Wednesday, May 4, 2011

निळावंतीची निळाई


कालच्या हिताचीनाका कोएनच्या भेटीचे मुख्य कारण  होती नेमोफिला ही इवलाली फुलं. या पार्कची जाहीरातच इतकी आकर्षक होती की माझ्याकडुन दुर्लक्ष झालच नाही.  हि फुलं आधी कधीच पाहीली नव्हती त्यामुळे नक्की किती मोठी किंवा छोटी असतील याचा अंदाजही नव्हता.  फुलांची बाग खुप मोठ्ठी आहे याचा अंदाज जाहीरात बघुन आला होताच.
म्हणुन मग परवा सकाळीच हिताची नाका कोएन ला गेले. त्या भेटीच्या अर्ध्या भागाचे म्हणजे ट्युलिपचे फोटो इथे आहेत. तर या ट्युलिप गार्डन मधुन कसाबसा पाय काढला . पार्क मधले साईन बोर्ड वाचत वाचत नेमोफिलाच्या दिशेने निघाले होते. एका वळणावर समोर जे आले त्याने अक्षरशः थक्क झाले.

समोर आहे ती बाग आहे कि क्षितीजाला भिडलेला निळा समुद्र आहे हेच कळेना.  म्हणजे आधी जो अंदाज वगैरे आला असे वाटले होते ते चुकलेलेच होते. ही अथांग पसरलेली निळाई वेड लावणारी होती.  या फुलांचे मराठीमधले नाव माहीत नाही पण त्याक्षणी डोक्यात आले ते निळावंती.

निळावंती हि खरतर प्राण्याची भाषा जाणण्याची कला. पण योग्य प्रकारे साध्य न झाल्यास या कलेमुळे वेड लागते असे मिथक आहे.  पण इथे समोर पसरलेली निळाई इतकी सुंदर होती की तीचं वेड न लागलं तरच नवल. कोट्यावधी निळ्या इवल्याला फुलांचा गालीचा पायासमोरपासुन उंचावरच्या टेकाडांवर पसरलेला. त्या टेकाडांमधुन जाणार्‍या वळणा वळणांच्या वाटा, आणि त्या वाटांमधुन जाणारे  रसिक जे स्वतःला त्या निळ्या समुद्रात झोकावून द्यायलाही तयार झाले असते.  म्हणुनच निळावंतीची हि निळाई!

आकाशाचा सगळा निळा रंग  पांघरून बसलेली हि चिमुकली फुलं  अशी कोट्यावधींच्या संख्येत लावून त्यांचा समुद्र करायची ज्याची कोणाची कल्पना असेल त्याच्या कल्पनाशक्तीला सलाम.  या निळाईच्या प्रत्येक फुलाला त्याच्या सुंदरते साठी गोंजाराव अशी इच्छा झाली पण त्यासाठी माझा जन्मही अपुरा पडला असता. त्यापेक्षा या देखाव्याला जमेल तसं कॅमेर्‍यात उतरवलं आणि निळावंतीच्या या निळाईत स्वतःला विसरण्यातच समाधान मानलं.


नाव : नेमोफिला Nemophila
फॅमिली : Hydrophyllaceae
वापरातले नाव : बेबी ब्ल्यु आईज (baby blue-eyes)
हिनाचीनाका कोएन मधे लावलेली रोपसंख्या : ४५००००० रोपे












देखा एक ख्वाब तो ये...




अनेक वर्षापूर्वी जेव्हा सिलसिले मधले 'देखा एक ख्वाब' हे गाणे बघितले होते तेव्हाच मनाशी ठरवले होते की या ठिकाणी मला जायचेय. विविध रंगानी रंगलेले ट्युलिप गार्डन तेव्हा स्वप्नवतच वाटले होते. अशा गार्डन मधे कुणाबरोबर तरी फिरण्याचे स्वप्न तेव्हाच रंगवून टाकले असणार मी. अर्थात तेव्हा कुणाबरोबर वगैरे ते महत्वाचे नव्हतेच. या अशा फुलांच्या ताटव्यांमधुन जाणार्‍या धुक्याने भरलेल्या वाटा तेवढ्या महत्वाच्या होत्या!

लग्न झाल्यावर नवर्‍यालाही हे स्वप्न सांगुन झालं पण त्याने सिलसिले हा सिनेमाच पाहीला नसल्याने आणि तेव्हा युट्युब वगैरे काही उपलब्ध नसल्याने मी जे काही वर्णन केलं ते त्याने ऐकून घेतलं आणि फक्त हो जाऊयात इतकच म्हणाला.

आता अनेक वर्षांनीही हे स्वप्न त्या ट्युलिपच्या  रंगांएवढेच  ताजेतवाने राहिलेय. ती सिनेमामधली बाग हॉलंड मधली आहे वगैरे ऐकीव माहीती मिळाली आणि तिथे जाण्याचा योग कधीतरी यावा अशी एक आशा मनात होती.

मागच्या वर्षी जपान मधल्या हिताचीनाकाकोएन म्हणुन एका पार्कची माहीती मिळाली आणि तिथेही योग्य सिझन मधे गेल्यास ट्युलिपच्या बागा बघायला मिळतील हे कळले.   त्याप्रमाणे जायचा प्लॅन होता यावर्षी  पण वसंताच्या आगमनाच्या त्याच काही दिवसात भारतात असल्याने यावर्षीही तो चान्स हुकला म्हणुन हळहळतच होते.  पार्क कॅलेंडर प्रमाणे एप्रिल चे दोन आठवडे फक्त ट्युलिपचा सिझन असणार होता. मे महिना उजाडल्यावर   नेमोफिला नावाच्या निळ्या फुलांचा सिझन चालू होणार होता.
आता ट्युलिप नाही तर नेमोफिला तरी बघावित या विचाराने काल हिताचीनाकाकोएन ला निघाले.  बरच लांब असल्याने आणि मी फक्त फोटोग्राफी या उद्देशाने जात असल्याने एकटीच जायचं असे ठरवले.


साधारण तीन एक तास ट्रेन आणि मग बसने प्रवास करुन शेवटी त्या कोएन म्हणजे पार्कच्या गेट पाशी उतरले. तिथे मॅप बघताना उगीचच तिथल्या मुलीला कुठली फुलं आता बघता येतील असा प्रश्न केला आणि तीच्या ट्युलिप या उत्तराने एक आनंदाचा धक्काच बसला. अर्थात पहिली भेट तिथेच दिली.
एकूण ७० प्रकारच्या आणि विविध रंगांच्या या ट्युलिपच्या बागा प्रत्यक्षातही तितक्याच अप्रतिम दिसत होत्या. त्यांचे वर्णन वगैरे करण्यासाठी तर माझ्याकडे शब्दच नाहीत त्यामुळे तुम्ही  सरळ फोटोच पहा.

नेहेमीचा ५डी मार्क २ भारतात ठेवल्याने २०डी आणि त्याची १७-८५ लेन्स आणि १५मिमि सिग्मा लेन्स  बरोबर घेतल्या.  हा निर्णय अगदी योग्य होता हे मला तिथे गेल्या गेल्या कळलं. १७-८५ लेन्स वाईड अँगल ला नेल्यावर म्हणजे २४ च्या पेक्षा कमी सेटिंगला ठेवल्यावर कॅमेरा हँग होत होता. हा प्रॉब्लेम आधीही आलेला पण मीच इग्नोर केला होता. पण आता मात्र हे सारखच होत होतं. शेवटी सगळेच्या सगळे फोटो १५मिमि सिग्माने काढले आहेत. फक्त ती २०डी वर लावल्याने १५ मिमि ऐवजी २२मिमि सारखी वापरली गेली आणि अल्ट्रा वाईड न दिसता फक्त वाईड दिसली.