्या आश्रमात राहिलेल्या स्टीव्हने इथून काय नेलं ते त्याचं त्याला माहित! पण त्याची ही वाक्यं मात्र खूप काही सांगून जातात.

"Your time is limited, so don’t waste it living someone else’s life. Don’t be trapped by dogma – which is living with the results of other people’s thinking. Don’t let the noise of other’s opinions drown out your own inner voice. And most important, have the courage to follow your heart and intuition. They somehow already know what you truly want to become. Everything else is secondary" - Steve Jobs’ Stanford Commencement Address


“Almost everything–all external expectations, all pride, all fear of embarrassment or failure–these things just fall away in the face of death, leaving only what is truly important. Remembering that you are going to die is the best way I know to avoid the trap of thinking you have something to lose. You are already naked. There is no reason not to follow your heart.” – Steve Jobs’ Stanford Commencement Address

त्याचं पुढचं आयुष्य प्रचंड चढउतार आणि उलथापालथीने भरलेले होते. पण तो नेहेमीच स्वतःच्या मर्जीनुसार जगला. त्याचे सुरुवातीचे आयुष्य पर्सनल कॉम्प्युटर बनवण्याच्या आणि ते लोकांना विकण्याच्या ध्यासाने भारलेले होते. त्यातून Apple कंपनीचा जन्म झाला. सुरुवातीचे Apple कॉम्प्युटर खूप नावाजले गेले ते त्यातल्या पहिल्या स्प्रेडशीट प्रोग्राम VisiCalc मुळे. त्यानंतरचा Apple चा महत्वाचा प्रोजेक्ट होता लिसा कॉम्प्युटर. हा सर्वात पहिला ग्राफिक इंटरफेस असणारा कॉम्प्युटर!

बर्‍याच कारणामुळे स्टीव्ह लिसा प्रोजेक्ट मधून बाहेर फेकला गेला. तेव्हा जिद्दीने त्याने Macintosh प्रोजेक्ट वर काम करायला सुरुवात केली. खरंतर हेही कंपनी साठी खूप महत्वाचे प्रोजेक्ट बनले पण पुन्हा एकदा स्वभावाच्या कारणांमुळे स्टीव्ह चक्क Apple च्या बाहेर काढला गेला. याचवेळी त्याचे लक्षं अ‍ॅनिमेशन चित्रपट बनवणाऱ्या George Lucas आणि त्याच्या टीम कडे केले. ही कल्पना स्टीव्हला आवडल्याने त्याने ती कंपनीच विकत घेऊन Pixar ची सुरुवात केली.

शिवाय स्वतःच तयार केलेल्या कंपनीतून बाहेर काढले जाण्याच्या प्रकाराने हताश न होता त्याने नवी सुरुवात केली. NeXT ही कंपनी स्थापून पुन्हा एकदा नवीन कॉम्प्युटर आणि ऑपरेटिंग सिस्टीम बनवण्याच्या मागे लागला. युनिक्स सारखी मजबूत आणि Apple सारखा ग्राफिक इंटरफेस असणारी सिस्टीम बनवणे हे त्याचे ध्येय होते.

त्याच सुमारास १९९५ मध्ये 'पिक्सार'ने 'डीस्ने'चा 'टॉय स्टोरी' हा पहिला कॉम्प्युटर वापरून बनवलेला अ‍ॅनिमेशन चित्रपट बनवून प्रदर्शित केला आणि याच्या नावावर पिक्सारने प्रचंड पैसाही कमावला. Apple ला मात्र पुन्हा एकदा स्टीव्हची गरज भासली आणि स्टीव्ह Apple मध्ये परत आला. सुरुवातीला फक्त सल्लागार म्हणून आणि नंतर सीईओ म्हणून! सीईओ झाल्याच्या सहा महिन्यात Apple पुन्हा एकदा फायद्यात चालायला लागली.

स्टीव्ह मात्र एवढ्यावर समाधान मानणारा नव्हताच! iMac च्या सुंदर रूपाने पुन्हा एकदा कॉम्प्युटरच्या दुनियेत क्रांती आणली.

“In most people’s vocabularies, design means veneer. It’s interior decorating. It’s the fabric of the curtains of the sofa. But to me, nothing could be further from the meaning of design. Design is the fundamental soul of a human-made creation that ends up expressing itself in successive outer layers of the product or service.” – Fortune

इथून पुढे Apple ची घोडदौड Mac OS X कडे झाली जी मुळची NeXTSTEP होती. डिजीटल हब बनवण्यासाठी iMovie (1999), iTunes (2001), iDVD (2001), iPhoto (2002), iCal, iSync (2002), GarageBand (2004), iWeb (2006) यांची निर्मिती झाली.

पुन्हा एकदा iPod च्या निर्मितीने संगीत क्षेत्रात महत्वपूर्ण बदल झाले. सोनीने walkman बनवून जे बदल संगीत जगात आणले त्याच प्रकारचे किंवा जास्तच महत्वाचे बदल आयपॉड आणि आयट्यून मुळे झाले. संगीत विकत घेऊन ऐकणे अतिशय सोपे झाले.

२००७ मध्ये आलेल्या आयफोनने फोनच्या जगात आणि एकूणच माहिती आणि संपर्काच्या दुनियेत पार उलथापालथ केली. फोन हा केवळ संपर्काचे साधन राहिला नाही तर त्याहून अधिक काही बनला. आयफोनमुळे "दुनिया मुठ्ठीमे" हे शब्दशः खरं झालं. जगाला धक्का देण्याचे स्टीव्हचे काम अजून संपले नव्हतेच. २०१० मध्ये आयपॅड आला तो पुन्हा एकदा कॉम्प्युटर विश्वात क्रांती घेऊन!

या सगळ्या आय क्रांतीच्या दरम्यान २००३ पासून स्टीव कॅन्सरने ग्रस्त होता. अलीकडेच बरा झाला आणि पुन्हा आला. यावेळी ऑगस्ट मध्ये Apple मधून विश्रांती घेतो म्हणाला तेव्हा खरंच मला वाटलं होतं कि हा पुन्हा येणार नवीन काहीतरी घेऊन. पुन्हा एकदा या विश्वात बदल घडवायचे याचे प्लॅन असणार पण बहुधा नियतीला ते मंजूर नव्हतं. iPhone 4S च्या रिलीजच्या बातमी बरोबर स्टीव्हच्या जाण्याची बातमीही आली. मात्र नियती स्टीव्हला घेऊन गेली तरी तो विज्ञान तंत्रज्ञान विश्वातच नाही तर सामान्य माणसाच्या मनातही घर करून रहाणार. स्टीव्ह जॉब्सने आपला कॉम्प्युटर्स, संगीत क्षेत्र, अ‍ॅनिमेशन चित्रपट, फोन या विश्वांवर उमटवलेला ठसा कालातीत आहे.

आज माझी मुलगी आय फॉर आयफोन म्हणते, सफरचंदाला इंग्रजी मध्ये Mac म्हणते. टॉय स्टोरी मधल्या अ‍ॅन्डी च्या खेळण्यांबरोबर समरस होते, निमो हरवल्याने कावरीबावरी होते, हवं ते गाणं आयपॅड वर शोधून दे म्हणते तेव्हा आजच्या पिढीचे आयुष्य स्टीव्ह ने किती आमुलाग्र बदलले आहे याची जाणीव होते.

“Being the richest man in the cemetery doesn’t matter to me … Going to bed at night saying we’ve done something wonderful… that’s what matters to me.” - as quoted in The Wall Street Journal (Summer 1993).


Thanks a lot Steve. You have really changed our world.
You will be always remembered.


--------------------------------------------------




- सर्व माहिती इंटरनेट वरुन साभार
http://allaboutstevejobs.com/bio/short/short.html
http://www.macstories.net/roundups/inspirational-steve-jobs-quotes/

अत्यंद जलद मु.शो. साठी मेघनाचे मनापासुन आभार.