Monday, June 13, 2011

देवाचे बेट - मियाजीमा



तीन दिवसाची हिरोशिमा ट्रीप. त्यातला एक दिवस पूर्ण मियाजीमाला जायचे असे ठरवूनच गेलो होतो.
मियाजीमा म्हणजे म्हणे देवाचे बेट.इथले इत्सुकुशिमा नावाचे देऊळ फार प्रसिद्ध आहे. शेकडो वर्षापासून हे बेट पवित्र बेट म्हणून ओळखले जाते. सर्वसामान्य लोकांना या बेटावर येण्यासही बंदी होती.केवळ भिक्षु आणि साधू यांनाच या बेटावर प्रवेश होता. या बेटाचे पावित्र्य जपण्यासाठी या बेटावर म्हणे मृत्यू आणि जन्म दोन्ही गोष्टींना मनाई होती आणि आहे. अजूनही प्रेग्नंट स्त्रिया आणि अतिशय म्हातारी किंवा खूप आजारी माणसे बेटावरून हिरोशिमाच्या मुख्य भागाकडे जातात अशी माहिती गुगल सांगते.या बेटावर स्मशानही नाहीये. मृत्यू आणि जन्म अपवित्र का आणि चुकून एखाद्याचा मृत्यू झाल्यास काय हे मात्र अनुत्तरीत आहे.

इथल्या जंगलातली झाडे तोडायलाही पूर्ण बंदी होती. ती बंदी अजूनही आहे कि नाही हे माहीत नाही. पण नसावी कारण त्याशिवाय रस्ते, दुकाने हे झालेच नसते.  बेटावर हरणे भरपूर आहेत. त्याशिवाय आम्हाला एक कोल्ह्यासारखा दिसणारा प्राणी दिसला पण नक्की ओळखता आला नाही.इथले जंगल अजूनही दुर्गम आणि अतिशय सुंदर शांत आहे.

बहुतेक जपानी देवळांच्या दरवाज्याच्या समोर एक उंच लाकडी किंवा दगडी गेट सारखे वाटणारे खांब असतात. बहुतेक वेळा केशरी रंगात रंगवलेले हे खांब बघितले कि मला देवळासमोर तोरणं  लावलेली आहेत असेच वाटते. या खांबाचा अर्थ भौतिक जगातून पवित्र जगात जाणारा रस्ता असा काहीसा होतो असे ऐकले आहे. या गेटला जपानीमध्ये  तोरीइ म्हणतात. 
तर या इत्सुकुशिमा मधली ओ तोरीइ खूप मोठ्ठी आहे आणि ही समुद्रात आहे.ओहोटीच्या वेळेत या ओ तोरीइ पर्यंत चालत जाता येते. मात्र भरतीच्या वेळेस ही समुद्रात तरंगत असल्यासारखी दिसते. पूर्वी बेटावर येणाऱ्या लोकांना या तोरीइ मधून बोट घेऊन यावे लागे. हे मंदिरही एखाद्या बंदराप्रमाणे आहे. बोट घेऊन आल्यावर उतरायला धक्का सुद्धा आहे. भरतीचे पाणी ओ तोरीइ पार करून पार इत्सुकुशिमाच्या देवळाच्या खालपर्यंत पोचते. त्यावेळी हे सम्पूर्ण देऊळ पाण्यावर उभे असल्यासारखे दिसते. भौतिकाकडून आधी भौतीकाकडे असा प्रवास दाखवण्यासाठीच हे देऊळ जमिनीपासून दूर पाण्यावर असल्याप्रमाणे बांधले आहे असे म्हणतात.

युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून नोंदलेले देऊळ आणि ओ तोरीइ दोन्ही लाकडी आहेत. ओ तोरीइ camphor (म्हणजेच कापूर का?)च्या लाकडापासून बनवली आहे. त्याशिवाय या ओ तोरीइचे वैशिष्ठ असे म्हणतात कि ती जमिनीमध्ये गाडलेली नाही. ती नुसती समुद्राच्या वाळूवर ठेवलेली आहे. रुंद तळ असल्याने स्वत:चा भार तोलत ती शेकडो वर्षे उभी आहे. समुद्राच्या भरती ओहोटीचा तिच्यावर काही परिणाम होत नाही.

या ठिकाणी भेट द्यायचे बरेच दिवसापासून मनात होते. आम्ही बोटीमधून आलो तेव्हा ओहोटी होती आणि ओ तोरीइ च्या जवळ लोकही दिसत होते. पण बोटीतून उतरून तिथे जाई पर्यंत भरतीचे पाणी चढायला सुरुवात झाली होती. त्यामुळे ओ तोरीइला हात लावता आला नाहीच. अक्षरश्: सेकंदा सेकंदाला पाणी पुढे येत होते. इथे यायचे म्हणून मी मुद्दाम गमबुट घालून आले होते. त्यामुळे थोड्याफार पाण्यात उभे राहून फोटो काढता आले. पण फार वेळ उभे रहाण्यात अर्थ नव्हता.अगदी आत्ता वाळू दिसत असलेला भाग क्षणात घोटाभर पाण्यात बुडून जात होता. आजचा बहुतेक वेळ अगदी पावसाळी हवा आणि आकाश भरून आलं होतं. असलं आकाश असलं कि फार खराब फोटो येतात. पण नशिबाने थोडीशी साथ दिली आणि काही मिनिटे तरी निळ्या आकाशाचा एक तुकडा दिसला.त्या निळ्या तुकड्यांबरोबर ढगाळ हवे मुळे एक वेगळाच कुंद असा परिणाम मिळत होता. 


पाणी नुकतेच चढत असताना या दगडावरून सहज जाता येत होते. आम्ही इथून दोन चार मिनिटात देवळाच्या आत पोचलो तोपर्यंत मात्र हे दगडही पाण्यात बुडून गेले होते. अजून देऊळ मात्र वाळूतच दिसत होते.


संध्याकाळी सहा वाजता पुन्हा भरती असणार होती त्याआधी पुन्हा एकदा देवळात गेलो. यावेळी मात्र हे देऊळ पूर्ण पाण्यात उभे होते आणि ओ तोरीइ अगदी पार समुद्राच्या मध्ये असल्यागत वाटत होती. इथे सूर्यास्त बघण्याचा माझा प्लान होता. पण  सूर्य अधिक ढगात लपल्याने सूर्यास्त काही दिसलाच नाही.

 






Friday, June 3, 2011

रंगवुनी आसमंत

रंग आणि गंधाची बरसात करणारा ऋतू म्हणून आपण वसंताचं नेहेमी गुणगान गातो. हिरवेगार गालिचे देणाऱ्या वर्षाऋतूचंहि आपण मनापासून कौतुक करतो. शरदऋतूच्या चांदण्यात भिजलेल्या रात्रिंनीही कवींना नेहेमीच भुरळ पाडली आहे. पण शरद किंवा हेमंतामध्ये वातावरणात होणारे इतर बदल मात्र मी कधी फारसे टिपले नव्हते.

इथे जपानमध्ये आलो आणि सुरुवातीचे काही दिवस  असेच जवळपास भटकण्यात गेले. नंतर हिवाळा आल्यावर माउंट फुजीवर जाणे होणार नाही अस वाटून आम्ही ऑक्टोबरमध्ये म्हणजे  हिवाळ्याच्या सुरुवातीलाच बसने जाता येतं तिथपर्यंततरी जावे असा विचार करून निघालो. शेवटचा बसचा तासाभराच्या प्रवासाचा टप्पा पार करून फुजीच्या मध्यापर्यंत पोचता येतं. त्या प्रवासात घाटातून दिसणारी दरी मात्र अप्रतिम होती. तिथे आजूबाजूला खूप उंच असे दुसरे डोंगर नसल्याने अथांग पसरलेली शेते, छोटे डोंगर, जवळपासचे उन्हात चमकणारे तलाव अस सगळ सुंदर दिसत होतं. मग ढगांच्या कापसात बस शिरली ती बराच वेळ बाहेर पडेना. अचानक एका वळणावर कापसाला मागे टाकून बस वर आली. त्या वळणावर दिसलेलं दृष्य मात्र कधी मनातून पुसताच येणार नाही इतक अवर्णनीय होतं. सगळी झाडे पिवळ्या धम्मक रंगाची आणि मध्ये मध्ये केशरी पानांचा शिडकावा. फक्त दोन सेकंदात हे स्वर्गरूप दाखवून बसने परत एक वळण घेतलं. बस पुढे चालली होती मात्र माझं मन तिथेच त्या वळणावर रेंगाळलं. हि माझी आणि शरदाची पहिली नजरभेट.

 काही वेळाने बस थांबली आणि आम्ही उतरलो. इथे मात्र धुक्यात लपंडाव खेळणारी तसलीच पिवळी केशरी झाडं, काळ्या खडकाळ  जमिनीतून     निघालेली पांढरीशुभ्र निष्पर्ण खोडं आणि मधूनच दिसणारे आकाशाचे निळे तुकडे. स्वर्गच जणू. नेहेमी हिरवीगार झाडे पहायची सवय असलेल्या डोळ्यांना हि धुक्यात लपाछपी खेळणारी लाल केशरी रंगाची उधळण वेडच लावत होती.


जपानमधला हा ऑटम इतकं रंगवून टाकेल असं आधी कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. इथला हा रंगोत्सव शरदऋतू मधे सुरु होउन हेमंतऋतू मधेही चालु असतो. शरद हेमंताच्या या अप्रतिम लावण्याने अशी काही भूल घातली की  तिथून परत आल्यावर आमच्या सगळ्याच सुट्ट्या हि रंगपंचमी बघण्यासाठी भटकण्यात जाऊ लागल्या.
हळुहळू कधी, कुठल झाड कसं नटतं हे ही लक्षात यायला लागलं होतं. एरवी मॅपलची हातभरापेक्षा मोठी पानं क्वचित सिनेमामधे पाहिलेली आठवत होती. पण जपानी मॅपलच्या, मोमीजीच्या  नाजुकतेने मात्र वेडच लावलं. इतक्या नाजुक, सुंदर, कोरीव पानांचा हा वृक्ष जेव्हा लालचुट्टुक रंगाची शाल ओढतो तेव्हा लक्षलक्ष चांदण्या फुलल्या सारखा दिसतो.




मग कधी दिसतो तो पिवळ्या धम्मक पानांनी डवरलेला गिन्को. तो अजुनही इतका डवरलेला दिसतो कि खाली पसरलेला त्याचा सडा पाहून प्रश्न पडावा 'हा पडलेला पर्णसंभारही नक्की याचाच का?' वार्‍याच्या प्रत्येक झुळकेबरोबर काही पिवळी पाने झाडाचा हात सोडून  भिरभिरत, तरंगत खाली येउन विसावतात.  आणि खालच्या सड्याला अधिकच समृद्ध करतात. त्या भिरभिरणार्‍या  पानांबरोबर मनही हल्लक होउन तरंगायला लागते.


   
पहिल्या वर्षाच्या या नेत्रसुखद अनुभवानंतर मात्र शरदाचं आगमन मला रंगदर्शना आधीच जाणवायला लागलं. आकाशाचा बदललेला गूढगंभीर निळाशार रंग, हवेतला एक प्रकासाचा सौम्यपणा, भरदुपारच्या उन्हात सुद्धा आलेला एक सुखद हळवेपणा हे  शरदाची वर्दी द्यायला लागतात आणि माझं मन धावत दऱ्याखोऱ्यात डोंगरावर भटकायला जातं. तिथेच तर आधी हजेरी लावतो ना हा, आणि मग हळूहळू सगळ्या जपानला आपल्या कवेत घेतो.

मग दरवर्षीची माझी एक ठरलेली फुजी ट्रीप असतेच.  शारदरंगात नटलेला हां पर्वतराज दरवर्षी वेगळी रूपं दाखवतो. कधी धुक्याची मलमल, तर कधी क्षितिजाला कवेत घेणारा निळाभोर रंग.  हि निळाई अनंताची. त्या निळाईला स्पर्श करायला मान उंच करणारे पिवळे केशरी सेडार वृक्ष, लाल मॅपल. जणू या तीन मूळ रंगामधूनच सृष्टीला रंगवून काढलं असावं. या रंगाबरोबरच पहिल्या वर्षी तिथे पाहिलेल्या सुंदर पांढऱ्याखोडाच्या काही  झाडांचे दर्शन घ्यायला दुसऱ्यावर्षी मी आसुसले होते, पण ते नशिबातच नव्हतं. तेवढी  तीच
झाडे  वाऱ्यापावसाने उखडून गेली होतं. हा त्या झाडांचा एकच फोटो  आहे माझ्याकडे, बाकि फक्त मनात आहेत ती माझ्या.



फुजी ट्रीप नंतर मग धाव असते कुठल्यातरी आरस्पानी पाण्याच्या तलावाकड़े. सुर्योदयाच्यावेळी उठून फेरफटका मारला की अगदी पार तळ दिसणार्‍या त्या स्फटिकासमान, स्थिर पाण्यात  आपलच रुपडं पाहणारे वृक्ष दिसतात.  आपला साज शृंगार कसा झाला आहे याची खात्री करत असावेत जणू.   त्या वातावरणात एकटच चालताना मन सुद्धा त्या  झाडांसारख निशब्द होऊन आपलच प्रतिबिंब शोधायला लागतं .

कधी पायवाटा पिवळ्या सड्याने हळदुल्या करणारे गीन्कोचे सुवर्णवृक्ष सामोरे येतात . प्रत्येकाचा रंग अगदी पारखून घ्यावा इतक्या चोख सोन्याचा. असल्या वाटा पावलांना भुरळ  न घालतील तरच नवल. अशा वाटानाही भेट द्यावी ती सकाळीच. पडलेला पर्णसंभार अजुनही तसाच नाजुक असतो. आणि त्यावर कोवळ्या उन्हातल्या सावल्यांचा खेळ सकाळी जितका मनमोहक दिसतो तितका दुपारी नाही दिसत.
  

या असल्या वाटांनी चालताना श्रम तर होतच नाहीत पण तरीही  या सुवर्णसड्यात भिजलेला एखादा असा बाक क्षणभर विसाव्याची ओढ़ लावतोच.  या बाकाने असे कित्येक शरद, हेमंत पाहिले असतील पण तरीही प्रत्येक वर्षीचं नाविन्यही त्याला नक्कीच जाणवत असेल.  प्रत्येक  वर्षाच्या अनुभवाने तो अधिकच समृद्ध होत असेल.

मोकळ्या माळरानावर वारया पावसाशी लढत एकटा उभा रहाणारा एखादा गिन्को एरवी साधाच दिसतो. पण यावेळी बघाल तर  दिसतो तो  खालच्या हिरवट गवतावर सोनफुले उधळणारा श्रीमंत सुवर्णवृक्ष. या असल्या सुवर्णवृक्षाखाली विश्रांतीला आलेल्या त्या पांथस्थाचा हेवाच वाटावा नाही? असली सोनफुले उशाशी घेउन झोपल्यावर स्वप्न सुद्धा सोनेरी होत असावीत .


कधी एखाद्या वळणावर दिसतात एकमेकांशी स्पर्धा करणारे असे हळदी कुंकुवा सारखे वृक्ष. हिरव्या ऋतूत बेमालूमपणे एकत्र झालेले हे, आता मात्र स्वत:चं अस्तित्व सिद्ध करताना दिसतात. स्वत:ची एक ओळख निर्माण करतात.



वाटतं, कसला हा उत्साह यांचा! वार्धक्याचे क्षण सुद्धा असे रसरसून जगतात. आनंद वाटत आणि सगळ्यांना विरहाची हुरहूर लावत पानगळ स्वीकारतात. सगळ्या धरणीला सुद्धा आनंद सड्यात न्हाऊ घालतात.


मारुती चितमपल्लींच्या पुस्तकात एकदा वाचलं होतं , कि काही माकडे हिवाळ्यात लाकडाची शेकोटी रचून आग न पेटवता त्या भोवती बसून शेकतात. आणि नंतर ही  लाकडे पेटत नाहीत, जणूकाही  त्यातलं अग्नितत्व माकडानी खेचून घेतलं असाव. हे असले अग्नीरंगांचे वृक्ष बघितले कि मला त्याची नेहेमी आठवण येते. वाटतं हे वृक्ष स्वतःमधली उरली सुरली धग अशी पानगळीतून पृथ्वीला दान करत असावेत. येणाऱ्या हिवाळ्यापासून पृथ्वीला वाचवण्यासाठी तिला  पांघरूण देत असावेत.
वाटतं, दातृत्व अस असावं. माणसाकडे ते असणं कधीच शक्य नाही.



  

Thursday, June 2, 2011

शॉकप्रुफ, वॉटरप्रुफ, डस्टप्रुफ, फ्रिजप्रुफ

शॉकप्रुफ, वॉटरप्रुफ, डस्टप्रुफ, फ्रिजप्रुफ हे नक्की कशाचे वर्णन असेल असे वाटले का? तर हे डिजिटल कॅमेर्‍यांचेच वर्णन आहे. सगळ्या ट्रेकर्स , स्नोर्कलर्स, हायकर्स, स्नोबोर्डस यांच्या मागण्यांना कॅमेरा कंपन्यांनी दिलेले उत्तर म्हणजे असे कॅमेरे आहेत.

सहसा साधे डिजीटल कॅमेरे फारच नाजुक असतात. पडले तर पार्ट आणि पार्ट वेगळा होतो. (हो मी पाडुन बघितलाय एक. त्याचं एक बटन हरवलं ते कधी मिळालच नाही पुन्हा.) शिवाय यांना पाणी लागलं, वाळु लागली, फार थंडी लागली कि हे कॅमेरे नीट काम करत नाहीत.

मग ट्रेकर्स , स्नोर्कलर्स, हायकर्स, स्नोबोर्डस नी काय करायचं? कारण यांना तर अशाच अतिविषम वातावरणात जायची हौस असते. आणि फोटो सुद्धा काढायचे असतात. अशांसाठीच आहेत हे वरच्या वर्णनाचे कॅमेरे.

आता इथे भारतातही पावसाळी सहलीला जायची टुम येईल. पावसात , धबधब्यात भिजताना केलेली मज्जा मित्र मैत्रिणींना फोटोच्या रुपात दाखावावेसे वाटेल. पण ते नेहेमीचे कॅमेरे नेले की त्यांना सांभाळण्यात जास्त त्रास होतो नाही? म्हणुनच हि माहिती देतेय तुमच्यासाठी.

यातला कुठलाही कॅमेरा मी स्वतः वापरुन बघितला नाही त्यामुळे इमेज क्वालिटी किंवा वापर यावर जास्त काही सविस्तर लिहु शकत नाही. हि नुसती आपली तोंडओळख.

कॅसिओ -

Casio Rugged EXILIM G EX-G1

http://www.dpreview.com/news/0911/09111801casioexg1.asp

(२००९)

G-SHOCK® ची घड्याळे बनवणार्‍या कॅसिओ ने त्याच प्रकारचा कॅमेरा बनवला.

- शॉकप्रुफ : ७ फुटावरुन.

- वॉटरप्रुफ : ६० मिनीटे सतत १० फुट खोल पाण्यात.

- डस्टप्रुफ : नाही

- फ्रिजप्रुफ : नाही

- क्रशप्रुफ : नाही

- जिपिस सुविधा : नाही



ऑलिम्पस -

TG-810, (जुने TG-610, TG-310)

http://www.olympusamerica.com/cpg_section/product.asp?product=1548

- शॉकप्रुफ : ६.६ फुटावरुन.

- वॉटरप्रुफ : नाही

- डस्टप्रुफ : नाही

- फ्रिजप्रुफ : -10°C

- क्रशप्रुफ : आहे

- जिपिस सुविधा : आहे

- व्हिडियो : नाही

जुनी मॉडेल्स जरा वेगळी असु शकतात.


STYLUS TOUGH-8010, (जुने: STYLUS TOUGH-6020, STYLUS TOUGH-3000)

http://www.olympusamerica.com/cpg_section/product.asp?product=1497

- शॉकप्रुफ : ६.६ फुटावरुन.

- वॉटरप्रुफ : ३३ फुट खोल पर्यंत

- डस्टप्रुफ : नाही

- फ्रिजप्रुफ : -10°C

- क्रशप्रुफ : 220LBF

- जिपिस सुविधा : आहे

- व्हिडियो : आहे



कॅनन -

Canon PowerShot D10

http://usa.canon.com/cusa/consumer/products/cameras/digital_cameras/powershot_d10

- शॉकप्रुफ : १.२ मी पण कंपनीची गॅरंटी नाही

- वॉटरप्रुफ : १०मीटर/ ३३फुट खोल पर्यंत

- डस्टप्रुफ : आहे

- फ्रिजप्रुफ : -१०°C

- क्रशप्रुफ : नाही

- जिपिस सुविधा : नाही

- व्हिडियो : नाही



फुजी -

FinePix XP10

http://www.fujifilm.com/products/digital_cameras/xp/finepix_xp10/

- शॉकप्रुफ : १ मीटर.

- वॉटरप्रुफ : ३मीटर खोल पर्यंत

- डस्टप्रुफ/मडप्रुफ : आहे

- फ्रिजप्रुफ : -10°C

- क्रशप्रुफ : नाही

- जिपिस सुविधा : नाही

- व्हिडियो : नाही



पॅनासॉनिक -

DMC-TS2(FT2)

http://panasonic.net/avc/lumix/compact/ts2_ft2/

- शॉकप्रुफ : १ मीटर /६.६ फुट.

- वॉटरप्रुफ : १०मीटर/ ३३फुट खोल पर्यंत

- डस्टप्रुफ : आहे

- फ्रिजप्रुफ : -10°C

- क्रशप्रुफ : नाही

- जिपिस सुविधा : नाही

- व्हिडियो : आहे



सोनी -

Sony Cyber-shot TX5

http://www.dpreview.com/news/1002/10021801sonytx5h55.asp

- शॉकप्रुफ : ५ फुट.

- वॉटरप्रुफ : १०फुट खोल पर्यंत

- डस्टप्रुफ : आहे

- फ्रिजप्रुफ : -10°C

- क्रशप्रुफ : नाही

- जिपिस सुविधा : नाही

- व्हिडियो : आहे



पेंटॅक्स -

PENTAX Optio WG-1 GPS

http://www.pentaximaging.com/digital-camera/Optio_WG-1_GPS_Green/

- शॉकप्रुफ : ५ फुट.

- वॉटरप्रुफ : १०मीटर/ ३३फुट खोल पर्यंत

- डस्टप्रुफ : आहे

- फ्रिजप्रुफ : -10°C

- क्रशप्रुफ : १०० किग्रॅ पर्यंत

- जिपिस सुविधा : आहे (हि सुविधा नसलेला Optio WG-1 सुद्धा उपलब्ध आहे)

- व्हिडियो : आहे
हा मी बघितला आहे. खरच छान वाटतोय.