Saturday, December 3, 2011

Under the Sky of Paris

पॅरिसला जाऊन फक्त लूव्र बघायचे आहे इतकेच काहीसे डोक्यात होते. त्याच बरोबर सेंट मॉनमिशेल बघायचे असेही होते. पण जसजसे माहिती काढत गेले तसे तिथे बघायला खूप काही आहे हे जाणवले. मायबोलीकर Sam आणि अस्चीग कडून खूप उपयोगी माहिती मिळाली आणि १२ दिवसांच्या फिरतीचा आराखडा तयार झाला. सगळे बुकिंग स्वतःच शोधून करायचे असे ठरवले त्याचा फायदाही झाला पण त्यासाठी फार वेळ मात्र द्यावा लागला. १२ दिवसातले पहिल्या दोन रात्री पॅरिसमध्ये पुढचे काही दिवस रोम आणि फ्लोरेंस मध्ये आणि पुन्हा शेवटच्या चार रात्री पॅरिस मध्ये होत्या. रात्रीच्या हिशेबात पाहिले तर बराच काळ वाटला तरी प्रवासात रात्री पोहोचणार असल्याने एकूण फिरण्याचे दिवस तसे कमीच होते. त्यात पुन्हा एक दिवस देऊन सेंट मॉनमिशेल ला जाणे शक्य नसल्याचे लक्षात आल्याने ते रद्दच केले.

साधारण संध्याकाळी मुक्कामी पोहोचू असा अंदाज होता. पण कोपेनहेगनला विमान २ तास उशिरा निघाले. पुढच्या सगळ्यालाच अर्थात उशीर झाला. अगम्य उच्चाराच्या पॅरिस विमानतळावर पुढच्या बसची चौकशी केल्यावर आपले उच्चार इथल्या लोकांच्या आणि इथले उच्चार आपल्या पचनी पडणारे नाहीत हे लग्गेच धान्यात आले. गेअर मोन्टपार्नासे असा मराठीच्या ठेक्यात केलेला खणखणीत उच्चार तिथल्या कन्यकेच्या कानाच्या पार वरून गेला. मग जपानमध्ये आल्या आल्या शिकलेली चिन्ह-हातवारे-कागदीघोडे यांची भाषा वापरून बस मध्ये एकदाचे बसलो. तो पर्यंत जायच्या ठिकाणाला गेआ मोन्पानाझ असे काहीसे म्हणतात असे कानांना कळले होते (म्हणजे उच्चारता येत नाही पण ऐकल्यावर कळते असे.) अशा उच्चाराच्या ठिकाणी मोठी ब्याग घेऊन उतरलो. इथून पुढे फक्त ८ मिनिट चालायचे होते पण कुठल्या दिशेला चालायचे हे आमचे दोघांचे नक्की होईना. शेवटी Taxi ला शरण जाऊन दोन चार मिनिटात पोहोचलो. इथे मात्र गुगल म्याप्स च्या कृपेने हॉटेलचा चेहेरा! वगैरे आधीच शोधून ठेवल्याचा फायदा झाला.

हसतमुख चेहऱ्याने इराशशाईमासे वगैरे ऐकण्याची सवय झालेल्या आम्हाला एका निर्विकार चेहऱ्याने रूमची चावी दिली आणि जपानच्या पहाटे झोपेच्या आधीन झालो.
दुसरा दिवस आमच्यासाठी फारच लवकर उजाडला आणि आम्ही अगदी भल्या सकाळी निघालो सुद्धा. दोन मिनिटे चालल्यावर समोरच एक मोठठा बाझार नुकताच चालू होताना दिसला. लोकल बाझार बघणे हे अत्यंत आवडीचे काम असल्याने अर्थातच तिथे वेळ घालवला. आजूबाजूच्या शेतामधली फळफळावळ, भाज्या, ताजे मांसमासे, नवनवीन प्रकारचे ब्रेड, मसाले, स्कार्फ, कपडे काय वाट्टेल त्या वस्तू तिथे होत्या. फ्रेंच माणसे एकमेकांशी गप्पा मारत आपापले दुकान सजावट होती. काहीशी आनंदी , काहीशी आपल्यातच मग्न असलेली. माणसांचे फोटो काढण्यासाठी माझी भीड चेपली नसल्याने अर्थात त्या कुणाचे फोटो नाही काढता आले.




थोडीफार सूर्याची किरणे दिसायला लागल्यावर इथून सरळ आयफेल टॉवर ला निघालो. इथल्या पहिल्याच ट्रेन प्रवासामध्ये कुणीतरी येऊन गाडीत दोन मिनिटांचा एक पपेट शो करून आम्हाला पहिला धक्का देऊन गेले. गाडीत पपेट शो म्हणजे गम्मतच!!   इतके वर्ष ट्रेनने प्रवास करूनही खिडकीतून बाहेर बघण्याची लहान मुलासारखी माझी हौस अजूनही भागलेली नाहीये. इथे तर सोनेरी किरणात आळोखेपिळोखे देत उठणारे एक आख्खे नवीन शहर होते बघायला. त्याच त्या उंच फ्रेंच खिडक्या असणारी घरं, वेगळ्याच प्रकारचे छत आणि बांधकाम असलेल्या बिल्डींग आणि मधेच डोकावणारे आयफेल टॉवरचे डोके! सगळ्याच गोष्टी मोहवून टाकणाऱ्या!

आता जपानमधल्या तोक्यो टॉवरला पाहिल्यावर इथल्या टॉवरमध्ये काय असे वेगळे असणार असे काहीसे मला वाटले होते. पण तो भ्रमाचा भोपळा टॉवरच्या समोर पोचल्याक्षणीच फुटला. या टॉवरची क्लासिक style आणि दुसऱ्याची Modern style म्हणजे ते apples टू oranges सारखं आहे . पण त्याशिवायही आयफेल टॉवरमध्ये जी भव्यता, प्रशस्तपणा आहे तो अक्षरश: गल्लीत असलेल्या तोक्यो टॉवरला नाहीये. सकाळच्या सोनेरी किरणात आणि एकांतात समोर असलेली सेईने (Seine ) नदी , तिच्यावरचे ते कमानीसारखे पूल, काठाकाठानी उभ्या असलेल्या जुन्या पद्धतीच्या बांधकामाच्या इमारती, मधून मधून मान उंच करून बघणारे चर्चचे मनोरे ! एका वेगळ्याच विश्वात , एका वेगळ्याच टाईम झोनमध्ये पोचल्यासारखे वाटले. एका क्षणी प्रेमात वगैरे पडतात तसेच काहीसे मीही या शहराच्या या चेहेर्याच्या प्रेमात पडले. शहराचा खरा चेहेरा काही का असेना, मला हा चेहेरा दिसला आणि भावला.
नदीजवळची सकाळ 


प्रशस्त! 


टॉवरच्या पुढची वर चढायची रांग बघून मात्र आमचे यान पुन्हा याच टाईमझोनात परतले. वर चढायचा प्लान शक्य नव्हताच. इथेच समोर हिरवळीवर निवांत बसलो. पुढचा प्रवास केला तो आर्क दे त्रीओम्फ (Arc-de-Triomphe) ला मात्र हा ट्रेन प्रवास काहीतरी स्पेशल असणार आहे याची आधीच कल्पना असण्याचे काही कारण नव्हते. ट्रेनच्या फलाटावर एक जण अकोर्डिअन घेऊन बसला होता. माझे संगीत ज्ञान नगण्य आहे त्यामुळे असे वाद्य असते हे माहित असूनही त्याचे नाव माहित नव्हते! त्याने जे सूर छेडले ते मात्र पार मनात आत आत घेऊन गेले. मघाशी ज्या वेगळ्या टाईमझोनात पोचले होते त्याच काळात पुन्हा परतले. काही मिनिटे  आणि एक शब्दहीन नुसती सुरावट. पण काय जबरदस्त मोहिनी होती त्या सुरांची. ती त्या कलाकाराची कला, त्या वाद्याचा आवाज, संगीतकाराच्या हाताची जादू कि या शहराचा प्रभाव. कोण जाणे? पण इतके प्रश्न तेव्हा ऐकताना पडले नाहीत. ते पडायला लागले कारण ते सूर मनातून जाईचनात. पुन्हा ऐकायचेय पण सुरावरून काय शोधणार? तेही असे सूर जे मनातच आहेत. गुगलने अजून सुरावरून गाणे शोधायची किमया केली नाहीये. ती खरच असायला हवी. एक कुठलीशी धून मनात अडकली कि फार अस्वस्थ व्हायला होतं ती कळेपर्यंत. इथे तर कळणार नाही याचीच खात्री होती. ते सूर "Sous le ciel de Paris" या गाण्याचे होते हे पार जपानला परत आल्यावर कळले.

आर्क पाहिला. आतमध्ये वर पर्यंत चढलो. तिथल्या कलाकृती पाहिल्या. अप्रतिम! इथून शहराचा एकच भाग वेगळा दिसतो नवीन काचेच्या इमारती असलेला.  हा एवढा भाग सोडला तर अख्खं पॅरिस एकाच साच्यातल्या सुंदर इमारतींनी भरलेले आहे. आणि एखाद्या मध्याकडून त्रिज्या काढाव्यात तसे आखलेले सरळ च्या सरळ रस्ते. त्या कोपर्यावरच्या सगळ्या इमारतींचा एक ठराविक साचा. पॅरिसचे एक चित्र. आणि अजून मनात वाजणारे मघाचे अकोर्डिअन. Under the sky of Paris ची सुरावट हवेत रेंगाळतेय.

आर्क 

आर्क वरुणा दिसणारे दृश्य. जिथून नंतर सूर्यास्त पाहिला ती  एकच उंच इमारत. 

इथून ओपेराला थोडा फेरफटका मारून मात्र सरळ आराम करायला गेलो. कारण मला कितीही उत्साह असला तरी चार वर्षाच्या पिल्लाला इतके फिरणे शक्य नव्हते. संध्याकाळी मी टॉवर मोन्पानाझ च्या छतावर सूर्यास्त बघायला गेले. हि एकच उंचच उंच इमारत इथे आहे. इथूनही मघाशी आर्क वरून पाहिल्यासारखे रस्ते , इमारती दिसतात. टॉवर सगळ्या शहरात दिमाखाने उभा असला तरी इथून मात्र छोटा दिसतो. सूर्यास्ताचे काही मूड असतात. काही दिवशी सूर्य महाराज अगदी रंगाची उधळण करीत परततात तर कधी कधी अगदी पार रंगहीन होऊन. आजचा दिवस असाच रंगहीन सूर्यास्ताचा निघावा हे अति दुर्दैव. पण किमान सूर्यास्त दिसला हे ही नसे थोडके.
३६०डिग्री मोन्पानाझ वरून सूर्यास्त 

शहर 

दुसऱ्या दिवशी पहाटेच रोमला प्रयाण आणि पुढचे काही दिवस तिथले. २२ तारखेला परत एकदा रात्री पूर्वीच्याच हॉटेलात निर्विकार चेहेऱ्याकडून  चावी घेतली.

पुन्हा एकदा त्या लोकल बझारला भेट द्यायची असे आधीच ठरवले होते. आज अजून एकदा आश्चर्याचा धक्का बसला. मागच्या वेळी फळफळावळ, भाज्यांनी भरलेले ते मार्केट यावेळी असंख्य कलाकृतींनी भरले होते. अनेक चित्रकार आपापली चित्रे मांडत होते. वा! असे मार्केट तर कधीच पाहिले नव्हते आम्ही. प्रत्येक चित्रकाराची वेगळी शैली , वेगवेगळे विषय असे सगळे एकत्र बघताना तेही गॅलरी मधली शिस्तबद्ध मांडणी नसताना बघणे म्हणजे एक वेगळीच पर्वणी होती. जलरंग, तेलरंग, पेन्सिल स्केच, क्रेयोन अशी माध्यमांचीही भन्नाट सरमिसळ होती. मस्तच! आजचा दिवस इथेच सत्कारणी लागला असे वाटले.

इथून नोत्रे दामे (Notre Dame Cathedral) ला गेलो. आजही वाटेत मध्ये एक दोन ठिकाणी कुणी गिटार , कुणी ट्रम्पेट असे वाजवून लोकांचे कान सुखावत होते. आम्ही लेकीच्या आग्रहानुसार थांबत, ऐकत पुढे जात होतो.  तोक्योमधेही हे प्रकार असल्याने  त्याबद्दल खूप आश्चर्य वाटत नव्हते.    पण का कोण जाणे ते आधी ऐकलेलं अकोर्डीयन मात्र अजून मनात होतं. आज रविवार असल्याने Notre Dame  मध्ये रविवारची प्रार्थना चालू होती. बाहेरची बेशिस्त स्थानिक आणि परदेशींची गर्दी आणि आत शांत शिस्तबद्ध वातावरणात चाललेली प्रार्थना - एकमेकांच्या अगदी विरोधी वातावरण होतं. इथल्या त्या काचेच्या रंगीत तावदानातून सांडणारा प्रकाश इवल्या इवल्या मेणबत्त्यांच्या प्रकाशात मिसळून प्रचंड उंच कमानीवर पसरलेली गूढता आणि शांत आवाजात चाललेली ती प्रार्थना हे एक अफलातून जादुई मिश्रण होते. पुन्हा एकदा टाईम झोन बदलणे प्रकार ! आता तर ती सुरावटही साथीला होते.
नोत्रे दामे 



आतमध्ये प्रार्थनेच्या वेळी 

प्रवेशद्वार 




आजची संध्याकाळ केवळ लूव्र (Louvre) म्युझियम बाहेरून बघून तिकिटे वगैरे कुठून घ्यायची हे बघायचे होते . धडधडत्या अंतकरणाने म्युझियमच्या मुख्य प्रवेश द्वारातून आत गेलो. हेच ते आपल्याला पहायचे होते ! तोच काचेचा पिरामिड , सुंदर बांधकामाची इमारत. वॉव ! इथे संध्याकाळ भर निवांत बसलो. का कोण जाणे पण तिथल्या कारंजामध्ये आज पाणी नव्हते, पिरामिडाला लाईटिन्ग नव्हते. तरीही ते सगळे सुंदरच भासले.
लूव्र म्युझियम 


उलट पिरामिड 


पुढचा दिवस पूर्ण म्युझियम मध्ये घालवायचा हे ठरले होते. "द विन्ची कोड" या पुस्तकात ज्या कलाकृतींचा उल्लेख झाला त्या बघायच्या असतील तर म्युझियमच्या साईट वर तसा एक प्लान आहे. तो मार्ग बघू असे ठरवले होते. सक्काळी लवकर उठून तिकीट काढणे प्रोग्राम केला आणि एकदाचे आत शिरलो. आमच्या मागे इतकी रांग झाली ते पाहून लवकर आल्याचे सार्थक झाले. आत मुलीसाठी बेबी स्ट्रोलर घेतला हा एक चांगला निर्णय होताच पण वाईटही होता हे आमच्या नंतर लक्षात आले. तो वेबसाईट वर दिलेला मार्ग पायऱ्या वापरून सांगितला आहे. एलेव्हेटर वापरताना दिशांचे पार कडबोळे होते आणि एका मोठ्ठ्या चक्रव्युहात फिरतोय असे काहीसे वाटते. आम्ही तिथे कितीवेळा चुकलो आणि चुकत चुकत नवी नवी दालनं पाहिली ते आम्हालाही आठवत नाही. तो मार्ग गुंडाळून ठेवून आम्ही दोनचार नावाजलेल्या कलाकृती आणि इजिप्त भाग बघू असे ठरवले. त्याप्रमाणे पहिल्यांदा मोनालिसा ला भेट दिली. प्रचंड गर्दीत आणि काचेच्या तावदानापलीकडे असलेले ते छोटेसे चित्र पाहून आमची तरी निराशा झाली. ते चित्र इतके का प्रसिद्ध झाले हे ते चित्र प्रत्यक्ष पाहूनही कळले नाही. व्हॅटीकन मधले सिस्टीन चॅपल पाहून आल्यामुळे हे अजूनच साधे वाटले का ते देव जाणे!  या चित्राच्या बरोबर समोर म्युझियम मधले सर्वात मोठे "वेडिंग ऑफ काना" हे चित्र आहे. हीच दोन चित्रे का इतक्या समोर आणि जवळ ठेवलीत माहित नाही.

स्फिंक्स 

इजिप्शियन ममी

इथे खटकलेल्या गोष्टी म्हणजे चित्रांची माहिती इंग्रजी मध्ये लिहिलेली नाही. आम्ही ऑडियो गाईड घेतले होते पण ती माहिती अगदी काही कलाकृतीन्साठीच उपलब्ध आहे. दुसरे म्हणजे सुचना / मार्गदर्शक फलक नाहीत फारसे. खोल्यांना रंग आहेत पण कलर कोडींग काही नीटसे कळत नाही. इथले रुट्स प्लान करण्यासाठी आणि त्यांचे योग्य फलक दाखवण्यासाठी एखाद्या जपान्याची मदत घेतली तर हे काम अचूक होईल असेही वाटले. म्हणजे वेगवेगळे रुट्स ठरवून त्याप्रमाणे मार्गदर्शक फलक लावले तर नवीन येणारे लोक हवा तो मार्ग निवडून शकतील.   अजून काही चित्रे पाहिली, हरवत हरवत फिरलो . तसेच हरवत इजिप्शियन ममी, पुतळे, मुखवटे अशा अनेक गोष्टी पाहिल्या. इथे सराईत पणे फिरायचे आणि हवे ते पहायचे तर बहुधा चार पाच वेळा सलग यावे लावेल, तेव्हाकुठे कुठे काय आहे याचा मागमूस लागेल.

संध्याकाळी दमून भागून म्युझीयमचा निरोप घेतला आणि चालत टॉवरकडे निघालो. तिथे लाईट्स बघायचे होते. या लाईट शोचा कॉपीराईट  आहे म्हणे. त्यामुळे लाईट्स लावलेला आयफेल टॉवरचा फोटो फ्रांस कडून पूर्वपरवानगी असल्याशिवाय प्रकाशित करता येत नाही. त्यामुळे अर्थातच त्याचे फोटो इथे दिले नाहीत.  म्युझियमपासून टॉवर पर्यंत  हा एक तासाभराचा निवांत वॉक आहे. नदीच्या कडेकडेने जाणारा, जुन्या इमारती, कमानीदार पुल यांच्याशी भेट घडवणारा. खरतर Sam ने बोटप्रवास करा असे सांगितले होते पण गर्दीत रांग लावणे, वाट बघणे या प्रकाराचा कंटाळा असल्याने चालत निघालो. शिवाय वाटेत अजून काही ठिकाणेही दिसतात ती ही बघायची होती. या आमच्या भटकंतीत हे निवांत शहर फारच आवडले. फ्रेंच लोक सगळी कामे निवांत करतात, दुपारी इतका मोठा लंच ब्रेक घेतात वगैरे वगैरे ऐकून होतो. इथे चालताना वाटलं, का आरामात जगू नये इथल्या लोकांनी? इतक्या निवांत फिरण्याच्या जागा आहेत, भर शहरात राहूनही नदीकाठी मोकळ्या जागा आहेत, शांत बसण्यासाठी , गप्पा मारण्यासाठी उद्याने आहेत, झालंच तर रस्त्यांच्या कडेला लाल औनिंग असलेली ती कॉफीगृह, उपहारगृह  आहेत. मस्तपैकी आपल्या नादात चालावं, आवडीचे वाद्य घेऊन हवे तिथे सूर छेडावेत, आवडीच्या माणसाबरोबर तासंतास कॉफी पीत गप्पा माराव्या नाहीतर हातात हात घालून संध्याकाळी नदीच्या काठी बसून राहावं ! काय गरज आहे नसत्या चिंता घेऊन वाघ मागे लागलेले आयुष्य जगण्याची? अर्थात इथल्या लोकांनाही ज्या चिंता असतील , जे प्रश्न असतील ते मला त्या एक तासाच्या भटकंतीमध्ये का आणि कसे जाणवणार म्हणा.
या शहराची एक अनामिक मोहिनी मनात उतरवत  आम्ही पॅरिसच्या निळ्या आकाशाखाली चालत राहिलो. पॅरिसची सुरुवात केली होती आयफेल टॉवर ने आणि शेवटही इथेच केला.



गर्दीने भरलेल्या प्रचंड बोटी


पण इथे आमच्या प्रवासाचा शेवट झाला असे म्हणणे फार चुकीचे ठरावे. दुसऱ्या दिवशी ट्रेनने अगम्य उच्चाराच्या विमानतळावर परत चाललो होतो. कुठल्यातरी एका स्टेशनवर एक माणूस चढला. एक पोर्टेबल
स्पीकर आणि ट्रम्पेट काढली आणि वाजवायला सुरुवात केली. नुसती ट्रम्पेट पहिल्यांदाच ऐकत होते. लेकही खुश झाली. त्या माणसाने दोन कुठली तरी छान गाणी वाजवली आणि तिसरे सुरु केले. वॉव !तीच सुरावट पुन्हा एकदा. हि सुरावट रोमामधेही एकदा थोडीशी कानावर पडली होती. पुढचे काही क्षण आम्ही अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो. बाकीचे असेच भारले होते कि त्यांच्यासाठी हे नेहेमीचेच होते काय माहित.  गाणं संपलं तसा तो नेहेमी प्रमाणे पैसे घ्यायला आला. सहसा असे कुणाला उगाचच पैसे द्यायला होत नाही पण यावेळी मात्र उत्स्फूर्तपणे पैसे दिले गेले. त्याच्या कलाकारीला दाद द्यायला त्यावेळी तितकेच सुचले.

या गाण्याबरोबर सुरु झाला तो एक नवा प्रवास. हे शब्द माहित नसलेलं गाणं शोधायचा. आल्यावर अनेक फ्रेंच इन्स्ट्रुमेंटल्स  युट्युबवर शोधून ऐकली. ती सुरावट मनात होती पण मिळत नव्हती. मग लेकीच्या पियानो सेन्सेईशि बोलले तर तीने काही सुरावटी वाजवून दाखवल्या आणि अगदी युरेका क्षण आला. हीच सुरावट तिने वाजवून दाखवली. अप्रतिम ! आता याची सीडी घरात आहे. मध्ये मध्ये ऐकते. अजूनही तीच मोहिनी आहे. आणि मनात वाटतंय हि सुरावट आणि अकोर्डीयनच्या सुरांत स्वतःला विसरण्यासाठी पुन्हा एकदा फ्रांस मध्ये ट्रीप करावी का?
हि सुरावट इथे ऐकता येईल. सगळ्यांना आवडेल का ते माहिती नाही. पण ऐकून काय वाटले ते नक्की इथे  सांगा.

Thursday, October 27, 2011

नभा सावर सावर



मायबोली दिवाळी अंक २०११ मध्ये प्रकाशित झालेला लेख.
------------------------------------------------------------------


अगदी बाळपणी आईच्या कडेवरून जाताना त्या आभाळाकडे पहिल्यांदा लक्ष गेलं असणार माझं. ते ही आमच्याबरोबर उडणाऱ्या चांदोमामाला बघायला. तेव्हा आभाळापेक्षा चांदोबाचेच आकर्षण असावे.  देवबाप्पा कुठे असतो? पाऊस कुठून पडतो? ढग कुठे असतात? वीज कुठून चमकते? चांदण्या कुठे असतात? चंद्र सूर्य कुठे असतात? असल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे जेव्हा 'आकाशात!' अशा शब्दात मिळायला लागली तेव्हा मात्र आकाशाबद्दलचं कुतूहल वाढत गेलं.

लहानपणी मुंबईजवळच्या एका दूरच्या उपनगरात राहिल्याने पूर्ण मोकळे विस्तीर्ण आकाश मात्र सहज वाट्याला आले नाही. बाल्कनीतून दृष्टीला पडलेला तो छोटासा चौकोनी निळा तुकडा म्हणजे आकाश असेच मानून चालले होते बराच काळ. त्याच निळ्या तुकड्यातले पांढरे शुभ्र ढग हे पुन्हा एकदा आकाशाकडे पहाण्याचे कारण. त्या ढगातले आकार शोधात खेळायचा खेळ कितीतरी वेळा खेळला असेल तेव्हा. पुढे गच्चीवर जाण्याची मिळालेली परवानगी, क्वचित कधीतरी झालेले समुद्रावरचे फिरणे यामुळे माझ्या आकाश या संकल्पनेच्या कक्षा हळूहळू रुंदावत गेल्या. केव्हातरी गोव्याच्या समुद्रकिनारी दिसलेले पावसाने ओथंबलेले आकाश ही विस्तीर्ण आकाशाची पहिली आठवण ठरावी.

शिकण्यासाठी मुंबईपासून दूर आल्यावर मोकळं आभाळ दिसणे ही तितकीशी दुर्मिळ गोष्ट नाही हे जाणवले! आकाशातले पडणारे तारे पहात मैत्रिणींबरोबर जागवलेल्या रात्री, पहाटे पहाटे पायऱ्यावर बसून अभ्यासाच्या नावाखाली पेंगुळताना पाहिलेला निळ्याशार क्षितिजावरचा चांदीसारखा चमकणारा नुकताच उगवलेला चंद्र, वळवाच्या पावसानंतर रुपेरी कडांचे ढग असलेले आकाश, गुलमोहोराच्या लालबुंद फुलांच्या मधूनच डोकावणारे आकाशाचे कवडसे अशा अनेक आठवणी आकाशाला आणि त्या फुलपाखरी जीवनाला एकत्र बांधतात.

नंतर असंख्य घरे बदलली पण आकाश मात्र सदोदित  साथीला होतं. घराच्या कुठल्यातरी एका खिडकी, बाल्कनी मधून तरी ते दिसत राहिलं, खुणावत राहिलं. जपानमध्ये आल्यावर मात्र मी नशीबवान ठरले. इतक्या दाटीवाटीने वसलेल्या या शहरातही मला मोकळं विस्तीर्ण आकाश दिसणारी घरं मिळाली. त्यापैकी एक घर तर कायम लक्षात राहिल असे. पश्चिमेला काचेची मोठी मोठी तावदाने. त्यातही एक त्रिकोणी कोपरा घरापासून पुढे आलेला त्याला दोन्ही बाजूंनी काचा. आणि महत्वाचं म्हणजे समोर अथांग पसरलेले आकाश. पार दूरच्या क्षितिजापर्यंत आणि फुजी पर्वतापर्यंत मध्ये एकही उंच इमारत नाही. अहाहा! त्या त्रिकोणी कोपऱ्यात उभे राहिले कि आजूबाजूला फक्त अथांग आकाशच दिसे.

या घरातून आकाशाची इतकी विलोभनीय रूपे दिसली कि आकाशाने अगदी वेडच लावलं. कधी पहाटे पहाटे निळे गुलाबी आकाश आणि उडणारे पाखरांचे थवे दिसत. कधी फुजीपर्वताच्या माथ्यावर पडणारी केशराची किरणे दिसत . कधी ढगांशी लपाछपी करणारा मिश्कील निळा कृष्ण दिसे. कधी निळाशार अथांग पसरलेला सागर भासे, तर कधी सोनकेशराने न्हाऊन गेलेली सांज दिसे. कधी कधी मात्र दिवस दिवस वाट पाहून सुद्धा एखादा निळा कवडसाही दिसणे दुरापास्त होई. येणारा प्रत्येक दिवस एक नवीन रूप, नवीन छटा घेऊन येई. सकाळी उठल्यावर पहिल्यांदा खिडकी उघडून त्या निळाईचे आणि फुजीचे दर्शन घेत एक मोकळा श्वास घेऊन दिवसाची सुरुवात करण्यासारखे सुख नाही.

शक्य असतं तर हे घर कधी सोडलंच नसतं. पण सगळ्याच गोष्टी थोडीच आपल्या हातात असतात. त्यानंतरही दोनदा घरं बदलून झाली. या दोन्ही वेळा उगवतीला असेच मोकळे विस्तीर्ण आकाश. यावेळी पार अगदी समुद्रापर्यंत! पहाटे उठल्यावर उगवत्या सूर्यनारायणाचे दर्शन घेत दिवस चालू करायचा. आकाशाचा उगवतीचा रंगही दररोज नवा! कुठून इतके रंग आणतो तो एक देवच जाणे.

इथे डोंगरादऱ्यात फिरायला गेले कि या आकाशाचे नखरे विचारूच नका. गुलाबी साकुराच्या फुलांआडून दिसणारे निळेभोर आकाश, पोपटी पालवी कडे कौतुकाने पहाणारे ढगाळलेले आकाश, आणि रक्तवर्णी मोमिजीच्या पानातून दिसणारे निळेशार आकाश एकच असले तरी त्याची एक वेगळी कहाणी असते. तुम्ही लक्ष देऊन पाहाल, ऐकाल तर ते सांगेलही तुमच्या कानात. उंच उंच कड्यांच्याही वर असलेले आकाश या पर्वतांशी कोणते हितगुज करत असते तेच जाणे.
स्वतःचे रूप पाण्यात निरखायची भारी हौस आहे या आभाळाला. जरा कुठे पाणी दिसलं कि गेलंच हे डोकावायला.  मात्र  क्षितिजापर्यंत पसरलेल्या सरोवरात डोकावून पहाताना ते पाणीच केव्हा आकाशरूप होते हे त्या पाण्यालाही कळत नसावे.  झुंजुमुंजू व्हायच्या आधीच एकट्याने अशा, शांत निश्चल तळ्याच्या काठी बसावे. मग ते आकाश तळ्यात उतरून तुमच्याशी गुजगोष्टी करते. मात्र पहाटेचा थंड वारा सुटला, पाखरांची किलबिल वाढायला लागली  कि भानावर येऊन तळ्यातून चटदिशी निघून जाते. अशा कितीतरी पहाट मी त्या आभाळाशी गप्पा मारण्यात घालवल्या आहेत.  कधी पांढऱ्याशुभ्र बर्फाचे अप्रूप वाटून त्या मऊ बर्फाला स्पर्श करायला आभाळ डोंगरमाथ्यावर उतरते. मी जाऊन कधी पाहिले नाही पण तिथे आभाळाच्या पाऊलखुणा नक्की असणार अशी मला खात्री आहे. कधी त्या बर्फाचा हेवा वाटून तसलेच पांढरेशुभ्र ढग आणते निळ्या अंगणात खेळायला.   कधी सांजेची सोनेरी किरणं घेऊन तरूशिखरांवर  उतरते आणि तिथल्या पक्षांना आमंत्रण देऊन जाते. 

ट्रेनने दूरवरचे परतीचे प्रवास करताना संध्याकाळच्या, गर्द निळ्या, पावसाने ओथंबलेल्या आकाशाने गावातल्या घरा, शेतांवर निळी पाखर घातलेली पाहाणे म्हणजे एक दुर्मिळ योग. त्या तशा संध्याकाळ पहाण्यासाठी मी कितीही वेळ प्रवास करायला तयार होईन. अशा प्रवासात सगळे प्रवासी दमून भागून झोपलेले असतात. ही संधी साधून ते आकाश गुपचूप खाली उतरते. तुम्ही जागे राहिलात, त्याची वाट पहात राहिलात कि ते तुमचीही विचारपूस केल्यावाचून राहात नाही.

एकदा नभाशी नाते जडले कि ते सगळीच गुपितं तुम्हाला सांगायला लागते, तुमची सुख दुःख वाटून घेते!  आयुष्याच्या प्रवासभर तुमच्या साथीला थांबते. लहानपणी चांदोबा, चांदण्या दाखवते. कापसाच्या ढगांचे आकार दाखवून हसवते. कधी मिश्कीलपणा करायला दिवसभर काळ्या मेघांच्या आड लपून राहते. तुम्ही खट्टू होऊन परतायला लागलात कि हळूच एक निळा तुकडा दाखवून तुम्हाला खुणावते, चिडवते आणि पुन्हा सुख दुःखाची लपाछपी खेळायला लागते. कधी शांततेचा निळा डोह दाखवते  तर कधी संकटांच्या बिजलीचे रौद्ररूप दाखवते. कधी धुरकटलेले, राखाडी, निस्तेज, दुःखी दिसते तर कधी आनंदाचे इंद्रधनु घेऊन येते. कधी तेजोनिधीची सुवर्णझळाळी लेऊन उत्कर्षाची स्वप्न दाखवते तर कधी  गूढ गंभीर सांजेचे रूप लेऊन  शेवटाचा प्रवास दाखवते.
इतके सगळे साज लेऊनही त्या निळाईत न्हालेले आकाश! निळा रंग परमात्म्याचा. निळा रंग कृष्णाचा. निळा रंग नभाचा !
मनही ही असेच आकाशासारखे. अथांग! गूढ! गहन! शेवटच्या श्वासानंतर त्या निळ्या कृष्णात विलीन होणारे!



नीलवर्णी आभाळाचे, जडे नाते केशराशी 
मोहरल्या दिशा दाही, धरणी सुवर्णाच्या राशी.



पंच पंच उषःकाली, घेती पाखरे भरारी 
प्रकाशाचं लेणं तुला ,नभ केशरी केशरी.




पाण्यातले रूप तुझे, पाण्यालाही निळी काया.
बिंब कोण? रूप कोण? अवघीची तुझी माया.



मेघ खेळती अंगणी, किरणांचा लपंडाव 
हळदुले पडे ऊन, कुठे सावलीचा ठाव.



दाट मेघांच्या आडून, नभं बघते लाजून  
रंग तुझा मन निळा, कसा र्‍हायचा  लपून?


शुभ्र कापसाचे थवे, धरी फेर अंतराळी.
निळ्या आकाशाचे गाणे, वारा नेई रानोमाळी.   


नभा सावर सावर, रंग तुझा सांडला रे
तुझे निळाईचे देणे,कान्हा झाली धरणी रे!


मज लाविलेसी वेडू, नभा तुझ्या किती छटा?
तुझ्याप्रती पोहोचती, साऱ्या मोक्षरूपी वाटा.






Wednesday, October 12, 2011

आयएसओ आणि मेगापिक्सेल वॉर



काही वर्षापूर्वीच म्हणजे जेव्हा डिजीटल कॅमेर्‍याचे युग चालू झाले नव्हते तेव्हा नेहेमीच्या फोटो प्रिंटिंग दुकानातले बरेचजण सहज फुकटात सल्ला द्यायचे. ४०० आयएसओ वाली फिल्म घ्या छान फोटो येतात. मग काहीच माहीत नसलेले काहीजण ती फिल्म घ्यायचेच. आता दुकानदारानेच सांगितली म्हणजे चांगली असणारच हो! कधी त्याने काढलेले फोटो छानच यायचे आणि कधी कधी मात्र पांढरे पडायचे. असं का व्हायचं बरं ?

त्यासाठी फिल्मस्पीड म्हणजे नेमकं काय ते बघावं लागेल.

फिल्मस्पीड म्हणजे फोटोफिल्म प्रकाशाला किती सेन्सिटीव्ह आहे याचे मोजमाप आहे. ज्या फिल्मची प्रकाश सेन्सिटिव्हिटी कमी असते ती स्लो फिल्म तर ज्या फिल्मची प्रकाश सेन्सिटिव्हिटी जास्त असते ती फास्ट फिल्म.  ५०, १०० या स्लो फिल्म तर २००, ४००, १६०० या फास्ट फिल्म. हो, हो. आता तुम्ही नक्कीच म्हणाल कि स्लो फास्ट अशी नावं सांगून काय होतं?  तर फास्ट फिल्म म्हणजे या फिल्मवर अगदी बारीकसा प्रकाशही लगेच नोंद केला जातो. त्या उलट स्लो फिल्मवर प्रकाशाची नोंद व्हायला प्रकाश जास्त असावा लागतो. किंवा बारीकसा प्रकाश नोंद करण्यासाठी जास्त वेळ शटर उघडे ठेवावे लागते.

मग समजा, एखादा घरातला समारंभ आहे. तर प्रकाश अर्थातच कमी असणार. मग शटर स्पीड कमी होणार आणि कमी प्रकाशातले फोटो हललेले किंवा काळपट येणार. तुम्ही जास्त आयएसओ असलेली जसे २०० किंवा ४०० वाली फिल्म घेतली तर फास्ट शटर स्पीड मुळे हललेले(ब्लर) फोटो यायचे प्रमाण कमी होऊन कमी प्रकाशातही चांगले फोटो येतील. पण समजा हीच फिल्म घेऊन तुम्ही दुपारच्या रणरणत्या उन्हात फोटो काढायला गेलात कि काय होईल? खूप प्रकाश असल्याने कॅमेर्‍याला शटर स्पीड खूप वाढवावा लागेल. पॉईंट आणि शूट कॅमेर्‍यात इतका जास्त शटर स्पीड जात नसेल तेव्हा फोटो ओव्हर एक्सपोज होऊन पांढरट येतील.  म्हणूनच त्या वरच्या उदाहरणात काही जणांचे फोटो छान आणि काहींचे बिघडलेले का आले ते आता तुमच्या लक्षात आलेच असेल.

त्यामुळे फोटो काढायचे म्हणून फिल्म विकत घेताना या फिल्मने नक्की कुठले फोटो काढणार ते आधीच विचार करून ठेवावे लागायचे. आणि त्यानुसार फिल्म स्पीड घ्यायला लागायचा. एखाद वेळी फास्ट फिल्म कॅमेर्‍यात भरलेली असायची तेव्हा नेमका आकाशाचा फोटो काढायचा चान्स येणे असे प्रकारही व्हायचे माझ्याबाबतीत. पण आता डिजीटल युगाने या प्रश्नाची वासलात लावलेली आहे.

बऱ्याच डिजीटल कॅमेर्‍यात आणि डीएसएलआर मधे हवे तेव्हा आयएसओ बदलण्याची सोय दिलेली असते. ओह, पण डिजीटल कॅमेर्‍यात तर फिल्मच नाही मग फिल्मस्पीड कुठून आला? डिजीटल कॅमेर्‍यात सेन्सर किती सेन्सिटिव्ह आहे याचे मोजमाप म्हणजे हा स्पीड. म्हणजे जर आयएसओ ४००, ६४० असा ठेवला तर फास्ट शटर स्पीड मधे फोटो घेणे शक्य होते. आणि कमी स्पीड केलात कि तुलनेने जास्त शटर स्पीड ठेवता येतो / ठेवावा लागतो. मग नेहेमीच जास्त आयएसओ का बरं नाही ठेवायचा? मग नेहेमी फास्ट शटरस्पीड मिळेल कि नाही? तर त्यालाही कारणं आहेत.

जास्त आयएसओ म्हणजे सेन्सर जास्त सेन्सिटिव्ह. मग तो हवा असलेला प्रकाश पकडताना नको असलेला प्रकाशही पकडतो आणि फोटोमध्ये नॉइज दिसतो. नॉइज म्हणजे फोटोत अतिशय बारीक रंगीत किंवा साधेच अनेक ठिपके दिसतात. यामुळे फोटोची क्लॅरिटी, शार्पनेस कमी होतो. फिल्ममधेही जास्त आयएसओ मुळे ग्रेनी फोटो मिळतात. फिल्ममधला हा ग्रेनीनेस काही वेळा फोटोच्या विषयाची गरज म्हणुनही मुद्दाम मिळवला जातो.

काही डिजीटल कॅमेर्‍यात आणि डीएसएलआरमध्ये ऑटो आयएसओ असा ऑप्शन असतो. त्यात कॅमेरा हवे ते शटर स्पीड मिळवण्यासाठी आपोआप आयएसओ बदलतो. अगदी अंधाऱ्या जागी, म्युझियम मध्ये वगैरे फोटो काढताना हे चांगले आहे पण खूप जास्त आयएसओ असला तर मात्र फोटो फारसे बघण्या- दाखवण्यासारखे रहात नाहीत. फार फार तर फोटो हुकला नाही याचे समाधान मिळते.

प्रयोग-

तुम्ही यावेळी प्रयोग करताना अ‍ॅपर्चर कायम ठेवा. आयएसओ बदलून वेगवेगळ्या आयएसओला शटर स्पीड कसा बदलतो ते स्वतः प्रयोग करून पहा. जसजसा आयएसओ वाढवू तसा शटर स्पीडही वाढत जातो.


मेगापिक्सेल वॉर -

डिजीटल कॅमेर्‍यात वर सांगितल्याप्रमाणे नको असलेल्या प्रकाशाने नॉइज येतोच. शिवाय अजून काही कारणांनी तो वाढू शकतो.  कॅमेर्‍याच्या सेन्सर मध्ये पिक्सेल्स (म्हणजे प्रकाशबिंदु म्हणू हवं तर)असतात. एक एक पिक्सेलचा (प्रकाशबिंदुचा) प्रकाश जोडून पूर्ण डिजीटल इमेज बनवली जाते. पण हे पिक्सेल्स एकमेकांच्या इतके जवळ असतात कि त्याचाही एकमेकांना इंटरफिअरन्स होतो.

आता साध्या डिजीटल कॅमेर्‍याच्या किंमती कमी ठेवायच्या असतात आणि सेन्सर फार महाग असतो. हे गणित सोडवायला साध्या डिजीटल कॅमेर्‍याचे सेन्सर खुपच लहान केलेले असतात. त्यामुळे त्यांचे पिक्सेल्सही अगदी सूक्ष्म असतात. अशा सूक्ष्म आणि एकमेकांना चिकटून असलेल्या पिक्सेल मुळे नॉइज वाढतो.

कॅमेर्‍याचा सिग्नल(चांगला प्रकाश) टू नॉइज रेशो काढून तो कॅमेरा जास्तीत जास्त किती आयएसओ पर्यंत फोटो काढू शकतो हे ठरवलं जातं. म्हणून काही कॅमेर्‍यात आयएसओ ८०० पर्यंतच वाढवता येतं तर काही कॅमेर्‍यात २५६०० इतके जास्त सुद्धा असू शकते.

आता समजा एक कॅमेरा ६ मेगापिक्सेल आहे. तोच कॅमेरा ८ मेगापिक्सेल करायला काय करावे लागेल? एकतर ८ मेगा पिक्सेल्स मावणारा मोठा सेन्सर घ्यावा लागेल. पण त्यामुळे किंमत वाढणार. शिवाय मोठा सेन्सर म्हणजे मोठी जागा आणि तुलनेने कॅमेरा मोठा होणार. मग काय केले जाते? तर आहे त्याच ६ मेगापिक्सेलवाल्या सेन्सरच्याच मापाच्या सेन्सरमध्ये ८ मेगा पिक्सेल घुसवले जातात. तेवढ्या जागेत घुसवण्यासाठी पिक्सेल आणखी बारीक केले जातात. पण बारीक पिक्सेल म्हणजे परफॉर्मन्स कमी, नॉइजही तुलनेने जास्त.

म्हणजे तुम्ही भले १२ मेगा पिक्सेलचा कॅमेरा जास्त पैसे देऊन विकत घ्याल पण त्याने काढलेल्या फोटोची क्वालिटी ८ मेगापिक्सेलवाल्या कॅमेर्‍यापेक्षा चांगली असण्याची शक्यता फारच कमी. म्हणुन जास्त मेगा पिक्सेलच्या मागे जाण्यात फारसा अर्थ नाही. नेहेमीच्या घरातल्या फोटो करता खरेतर ५ मेगापिक्सेलही पुरेसे आहे. फार फार तर आठ मेगा पिक्सेल! त्यावर असलेल्याचा काही फायदा नाही. ८ मेगापिक्सेलने काढलेले फोटो तुम्ही सहज ए४ साईज मध्ये किंवा मोठेही प्रिंट करू शकता. आपण नेहेमीसाठी कितीवेळा अशा मोठ्या आकाराचे प्रिंट वापरतो त्याचा विचार तुम्हीच करा.

हम्म, तुम्ही विचारालच आता डीएसएलआर बद्दल. कंझ्युमर डीएसएलआर क्रॉप सेन्सरचे असतात. म्हणजे सेन्सरचा आकार साध्या डिजीटल कॅमेर्‍यापेक्षा मोठा पण ३५ मिमी वाल्या फिल्मपेक्षा छोटा असतो. क्रॉप सेन्सरमुळे कॅमेर्‍याचा आकार छोटा व्हायला मदत होते. शिवाय किंमत आटोक्यात रहाते. क्रॉप सेन्सरमुळे जितकी इमेज ३५ मिमीवाल्या फिल्मवर आली असती, त्यापेक्षा छोटी इमेज नोंदवली जाते. अर्थात प्रो कॅमेर्‍यापेक्षा फोटो क्वालिटी थोडी कमी होते पण साध्या डिजीटल कॅमेर्‍यापेक्षा बरीच चांगली असते. प्रोझ्युमर कॅमेर्‍यामध्ये बऱ्याचवेळा प्रो कॅमेर्‍याच्या क्वालिटीचा पण क्रॉप सेन्सर वापरला जातो आणि प्रो कॅमेर्‍यामध्ये ३५मिमि फिल्मच्या आकाराचा सेन्सर वापरला जातो. त्याला फुलफ्रेम कॅमेरा असेही म्हटले जाते. प्रो कॅमेर्‍याच्या मोठा सेन्सर, मॅग्नेशियम अलॉय बॉडी, डिझाईन, वेदर सिलिंग इत्यादी फिचरमुळे त्याची किमत वाढते.  मोठ्या आकाराच्या सेन्सरमुळे बहुतेक डीएसएलआर मध्ये जास्त मेगा पिक्सेल असले तरी नॉइज तुलनेने कमी दिसतो. मात्र प्रो कॅमेरे बऱ्याच जास्त मेगा पिक्सेलचे असले तरी क्वालिटी उत्तम असते. हे कॅमेरे खूप जास्त आयएसओलासुद्धा वापरण्यायोग्य चांगल्या इमेजेस देऊ शकतात.

तुम्ही तुमच्या कॅमेर्‍यामध्ये आयएसओ रेंज किती आहे हे आता वाचून बघा. नंतर वेगवेगळ्या आयएसओला कसे फोटो येतात, शटरस्पीड कसा बदलतो तेही प्रयोग करून करायला हरकत नाही.

अधिक -
गेले अनेक दिवस हा लेख लिहून तयार होता. पण मला फोटो टाकायला वेळ नव्हता. आता अजूनही पुढचे एखाद दोन महिने वेळ मिळण्याची शक्यता कमीच आहे. म्हणून तसाच लेख इथे देत आहे. हा लेख फोटो नसले तरी चालण्यासारखा आहे असे वाटतेय.


----------

*** सर्व फोटोग्राफ आणि लेखन कॉपीराईट प्रोटेक्टेड आहे. लेखिकेकडुन लिखित पूर्व परवानगीशिवाय हा लेख पूर्णत: किंवा अंशत: इतर कुठेही वापरता किंवा प्रकाशित करता येणार नाही.      ****
      
शुद्धलेखन सहाय्यासाठी मेघनाचे मनापासून आभार.

Thursday, October 6, 2011

आय फॉर आयफोन...

स्टीव्हन पॉल जॉब्स, एक कॉलेज शिक्षण अर्धवट सोडलेला हिप्पी आयुष्य जगणारा मुलगा तंत्रज्ञानाच्या विश्वात इतकी उलथापालथ घडवेल असा कुणी त्यावेळी विचारही केला नसावा. वयाच्या १९व्या वर्षी स्वतःच्या शोधात भारतात आलेल्या आणि 'निम करोली' बाबाच्या आश्रमात राहिलेल्या स्टीव्हने इथून काय नेलं ते त्याचं त्याला माहित! पण त्याची ही वाक्यं मात्र खूप काही सांगून जातात.

"Your time is limited, so don’t waste it living someone else’s life. Don’t be trapped by dogma – which is living with the results of other people’s thinking. Don’t let the noise of other’s opinions drown out your own inner voice. And most important, have the courage to follow your heart and intuition. They somehow already know what you truly want to become. Everything else is secondary" - Steve Jobs’ Stanford Commencement Address


“Almost everything–all external expectations, all pride, all fear of embarrassment or failure–these things just fall away in the face of death, leaving only what is truly important. Remembering that you are going to die is the best way I know to avoid the trap of thinking you have something to lose. You are already naked. There is no reason not to follow your heart.” – Steve Jobs’ Stanford Commencement Address

त्याचं पुढचं आयुष्य प्रचंड चढउतार आणि उलथापालथीने भरलेले होते. पण तो नेहेमीच स्वतःच्या मर्जीनुसार जगला. त्याचे सुरुवातीचे आयुष्य पर्सनल कॉम्प्युटर बनवण्याच्या आणि ते लोकांना विकण्याच्या ध्यासाने भारलेले होते. त्यातून Apple कंपनीचा जन्म झाला. सुरुवातीचे Apple कॉम्प्युटर खूप नावाजले गेले ते त्यातल्या पहिल्या स्प्रेडशीट प्रोग्राम VisiCalc मुळे. त्यानंतरचा Apple चा महत्वाचा प्रोजेक्ट होता लिसा कॉम्प्युटर. हा सर्वात पहिला ग्राफिक इंटरफेस असणारा कॉम्प्युटर!

बर्‍याच कारणामुळे स्टीव्ह लिसा प्रोजेक्ट मधून बाहेर फेकला गेला. तेव्हा जिद्दीने त्याने Macintosh प्रोजेक्ट वर काम करायला सुरुवात केली. खरंतर हेही कंपनी साठी खूप महत्वाचे प्रोजेक्ट बनले पण पुन्हा एकदा स्वभावाच्या कारणांमुळे स्टीव्ह चक्क Apple च्या बाहेर काढला गेला. याचवेळी त्याचे लक्षं अ‍ॅनिमेशन चित्रपट बनवणाऱ्या George Lucas आणि त्याच्या टीम कडे केले. ही कल्पना स्टीव्हला आवडल्याने त्याने ती कंपनीच विकत घेऊन Pixar ची सुरुवात केली.

शिवाय स्वतःच तयार केलेल्या कंपनीतून बाहेर काढले जाण्याच्या प्रकाराने हताश न होता त्याने नवी सुरुवात केली. NeXT ही कंपनी स्थापून पुन्हा एकदा नवीन कॉम्प्युटर आणि ऑपरेटिंग सिस्टीम बनवण्याच्या मागे लागला. युनिक्स सारखी मजबूत आणि Apple सारखा ग्राफिक इंटरफेस असणारी सिस्टीम बनवणे हे त्याचे ध्येय होते.

त्याच सुमारास १९९५ मध्ये 'पिक्सार'ने 'डीस्ने'चा 'टॉय स्टोरी' हा पहिला कॉम्प्युटर वापरून बनवलेला अ‍ॅनिमेशन चित्रपट बनवून प्रदर्शित केला आणि याच्या नावावर पिक्सारने प्रचंड पैसाही कमावला. Apple ला मात्र पुन्हा एकदा स्टीव्हची गरज भासली आणि स्टीव्ह Apple मध्ये परत आला. सुरुवातीला फक्त सल्लागार म्हणून आणि नंतर सीईओ म्हणून! सीईओ झाल्याच्या सहा महिन्यात Apple पुन्हा एकदा फायद्यात चालायला लागली.

स्टीव्ह मात्र एवढ्यावर समाधान मानणारा नव्हताच! iMac च्या सुंदर रूपाने पुन्हा एकदा कॉम्प्युटरच्या दुनियेत क्रांती आणली.

“In most people’s vocabularies, design means veneer. It’s interior decorating. It’s the fabric of the curtains of the sofa. But to me, nothing could be further from the meaning of design. Design is the fundamental soul of a human-made creation that ends up expressing itself in successive outer layers of the product or service.” – Fortune

इथून पुढे Apple ची घोडदौड Mac OS X कडे झाली जी मुळची NeXTSTEP होती. डिजीटल हब बनवण्यासाठी iMovie (1999), iTunes (2001), iDVD (2001), iPhoto (2002), iCal, iSync (2002), GarageBand (2004), iWeb (2006) यांची निर्मिती झाली.

पुन्हा एकदा iPod च्या निर्मितीने संगीत क्षेत्रात महत्वपूर्ण बदल झाले. सोनीने walkman बनवून जे बदल संगीत जगात आणले त्याच प्रकारचे किंवा जास्तच महत्वाचे बदल आयपॉड आणि आयट्यून मुळे झाले. संगीत विकत घेऊन ऐकणे अतिशय सोपे झाले.

२००७ मध्ये आलेल्या आयफोनने फोनच्या जगात आणि एकूणच माहिती आणि संपर्काच्या दुनियेत पार उलथापालथ केली. फोन हा केवळ संपर्काचे साधन राहिला नाही तर त्याहून अधिक काही बनला. आयफोनमुळे "दुनिया मुठ्ठीमे" हे शब्दशः खरं झालं. जगाला धक्का देण्याचे स्टीव्हचे काम अजून संपले नव्हतेच. २०१० मध्ये आयपॅड आला तो पुन्हा एकदा कॉम्प्युटर विश्वात क्रांती घेऊन!

या सगळ्या आय क्रांतीच्या दरम्यान २००३ पासून स्टीव कॅन्सरने ग्रस्त होता. अलीकडेच बरा झाला आणि पुन्हा आला. यावेळी ऑगस्ट मध्ये Apple मधून विश्रांती घेतो म्हणाला तेव्हा खरंच मला वाटलं होतं कि हा पुन्हा येणार नवीन काहीतरी घेऊन. पुन्हा एकदा या विश्वात बदल घडवायचे याचे प्लॅन असणार पण बहुधा नियतीला ते मंजूर नव्हतं. iPhone 4S च्या रिलीजच्या बातमी बरोबर स्टीव्हच्या जाण्याची बातमीही आली. मात्र नियती स्टीव्हला घेऊन गेली तरी तो विज्ञान तंत्रज्ञान विश्वातच नाही तर सामान्य माणसाच्या मनातही घर करून रहाणार. स्टीव्ह जॉब्सने आपला कॉम्प्युटर्स, संगीत क्षेत्र, अ‍ॅनिमेशन चित्रपट, फोन या विश्वांवर उमटवलेला ठसा कालातीत आहे.

आज माझी मुलगी आय फॉर आयफोन म्हणते, सफरचंदाला इंग्रजी मध्ये Mac म्हणते. टॉय स्टोरी मधल्या अ‍ॅन्डी च्या खेळण्यांबरोबर समरस होते, निमो हरवल्याने कावरीबावरी होते, हवं ते गाणं आयपॅड वर शोधून दे म्हणते तेव्हा आजच्या पिढीचे आयुष्य स्टीव्ह ने किती आमुलाग्र बदलले आहे याची जाणीव होते.

“Being the richest man in the cemetery doesn’t matter to me … Going to bed at night saying we’ve done something wonderful… that’s what matters to me.” - as quoted in The Wall Street Journal (Summer 1993).


Thanks a lot Steve. You have really changed our world.
You will be always remembered.


--------------------------------------------------




- सर्व माहिती इंटरनेट वरुन साभार
http://allaboutstevejobs.com/bio/short/short.html
http://www.macstories.net/roundups/inspirational-steve-jobs-quotes/

अत्यंद जलद मु.शो. साठी मेघनाचे मनापासुन आभार.



Thursday, August 4, 2011

'लिटील बॉय' नावाचे ब्रह्मास्त्र - ६६ वर्षे

'लिटील बॉय' नावाचे ब्रह्मास्त्र - ६६ वर्षे 


साधारण दोन दशकांपूर्वी -
शाळेत आठवी, नववीच्या वर्गात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची घोषणा झाली. विषय होता "अणुऊर्जा सामर्थ्य फायदे आणि तोटे". कसलाही विचार न करता  आठवीतल्या मी आणि माझ्या मैत्रिणीने नाव नोंदवलं. आता या विषयावर माहिती मिळवायला हवी होती. तेव्हाच्या काळात इंटरनेट वगैरे काही नव्हतेच शिवाय मी राहत होते त्या ठिकाणी विज्ञानाची पुस्तके मिळणारी लायब्ररीही नव्हती. शाळेतली पुस्तके पुरेशी नव्हती. मग कुठल्या कुठल्या बाईंच्या घरी जाऊन, ओळखीच्या लोकांच्या घरी जाऊन खूप माहिती गोळा केली. स्पर्धेची तयारी म्हणून चार्टस वगैरे तयार  केले. तेव्हा मिळणारा एक एक माहितीचा तुकडा अमूल्य होता. अणूचे विभाजन कसे होते, त्यापासून कशी प्रचंड ऊर्जा उत्सर्जित होते, मूलद्रव्याचे 'हाफ लाईफ'* वगैरे संकल्पना तेव्हा अभ्यासल्या. हे सगळं एकदम भारून टाकणारं होतं. मात्र त्या माहितीच्या तुकड्यांमधेच जपानमध्ये हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर टाकलेल्या  अणुबॉम्ब बद्दल जेव्हा माहिती वाचली तेव्हा खूप भयानक वाटलं होतं. सगळंच उध्वस्त झालं म्हणजे काय झालं असेल याची कल्पनाही करता येत नव्हती.  किरणोत्सर्ग झालेल्या माणसांच्या , मुलांच्या कथा हृदय पिळवटून टाकणाऱ्या होत्या. त्या 'मश्रूम क्लाऊड'** चे पाहिलेले चित्र मनावर पक्के कोरले गेले. नक्की आठवत नाही पण माझ्या तेव्हाच्या लिखाणात हे सगळे तोटेच फार दिसले असावेत असं वाटतंय. तेव्हाच केव्हातरी मी ठरवलं कि हिरोशिमा आणि नागासाकीला जाऊन तिथे काय झालंय ते एकदा बघायचेच. तिथे जाता येईल का? आता तिथे काय असेल हे सगळे प्रश्न त्या वयात पडलेच नव्हते.


जून २०११ - 
मी स्वत:शीच ठरवलेल्या हिरोशिमा भेटीच्या गोष्टीला आता अनेक वर्ष उलटली होती. नशिबाने मला अगदी सहज जपान मधेच आणलं होतं. मात्र काही ना काही होऊन अजून प्लान न झालेली हिरोशिमा भेट यावर्षी मात्र  ठरवूनच टाकली. आता हिरोशिमा तोक्यो सारखेच एक शहर आहे, तिथे कसल्याही खुणा नाहीत वगैरे माहिती आधीच कळली  होती. पण माहिती असणे आणि उमजणे यात फरक आहेच. तिथे पोचल्यावर खरच या शहराने असे काही सहन केले असेल असे वाटलेच नाही. पण तेव्हाही मनात आलं कि जिथे अणुबॉम्ब टाकला ती जागा दूर असणार त्यामुळे तिथे गेल्याशिवाय कळणार नाही. सामान ठेवून लगेचच भर पावसात आम्ही ट्रामने निघालो 'गेम्बाकू दोम' अर्थात "हिरोशिमा आटोमीक बॉम्ब डोम" किंवा  'A-Bomb Dome' आणि 'हिरोशिमा पीस म्युझियम' बघायला. पण ते ठिकाण ट्रामनेही फार दूर नव्हते. या थांब्यावर उतरल्यावर पुन्हा एक धक्का बसला. ट्राम मधून उतरल्या उतरल्या लगेचच 'गेम्बाकू डोम' अगदी समोर उभा होता.  जी बघायचे इतकी वर्ष  मनात होते ती भग्न वास्तू अशी  समोर उभी दिसल्यावर काय वाटले ते लिहिता येणार नाही.  या वास्तूच्या अवती भवती फिरताना नकळतच ६६ वर्षापूर्वी या वास्तूचे जे स्वरूप असेल आणि काही क्षणांच्या त्या अवधीत जी उलथापालथ  झाली असेल त्याची ओझरती, पुसटशी चित्रे मनःपटलावर तयार होऊन विरत होती.  त्यांना निश्चित असे स्वरूप नव्हते पण त्या वेदना, दुख: जाणवत होती. कदाचित त्यावेळच्या तिथल्या सावल्या जशा भिंतींवर, दगडावर कोरल्या गेल्या तशाच कुणी सांगावे त्या भावनाही तिथल्या आसमंतात कोरल्या गेल्या असतील आणि तिथे जाणाऱ्यांना जाणवत असतील.

हा डोम  'आइओई'  नदीच्या  काठावर आहे. त्या बिल्डींगचे खरे नाव तीन वेळा बदलले आणि स्फोटाच्या वेळचे नाव होते 'हिरोशिमा इण्डस्ट्रिअल प्रमोशनल हॉल'.  स्फोटानंतरच्या काही दशकात नवीन इमारती बांधताना पूर्वीचे सगळे साफ केले गेले.  हा डोमही कदाचित गेला असतं पण लोकांनी मागणी करून १९६६ साली याला अणुस्फोटाचे  स्मारक करण्याचे ठरले. तेव्हा याचे नामकरण 'हिरोशिमा आटोमीक बॉम्ब डोम' किंवा  'A-Bomb Dome'  असे केले गेले. १९९६ साली या डोम ला युनेस्कोने 'वर्ल्ड हेरीटेज' म्हणून मान्यता दिली.  त्याची पडझड होऊ नये म्हणून  डागडुजी करून आता आतमध्ये लोखंडाचे सपोर्ट वगैरे लावले आहेत.





अणुस्फोटाचे केंद्र (हायपो सेंटर) या हॉल पासून साधारण दीडशे मीटर अंतरावर होते. बॉम्ब टाकताना तो या 'आइओई' नदीवर असलेल्या टी आकाराच्या  ब्रिज वर टाकायचा असे ठरले होते पण (कदाचित लिमिटेड प्रिसिजन मुळे ) तो काहीशे मीटर बाजूला पडला.  केंद्रापासून साधारण दोन किमी च्या परिसरातल्या जवळपास सगळ्याच इमारती घरे पार उध्वस्त झाली. हा डोम आणि अशाच एखाद दोन इमारती थोड्याफार उभ्या अवस्थेत राहिल्या.  इतक्या प्रचंड उष्णतेत आणि दाबात हा डोम असा शिल्लक राहिला हे महद्आश्चर्यच.  'आइओई'वरचा T ब्रिज सुद्धा शिल्लक राहिला. पण तो ब्रिज म्हणे धक्क्यामुळे एकदा उंच वर उडून पुन्हा जागेवर बसला. दुरुस्त करून काही वर्ष  तो पुन्हा वापरात होता. पुनर्बांधणी केलेल्या या ब्रिजवरूनच ट्राम जाते. स्फोटाच्या प्रचंड प्रकाशाने या ब्रिजवरच्या रस्त्यावर रेलिंग्ज च्या सावल्या कायमच्या  छापल्या गेल्या होत्या. शेकडो लोकांनी  भाजल्याच्या वेदना कमी करण्यासाठी या 'आइओई' नदीत उड्या टाकल्या होत्या. इतक्या जवळ असलेले फारसे कुणी बचावालेच नसल्याने हि नदी मृतदेहांनी भरून गेली होती.

त्याच परिसरात पुढे असलेल्या पीस म्युझियमची भव्य नवीनच बांधलेली इमारत आहे. डोमच्या इतिहासाचे प्रचंड ओझं वागवतच आम्ही पीस म्युझियम मध्ये शिरलो. आत गेल्यावर सुरुवातीलाच एक व्हिडियो दिसतो. त्यात एका टेस्ट साठी केलेला अणुस्फोट दाखवला आहे आणि 'मश्रूम क्लाऊड'ही दिसलाय. या स्फोटाचा हादरा इतका जबरदस्त वाटला  कि काही क्षण मन सुन्न झाले. हि टेस्ट होती हे कळूनही फार कसतरीच वाटलं. पण अजून बरंच बाकी होतं. आत सुरवातीला दुसऱ्या महायुद्धाचा साधारण इतिहास आणि बरेच फोटो आहेत. त्यात जपान कसा या युद्धात गोवला गेला.  हिरोशिमा सारखी शहरे कशी इन्डस्ट्रिअल सेंटर झाली अशा प्रकारची माहितीही आहे.  या महायुद्धाच्या वेळी जपानची स्थिती फारच हलाखीची झाली होती. खाणपिणं, रोजच्या गरजेच्या वस्तू यांचा तुडवडा होता. १९४१ मध्ये जपान ने 'पर्ल हार्बर' वरचा हल्ला  केला आणि अमेरिकेविरुद्ध खुले युद्ध सुरु झाले.हिरोशिमाच्या फॅक्टरीज मिलिटरी प्रॉडक्ट्स बनवायला लागल्या. सामान्य माणसेही युद्धात खेचली गेली. शहरांवरील रात्रीचे हल्ले वाचवण्यासाठी शहरांमध्ये ब्लॅक आउट्स करायला लागले. हिरोशिमामधल्या घरांसाठी बॉम्बशेल्टर वगैरेही तयार केली गेली. शाळेतली मुलेही वेगवेगळ्या मेहेनतीच्या कामाला जुंपली गेली. जपानच्या विविध भागातून बरीच मुले कामासाठी म्हणून हिरोशिमा सारख्या शहरात आणून ठेवली होती. असे म्हणतात कि वाढत वाढत हे प्रमाण इतके झाले कि १९४४ पर्यंत हिरोशिमाताल्या फॅक्टरीज मध्ये साधारण एक चतुर्थांश कामगार ही मुलं होती. मोठ्या मोठ्या आगीचा धोका टाळण्यासाठी जवळ जवळ असलेली घरे पाडून टाकण्यात आली आणि हिरोशिमामधले लोक बेघर झाले.  भाज्या, खाद्यपदार्थ यांचा तुडवडा कमी करण्यासाठी शाळेच्या मैदानात मुलांकडून शेतीची व इतर कामे करून घेतली जाऊ लागली. स्फोटात याच सगळ्या मुलाना आपले जीव गमवावे लागले.  त्या मुलांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी उभी असलेली देवी, शांततेचे प्रतिक म्हणून तयार केलेले ओरिगामीचे करोडो हंस या गोष्टी डोम च्या जवळपास ठेवलेल्या आहेत.

मेहेनतीची काम करणारी शाळेची मुले.



अमेरिकेने अणुबॉम्ब का बनवला ?
कमी अधिक प्रकारे या महायुद्धात सापडलेल्या सगळ्याच देशांची अशी परिस्थिती असावी. मग अमेरिकेने अणुबॉम्ब का बनवला ?
जर्मनीमध्ये १९३८ साली अणु विघटन (न्युक्लीअर फिजन) करून प्रचंड ऊर्जा निर्माण होते अशा प्रकारचा शोध लावला गेला होता. त्यानंतर लगेचच सुरु झालेल्या युद्धात नवनवीन प्रकारची युद्ध सामुग्री वापरली गेली. या प्रचंड अणुऊर्जेचा वापर बॉम्ब बनवायला करणे ही यातीलच एक संकल्पना.

नाझी आणि हिटलरच्या भयाने 'Leó Szilárd' आणि काही जर्मन शास्त्रज्ञ अमेरिकेत पळून गेले होते. त्यांची अशी खात्री होती कि जर्मनी अणुऊर्जेवर आधीच प्रयोग करून बॉम्ब बनवत आहे. म्हणून त्यांनी आईनस्टाईनला भरीस पाडून अमेरिकेच्या तेव्हाच्या अध्यक्ष रूझवेल्ट यांना एक पत्र लिहावयास लावले. त्यानुसार नवीन प्रकारच्या बॉम्बबद्दल प्रयोग करण्याची परवानगी मागितली गेली आणि ती मिळालीही. बहुधा हा सगळ्या जगासाठीच एक काळाकुट्ट दिवस असावा. याप्रकारे हे प्रयोग सुरु झाले.


पुढे १९४२ मध्ये मॅनहॅटन प्रोजेक्ट सुरु झाला. अमेरिकेसाठी हा एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट होता. तीन वर्ष आणि २ बिलियन डॉलर्स याचा चुराडा करून १९४५ साली जगातला पहिला अणुबॉम्ब तयार झाला. १६ जुलै १९४५ साली जगातल्या पहिल्या अणुबॉम्बची मेक्सिको मध्ये चाचणी केली गेली.
मॅनहॅटन प्रोजेक्ट 

पहिल्या अणुबॉम्बची चाचणी


त्याआधीच म्हणजे १९४३ सालापासूनच युद्धात जपान वरचढ ठरतोय हे लक्षात घेऊन अमेरिका जर्मनी ऐवजी जपानवर अणुबॉम्ब टाकण्याचा विचार करायला लागले.  १९४४ सालापर्यंत मात्र जपानची परिस्थिती अगदीच खराब झाली होती. तेव्हा सोवियेत युनियनच्या सहकार्याने जपान मध्ये घुसून युद्ध थांबवणे किंवा  जपान विरुद्ध अणुबॉम्ब वापरणे असे दोन उपाय होते.  सोविएत संघाचा वरचष्मा टाळण्यासाठी आणि शिवाय खर्च झालेले २ बिलियन डॉलर उपयोगी आणले हे दाखवण्यासाठी  १८ सप्टेंबर १९४४ या दिवशी अणुबॉम्ब वापरणे हा ऊपाय निवडला गेला.


आता जपान हे नक्की झाल्यावर कुठल्या शहरावर अणुबॉम्ब टाकायचा हे हि ठरवायचे होते. इथे तेव्हाच्या अमेरिकेचा अतिशय क्रूरपणा दिसतो. अणुबॉम्बचे नक्की काय आणि किती दुष्परिणाम होतात हे अजून जगाला माहित व्हायचे होते. पण या प्रोजेक्ट वर काम करणार्यांना त्याची बरीचशी कल्पना होतीच. तरिही या परिणामांचा नीट अभ्यास करण्यासाठी म्हणून त्यांना अशी शहरे हवी होती जिथे साधारण ३ माइल्स म्हणजे ४.८ किमीच्या परिघात नागरी वस्ती दाट आहे. अशा ठिकाणी बॉम्ब टाकल्यावर त्याची विनाशकारी क्षमता नीट अभ्यासता येईल असे त्यांचे म्हणणे होते. एप्रिल, मे मध्ये आधी हिरोशिमा, क्योतो,  योकोहामा, कोकुरा अशी शहरे त्यांनी निवडली. अणुबॉम्बचे परिणाम व्यवस्थित अभ्यासता यावे म्हणून या महत्वाच्या शहरांवरचे इतर बॉम्ब हल्ले बंद करण्यात आले. नंतर पुन्हा एकदा चर्चा वगैरे होऊन   २५ जुलै रोजी हिरोशिमा,  कोकुरा, नीइगाता, आणि नागासाकी अशी चार शहरे नक्की करण्यात आली. कदाचित तोक्योचे नाव नसण्याचे कारण म्हणजे तोक्यो मध्ये युद्ध कैदी होते हे असावे. २ ऑगस्ट १९४५ रोजी हिरोशिमावर सगळ्यात आधी बॉम्ब टाकण्यात येण्याचे नक्की केले गेले आणि तशी 'ऑफिशिअल ऑर्डर' निघाली.




६ ऑगस्ट १९४५
नेहेमीसारखाच उगवलेला हा दिवस हिरोशिमासाठी इतका वाईट ठरणार आहे याची हिरोशिमावासियांना कल्पना असण्याचे काही कारणच नव्हते.  मात्र बॉम्बिंगची 'ऑफिशिअल प्रोसेस' आणि तयारी आदल्या रात्रीच सुरु झाली होती.  तेव्हा 'विज्युअल बॉम्बिंग' सगळ्यात विश्वासार्ह असल्याने तेच करण्यात येणार होते. पहाटेच तीनियान, मारियाना बेटावरून वातावरणाचा आढावा घेणारी विमाने निघाली. आकाश निरभ्र असल्याने हिरोशिमाचा प्लॅन नक्की झाला. त्यानंतर B-29 जातीची तीन विमाने निघाली. त्यातल्या पहिल्या enola gay  नावाच्या विमानात "लिटील बॉय"$ नामक अणुबॉम्ब  होता. नाव 'लिटील बॉय' असले तरी १३००० टन इतकी त्याची क्षमता होती. आणि हा 'युरेनियम-२३५' वापरून  तयार करण्यात आला होता. 'युरेनियम-२३५'चे 'हाफ लाईफ' ७०० मिलियन वर्षे इतके आहे. त्याच्या मागच्या विमानात तापमान, दाब इत्यादी मोजणारी यंत्रे होती आणि शेवटचे विमान  फोटोग्राफीसाठी होते. अमेरिकेने स्वताच्या प्रयोगाच्या सिद्धांतासाठी तापमान आणि इतर अनेक गोष्टी मोजणारी उपकरणेही बॉम्बिंग करण्यात येणारया भागाच्या आसपास टाकली.


सकाळी ८:१५ मिनिटांनी enola gay ने  ९४००मी उंचीवरून अणुबॉम्ब 'आइओई'च्या T ब्रिज वर टाकला. काही सेकंद फ्री फॉल झाल्यावर तो बॉम्ब जमिनीपासून साधारण ६००  मी उंचीवर T ब्रिजच्या  जवळच असलेल्या  शिमा हॉस्पिटलच्यावर हवेतच फुटला. जास्तीत जास्त परिणामांसाठी बॉम्ब तसा हवेतच फुटणे जरुरी होते, त्यामुळे तो तसाच तयार केला गेला होता. काही मायक्रो सेकंदातच न्युक्लीअर चेन रिअक्शन्स चालू झाल्या. प्रचंड उष्णता आणि प्रकाश निर्माण झाला. त्यानंतरच्या दोन तीन सेकंदात आगीचा एक प्रचंड लोळ तयार झाला. क्षणाभरातच तो लोळ तीन किमीच्या परिसरात पसरला आणि काही क्षणांसाठी त्या भागातले तापमान ३००० डिग्री सेल्सियस च्या पुढे पोचले. त्या आगीचा आणि धुराचा 'मश्रूम क्लाऊड' तयार झाला, जो कित्येक किमी अंतरावरूनही दिसला. त्यानंतरच्या काही सेकंदात जोरदार हवेचा दाब तयार होऊन मोठठा हवेचा धक्का बसला. हे सगळे व्हायला आपल्याला विचार करायला लागतोय त्यापेक्षा कितीतरी कमी वेळ लागला.


तिथे प्रत्यक्ष असलेल्या लोकांना तर विचार करायलाही वेळ मिळाला नाही.  क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. दोन, तीन किमीच्या परिसरातल सगळं सगळंच उद्वस्त झालं. माणसे उभ्या जागेवर विरून गेली. उरल्या त्या त्यांच्या सावल्या. भिंतीवर, दगडावर, आणि चपलांवर उमटलेल्या#. हजारो माणसे भाजली. आणि ती वेदना टाळण्यासाठी त्यांनी पाण्यात, नदीत उड्या मारल्या.  अनेकांची त्वचा शरीरापासून वेगळी झाली. इतकी प्रचंड उष्णता  आणि किरणोत्सर्ग यांनी  श्वासमार्ग आणि अन्नमार्ग भाजून निघाले. आणि त्यामुळे लोकांचे हालहाल झाले. हजारो माणसे भाजल्याने मेली, जी वाचली ती काही तासात तीव्र किरणोत्सर्गाने आणि भाजल्याच्या जखमांनी मुत्यूमुखी पडली. लोखंडाचे दरवाजेच्या दरवाजे वाकले. टाईल्स, घरातली क्रोकरी, काचेच्या वस्तू चक्क वितळून एकमेकाला चिकटून गेल्या. या वस्तुंची अशी अवस्था तर माणसांचे काय झाले असेल याची कल्पनाच करवत नाही.  स्फोट होऊन दोन तासांनी पहिला फोटो घेतला गेला. शाळेतल्या टीन एज मुलांच्या ग्रुपचा. भाजलेले,  गोंधळलेले,घाबरलेले, भकास अवस्थेतले.  फोटोग्राफर म्हणतो "माझी फोटो घ्यायची हिम्मतच होत नव्हती.  पण खूप हिम्मत करून काढलाच. मग थोडा धीर आला आणि गरज म्हणून फोटो काढत गेलो." त्या पहिल्या फोटोचा फोटो काढायचीसुद्धा माझी हिम्मत झाली नाही.
हा स्फोटापासून ७ किमी अंतरावरून स्फोटानंतर काही मिनिटात दिसलेला मश्रूम क्लाऊड



स्फोटानंतर - 


इतक्या सगळ्या उत्पातानन्तरही अमेरिकेने दुसरा बॉम्ब "फॅट मॅन" नागासाकीवर टाकलाच.  जपानने १५ ऑगस्ट  १९४५ रोजी विनाअट शरणागती पत्करली.   ती नसती पत्करली तर कदाचित तिसरा अणुबॉम्बही पडला असता. तशा ऑर्डर्सही निघाल्या होत्या. मात्र जपानच्या शरणागतीमुळे  दुसरे महायुद्ध संपले. स्फोट तर होऊन गेला. पण पुढचे काळे भविष्य अजून जपानी लोकांना कळलेच नव्हते. स्फोटानंतर किरणोत्सर्गी काळा पाऊस  पडला. स्फोटात जखमी झालेले आणि वाचलेलेही बरेच जण पुढच्या काही दिवसात तीव्र किरणोत्सर्गामुळे मृत्यू पावले. त्यातही केसातून कंगवा फिरवताच मुलांचे सगळेच्या सगळे  केस हातात आलेल्या आया, नखे , केस गळून गेलेली माणसे होती. स्फोटाच्या वेळी जन्मही न झालेली पण आपली बुद्धी आणि आकलन क्षमता घालवून बसलेली बाळं होती.  आणि अजुनही न लिहवता येणारया असंख्य गोष्टी इथल्या माणसांना भोगाव्या लागल्या. तेवढ्यातही त्यांचे भोग संपले होते का? तर नाही. स्फोटानंतरच्या काही वर्षात कॅन्सरचे आणि ल्युकेमियाचे प्रमाण खूप वाढले.  जी मुले त्यावेळी लहान होती त्यांना पुढच्या चार ते पाच वर्षात कॅन्सर ने गाठले. त्यातलीच एक 'सादाको  सासाकी'. तिने बरं होण्यासाठी एक हजार ओरिगामीचे हंस करायचे ठरवले पण नियतीला ते मंजूर नव्हतेच. असेच अनेक अभागी जीव त्या २ बिलियन डॉलर च्या खर्चाला राजमान्यता देण्याच्या प्रयत्नात मूत्यू पावले. अमेरिकेने मात्र हिरोशिमा आणि नागासाकी  हि शहरे नागरी वस्तीची असल्याची माहिती बराच काळ दडवून ठेवली. पुढला बराच काळ हि दोन ठिकाणे फक्त मिलिटरीचे अड्डे असल्याचे भासवण्यात आले होते.


#1 - काळ्या पावसाचे ओघळ 
#२ वाकलेले लोखंडी दरवाजे
#३ भग्न मूर्ती
#४ वितळून चिकटलेल्या काचेच्या बाटल्या
#५, #६  वितळलेल्या टाईल्स आणि क्रोकरी 


सादाकोने केलेले ओरीगामिचे हंस

राखेतून जन्म घेणारा फिनिक्स पक्षी -
जपान्यांच मात्र कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.खरंतर जपानी मिलिटरीला हिरोशिमामधल्या स्फोटाच्या तीव्रतेचा अंदाज यायलाही आणि बाहेरून मदत मिळायलाही काही तास गेले. अशा प्रकारचे अस्त्र प्रथमच वापरले गेले असल्याने नक्की काय झालेय हे ही कळत नव्हते. पण तरी बॉम्बस्फोट  झाल्यानंतरच्या काही तासात मदत कार्य वेगाने चालू झाले. हिरोशिमाताल्याच जगल्या वाचलेल्या लोकांनी रस्ते आणि दळणवळण नीट करायचे प्रयत्न सुरु केले. चक्क  दुसऱ्या दिवसापासून त्यांनी  काही भागातला वीजपुरवठा सुरळीत केला. स्फोटापासूनच्या तीन दिवसात शहराच्या बरयाच भागात ट्राम सर्विस चालू झाली. हायपो सेंटर पासून फक्त १.९ किमी वर असलेल्या हिरोशिमा स्टेशनलाही स्फोटाचा हादरा बसलेला होता. पण जिवंत असलेल्या सहकार्यांच्या अथक परिश्रमाने दुसऱ्या दिवशी 'उजीनो' नावाची एक ट्रेन लाईन चालू झाली आणि आठ तारखेला दुसरी ट्रेन लाईनही चालू झाली. या जागी पुढची ७५ वर्षे काहीही उगवणार नाही असे बोलले जात असताना ऑटममध्ये  काही ठिकाणी जमिनीतून फुटलेल्या अन्कुरांमुळे लोकांच्या आशा पल्लवित झाल्या. पीस म्युझियमच्या बाहेर असलेले आओगिरीचे एक झाडही असेच आतून जळून गेलेले पण त्यालाही पालवी फुटली.  या निसर्गाने केलेल्या चमत्कारामुळे लोकांना जगण्याची उमेद मिळाली. त्या आओगीरीच्या  झाडाचे एक हृदयस्पर्शी गाणे तिथे ऐकता येते. गाण्याचे बोल या जुन्या जखमा न विसरताही उमेदीचे जगण्याची आशा देतात.   इथल्या लोकांच्या परिश्रमाने आणि उमेदीने काही वर्षातच जपान पुन्हा एक महासत्ता म्हणून गणला जाऊ लागला. राखेतून जन्म घेणारा फिनिक्स पक्षी जपानच्या रूपाने सगळ्यांना  दिसला. आता आज ६६ वर्षांनी या घावाची कुठलीच दृश्य खुण दिसत नाही. पण जुन्या हिरोशिमाच्या लोकांच्या मनात हा घाव अजून तसाच आहे. दर वर्षी ६ ऑगस्ट ला 'आइओइ' नदीच्या काठी जमून  लोक मृतांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करतात. नदीत दिवे सोडतात.  आजही हिरोशिमाचे महापौर जगात कुठेही 'न्युक्लीअर टेस्ट' केली कि तिथल्या राष्ट्राध्याक्षाना पत्र पाठवतात. आज पर्यंत अशी एकूण ५९५ पत्रे त्यांनी पाठवली आहेत.
आओगिरीचे गाणे इथे ऐकता येईल  


हिरोशिमाच्या मेयरने पाठवलेले एक पत्र 


बऱ्याच ठिकाणी दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास वाचताना किंवा त्यासंबंधी सिनेमे बघताना जपानी सैनिक अतिशय क्रूर होते असे भासवले जाते. ते कडवे राष्ट्रभक्त होते आणि आहेतही. नेहेमीच्या बोलण्या वागण्यात त्यांची राष्ट्रभक्ती दिसून येणार नाही. पण जेव्हा त्यांचा देश कुठल्याही संकटात असतो किंवा अगदी एखादा खेळाचा जागतिक पातळीवरचा सामना असतो तेव्हा सगळे जपानी एका वेगळ्याच राष्ट्रभक्तीने भारून गेल्यासारखे वाटतात. पण क्रूरता मात्र कुठे दिसत नाही. जर ती मूळ रक्तात होती तर आताही दिसायला हवी होती. एका जपानी मित्राला या बाबतीत जेव्हा विचारले तेव्हा त्याने दिलेले उत्तर विचार करण्यासारखे होते, "इतिहास हा जेत्यांनी लिहिलेला असतो"!

पुन्हा एकदा जून २०११-
जपानचे दुर्दैव म्हणावे का काय ते कळत नाही. ज्या जपानने कधी अणुबॉम्ब बनवला नाही,  किंवा त्याला मदतही केली नाही त्या जपानला दुसऱ्या महायुद्धात दोन वेळा आणि आता पुन्हा एकदा किरणोत्सर्गाला सामोरे जावे लागतेय. जपान या प्रसंगातून नक्कीच मार्ग काढणार हे आहेच. अणु उर्जेचा सामर्थ्य म्हणून केलेला वापरही जर किरणोत्सर्गाचा धोका आपल्यापुढे ठेवत असेल तर उर्जा म्हणून दुसऱ्या पर्यायांकडे बघण्याची गरज आहे. जपान या आपत्तीमुळे बाबतीत एखादा नवीन पायंडा पाडून जगाला 'क्लीन एनर्जी' कडे नेणार का ही विचार करण्याची गोष्ट आहे.
जगाला शांतीचा संदेश देणार्‍या  या बुद्धाची भंगलेली मुर्ती बरेच काही सांगुन जाते! 


*हाफ लाईफ - एखादे किरणोत्सर्गी मुलद्रव्य असलेल्यापेक्षा अर्ध्याने कमी होण्यासाठी जो वेळ लागतो त्याला हाफलाईफ असे म्हणतात.

** मश्रूम क्लाऊड -  अणुबॉम्बचा स्फोट झाल्यावर धुअराला, धूर , आग अशा मिश्रणाचा एक मोठ्ठा ढग दिसतो, त्याचा आकार मश्रूम सारखा दिसतो, म्हणून त्याला मश्रूम क्लाऊड म्हणतात.

#सावल्या - प्रचंड उष्णता आणि प्रकाशामुळे काही वस्तू, सजीव यांच्या सावल्या भिंतीवर उमटल्या गेल्या. म्हणजे सावली पडलेले भाग सोडून बाजूची भिंत ब्लीच झाले आणि सावलीचा भाग तसाच काळा राहिला.

$ लिटील बॉय हे हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बचे नावं आहे. याबद्दल अधिक तांत्रिक माहिती इथे मिळेल.http://en.wikipedia.org/wiki/Little_Boy

--------------------
-हा लेख इतरांना वाचायला द्यायचा असल्यास कृपया लेखाची  हि लिंक द्या. कॉपी करून पाठवू नका. 
-या लेखात वापरलेले जे फोटो हिरोशिमा पिस म्युझियम मधे काढले आहेत त्याखाली तसे नमुद केले आहे. आणि इथे ते फोटो फक्त माहिती म्हणुन वापरलेले आहेत. या म्युझियम मधे फोटो काढायला परवानगी आहे.
- शुद्धलेखन सहाय्यासाठी मंजिरीचे मनापासून आभार.



Monday, June 13, 2011

देवाचे बेट - मियाजीमा



तीन दिवसाची हिरोशिमा ट्रीप. त्यातला एक दिवस पूर्ण मियाजीमाला जायचे असे ठरवूनच गेलो होतो.
मियाजीमा म्हणजे म्हणे देवाचे बेट.इथले इत्सुकुशिमा नावाचे देऊळ फार प्रसिद्ध आहे. शेकडो वर्षापासून हे बेट पवित्र बेट म्हणून ओळखले जाते. सर्वसामान्य लोकांना या बेटावर येण्यासही बंदी होती.केवळ भिक्षु आणि साधू यांनाच या बेटावर प्रवेश होता. या बेटाचे पावित्र्य जपण्यासाठी या बेटावर म्हणे मृत्यू आणि जन्म दोन्ही गोष्टींना मनाई होती आणि आहे. अजूनही प्रेग्नंट स्त्रिया आणि अतिशय म्हातारी किंवा खूप आजारी माणसे बेटावरून हिरोशिमाच्या मुख्य भागाकडे जातात अशी माहिती गुगल सांगते.या बेटावर स्मशानही नाहीये. मृत्यू आणि जन्म अपवित्र का आणि चुकून एखाद्याचा मृत्यू झाल्यास काय हे मात्र अनुत्तरीत आहे.

इथल्या जंगलातली झाडे तोडायलाही पूर्ण बंदी होती. ती बंदी अजूनही आहे कि नाही हे माहीत नाही. पण नसावी कारण त्याशिवाय रस्ते, दुकाने हे झालेच नसते.  बेटावर हरणे भरपूर आहेत. त्याशिवाय आम्हाला एक कोल्ह्यासारखा दिसणारा प्राणी दिसला पण नक्की ओळखता आला नाही.इथले जंगल अजूनही दुर्गम आणि अतिशय सुंदर शांत आहे.

बहुतेक जपानी देवळांच्या दरवाज्याच्या समोर एक उंच लाकडी किंवा दगडी गेट सारखे वाटणारे खांब असतात. बहुतेक वेळा केशरी रंगात रंगवलेले हे खांब बघितले कि मला देवळासमोर तोरणं  लावलेली आहेत असेच वाटते. या खांबाचा अर्थ भौतिक जगातून पवित्र जगात जाणारा रस्ता असा काहीसा होतो असे ऐकले आहे. या गेटला जपानीमध्ये  तोरीइ म्हणतात. 
तर या इत्सुकुशिमा मधली ओ तोरीइ खूप मोठ्ठी आहे आणि ही समुद्रात आहे.ओहोटीच्या वेळेत या ओ तोरीइ पर्यंत चालत जाता येते. मात्र भरतीच्या वेळेस ही समुद्रात तरंगत असल्यासारखी दिसते. पूर्वी बेटावर येणाऱ्या लोकांना या तोरीइ मधून बोट घेऊन यावे लागे. हे मंदिरही एखाद्या बंदराप्रमाणे आहे. बोट घेऊन आल्यावर उतरायला धक्का सुद्धा आहे. भरतीचे पाणी ओ तोरीइ पार करून पार इत्सुकुशिमाच्या देवळाच्या खालपर्यंत पोचते. त्यावेळी हे सम्पूर्ण देऊळ पाण्यावर उभे असल्यासारखे दिसते. भौतिकाकडून आधी भौतीकाकडे असा प्रवास दाखवण्यासाठीच हे देऊळ जमिनीपासून दूर पाण्यावर असल्याप्रमाणे बांधले आहे असे म्हणतात.

युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून नोंदलेले देऊळ आणि ओ तोरीइ दोन्ही लाकडी आहेत. ओ तोरीइ camphor (म्हणजेच कापूर का?)च्या लाकडापासून बनवली आहे. त्याशिवाय या ओ तोरीइचे वैशिष्ठ असे म्हणतात कि ती जमिनीमध्ये गाडलेली नाही. ती नुसती समुद्राच्या वाळूवर ठेवलेली आहे. रुंद तळ असल्याने स्वत:चा भार तोलत ती शेकडो वर्षे उभी आहे. समुद्राच्या भरती ओहोटीचा तिच्यावर काही परिणाम होत नाही.

या ठिकाणी भेट द्यायचे बरेच दिवसापासून मनात होते. आम्ही बोटीमधून आलो तेव्हा ओहोटी होती आणि ओ तोरीइ च्या जवळ लोकही दिसत होते. पण बोटीतून उतरून तिथे जाई पर्यंत भरतीचे पाणी चढायला सुरुवात झाली होती. त्यामुळे ओ तोरीइला हात लावता आला नाहीच. अक्षरश्: सेकंदा सेकंदाला पाणी पुढे येत होते. इथे यायचे म्हणून मी मुद्दाम गमबुट घालून आले होते. त्यामुळे थोड्याफार पाण्यात उभे राहून फोटो काढता आले. पण फार वेळ उभे रहाण्यात अर्थ नव्हता.अगदी आत्ता वाळू दिसत असलेला भाग क्षणात घोटाभर पाण्यात बुडून जात होता. आजचा बहुतेक वेळ अगदी पावसाळी हवा आणि आकाश भरून आलं होतं. असलं आकाश असलं कि फार खराब फोटो येतात. पण नशिबाने थोडीशी साथ दिली आणि काही मिनिटे तरी निळ्या आकाशाचा एक तुकडा दिसला.त्या निळ्या तुकड्यांबरोबर ढगाळ हवे मुळे एक वेगळाच कुंद असा परिणाम मिळत होता. 


पाणी नुकतेच चढत असताना या दगडावरून सहज जाता येत होते. आम्ही इथून दोन चार मिनिटात देवळाच्या आत पोचलो तोपर्यंत मात्र हे दगडही पाण्यात बुडून गेले होते. अजून देऊळ मात्र वाळूतच दिसत होते.


संध्याकाळी सहा वाजता पुन्हा भरती असणार होती त्याआधी पुन्हा एकदा देवळात गेलो. यावेळी मात्र हे देऊळ पूर्ण पाण्यात उभे होते आणि ओ तोरीइ अगदी पार समुद्राच्या मध्ये असल्यागत वाटत होती. इथे सूर्यास्त बघण्याचा माझा प्लान होता. पण  सूर्य अधिक ढगात लपल्याने सूर्यास्त काही दिसलाच नाही.